नवी दिल्लीः प. बंगालच्या विधानसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या धार्मिक टिप्पण्ण्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर किती खटले
नवी दिल्लीः प. बंगालच्या विधानसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या धार्मिक टिप्पण्ण्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर किती खटले दाखल केले, त्यांना किती नोटीसा पाठवल्या असा थेट सवाल तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून केला आहे.
प. बंगालमधील दमजुर येथे एका रॅलीला संबोधताना बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथील भाषणात मुसलमानांना पाकिस्तानी म्हणून कुणी संबोधले होते? असं बोलताना त्यांना शरम वाटत नाही? माझ्या विरोधात तुम्ही काहीही बोला पण हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, आदिवासी यांच्यासोबत आपण आहोत. माझ्या विरोधात १० तक्रारी दाखल केल्या आहेत. नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. पण मला त्याने फरक पडत नाही. जे मोदी रोज हिंदू-मुस्लिम करत असतात त्यांच्याविरोधात किती केस दाखल केल्या आहेत, असा घणाघात केला.
दोन दिवसांपूर्वी हुगळी येथे एका प्रचारसभेत धार्मिक आधारावर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केल्या प्रकरणात ममता बॅनर्जी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्यानंतर राजकारण तापले आहे.
भाजपच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे हुगळी येथील प्रचार सभेत मुस्लिमांना मताचे आवाहन केल्याप्रकरणात तक्रार केली. त्यावर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांचे भाषण लोकप्रतिनिधित्व कायदा व आचारसंहितेचा भंग असल्याचे स्पष्ट करत त्यांच्या कडून ४८ तासांच्या आत उत्तर मागितले आहे.
आयोगाच्या या निर्णयावर तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत टीका करण्यास सुरूवात केली आहे. पक्षाच्या लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांनी निवडणूक आयोगाने भेदभाव करणे बंद करावे असे म्हटले. भाजपाच्या तक्रारीवर ममता दीदींना नोटीस पाठवली जाते मग तृणमूलने केलेल्या तक्रारींचे काय, असा सवाल करत भाजपच्या उमेदवारांकडून पैसे वाटप केल्याचे व्हीडिओ पुरावे आहेत. मतदारांना कॅश कुपन दिली जातात, यावर निवडणूक आयोग गप्प का असा सवाल केला.
मोदींच्या विधानावर आयोग गप्प
कुचबिहार येथील प्रचार सभेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करताना मोदींनी थेट धर्माचा उल्लेख केला होता.
भाजपच्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे जाणूनबुजून दुर्लक्ष
गेल्या आठवड्यात नंदीग्राममध्ये मतदानादरम्यान आयोगाकडून काही चुका झाल्याची तक्रार ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण आयोगाने बॅनर्जी यांची तक्रार लगेच फेटाळली.
बॅनर्जी यांचे असे म्हणणे होते की, त्या मतदानाला आल्या असता तृणमूल व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद उत्पन्न झाल्याने त्यांना दोन तास बसून राहावे लागले.
बॅनर्जी यांच्या या तक्रारीला ५ एप्रिल रोजी उत्तर देताना निवडणूक आयोगाने झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत त्यांचे आरोप तथ्यात्मक दृष्टीने अत्यंत चुकीचे असून त्यांच्या मतदान केंद्रामधील वर्तनाने प. बंगालच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली होती. आयोगाने नंदिग्राममध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार अथवा मतदारांना धमकावण्याच्या घटना घडल्या नाहीत असेही स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाच्या या उत्तरावर तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन यांनी एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी भाजपच्या गुंडांना पहिले पकडावे व अनुचित घटना घडू नये याची काळजी घ्यावी असे म्हटले होते.
भाजप उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम
आसाममध्ये भाजपच्या उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम सापडण्याची घटना तर अत्यंत महत्त्वाची ठरते. ही घटना उघडकीस आल्यानंतर काँग्रेस व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. निवडणूक आयोग या घटनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.
पण एवढे प्रकरण होऊनही ज्या मतदारसंघात ही घटना घडली त्या रातबारीमध्ये एका मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेतले जाईल असे निवडणूक आयोगाने जाहीर केले पण भाजपचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. निवडणूक आयोगाने या प्रकरणात केवळ वाहतूक आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्टीकरण देत चार अधिकार्यांना निलंबित केले. निवडणूक आयोगाने नंतर रातबारीमध्ये झालेली घटना आमच्या अधिकार्याकडून जाणूनबुजून, कोणताही हेतू ठेवून झाली नव्हती किंवा मतदानावर त्याचा परिणाम व्हावा अशी केली नव्हती असे स्पष्ट करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
यावर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ही कुठली पटकथा आहे असा सवाल केला. त्यांनी एक ट्विट लिहिले, त्यात त्या म्हणतात,
क्या स्क्रिप्ट है? चुनाव आयोग की गाड़ी खराब हुई, तभी वहां एक गाड़ी प्रकट हुई। गाड़ी भाजपा के प्रत्याशी की निकली। मासूम चुनाव आयोग उसमें बैठ कर सवारी करता रहा। प्रिय EC, माजरा क्या है? आप देश को इस पर कुछ सफाई दे सकते हैं? या हम सब मिलकर बोलें EC की निष्पक्षता को वनक्कम?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही एक ट्विट केले. त्यात ते म्हणतात, EC की गाड़ी ख़राब, भाजपा की नीयत ख़राब, लोकतंत्र की हालत ख़राब!
राहुल गांधी यांनी ३ एप्रिलला आसाममधील बोडो लँड पीपल्स फ्रंटचे उमेदवार रंगजा खुनगूर बसूमातारी यांच्या विरोधातही एक तक्रार केली होती. बीपीएफने तेथे काँग्रेससोबत युती केली होती. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बीपीएफने काँग्रेसशी युती तोडली व भाजपशी हात मिळवणी केली. या वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ येऊनही बसूमातरी यांचा अर्ज निवडणूक आयोगाने स्वीकारला.
या तक्रारीबाबत आम्ही काही करू शकत नाही, असे निवडणूक आयोगाने उत्तर दिले. बसूमातरी या स्वखुशीने भाजपमध्ये सामील झाल्याचे व त्यांच्यावर कोणताही दबाव नसल्याचे उत्तर आपल्याला मिळाल्याचा युक्तिवाद आयोगाने केला.
भाजपच्या मंत्र्यावर आयोगाची अशीही मेहेरबानी
आसाममधील एक घटना तर निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाचे उदाहरण आहे. २ एप्रिलला आसामचे मंत्री व भाजपचे उमेदवार हिमंता बिस्वा सर्मा यांना बोडोलँड पीपल्स फ्रंटचे प्रमुख हागरामा मोहिलरी यांना धमकावले होते, त्यावर निवडणूक आयोगाने हिमंता सरमा यांना ४८ तासांची प्रचार बंदी घातली होती. पण आयोगाने ही मुदत एक दिवसाने कमी केली व त्यांना प्रचार करू दिला.
मूळ बातमी
COMMENTS