बंगालमध्ये भाजपच्या ५ रथयात्रा

बंगालमध्ये भाजपच्या ५ रथयात्रा

कोलकाताः प. बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी भाजप संपूर्ण राज्यात रथयात्रा काढणार असून या रथयात्रेतून राज्यात परिवर्तनचा संदेश भाजपकडून दिला जाणार आहे. राज्यात निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये होतील असा भाजप नेत्यांचा अंदाज आहे. या रथयात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून पक्षाकडून ५ रथयात्रा काढल्या जातील. या रथयात्रा राज्यातले सर्व २९४ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढतील असे भाजपने ठरवले आहे.

गेल्या शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प. बंगालमधील पक्षाच्या सर्व प्रभारी नेत्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत पक्षाचे महासचिव कैलास विजयवर्गीय, संयुक्त महासचिव शिव प्रकाश व प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष उपस्थित होते. या बैठकीत फेब्रुवारीपासून राज्यात ५ रथयात्रांना सुरूवात केली जाणार असल्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रत्येक रथयात्रेचे नेतृत्व भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते करतील. प्रत्येक सोमवारी एक नेता एक यात्रा सुरू करेल व ती आठवड्यात मतदारसंघाचा दौरा करेल, असे ठरवण्यात आले.

प.बंगालचे संपूर्ण राजकारण बदलण्याचा भाजपचा इरादा असून पक्षाने सत्ताधारी तृणूमूल पक्षाचे अनेक नेते फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. भाजपच्या एका नेत्याने या संदर्भात प्रतिक्रिया दिली की, ममता बॅनर्जी यांच्यापुढे पक्षातील बंडखोरीचे आव्हान उभे राहिले असून तृणमूलच्या अनेक नेत्यांचा ओघ भाजपकडे दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पण केद्रातील पक्षनेतृत्वाने सर्वच नेत्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहून निर्णय घ्यावयाचा असल्याचे आदेश दिले आहेत, असे हा नेता म्हणाला.

भाजपच्या प्रस्तावित ५ रथयात्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी प्रचार दौरे नेत्यांकडून सुरू होणार आहेत. यात अमित शहा येत्या ३० व ३१ जानेवारीला राज्यात एका कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

मूळ बातमी

COMMENTS