अखेर व्हीसा मंजूर; ७४ वर्षानंतर दोन भावांची भेट

अखेर व्हीसा मंजूर; ७४ वर्षानंतर दोन भावांची भेट

चंदीगडः ७४ वर्षानंतर पाकिस्तानात राहिलेल्या भावासोबत काही आठवडे काढण्याची भारतीय नागरिक सिका खान यांची इच्छा अखेर पूर्ण झाली. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाने २८ जानेवारीला बठिंडा जिल्ह्यातील फुलेवाला गावात राहणाऱ्या सिका खान यांना २ महिन्यांचा व्हीसा मंजूर केला. ते आता पाकिस्तानात फैसलाबाद येथे राहणारे ८४ वर्षीय सख्खे बंधु मुद्दमेद सिद्दीक यांना भेटणार आहेत.

काही दिवसांपूर्वी सिका खान यांनी मुद्दमेद सिद्दीक यांची एका तासासाठी कर्तारपूर गुरुद्वारा येथे भेट घेतली होती. या भेटीचे व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने चर्चा सुरू झाली होती.

भारत-पाकिस्तान फाळणीनंतर ७४ वर्षानंतर दोघे भाऊ एकमेकांना पहिल्यांदा भेटत होते. मात्र ही भेट अगदी कमी कालावधीसाठी झाल्याने पुन्हा दीर्घ काळ भेट व्हावी अशी इच्छा भारत-पाकिस्तानातील दोघांच्या कुटुंबियांकडून व आप्तेष्टांकडून व्यक्त झाली होती. कर्तारपूरच्या भेटीत दोघे भाऊ एकमेकांना भेटल्यानंतर आनंदाश्रू पाहायला मिळाले होते, उपस्थितांमध्ये भारत-पाकिस्तान संबंध पूर्ववत, मैत्रीचे व्हावे अशाही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर या दोघा भावांना एकमेकांसोबत अधिक वेळ व्यतित करता यावा म्हणून भारत व पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयाने ७५ वर्षांच्या सिका खान यांना दोन महिन्याचा व्हीसा मंजूर केला.

आता सिका खान वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात पोहचतील. तेथून त्यांना फैसलाबाद येथे सिद्दीक यांच्या घराकडे नेण्यात येईल, अशी माहिती सिका खान यांच्या कुटुंबियांनी दिली.

मी किती आनंदी आहे, हे शब्दांत व्यक्त करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया सिका खान यांनी द वायरकडे व्यक्त केली. पाकिस्तानात भावाला भेटण्यासाठी जाताना काही भेटवस्तू आपण नेणार आहोत, त्या त्याला आवडतील असे सिका खान म्हणाले.

सिका खान यांची आई मुळची फुलेवाल गावातील. त्यांचा विवाह लुधियानानजीक जाग्रॉन या गावातील व्यक्तीशी झाला. फाळणीच्या वेळी दोघे भाऊ फुलेवालमध्ये मामाच्या घरात आश्रयासाठी थांबले होते. त्यावेळी सिका खान केवळ सहा महिन्याचे होते. फाळणीमुळे पंजाबात दंगली भडकल्या होत्या. परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. हजारो कुटुंबे उघड्यावर आली होती. हजारो बेपत्ता झाले होते. जेव्हा दंगली शांत झाल्या तेव्हा सिकाचे वडील व त्यांचे मोठे काका गावात नसल्याचे लक्षात आले. या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पण सिका खान यांच्या वडिलांचा, काकांचा पत्ता लागला नाही. या दरम्यान सिका खान यांच्या आईने आत्महत्या केली. या घटनेमुळे सिका खान अनाथ झाले. पुढे त्यांचा सांभाळ मामानेच केला.

फाळणीच्या जखमेची दाहकता सिका खान यांना पुढे आयुष्यभर जाणवत होती. आपले आप्तजन लहानपणीचे गेले पण जे कोणी पाकिस्तानात गेले असतील त्यांची भविष्यात कधीतरी आपली भेट होईल अशी आशा त्यांना होती.

२०१९मध्ये पाकिस्तानातील एक संस्था पंजाबी लहर यांनी ८२ वर्षांचे मुद्दमेद सिद्दीक यांच्या संदर्भात एक वृत्त यू ट्यूबवर प्रसारित केले. या वृत्तानंतर मुद्दामेद सिद्दीक व सिका खान हे एकमेकांचे भाऊ असल्याचे दिसून आले. त्यानंतर या संबंधाची चर्चा सुरू झाली.

याच काळात भारत-पाकिस्तानने कर्तारपूर साहिब कॉरिडोर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतातून हजारो शीख भाविकांना कर्तारपूर साहिबमध्ये जाण्याची संधी मिळाली. यातून २३ मार्च २०२०मध्ये सिका खान व सिद्दीकी यांची भेट निश्चित झाली होती. पण या भेटीच्या दोन दिवस अगोदर कोविड-१९ संदर्भातले लॉकडाउन जाहीर झाले आणि या दोघांची भेट लांबणीवर पडली.

त्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर १७ नोव्हेंबर २०२१मध्ये कर्तारपूर कॉरिडोर सुरू झाला. तेव्हा या दोघा भावांची पुन्हा भेट निश्चित करण्यात आली. १२ जानेवारीला सिद्दीकी व सिका खान कर्तारपूर येथे भेटले. ७४ वर्षानंतर एकमेकांना पाहिल्यानंतर दोघा भावांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. उपस्थितांचेही डोळे पाणावले. पण ही भेट अगदी मर्यादित काळासाठी १ तासाची झाल्याने दोन्ही बाजू नाराज झाल्या होत्या. अखेर भारत-पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दोघा भावांनी प्रदीर्घ काळ व्यतित करावा म्हणून राजनयिक पातळीवर हालचाली केल्या व सिका खान यांना २ महिन्याचा पाकिस्तानचा व्हीसा मिळाला.

सिका खान यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. ते कृषी मजूर म्हणून काम करत होते. आता वयोमानाने त्यांना काम झेपत नाही. पण आता त्यांचा भाऊ भेटत असल्याने त्यांच्या गावाने वर्गणी काढून सिका खान यांची पाकिस्तान भेट अधिक सुकर केली आहे.

सिका खान यांच्या आयुष्याची सुरूवात दुःखात झाली पण आता आयुष्याच्या अखेरीस त्यांना मिळत असलेला आनंद आमच्या गावासाठी महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया सिका खान यांचे एक निकटवर्तीय जगसिर यांनी दिली. आता दोघे भाऊ एकमेकांच्या सोबत वेदना व आनंद व्यक्त करतील हे महत्त्वाचे असल्याचे जगसिर यांचे म्हणणे आहे. १९४७च्या दुःखद फाळणीचा इतिहास आपण बदलू शकत नाही पण आता दोघे जण काही क्षण आनंदात घालवू शकतात यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, असा विश्वास जगसिर यांनी व्यक्त केला.

दरम्यान सिका खान यांना व्हीसा मंजूर केल्याची माहिती पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयाने ट्विट करून दिली आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये कर्तारपूर साहिब कॉरिडोर सुरू केल्याने दोन्ही देशांमधील जनतेमध्ये सुसंवाद साधला व लोक जवळ आल्याची पाकिस्तानची प्रतिक्रिया आहे. पाकिस्तानने सिका खान यांचा एक कृतज्ञता व्यक्त करणारा एक व्हीडिओही ट्वीट केला आहे.

मूळ वृत्त

COMMENTS