बंगालमधील हिंसाचार कथांना बनावट बातम्यांचा आधार

बंगालमधील हिंसाचार कथांना बनावट बातम्यांचा आधार

भाजप नेते, आयटी विभाग आणि भाजपला पाठिंबा देणाऱ्यांनी सोशल मीडियावर बनावट फोटो व व्हिडिओ शेअर करून एक वेगळीच गोष्ट पसरवण्यास सुरुवात केली आहे आणि या हिंसाचाराला धार्मिक रंग दिला आहे.

जीएसटी चोरी रोखण्यासाठी ७ शिफारशी सादर
एसटी संप तोडगा नाही; सरकार हायकोर्टात
शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचा ५० वर्षांहून अधिक दीर्घ इतिहास आहे. यावेळीही तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) २९२पैकी २१३ जागा जिंकून राज्यातील सत्ता कायम राखल्याच्या बातम्या येऊ लागल्या, त्यापाठोपाठ राज्याच्या विविध भागांतून हिंसाचाराच्या बातम्याही येऊ लागल्या.

ताज्या बातम्यांनुसार, रविवारी निवडणुकांचे निकाल आल्यापासून सुरू झालेल्या राजकीय हिंसाचारात किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आपले सहा पाठीराखे/कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने (भाजप) केला आहे, तर आपले चार कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा टीएमसीने केला आहे.

यातच भाजप नेते, आयटी विभाग आणि भाजपला पाठिंबा देणाऱ्यांनी सोशल मीडियावर बनावट फोटो व व्हिडिओ शेअर करून एक वेगळीच गोष्ट पसरवण्यास सुरुवात केली आहे आणि या हिंसाचाराला धार्मिक रंग दिला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी स्थितीचा आढावा घेण्यासाठी कोलकात्यात पोहोचले. बुधवारी नड्डा यांनी ‘टीएमसी-प्रायोजित हिंसाचारा’च्या निषेधार्थ पक्ष कार्यालयात धरणे धरले.

हिंसाचाराच्या बातम्या

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, उत्तर कोलकातामधील भाजप कार्यकर्ते अभिजित सरकार यांची टीएमसीच्या गुंडांनी सोमवारी हत्या केली. नॉर्थ ट्वेंटीफोर परगण्यात भाजप कार्यकर्त्याचा बचाव करताना त्याची आई, शोवारानी मंडल, यांचा मृत्यू झाला. उत्तम घोष नावाच्या भाजप कार्यकर्त्याचीही टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचे बातमीत म्हटले आहे. नव्याने स्थापन झालेल्या इंडियन सेक्युलर फ्रण्टनेही त्यांचा कार्यकर्ता हसनुर जमान मारला गेल्याचा दावा केला आहे. सीपीआय(एम)च्या महिला कार्यकर्तीची मुर्शिदाबादमध्ये हत्या झाल्याचेही वृत्त आहे. बीरभूममधील ५४ वर्षीय पंचायत सदस्य व टीएमसी कार्यकर्ते श्रीनिवास घोष यांचा भाजपच्या पाठीराख्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. हुगळीतील टीएमसी कार्यकर्ते देबू प्रामाणिक यांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आल्याचा पक्षाचा दावा आहे. सीपीआय(एम)च्या उत्तर दिनाजपूर कार्यालयाला आग लावण्यात आल्याचे वृत्त आहे, तर पश्चिम मिदनापूरमध्ये एका टीएमसी कार्यकर्त्याची हत्या झाल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सने पोलिसांच्या कोटसह प्रसिद्ध केली आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पूर्व बर्धमान जिल्ह्यात झालेल्या चकमकींमध्ये चार जण मारले गेल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितल्याचे पीटीआयच्या बातमीत म्हटले आहे. याशिवाय टीएमसी कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केल्याच्या, पक्ष कार्यालयांत नासधूस केल्याच्या अनेक बातम्या आहेत, तर भाजप कार्यकर्त्यांनी गलसी, नबग्राम आणि बर्धमान येथे आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ले केल्याचा आरोप टीएमसी नेते करत आहेत.

धार्मिक रंग’

या सगळ्या घटना राजकीय हिंसाचाराच्या असूनही भाजप त्याला धार्मिक रंग देत आहे. तारकेश्वरमध्ये पराभव पत्करावा लागलेले भाजपचे माजी राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांनी सोमवारी ट्विट करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बंगालमध्ये सुरक्षादले पाठवण्याचे आवाहन केले आहे. बिरभूम जिल्ह्यात हजारो हिंदू कुटुंबे शेतांमध्ये लपली आहेत. स्त्रियांवर अत्याचाराच्या बातम्या आहेत, असे ट्विट दासगुप्ता यांनी केले आहे.

बिष्णूपूरचे भाजप खासदार व युवा मोर्चाचे अध्यक्ष सौमित्र खान यांनी मंगळवारी ट्विट करून, नानूरमधील (बीरभूम जिल्हा) भाजप कार्यकर्तीवर जमावाने बलात्कार केल्याचा, आरोप केला. नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले पण ते वेगळ्या स्वरूपात, ग्राफिक इमेजेससह, प्रसृत होत होते.

इंडिया टुडे समूहाचे कार्यकारी संपादक दीप हलदर यांनीही खान यांचे ट्विट पडताळणी न करता प्रसृत केले. मात्र, बीरभूमवरील सामूहिक बलात्काराची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपण हे ट्विट डिलीट केल्याचेही त्यांनी नंतर सोशल मीडियावर सांगितले. सामूहिक बलात्काराची बातमी खोटी असल्याचे बीरभूमचे पोलिस अधीक्षक नागेंद्रनाथ त्रिपाठी यांनीही स्पष्ट केले. ही अफवा सोशल मीडियावर नेमकी कोठून पसरली याचा शोध पोलिस घेत आहेत. स्रोत सापडल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी ट्विटरवर थेट समुदायाची नावे घेत हा हिंसाचार धार्मिक आहे असा आरोप केला आहे. त्यांचे ट्विट: “टीएमसीने चालवलेला हिंसाचार जिन्नाह यांच्या डायरेक्ट अॅक्शन डे कॉलची आठवण करून देणारा आहे. आजची टीएमसी म्हणजे जिन्नाह यांची मुस्लिम लीग आहे. खून, बलात्कार होत आहेत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांनी मौन राखले आहे. लोकशाहीची ऐशीतैशी! ५ राज्यांत निवडणुका झाल्या पण असे कुठेच घडले नाही.”

वरिष्ठ पत्रकार अभिजित मुजुमदार यांनीही धार्मिक बाजूवर भर देत ट्विट केले आहे: “जिहादी बंगालमध्ये रक्ताने होळी खेळत आहेत. हे अदील ‘सेक्युलर’ व ‘लिबरल’ लोकांच्या घरातही एक दिवस पोहोचावेत म्हणजे कळेल.”

दिल्लीतील भाजप खासदार परवेश सिंग यांनी टीएमसीला इशारा दिला आहे: “टीएमसीच्या गुंडांनी निवडणूक जिंकल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना मारले, त्यांची वाहने व घरे ते जाळत आहेत. लक्षात ठेवा, टीएमसीचे खासदार, मुख्यमंत्री, आमदार यांनाही दिल्लीत यावे लागते. हा इशारा समजा.”

टीएमसीचे समाजकंटक गुंड व जिहादी हिंदूना लक्ष्य करत आहे अशा बातम्या सगळीकडून येत आहेत, अशा आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषदेने  मंगळवारी प्रसिद्ध केले आहे. त्यात पुन्हा ‘हिंदू समाजाला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे आणि ते त्याचा उपयोग करतील’ असे आवाहनही केले आहे.

बनावट बातम्या

जमाव पोलिसांवर हल्ला करत आहे असा ओडिशातील जुना व्हिडिओ पश्चिम बंगालमधील निवडणुकोत्तर हिंसाचाराचा पुरावा म्हणून शेअर केला जात आहे, असे अल्टन्यूजच्या बातमीत म्हटले आहे. आज तक वाहिनीचे पत्रकार कमलेश सिंग यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आणि नंतर डिलीट केला. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. यामध्ये टीएमसीच्या अभियान गीतावर काही लोक तलवारी घेऊन नाचत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय महिरा मोर्चाच्या प्रमुख प्रीती गांधी यांनी या व्हिडिओ शेअर केला व त्याला ८३,०००हून अधिक व्ह्यूज मिळाले. पश्चिम बंगाल गुप्तचर खात्याने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलद्वारे हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगितले आहे. २०१९ सालातील विद्यासागर कॉलेजमधील हिंसाचाराचे फोटो पश्चिम बंगालमधील निवडणुकोत्तर हिंसाचाराचे फोटो म्हणून शेअर करण्यात आले. या फोटोंवरून बंगालमधील ‘हिंदूं’ची स्थिती समजते, असे एका ट्विटर यूजरने ट्विट केले आहे. भाजपचे तमीळनाडूतील आयटी व सोशल मीडिया प्रमुख निर्मल कुमार यांनी हेच फोटो शेअर करून  #PresidentRuleInBengal हा हॅशटॅग चालवला. मात्र, हे फोटो ३० मार्च, २०१८ या तारखेचे असल्याचे ऑल्ट न्यूजच्या तपासात दिसून आले. दोन वर्षांपूर्वी रामनवमीनंतर झालेल्या चकमकींचे हे फोटो असल्याचे हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीत म्हटले आहे.

‘द हिंदू बीट्स’ या फेसबुक पेजवर ढाक्यातील (बांगलादेश) फोटो शेअर करण्यात आले व हे पश्चिम बंगालमधील ताजे फोटो आहेत असा दावा करण्यात आला. इन्स्टाग्रामवरील ‘युवादोप’ आणि ‘तत्व इंडिया’ या दोन ५०,०००हून अधिक फॉलोअर्स असलेल्या खात्यांवरही बनावट बातम्या व ‘पश्चिम बंगालमध्ये जातिसंहार’, ‘महिलांवर सामूहिक बलात्कार’, ‘बंगाल हिंसाचाराचे ममतांनी निवडणुकीपूर्वीच केले होते नियोजन’ अशा प्रक्षोभक पोस्ट्स होत्या.

भाजपच्या हॅण्डल्सवर बनावट बातम्या व चुकीच्या माहितीचा महापूर होता, असे फॅक्ट-चेकिंग वेबसाइट्सच्या वार्ताहरांनी ‘द वायर’ला नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले.

राष्ट्रपती राजवटीचे आवाहन

पश्चिम बंगालमधील स्थिती भीषण आहे आणि तेथे राष्ट्रपती राजवटीची गरज आहे, असे चित्र भाजप नेते व भाजपच्या समर्थकांकडून समन्वयाने उभे केले जात आहे. कायदा व सुव्यवस्था मोडून पडल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करण्याची याचिका एका चेन्नईस्थित स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत नमूद आरोप सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट बातम्यांच्या आधारेच करण्यात आलेले आहेत, असे याचिकेच्या मजकुरातून स्पष्ट होते. दरम्यान, ट्विटरवर #PresidentsRuleinBengal हा हॅशटॅग ट्रेण्ड करण्यात येत आहे. ही मागणी पत्रकार अभिजित मुजुमदार यांनी उघड केली आहे. बंगालमध्ये लष्कर बोलवा, मारेकऱ्यांना गोळ्या घाला एनआरसी आणा वगैरे मागण्या त्यांनी केल्या आहेत. खासदार परवेश सिंग यांसारख्या अनेक भाजप समर्थकांनी तर राष्ट्रपती राजवटीची मागणी लावून धरली आहेच.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: