युक्रेन प्रकरणात चीन किती गुंतलंय?

युक्रेन प्रकरणात चीन किती गुंतलंय?

चीन आणि रशियाचे संबंध कसे आहेत? किती घनिष्ट आहेत? दोघांमधलं सहकार्य कोणत्या प्रकारचं असेल आणि किती टोकाचं असेल? असे प्रश्न रशियाच्या युक्रेन आक्रमण

इराणने चाबहार प्रकल्पातून भारताला वगळले
Tik Tok सह ५९ चिनी ऍप्सवर बंदी
गोग्रा भागात तैनात भारत-चीनच्या सैनिकांची माघार

चीन आणि रशियाचे संबंध कसे आहेत? किती घनिष्ट आहेत? दोघांमधलं सहकार्य कोणत्या प्रकारचं असेल आणि किती टोकाचं असेल?

असे प्रश्न रशियाच्या युक्रेन आक्रमणाला तीन आठवडे होत असताना चर्चेमधे आले आहेत.

युक्रेन आक्रमण सुरु होण्याच्या आधी तीन आठवडे पुतीन आणि शी जिनपिंग यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. हिवाळी ऑलिंपिकला भेट देण्याचं निमित्त पुतीन यांनी साधलं होतं. तेव्हां पुतीन यांनी युक्रेनच्या हद्दीवर सैन्य नेऊन ठेवलं होतं आणि युक्रेनवर कारवाई करणार आहोत असं सांगायला सुरवात केली होती.

त्या भेटीअंती चीन- रशियातर्फे अधिकृत वक्तव्य सादर केलं गेलं. त्यात ” चीन रशिया संबंध असीम आहेत, सहकार्यावर कोणतीही बंधनं नाहीत, कोणत्याही प्रकारचं कोणत्याही क्षेत्रात सहकार्य केलं जाऊ शकतं,” असं जाहीर करण्यात आलं. तसंच युक्रेन आणि तैवान या प्रश्नी दोन्ही देशांचा एकमेकाच्या धोरणांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.

रशियाचं नेमकं किती सैन्य युक्रेन हद्दीवर आहे, रशियाचं नेमकं नियोजन काय आहे याची कल्पना चीनला नव्हती, रशियानं तशी कल्पना दिलेली नव्हती. कारवाई करणार एवढंच सांगितलं होतं.

पश्चिमेचं शीत युद्धाच्या काळातलं राजकारण सुरु झालंय, रशियाला एकटं पाडण्यात येतंय असं पुतीनचं म्हणणं होतं. तोच प्रयोग चीनवरही होणार असल्यानं दोघंही जगातून एकटे पडतील अशा स्थितीत दोघांनी एकत्र रहाणं दोघांच्या हिताचं आहे अशी दोघांची भूमिका होती असं मुत्सद्दी सांगतात. मुत्सद्दी सांगतात असं म्हणायचं कारण चीन आणि रशिया यांची कूटनीतीची भाषा अतीशय संदिग्ध असते, कोणीही कसेही अर्थ काढावेत इतकी ती सैल असते.

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष आक्रमणाला सुरवात झाली तेव्हां युनोच्या सुरक्षा समितीत युक्रेन प्रश्न चर्चेला आला. रशियाच्या निषेधाचा प्रस्ताव सुरक्षा समिती चर्चेत आला. चीननं मधली वाट काढली. चीननं ठरावाला पाठिंबा दिला नाही पण विरोधही केला नाही, कलटी मारली.

राजकीय वर्तुळात चीनच्या या पवित्र्याबद्दल आश्चर्य व्यक्त झालं. पुतीन शी जिन भेटीनंतरच्या मिले सुर तेरा हमारा कुठं गायब झालं असं मुत्सद्दी विचारू लागले. चीनच्या प्रतिनिधीनी युक्रेनचा प्रश्न सामोपचारानं मिटावा, आपण मध्यस्थी करायला तयार आहोत असं सांगितलं. खाजगीत मुत्सद्दी म्हणाले की युक्रेन हा सार्वभौम देश असल्यानं त्याच्यावर आक्रमण होणं बरोबर नाही.

खाजगीत बोलताना चिनी मुत्सद्दी म्हणतात की पुतीन शी जिनपिंग भेटीच्या वेळी रशिया प्रत्यक्ष आक्रमण करेल असं वाटलं नव्हतं. खरोखरच माहित नव्हतं की खेळ चालला होता, रशियाचं मन वळवण्याचा प्रयत्न चालला होता?

माध्यमात बातम्या येत आहेत की रशियानं चीनकडं शस्त्र सामग्री, युद्धाला उपयुक्त यंत्रंतंत्र आणि आर्थिक मदत मागितलीय. चीनचे अधिकारी म्हणतात की अशी मदत मागितलेली नाही. रशियाही म्हणतंय की बातम्या खोट्या आहेत. मग या बातम्या आल्या कुठून? आग लागली नसतांनाही धूर येत होता? बातम्या पसरवण्याचं तंत्र पुतीन यांना चांगलंच अवगत आहे, त्यांनी हा उद्योग केला असेल? प्रत्यक्षात बोलणीही चालली असतील पण जाहीरपणे मात्र तसं काहीही नसल्याचं सांगायचं?

आक्रमण सुरु करतांना पुतीन यांनी काय गणित मांडलं होतं आणि कोणतं वेळापत्रक मनाशी धरलं होतं कळायला मार्ग नाही. मुळात काही नियोजन तरी होतं की नाही तेही कळायला मार्ग नाही. कारण पुतीन फक्त आज्ञा देतात, ते चर्चा करत नाहीत. त्यांची एक विशेष कार्यशैली आहे. तो संदिग्ध बोलतात आणि समोर बसलेल्या माणसाला कामाला लावतात. निर्णय घेणाऱ्यानं साधारणपणे पुतीन यांना काय बरं हवं असावं याचा अंदाज बांधून निर्णय घ्यायचा. सारं काही ठीक झालं की त्याचं श्रेय आपोआप पुतीनकडं जातं. मामला फेल गेला तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होते. त्यामुळं आक्रमणाचा योग्य परिणाम साधला नाही तर अधिकारी नाहिसे होतील. पण दुरून सारं पहाणाऱ्यांनी केवळ अंदाज बांधत रहायचं.

युक्रेन आक्रमण झाल्यानंतर नेटोनं आणि अमेरिकेनं युद्ध भडकवू न देता रशियावर आर्थिक निर्बंध लादले. त्याचे परिणाम रशिया वा पुतीन यांच्यावर कसे होत आहेत ते कळणं कठीण आहे कारण रशियन माध्यमं त्या बाबत उपयोगी नाहीत आणि पुतीन यांची दहशत आहे. परंतू आर्थिक निर्बंधांचे फटके रशियाला बसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळं रशियानं चीनकडं मदत मागितली असण्याची शक्यता आहे.

पण अजूनही चीन गप्प आहे.चीननं कोणतीही मदत दिल्याची चिन्हं दिसत नाहीत.

चीन आणि रशियाचं दुखणं सारखंच आहे.

चीनला तैवान आणि हाँगकाँगला तोंड द्यायचं आहे. तैवानला कधीतरी अधिकृतरीत्या गिळायची चीनची इच्छा आहे आणि हाँगकाँगमधला असंतोष पूर्ण थंड करायची इच्छा आहे. युरोप आणि अमेरिकेच्या दबावामुळं चीन दात ओठ खात गप्प आहे. दांडगाई करणं योग्य नाही, शेवटी आपलं आर्थिक हित महत्वाचं आहे यावर चीन पक्का आहे.

परंतू युक्रेन व इतर शेजारी देशांच्या बाबतीत रशियाचं डोकं पक्कं झालेलं नाही. दांडगाई केली तर भागतं असा अनुभव पुतीन यांनी चेचन्या, जॉर्जिया आणि क्रिमियाच्या बाबतीत घेतला. तसंच युक्रेनच्या बाबतीत घडेल, युरोप-अमेरिका गप्प रहातील अशी पुतीन यांची समजूत होती. पण ती खोटी ठरली. युरोप एकत्र झालं आणि युक्रेनच्या बाजूनं उभं राहिलं.

चीनच्या एकूण वर्तणुकीवरून त्यांचं धोरण कळू शकतं. दांडगाई करू नका, धीमेपणानं घ्या, तूर्तास तरी, असं चीनचं धोरण दिसतंय. चिनी मुत्सद्दी खाजगीत ते रशियन मुत्सद्द्यांना सांगत असावेत. चिनी माणसं फार मजेशीर असतात. म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करून ते बोलतात. मुख्य म्हणजे खाजगीत ते सैलपणे बोलत नसतात. पण पुतीन यांचं व्यक्तिमत्व अगदीच वेगळं आहे. ते माफिया डॉन असल्यासारखा देश चालवतात. त्यामुळं चीनचं मन काय आहे याचा नीट विचार त्यांनी केला नाही, अशी शक्यता दिसते.

चीन आणि युक्रेनचे व्यापारी संबंध २००८ सालापासून आहेत.चीननं बेलारूस, युक्रेन, कझाकस्तान, उझबेकिस्तान इत्यादी सर्व देशात पाय पसरलेत, आर्थिक संबंध निर्माण केलेत. युक्रेनशी चीनचा सुमारे १६ अब्ज डॉलरचा व्यापार आहे, आयात निर्यात निम्मी निम्मी आहे. युक्रेनशी शत्रुत्व पत्करण्यात अर्थ नाही, इतर देशांनाही चुकीचा संदेश जाईल.

तूर्तास तरी दांडगाई उपयोगी नाही, दमानं घेतलं पाहिजे असं चीनचं सूत्र दिसतंय.

चीनच्या वर्तणुकीतून ते सूत्र लक्षात येतंय, पुतीन कसा विचार करतात? पहायचं.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

 

 

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0