साऊंड ऑफ मेटल

साऊंड ऑफ मेटल

साऊंड ऑफ मेटल ही रूबेन आणि लू यांची सांगितीक गोष्ट आहे. रूबेन आणि लू, मेटल या प्रकाराचे संगीतकार. रूबेन ड्रमर आहे आणि लू गिटारिस्ट आहे. दोघं व्हॅनम

विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे हेनी बाबू यांना समर्थन
कांचन ननावरेच्या तुरुंगातील मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटिस
रेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार

साऊंड ऑफ मेटल ही रूबेन आणि लू यांची सांगितीक गोष्ट आहे.

रूबेन आणि लू, मेटल या प्रकाराचे संगीतकार. रूबेन ड्रमर आहे आणि लू गिटारिस्ट आहे. दोघं व्हॅनमध्येच रहातात, आपली वाद्यं, उपकरणं, घेऊन गावोगाव जलसे करत फिरतात. दोघांची वृत्ती जिप्सी आहे.

रूबेन अमेरिकन आहे आणि लू फ्रेंच. दोघांनीही अंगावर नाना प्राणी नाना रंगात गोंदवून घेतलेले आहेत. लूच्या बोटांत जाडजूड अंगठ्या आहेत,अंगठ्यांमध्ये खडे आहेत. खडे मौल्यवान वाटत नाहीत, काहीसे ओबडधोबड आहेत. रुबेन ड्रम वाजवत असतो तेव्हां उघडाबंब असतो, प्रचंड घामाघूम झालेला असतो. लू प्रचंड नाचत,उड्या मारत, तीव्र स्वरात गाते.जलशात सामिल झालेले समोरचे तरुण किंचाळत असतात, नाचत असतात. वातावरणात एक उन्माद असतो.

अशा उन्मादी आणि तीव्र ध्वनीनं व्यापलेल्या वातावरणात एकाएकी रुबेनला त्याच्या ड्रमचा आवाज ऐकू येईनासा होतो. आवाज क्षीण होतो आणि बेसूरही होत जातो. लाऊड स्पीकरचा पडदा फाटल्यानंतर प्रत्येक ध्वनी फरफरफाटका येतो तसं होतं.

रूबेन हादरतो. ऐकूच आलं नाही तर संगीत कसं करणार? खल्लास.

लू सांगते की डॉक्टरकडं जाऊया. तेही त्याला ऐकू येत नाही. ती वहीवर लिहून देते.

डॉक्टर सांगतो – तुझ्या कानाची ऐकण्याची क्षमता २४ टक्क्यावर आलीय, ताबडतोब वरच्या पट्टीतल्या ध्वनीपासून दूर गेला नाहीस तर ती शून्यावर येईल.

डॉक्टर काय म्हणतोय ते रुबेनला ऐकूही येत नाही आणि आवाज इतका विरूप झालेला असतो की शब्दही कळत नाहीत.

उपाय?

४० ते ८० हजार डॉलर खर्च करून इंप्लांट रोवणं.

लू रुबेनला एका कर्णबधिरांच्या संस्थेत पाठवते, तिथं फुकटच उपचार होतील अशा आशेनं. दोघांमधे भांडण होतं. शेवटी लू पॅरिसला आपल्या वडिलांकडं निघून जाते.

रूबेन दांडगाई करत करत संस्थेत पोचतो. इलाजच नसतो. तिथं जो नावाचा एक माणूस त्याला खुणांची भाषा शिकवतो.

जो स्वतः बहिरा असतो. तो चेहऱ्यानं आणि खुणा करून बोलतो. फार गोड माणूस, कणखर, समोरच्या माणसाला मदत करायला सदैव तयार, उबदार. चित्रपटात तो दिसल्या दिसल्या इतकं बरं वाटतं की क्षणभर चित्रपट बाजूला राहून मनात येतं की याला अभिनयाचं ऑस्कर मिळायला हवं.

व्हीयेतनाम युद्धात थोड्याच अंतरावर बाँब फुटल्यामुळं जो बहिरा झालेला असतो. हा आघात त्याला सहन होत नाही, त्याला बियरचं व्यसन लागतं. त्या पायी पत्नी व मुलं त्याला सोडून गेलेली असतात.

रूबेन म्हणतो की त्याला काही करून इंप्लांट बसवून घ्यायचाय. एका बहिऱ्या मुलाची मदत घेऊन तो आपली वाद्यं विकतो, गाडीही विकतो.

जो त्याला सांगतो की तू इंप्लांटच्या नादी लागू नकोस. जगात निरवता, शांतता, कमीत कमी आवाज यातही सौंदर्य आहे, ते सौंदर्य अनुभव.

जो रुबेनला एक खोली देतो. तिथं फक्त कॉफी, पाणी, टेबल, खुर्ची, वही आणि पेन. त्याला सांगतो की सकाळी उठल्या उठल्या वही ओढायची आणि लिही लिही लिहीत रहायचं. लिहिण्यासारखं मनात काही उरणार नाही इतकं लिहायचं. रुबेन करून पहातो. वेडा होतो. रिकाम्या मनाची सवय नसते. काहीही उरलेलं नसलेली स्तब्धता, स्टीलनेस (stillness), त्याला अनुभवता येत नाही.

रुबेन वेदना सहन करून इंप्लांट बसवून घेतो.

डॉक्टर तपासणी करतात. रुबेनला वाटतं की चला आता ध्वनी कानात पोचणार.

पण कसलं काय. डॉक्टर काय बोलतात ते त्याला नीट कळत नाही, विचित्रच आवाज येऊ लागतात.

रुबेन डॉक्टरकडून बाहेर पडतो.  पॅरिसला जातो. वाटेत सर्व आवाज विरूप आणि फाटलेले. लूच्या घरी एक पार्टी असते. तिथं माणसं बोलतात, त्याला बोलणं कळत नाही. लू गाणं म्हणते, रूबेनला ते कळत नाही.

रूबेन लूच्या घरून बाहेर पडतो. रस्त्यावर एका बाकड्यावर बसून विचार करतो.

एका क्षणी डोकं आणि कानावर असलेलं उपकरण उचकटून फेकून देतो. समोरच्या झाडातून पाझरणारे शांत सूर्यकिरण त्याला दिसतात. चर्चची इमारत, चर्चचा मिनार, घंटा त्याला शांत दिसते, नेहमीपेक्षा वेगळी दिसते. रस्त्यावर मुलं खेळतांना दिसतात.

चित्रपट संपतो.  

ध्वनी आणि दृश्यं यांच्यात एक नातं असतं.आपल्याला दिसतं कारण आपल्याला त्या दिसण्यातला ध्वनीही ऐकू येत असतो. आपल्याला माणसाचं बोलणं समजतं कारण आपल्याला त्या माणसाचे ओठ हलताना दिसत असतात.  पानांची सळसळ आपल्याला कळते कारण ती आपल्याला दिसत असते.

ध्वनी आणि दृश्याची संगत तुटली तर काय होऊ शकतं? बहिरेपण आलेल्या माणसाला ते समजतं. एक इंद्रीय काम करेनासं होत पण त्या बरोबरच त्याच्याशी संलग्न इतरही संवेदना नाहिशा होतात. फार गोची होते. अंधांचंही नेमकं तसंच होत असतं.

रुबेनला ऐकू येईनासं होतं त्या क्षणी आपलाही थरकाप उडतो.

दृश्य आणि ध्वनी यातलं तुटलेलं नात असा एक भीषण प्रकार या चित्रपटात दिग्दर्शकानं हाताळलाय. ऐकू येत नसल्यानं उध्वस्थ झालेली माणसं आणि त्यांना त्या अभावासह जीवनाचे अर्थ सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात अनेकानेक प्रसंगांतून दिसतो.

ऐकू न येणारी माणसं चेहऱ्यानं बोलतात, खुणांनी बोलतात. त्यांचं हालचालीनी व्यक्त होणं नृत्यासारखं देखणं असतं.

ध्वनी हा ऐंद्रीय बोध नाहिसा झाल्यानंतर जे काही घडतं, ते आपल्याला समजायला एकच मार्ग म्हणजे त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव. रुबेन आणि लू या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव हाच चित्रपटाचा गाभा आहे. संस्थेमधे भेटलेले कर्णबधीर विद्यार्थी आणि शिक्षक यांचेही चेहरे अतीशय लवचीक, प्लास्टिक, पटापट बदलणारे असतात.  हे सारं क्लोजअपमधूनच कळतं. चित्रपटभर देखणे क्लोजअप पसरलेले आहेत. रुबेनचा चेहराअभिनय कमालीचा बोलका आहे.

रुबेनची भू्मिका करणाऱ्या रिझ अहमद याला  अभिनयाचं नामांकन आहे, ते मिळावं इतका समर्थ अभिनय रिझनं केलाय.

रूबेनचं जिप्सीपण चित्रपटाच्या टोकाटोकाला कळतं. त्याची आई नर्स असते, वडील कोण असं विचारल्यावर रुबेन म्हणतो माहित नाही. बेघर, घराचं प्रेम न मिळालेला माणूस. व्यसनी होतो, सर्व प्रकारची ड्रग करतो. जलसे करता करता एके दिवशी त्याला लू भेटते. लूचे वडील पॅरिसमधे रहातात, श्रीमंत असतात. त्यांचं लूच्या आईशी पटत नाही. लूला घेऊन आई घर सोडते. घराच्या प्रेमाला पारखी लू रुबेनच्या सहवासात येते. दोन बेघर एकत्र रहातात, रुबेनचं व्यसन सुटतं.

चारेक वर्षं दोघं धमाल सुखी जगत असतात आणि रुबेन बहिरा होतो.

लू बापावरचा राग विसरून पॅरिसला परतते.

रुबेन पॅरिसला जातो तेव्हां आता दोघांचं मीलन पुन्हा होणार असं वाटू लागतं. पण तसं घडत नाही,  रुबेन लू पासून दूर जाऊन  शांततेशी जुळवून घ्यायला सिद्ध होतो.

इथं चित्रपट संपतो.

ध्वनी कल्लोळानं चित्रपटाची सुरवात आणि शांततेनं शेवट. 

रूबेनची भूमिका रिझ अहमद या इंग्लीश नटानं केलीय. रिझचे आई वडील पाकिस्तानातून इंग्लंडमधे स्थलांतरीत झाले. रिझ इंग्लंडमधे वाढला, तो इंग्रजच आहे. या  चित्रपटात तो रूबेन या लॅटिनो अमेरिकन माणसाची भूमिका करतो.

नट कुठं जन्मला, त्याचे आई वडील कोण आहेत असले प्रश्न म्हणजे बुलशिट, त्याचा अभिनय पहायचा असतो. साऊंड ऑफ मेटल पहाताना आपल्याला रिझ अहमद  दिसत नाही, रुबेन दिसतो.

हा चित्रपट म्हणजे साऊंड आणि व्हिज्युअल इंजिनयरिंगची कमाल आहे.

सगळी करामत आहे ती ध्वनीची. म्हणूनच ध्वनी या वर्गाचं नामांकन चित्रपटाला मिळालं आहे. उत्तम चित्रपट, अभिनय (रिझ अहमद), सहाय्यक अभिनेता (जोची भूमिका करणारा पॉल रेसी), पटकथा आणि संकलन या वर्गाचीही नामांकनं चित्रपटाला आहेत.

चित्रपटात एक तत्व दडलेलं आहे. स्टिलनेस, निरवता, स्तब्धता.

गेली काही वर्षं टीव्ही, सेलफोन, यामुळं आपल्याला बाह्यसंवेदनांचं अजीर्ण झालंय, सेन्सरी ओवरलोड झालाय. आपण निरवता, स्तब्धता हरवून बसलोय.

याची जाणीव हा सिनेमा करून देतो.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

साऊंड ऑफ मेटल
दिग्दर्शक – दारियस मर्डर 
कलाकार – रिझ अहमद, ऑलिव्हीया कुक, पॉल रेसी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0