उत्तराखंडः हिमनदी दुर्घटनेत ३ ठार, दीडशेहून अधिक बेपत्ता

उत्तराखंडः हिमनदी दुर्घटनेत ३ ठार, दीडशेहून अधिक बेपत्ता

नवी दिल्ली/डेहराडून/गोपेश्वरः उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात ऋषिगंगा नदी खोर्यात रविवारी हिमनदीचा एक भाग तुटल्याने अलकनंदा व तिच्या अन्य साहाय्यक नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि संपूर्ण गढवाल भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पूरात दीडशेहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अलकनंदा व अन्य नद्यांच्या किनार्यांवरील अनेक गावांना या पुराचा तडाखा बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा पूर ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पावर जाऊन थडकल्याने प्रकल्पावर काम करणारे दीडशे कर्मचारी वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उशीरा माहिती आली तेव्हा ३ जणांचे मृतदेह मिळाले असून अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

या महापुरात पौरी, तेहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार, डेहरादून व अन्य जिल्ह्यांना मोठा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

नंदा देवी राष्ट्रीय अभयारण्यातून निघणार्या ऋषिगंगा नदीच्या वर असलेल्या जलाशयात हिमखंड कोसळल्याने पाण्याचा मोठा प्रवाह खाली आला आणि त्याने धौलगंगा खोरे व अलकनंदा खोर्यात आक्राळविक्राळ रुप धारण केले. हा प्रवाह ऋषिगंगा व धौली गंगा यांच्या संगमावर वसलेल्या ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पावर कोसळल्याने या प्रकल्पात उपस्थित असलेले दीडशेहून कर्मचारी अडकले. या प्रकल्पालाही मोठे नुकसान झाले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी नंदप्रयागपासून पुढे अलकनंदा नदीचा प्रवाह सामान्य झाल्याचे म्हटले आहे. राज्याचे मुख्य सचिव, पोलिस व अन्य यंत्रणा परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचे रावत यांनी ट्विट केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS