कमला हॅरिस : खऱ्या अमेरिकेची प्रतिनिधी

कमला हॅरिस : खऱ्या अमेरिकेची प्रतिनिधी

जगात इतरत्र जे घडतंय किंवा घडू घातलंय त्याची रंगीत तालीम अमेरिकेत होतेय. अमेरिका हा देश कोणाचा आहे आणि तो कोणी चालवायचा आहे असं कमला हॅरिस विचारत आहेत.

अल-काइदाचा प्रमुख अल-जवाहिरी ठार
‘हाऊडी मोदी’ : मोदींसाठी लाभदायक, पण भारतासाठी?
रिप्लेसमेंट सिद्धांत आणि जगभरचे जेंड्रन

हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष जवळपास झाल्याच होत्या. त्यांना डोनल्ड ट्रंप यांच्यापेक्षा अडीचेक लाख मतं जास्त मिळाली होती. पण इलेक्टोरल मतांमधे त्या हरल्या.

आता कमला हॅरिस नावाची एक महिला उपाध्यक्ष होऊ पहात आहे.   हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे  भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमैकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. कमला ब्लॅक बॅप्टिस्ट चर्चमधे जातात. नवरा डग्लस एमहॉफ हा ज्यू आहे. सहा वर्षापूर्वी कमलाचं लग्न झालं. डग्लसच्या दोन मुली आता त्यांच्या मुली आहेत. त्या कमलाला मॉमला म्हणतात.

कमला हॅरिस खऱ्या खुऱ्या अमेरिकेच्या खऱ्या खुऱ्या प्रतिनिधी आहेत.

अमेरिका हा स्थलांतरीतांचा देश आहे. अमेरिकेतला एक ट्रंपवादी गट स्वतःला स्थानिक अमेरिकन, गोरे अमेरिकन म्हणवतो. परंतू गोरे अमेरिकनही मुळचे अमेरिकन नाहीत. काळाच्या ओघात ते गोऱ्यांच्या देशांतून स्थलांतरीत झाले आहेत. कमला हॅरिसचे आई वडील भारत आणि जमैकातून आलेत आणि त्यांचा नवरा डग्लसचे आई वडील ऑस्ट्रियातून स्थलांतरीत झाले आहेत. श्रीमंत आणि सुखवस्तू लोक नशीब काढायला बाहेरून अमेरिकेत पोचले. आफ्रिकन गुलाम वेठ कामगार म्हणून अमेरिकेत आणले गेले. चिनी, भारतीय, मेक्सिकन लोकं आर्थिक विकास साधण्यासाठी अमेरिकेत गेले. सुरवातीला गोऱ्यांची संख्या जास्त होती पण हळूहळू इतरांचीही संख्या वाढत गेली आणि आता गोरे व इतर लवकरच संख्येने सारखेच होऊ घातले आहेत.

तरीही गोऱ्यांना वाटतं की देश त्यांचाच आहे, बाकीचे लोकं उपरे आहेत. ट्रंप यांनी अमेरिकेतील विविधतेचं रूपांतर विभागणीत करून टाकलंय आणि गोरे सोडता इतर सर्व लोकं उपरे नव्हेत तर देशद्रोही ठरवलेत. या ना त्या वाटेनं त्यांना खच्ची करणं, त्यांना मतदान नाकारणं, त्यांना घालवून देणं असा उद्योग ट्रंप यांनी चालवला आहे. कमला हॅरिस या काळ्याच नाहीत, तर त्या किळसवाण्या आहेत असं ट्रंप म्हणू लागले आहेत.

कमला हॅरिस ठामपणानं सांगत आहेत, की अमेरिका सर्वांचाच आहे, गोऱ्यांचाही आहे आणि काळ्यांचाही आहे.

उपाध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षानं त्यांना निवडल्यावर त्यांनी केलेलं भाषण महत्वाचं आहे. त्या म्हणाल्या की अमेरिकेची फाळणी ट्रंप यांनी केलीय. ही फाळणी केवळ वंशाच्या आधारावर नाही तर गरीब आणि श्रीमंत अशीही आहे.

अमेरिकेत ४ कोटी माणसं आज गरीब किवा अती गरीब या वर्गात मोडतात. त्यात काळे आहेत आणि गोरेही आहेत. काळे गरीब गोऱ्या गरीबांपेक्षा जास्त आहेत. गरीबांना मिळणारं उत्पन्न जेमतेम पोट भरण्यापुरतंच असतं. चांगलं शिक्षण आणि चांगलं आरोग्य या दोन्ही पासून गरीब माणसं वंचीत आहेत. चांगल्या शाळेत जाऊ न शकलेल्यात काळे जास्त आहेत पण गोरेही भरपूर आहेत. कॉलेजात शिकण्यासाठी कर्जबाजारी झालेल्या विद्यार्थ्यांत गोऱ्यांची संख्या जास्त आहे. आरोग्य विमा नसणं हे वास्तव काळे आणि गोरे दोघांमधेही आहे.

मालक गरीब आणि मध्यम वर्गीयांना कमी वेतन देतात, कंपनीतल्या वरिष्ठ गटातले लोक सगळे पैसे हाणतात. करांतून सुटका श्रीमंतांना मिळते. साधनांचं पुनर्वाटप करायला सरकार तयार नाही, विषमता दूर करण्यासाठी पुढाकार घ्यायला सरकार तयार नाही. गरीब असतील तर त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं, सरकार त्याना मदत करणार नाही असा पवित्रा उत्तरोत्तर सरकार घेतंय. २००७ सालचा सबप्राईम घोटाळा अर्थसंस्थातल्या चिमूटभर लोकांनी केला, त्यांना सरकारनं तुरुंगात धाडलं नाही. लाखो मध्यम वर्गीय धुळीला मिळाले.

आज वरवर पहाता अमेरिकेत वस्तूंची रेलचेल दिसते, दुकानांचा चकचकाट दिसतो, जाहिरातींतून ऐश्वर्य दिसतं. प्रत्यक्षात हा झगमगाट समाजातल्या एका छोट्या वर्गाची मिरास झालीय, सामान्य माणूस वंचीत आहे.

कमला हॅरिस या स्थितीकडं लक्ष वेधत आहेत. काळी माणसं केवळ काळ्यांचीच नव्हे तर गरीबांचंही प्रतीक आहेत. काळ्यांचा लढा केवळ रंगानं काळ्या असणाऱ्या लोकांचा लढा राहिलेला नाही, तो संकटात असलेल्या बहुसंख्यांक अमेरिकींचा लढा झाला आहे.

कमला हॅरिस यांनी कोविडनं उभ्या केलेल्या संकटाकडं लक्ष वेधलं आहे. कोविडनं पूर्ण अमेरिकेची वाट लावलीय, त्यात काळ्यांना जास्त फटका बसलाय येवढंच. कोवीड संकटाला ट्रंप यांचं क्रूर धोरण कारणीभूत आहे असं कमला हॅरिस सांगत आहेत. माणसं मरत असताना काही कंपन्या औषधं आणि उपकरणांची साठेबाजी करून फायदा कमवत आहेत; संकटग्रस्तांना सरकारनं दिलेल्या  आर्थिक मदतीचा लक्षणीय वाटा श्रीमंत कंपन्यांकडं चालला आहे. ट्रंप यांना केवळ आणि केवळ पैसे आणि फायदा मिळवणं येवढंच दिसतं, त्यांना अमेरिकन समाजाच्या हिताशी काहीही देणं घेणं नाही या हॅरिस यांनी केलेल्या आरोपातलं  तथ्थ्य दाखवणारे अनेक पुरावे पहायला मिळतात.

भारतात आज हॅरिस यांची आई भारतीय होती याच विषयावर भर दिला जातोय. तो मुद्दा अजिबातच महत्वाचा नाही. कमला हॅरिस अमेरिकन आहेत आणि कर्तबगार आहेत इकडं लक्ष द्यायला हवं. त्या कॅलिफोर्नियाच्या अटर्नी जनरल होत्या आणि आता खासदार आहेत. वकील या नात्यानं त्यांनी सेनेटमधे केलेल्या कामगिरीमुळं संसदीय राजकारण जाणकारांना चकीत केलं आहे. जेफ सेशन्स आणि विल्यम बार हे दोन अॅटर्नी जनरल आणि जस्टीस केवेनॉ यांची त्यांनी केलेली उलटतपासणी पाहून अमेरिकन सेनेट, जनता चकीत झाली होती.  त्यांना कायदा कळतो. त्यांना प्रशासन कळतं. उपाध्यक्ष न होत्या तर त्या अमेरिकेच्या कायदे मंत्री, अॅटर्नी जनरल होऊ शकल्या असत्या.

कमला हॅरिस यांचा धर्म कोणता याला महत्व नाही. म्हटलं तर त्यांच्या घरात हिंदू, ख्रिस्ती आणि ज्यू असे तीनही धर्म आहेत. ट्रंप यांचे पाठिराखे त्यांचा धर्म शोधण्याचा प्रयत्न करतील. ओबामांचा उल्लेख आजही ट्रंप बराक हुसेन ओबामा असा करतात. ओबामांचे वडील आफ्रिकन होते आणि मुस्लीम होते याकडं ट्रंप यांचं लक्ष असतं. ओबामा स्वतः ख्रिस्ती आहेत आणि अमेरिकन आहेत हे त्यांना मान्य नाही.

वर्ण आणि धर्म या मुद्द्यावर जाऊन मुख्य प्रश्न टाळण्याची एक लाट अमेरिकेत आणि जगात आली आहे. कमला हॅरिस अमेरिकेच्या भल्याचं बोलत आहेत, आर्थिक प्रश्नावर भूमिका घेत आहेत, अमेरिकेतल्या आरोग्य आणि शिक्षण या प्रश्नांकडं लक्ष वेधत आहेत. इकडं दुर्लक्ष करायचं आणि त्यांचा धर्म कोणता, त्यांची आई भारतीय होती आणि पिता जमैकन होता यावर भर द्यायचा हे आहे ट्रंप यांचं राजकारण. भारतीय माणसंही त्यांच्याकडं ते त्या चेन्नईच्या शामला गोपालन यांची मुलगी म्हणून पहातात, एक कर्तबगार महिला म्हणून पहात नाहीत.

जगात इतरत्र जे घडतंय किंवा घडू घातलंय त्याची रंगीत तालीम अमेरिकेत होतेय. अमेरिका हा देश कोणाचा आहे आणि तो कोणी चालवायचा आहे असं कमला हॅरिस विचारत आहेत. माणसं महत्वाची की त्यांचा धर्म महत्वाचा, माणसं महत्वाची की त्यांचा वर्ण महत्वाचा असाही प्रश्न हॅरिस यांनी ऐरणीवर आणलाय.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0