क्वारंटाइन

क्वारंटाइन

एका सफाई कर्मचाऱ्याकडून एका डॉक्टरला प्लेगच्या दिवसांमध्ये प्रेरणा कशी मिळाली, ही सांगणारी राजिंदर सिंह बेदी यांनी १९४० मध्ये लिहिलेली ‘प्लेग आणि क्वारंटाइन’ ही कथा. राजिंदर सिंह बेदी, हे सादत हसन मंटो आणि कृष्णन चंदर यांच्या समकालीन लेखक होते. त्यांनी मुघले आझम आणि देवदास यांसारख्या अनेक चित्रपटांचे संवाद लेखन केले आहे.

कर्नाटकातील बंडाळी
अनीताची कहाणी – चोहीकडे नुसतंच पाणी
‘काश्मीर : शैक्षणिक संस्थांमधील माध्यमबंदी उठवा’

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या आणि आजूबाजूच्या प्रत्येक वस्तुला आंधळं करून सोडणाऱ्या धुक्या सारख्याच प्लेगच्या भितीनेही आपले पाय चौफेर पसरले होते. नगरातल्या प्रत्येकाचाच त्याच्या नावाने थरकाप व्हायचा.

राजिंदर सिंह बेदी

राजिंदर सिंह बेदी

प्लेग तर भयंकर होताच पण क्वारंटाइन त्याच्या पेक्षाही भयावह होतं. लोक प्लेगने जितके घाबरले नव्हते, जितके ते क्वारंटाइनने घाबरलेले होते. आणि याच कारणाने आरोग्य विभागाने नगरातील लोकांना उंदरांपासून वाचण्यासाठी, जी पुरुषभर उंचीची जाहिरात छापून प्रत्येक दरवाजा, सडक आणि चौरस्त्यात लावली होती, त्यावर ‘ना उंदीर ना प्लेग’च्या, नाऱ्याला पुढे वाढवत, ‘ना उंदीर ना प्लेगच्या सोबतच नाही क्वारंटाइन’ हेही लिहून टाकले होते.

क्वारंटाइन बद्दल लोकांमध्ये असलेली भिती योग्यही होती. एक डॉक्टर या नात्याने माझे या विषयावरील मत ठाम आहे आणि मी हे दाव्याने सांगू शकतो, की नगरामध्ये जितके मृत्यु क्वारंटाइनने झाले होते, तितके प्लेगमुळे झाले नव्हते. क्वारंटाइन जरी कुठला आजार नसला, तरी हे एका अशा इमारतीचे नाव आहे, ज्यामध्ये महामारीच्या वेळी रोग्यांना नीरोगी लोकांपासून कायदेशीररीत्या वेगळे ठेवले जाते, जेणेकरुन आजार पुढे पसरू नये.

क्वारंटाइनमध्ये जरी डॉक्टर आणि नर्सेसची व्यवस्था केली गेली होती, तरी वाढलेल्या रोग्यांची वैयक्तिक काळजी घेणे अशक्य होते. बऱ्याचशा रोग्यांना त्यांचे नातेवाईक जवळ नसल्याने, हिम्मत हरताना मी पाहिले आहे. खूप साऱ्या रोग्यांनी आसपासचे रोगी मरत असताना पाहून मरणाआधीच मरण अनुभवलं. कधी कधी तर असं व्हायचं, की जर एखादा व्यक्ती जुजबी आजारी असेल, तरी तो त्या महामारीच्या वातावरणामुळेही जीव सोडून द्यायचा. एकाच वेळी मृतांची संख्या वाढल्यामुळे त्या मृतांचा अंत्यविधीही क्वारंटाइनच्या कायदे नियमांनीच व्हायचा. म्हणूनच त्या शेकडो मृत शरीरांना कुत्र्याच्या शवाप्रमाणे ओढत नेऊन एक मोठा ढीग बनवला जायचा आणि कोणत्याही प्रकारचे धार्मिक संस्कार न करता पेट्रोल टाकून आगीच्या स्वाधीन केलं जायचं. संध्याकाळी जेंव्हा सूर्य बुडत असायचा आणि त्याची लालिमा त्या जळत असलेल्या आगीच्या ज्वाळांमध्ये मिसळायची, तेंव्हा दुरून नगरामधून पाहणाऱ्या रोग्यांना वाटायचे, की पूर्ण जग पेट घेत आहे.

क्वारंटाइनमध्ये मृतांची संख्या यामुळेही वाढली, कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीमधे रोगाची लक्षणे दिसू लागत तेव्हा त्याचे कुटुंबीय ते लपवून ठेवायला लागत, जेणेकरुन रोग्याला जबरदस्तीने क्वारंटाइनसाठी नेण्यात येऊ नये. प्रत्येक डॉक्टरला हे निर्देश देण्यात आले होते, की त्यांना रोग्याबद्दल कळताच क्वारंटाइनसाठी निरोप द्यावा. याचमुळे लोक डॉक्टरांकडून उपचारही करून घेत नसत. एखाद्याच्या घरी महामारी आहे, हे तेंव्हाच कळायचे, जेंव्हा त्या घरुन रडण्याचा आवाज किंवा मृत शरीर निघायचे.

त्या दिवसांत मी क्वारंटाइनमधे एक डॉक्टर म्हणून काम करत होतो. प्लेगच्या भीतीने माझ्या मन आणि मेंदूवरही ताबा घेतला होता. संध्याकाळी घरी आल्यावर, मी बर्‍याच काळपर्यंत कार्बोलिक साबणाने माझे हात धुवायचो आणि दुसर्‍या एका औषधाने गुळण्या करायचो, नाहीतर पोट जळण्यासारखी गरम कॉफी किंवा ब्रँडी प्यायचो. यामुळे मला निद्रानाश आणि डोळ्यांची तक्रार झाली. खूप वेळेस तर मी उलटीचे औषध घेऊन पोट साफ करायचो. गरम कॉफी किंवा ब्रँडी पिल्याने, पोटात आग व्हायची आणि ताप वाढून मेंदूपर्यंत पोहोचायची आणि मग मी एखाद्या समजदार व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे निदान लावायचो. घशात जर थोडीशी खवखव जाणवली, तर मला असे वाटायचे की ही प्लेगची लक्षणे आहेत आणि मीही या प्राणघातक आजाराला बळी पडनार… प्लेग! आणि मग …क्वारंटाइन!

त्या दिवसांत, नवीन ख्रिश्चन बनलेला आणि माझ्या गल्लीमध्ये साफसफाईचे काम करणारा विल्यम भागू खकरूब माझ्याकडे आला आणि म्हणाला, “बाबूजी … भयानक झालं आहे.” आज, रुग्णवाहिका आजूबाजूच्या परिसरातून एकवीस रोग्यांना घेऊन गेली. ”

“एकवीस? रुग्णवाहिकेत…? ” आश्चर्याने माझ्या तोंडून हे शब्द गेले.

“हो … संपूर्ण एकवीस … त्यांनाही क्विंटन (क्वारंटाइन) ला नेले जाईल … अरेरे! ते बेचारे आता कधीच परत येणार नाहीत? ”

थोडया विचारपुशी नंतर मला कळले, की भागू रात्री तीन वाजता उठतो. पावभर मद्यप्राशन करून समितीच्या निर्देशानुसार रस्त्यावर व नाल्यांमध्ये चुना लावण्यास सुरुवात करतो, जेणेकरून साथीचा रोग पसरू नये. मला भागूने सांगितले की त्याचे रात्री तीन वाजता उठन्याचे कारण हे ही होते, की बाजारात आणि नाल्यांमध्ये पडलेले मृतदेह गोळा करणे आणि आजारपणाच्या भीतीने घराबाहेर पडत नसलेल्या लोकांची किरकोळ कामे करणे. भागूला कोणत्याही आजाराची भीती नव्हती. तो म्हणायचा की मृत्यूपासून कोणीही पळून जाऊ शकणार नाही. तुम्ही कुठेही गेलात, तरी तो तुम्हाला गाठेलच!

त्या काळी, जेव्हा कुणीही कुणाच्या आसपास फिरकायचे नाही, त्या काळात भागू डोक्यावर आणि तोंडावर कापड बांधुन न घाबरता लोकांची सेवा करीत होता. जरी तो शिकलेला नव्हता, तरीही तो एखाद्या जाणकार व्यक्तीप्रमाणे रोग्यांना आजारापासून वाचण्याचे उपाय सांगायचा. तो लोकांना स्वच्छता राखण्याचे, बाहेर न निघण्याचे सल्ले द्यायचा. एक दिवस मी त्याला लोकांना अधिक मद्यपान करण्याचा सल्ला देताना पाहिला. त्यादिवशी जेव्हा तो माझ्याकडे आला, तेव्हा मी विचारले, “भागू, तुला प्लेगची भीती वाटत नाही?”

“नाही बाबूजी… माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही इतके मोठे डॉक्टर आहात, हजारो रूग्ण तुमच्याकडून बरे होऊन जातात. पण जेव्हा माझ्यावर उपचार करण्याची वेळ येईल तेव्हा तुमच्याही औषध पाण्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. हो बाबूजी… तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी खरंच सांगतोय.” आणि मग गोष्टींचा रोख बदलत बोलला, ” मला काहीतरी सांगा बाबूजी … कोन्टीनबद्दल. ”

“तिथे हजारो रूग्ण क्वारंटाइनमधे ठेवण्यात आले आहेत. आम्ही शक्य तितका त्यांच्यावर उपचार करतो. परंतु कुठपर्यंत, जे लोक माझ्याबरोबर काम करतात त्यांनाही बराच काळ रूग्णांसोबत रहाण्याची भीती वाटते. भीतीमुळे त्यांचा गळा कोरडा पडतो. मग तुझ्याप्रमाणे कोणी रुग्णाच्या तोंडाला तोंड लावत नाही. ना तुझ्यासारखा कोणी त्यांना जीव लावतो … भागू! देव तुझं कल्याण करो. कारण तू माणसांची अशा प्रकारे सेवा करतोस.”

मान खाली घालून तोंडावर बांधलेला गमछा बाजूला करत मद्यपानाने लाल झालेला चेहरा दाखवत, भागू म्हणाला, “बाबूजी, माझी काय पात्रता. माझ्याकडून कुणाचे कल्याण होत असेल? माझं हे शरीर जर कोणत्या कामी येत असेल, तर यापेक्षा चांगली बाब काय असेल. बाबूजी, चर्चचे मोठे पाद्री लाबे (रेव्हरंड मोनित लाम, अबे), जे नेहमी आमच्या शेजारी प्रचारासाठी येतात, सांगतात, की परमेश्वर इसामसिह हेच शिकवतात, की रोग्यांची सेवा मन लाऊन करा… मला वाटते… ”

भागूच्या धैर्याचे मला कौतुक वाटले पण भावनिक झाल्यामुळे मी ते व्यक्त करू शकलो नाही. त्याचा आत्मविश्वास आणि दारूने व्यापलेले जीवन पाहून माझ्या हृदयात त्याच्याविषयी करुणा निर्माण झाली. मी मनापासून ठरवलं, की आज क्वारंटाइनमधे  मी मन लाऊन काम करुन बर्‍याचशा रुग्णांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेन. मी त्यांना आराम मिळावा म्हणून जीवापाड प्रयत्न करीन. पण बोलणे आणि करणे यात खूप मोठा फरक आहे. प्रत्यक्षात क्वारंटाइनमधे रुग्णांची स्थिती पाहून आणि त्यांच्यापासून होणाऱ्या संसर्गाच्या भीतीने माझा थरकाप उडाला आणि भागुची बरोबरी करण्याची माझी हिम्मत झाली नाही.

तरीही त्या दिवशी मी भागुला सोबत घेऊन क्वारंटाइनमधे बरीच कामे केली. जे काम रूग्णाच्या अगदी जवळ जाऊन करायचे होते ते मी भागूकडून करुन घेतले आणि त्याने हे न डगमगता केले… मी स्वत: रूग्णांपासून खूप दूर राहत होतो, कारण मला मृत्यूची भीती वाटत होती आणि मुख्य म्हणजे क्वारंटाइनची.

मग भागु काय मृत्यू आणि क्वारंटाइनच्या पलिकडे पोचला होता?

त्यादिवशी सुमारे चारशे रूग्ण क्वारंटाइनमधे दाखील झाले आणि जवळपास अडीचशे जण मृत्यु पावले!

ही भागुची हिंमतच होती की मी बर्‍याच रुग्णांना बरे करू शकलो. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कक्षात रुग्णांच्या आरोग्याची सरासरी दर्शविण्यासाठी जो नकाशा लटकवला गेला होता, त्या अंतर्गत मी बरे केलेल्या रुग्णांची सरासरी रेषा मला वाढलेली दिसायची. दररोज मी काहीतरी कारणाने त्या खोलीत जात असे आणि ती रेषा शंभर टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत असे.

एक दिवस मी जास्त प्रमाणात ब्रांडी प्याली. माझे हृदय धडधडू लागले. नाडी घोड्यासारखी पळायला लागली आणि मी वेड्यासारखे वागायला लागलो. मला अशी शंका येऊ लागली की प्लेगच्या अळीने शेवटी माझ्यावर परिणाम केला आहे आणि लवकरच माझ्या घश्यावर किंवा मांडीवर गोळे दिसू लागतील. मला खूप भिती वाटली. त्या दिवशी मला क्वारंटाइनपासून पळून जावेसे वाटले. कारण जितका वेळ मी तिथे थांबलो तितका वेळ प्लेगच्या भीतीने कापत होतो. त्या दिवशी मला भागू फक्त दोन वेळेसच दिसला.

दुपारच्या सुमारास मी त्याला एका रुग्णाला कवटाळून नेत असताना पाहिले. तो खूप प्रेमाने त्या रुग्णाचे हात थोपटत होता. रुग्ण सर्व ताकदीनिशी बोलला, “भाऊ, तो परमेश्वरच मालक आहे आणि परमेश्वराने अशी वेळ शत्रुवरही आणू नये. माझ्या दोन मुली … ”

भागू त्याला थांबवत बोलला, “त्या परमेश्वर इसामसिहाचे धन्यवाद मान भाऊ … तूम्ही तर चांगले दिसत आहात.”

“हो भाऊ देवाचे आभार मानतो … मला आधीपेक्षा बरे वाटत आहे. पण मी क्वारंटाइन… ”

अजुन हे शब्द त्याच्या तोंडातून निघत होते, की त्याच्या नसा ताणल्या गेल्या. त्याच्या तोंडातून कफ येऊ लागला. डोळे दगडासारखे झाले. बरेच झटके आले आणि जो रोगी एका क्षणाआधी चांगला दिसत होता, कायमचा शांत झाला. भागूने त्याच्या मृत्यूवर रक्तअश्रू ओतले. कोणी त्याच्या मृत्युवर अश्रू वाहिले असते? एक भागुच सर्वांचा नातेवाइक होता. ज्याच्या मनामधे सर्वांसाठी दुःख आणि करुणा होती. एक दिवस परमेश्वर इसामसिहकडे जाऊन त्याने आग्रह केला, की मानवाच्या सगळ्या गुन्ह्याच्या बदल्यात भागुला घेऊन जावे आणि मानवाला माफ करावे.

त्याच दिवशी संध्याकाळी भागू माझ्याकडे धावत आला.अतिशय वेदनेने भरलेल्या आवाजात, विव्हळत तो म्हणाला, “बाबूजी … हे क्वारंटाइन नरक आहे. “पादरी लेबे या प्रकारच्या नरकाचाच नकाशा काढत असत… ”

मी म्हणालो, “हो भाऊ, हे नरकापेक्षा जास्त आहे … मी इथून पळून जाण्याचा विचार करीत आहे … आज माझी प्रकृती खूपच खराब आहे.”

“बाबूजी, त्याखेरीज आणखी काय असू शकते … आज आजाराच्या भीतीपोटी बेहोश झालेला एक रुग्ण, त्याला मृतदेह समजून, एका व्यक्तीने त्याला मृतदेहाच्या ढिगाऱ्यात टाकून त्याच्यावर पेट्रोल शिंपडले गेले आणि आगिने पेट घेताच तो रुग्ण आगीच्या चटक्यांनी हात- पाय मारायला लागला, त्याला आगीत हात मारताना पाहून मी आगीत उडी मारली आणि उचलले. बाबूजी! तो खूप जास्त जळला होता …माझा उजवा हात त्याला वाचवताना पूर्णपणे जाळून गेला आहे. ”

भागूची बाजू मी पाहिली, त्याच्यावर फिकट पिवळ्या रंगाची चरबी दिसत होती. त्याला पाहून मला धक्का बसला. मी विचारले, “माणूस जिवंत आहे का?” मग…? ”

“बाबूजी… तो खूप सभ्य माणूस होता. ज्यांचा चांगुलपणा आणि माणुसकी (शराफत) जगाचा फायदा करू शकली नाही, अशा दु: खाच्या स्थितीतही त्याने आपला जळलेला चेहरा वर उचलला आणि माझ्याकडे पाहून माझे आभार मानले. ”

“आणि बाबूजी …” भागु आपले बोलणे चालू ठेवत म्हणाला, “काही काळानंतर, त्याला इतका असह्य्य त्रास झाला, की आजपर्यंत मी कोण्या रुग्णाला मरणापूर्वी इतका त्रास सहन करताना पाहिले नव्हते… त्यानंतर त्यांचे निधन झाले. त्या वेळीच मी त्याला जर जळू दिले असते तर किती छान झाले असते. त्याला वाचवून, मी त्याला खूप त्रास सहन करण्यासाठी जिवंत ठेवले आणि मग तो वाचलाही नाही. आता जळलेल्या हातांनी मी त्याला पुन्हा त्याच ढिगाऱ्यात फेकुन आलो आहे. ”

यानंतर भागू काही बोलू शकला नाही. तो स्वतःच्या जखमांकडे पाहून बोलला, “तुम्हाला माहित आहे … कोणत्या आजारामुळे … त्याचा मृत्यू झाला?” प्लेगपासून नाही … क्वारंटाइन…क्वारंटाइनमुळे! ”

जरी या नरकासारख्या वातावरणात लोक शक्य तितक्या आरामात आणले जात होते, परंतु मध्यरात्री जेव्हा घुबडही बोलण्यास कचरले असते, तेव्हा शहरातील ते वेदनादायक वातावरण माता, बायको, बहीण आणि मुलं यांच्या आवाजाने भरून निघायचे. जेव्हा माझ्यासारख्या लोकांवर या सर्व गोष्टींचे इतके ओझे होते, तर ज्यांच्या घरात आजारी लोकं आहेत आणि जे सर्व मार्गाने हताश झाले होते अशा लोकांची स्थिती काय असेल? आणि त्याउलट, क्वारंटाइनचे रुग्ण ज्यांना हताशे मुळे यमराज येताना दिसायचा, ते जीवनाला असे कवटाळून बसले होते, जसे एखादा व्यक्ती वादळाला भिऊन झाडाच्या शेंड्यावर बसावा आणि पाण्याच्या जोरात लाटा त्या शेंड्यापर्यंत पोहंचून त्यांनी त्याला बुडवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करावा.

त्या भितीमुळे मी रोजच्या प्रमाणे क्वारंटाइन केंद्रातही गेलो नाही. काही महत्त्वाच्या कामांचे कारण सांगून जाणे टाळले, जरी मी खूप विचलित झालो होतो, पण माझ्या मदतीने एखाद्या रुग्णाला त्याचा फायदा मिळाला असता.परंतु प्लेग आणि क्वारंटाइनच्या भीतीने माझ्या मनावर आणि मेंदूवर अधिराज्य केले होते. संध्याकाळी झोपताना मला कळले, की आज संध्याकाळी पाचशेहून अधिक रुग्ण क्वारंटाईनमध्ये पोहोचले आहेत.

पोटाला जाळेल अशी गरम कॉफी पिऊन मी झोपायला लागलो होतो, की दरवाज्यातून भागूचा आवाज आला. नोकराने दार उघडले तेव्हा भागू दमून म्हणाला, “बाबू जी … माझी पत्नी आजारी आहे … तिच्या घशात गोळे आले आहेत … देवासाठी तिला वाचवा … तिचे दीड वर्षाचे बाळ आहे दूध पिते, तेही संपेल. ”

कोणतीही सहानुभूती व्यक्त न करता, मी त्याला विचारले, “यापूर्वी का येऊ शकला नाहीस … का ती आत्ताच आजारी पडली आहे?”

“सकाळी थोडा ताप आला होता … जेव्हा मी कोन्टीनला गेलो होतो …”

“बरं… ती घरी आजारी होती.. आणि तरीही तू क्वारंटाइनमध्ये गेला होतास?”

“हो बाबूजी…” भागू थरथरत म्हणाला. “ती जरा आजारी होती. मला वाटले की कदाचित दूध कमी झाल्यामुळे ती आजारी पडली असेल… दुसरे काहीही कारण नव्हते… मुख्य म्हणजे माझे दोन्ही भाऊ ही घरीच होते…आणि शेकडो रुग्ण क्वारंटाइनमध्ये असह्य होते… ”

“म्हणजे, आपल्या रुग्णांप्रती असलेल्या अति-दयाळूपणामुळे तु आजार आपल्या घरात आणला आहेस. मी तुला वारंवार सांगुनही, की रुग्णांच्या इतके जवळ जाऊ नको… बघ, आज त्याचमुळे मी तेथे गेलो नाही. ही सर्व तुझी चूक आहे. आता मी काहीही करू शकत नाही तुझ्यासारख्या जवानाने स्वतःच्या आयुष्याचा आनंद उपभोगला पाहिजे. जेंव्हा शहरात शेकडो रुग्ण पडून आहेत… ”

भागू मनापासून म्हणाला, “पण परमेश्वर यशू मसिह आहे …”

“चल हट्ट… मोठा आलास …तू मुद्दाम आपला हात आगीत टाकला आहेस.” आता त्याची शिक्षा मी का घेऊ? याला त्याग म्हणत नाहीत. इतक्या रात्री मी तुझी काहीच मदत करू शकत नाही…”

“चल … जा … पादरी लाम, अबे काही करतात का बघ…”

भागू मान खाली घालून निघून गेला. अर्ध्या तासानंतर, जेव्हा माझा राग शांत झाला, तेंव्हा मला माझ्या कृतीची लाज वाटू लागली. मी शहाणा नव्हतो ज्यामुळे नंतर अस्वस्थ झालो होतो. माझ्यासाठी सर्वात मोठी शिक्षा हीच होती, की मी माझा अभिमान बाजूला ठेवून भागूसमोर माझ्या आत्ताच्या कृतीबद्दल खेद व्यक्त करून, त्याच्या बायकोचे मनापासून उपचार करावेत. मी पटकन कपडे घालून धावतधावत भागूच्या घरी पोहचलो … तिथे पोचल्यावर मला दिसले की भागूचे दोन्ही धाकटे भाऊ त्यांच्या भावाच्या बायकोला बाजेवरून घेऊन जात आहेत … मी भागूला विचारले, “ते कुठे घेऊन जात आहेत?” भगुने हळूच उत्तर दिले, ” कोन्टीनला…”

“मग तुला आता क्वारंटाईन नरक वाटत नाही का … भागू?”

“तुम्ही येण्यास नकार दिला, बाबूजी … आणि दुसरा काय उपाय होता.” मला वाटले की तिथे डॉक्टरची ही मदत मिळेल आणि इतर रुग्णांचीही मी काळजी घेईन. ”

“बाज इथे ठेवा … इतर रूग्णांचा विचार आजुनही तुझ्या मनातून गेला नाही …?” मूर्ख… ”

खाट ठेवली गेली आणि माझ्याकडे जे  काही उत्तम औषध  होते, मी भागूच्या पत्नीला दिले आणि मग मी माझ्या शत्रूशी स्पर्धा करण्यास सुरुवात केली ज्याचे नाव प्लेग होते. भागूच्या पत्नीने डोळे उघडले.

भागू भावूकपणे म्हणाला, “बाबूजी, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.”

मी म्हणालो, “माझ्या पूर्वीच्या वागण्याबद्दल मला खेद आहे … परमेश्वर … तुमच्या सेवेचे फळ तुमच्या बायकोला ठीक करून देवो. ‘

त्याच वेळी, मी माझा शत्रू असलेल्या आजाराला आपली शेवटची युक्ती वापरताना पाहिले. भागूच्या बायकोचे ओठ फडफडू लागले. माझ्या हातात असलेली नाडी कमी होऊन खांद्याकडे सरकू लागली. मी हारत होतो आणि आजार जिंकत होता. मी पूर्ण पणे हरलो होतो. मी शरमेने मान खाली घातली आणि म्हणालो, “भागू! अभागी भागू! तुला आपल्या त्यागाचे विचित्र फळ मिळाले आहे … अरेरे!”

भागू रडू लागला.

ते दृश्य किती वेदनादायक होते, जेव्हा भागूने आपल्या छोट्याश्या मुलाला त्याच्या आईपासून कायमचे वेगळे केले आणि मला परत पाठऊन दिले.

मला वाटलं की आता दुःखाच्या अंधारात सापडल्यानंतर भागू कुणाचीही काळजी घेणार नाही… पण दुसर्‍याच दिवशी मी त्याला उठताना आणि रूग्णांची सेवा करताना पाहिलं. त्याने शेकडो घरे निराधार आणि अनाथ होण्यापासून वाचवली … आणि स्वतःचे आयुष्य अनावश्यक मानले. मी सुद्धा भागूकडून प्रेरणा घेऊन परिश्रम घेतले. क्वारंटाइन व रूग्णालयांतून मुक्त झाल्यानंतर माझ्या उर्वरित वेळेत मी शहरातील गरीब लोकांकडे घरोघरी गेलो, जे गटाराशेजारी घाणीच्या घरात राहत होते.

काही दिवसांत वातावरण आजारापासून पूर्णपणे मुक्त झाले. शहर पूर्णपणे धुऊन काढले गेले होते. उंदराचे कोठेही निशाण दिसत नव्हते. जर शहरात एखादे प्रकरण आढळले तर त्यावर  त्वरित लक्ष दिले जायचे ज्यामुळे रोग वाढण्याच्या सर्व शक्यता नष्ट झाल्या होत्या.

शहरातील व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू झाले. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये उघडण्यास सुरवात झाली.

एक गोष्ट माझ्याही लक्षात आली , ती म्हणजे मी बाजारातून निघालो की सर्व बाजूंनी लोकं माझ्याकडेच निर्देश करायचे. लोक कृतज्ञ नजरेने माझ्याकडे पहात असत. माझा फोटो कौतुकाने वृत्तपत्रांत छापला होता. चारही बाजूंनी होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावाने माझ्या हृदयात थोडासा अभिमानही निर्माण झाला.

शेवटी, मग एक मोठा कार्यक्रम ठेऊन, ज्यामध्ये शहरातील महान आणि श्रीमंत लोक आणि डॉक्टरांना आमंत्रित केले होते आणि अध्यक्षस्थानी वजीर-ए-बलदियात होते, माझ्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केल्यामुळे मला अध्यक्षाशेजारी बसवले गेले. फुलांच्या माळांनी माझी मान वाकली होती. मला आपले व्यक्तिमत्त्व खूप खास असल्याचे लक्षात आले. मी तिथून अभिमानाने कधी इथे तर कधी तिकडे बघायचो … मानवतेची सेवा केल्याबद्दल समिती मला एक हजार रुपयांचे बक्षीस देत होती.

उपस्थित सर्व लोक, प्रत्येकाने माझ्या सहकार्यांचे आणि विशेषत: माझे कौतुक केले आणि सांगितले, की माझ्या परिश्रम आणि प्रयत्नातून वाचलेल्या जीवांची संख्या मागील साथीमध्ये समाविष्ट केलेल्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे. मी दिवस आणि रात्र एकसुद्धा न पाहता, माझे आयुष्य समाजाचे जीवन मानले आणि माझी संपत्ती साथीच्या रोग्यांसाठी वापरली. साथीचा संसर्ग झालेल्या ठिकाणी पोहोचून मरणाऱ्या रूग्णांवर उपचार केले, त्यांना औषधोपचार दिले!

टेबलाच्या डाव्या बाजूला उभे असलेल्या वजीर-ए-बलदियातने हातात एक पातळ काठी घेतली आणि तेथील लोकांशी बोलताना त्याने आपले लक्ष भिंतीवर टांगलेल्या नकाशाकडे वळवले, ज्यामध्ये दररोज निरोगी होत असलेल्या रुग्णांचा आलेख वरच्या बाजूस सरकत राहिला होता. शेवटी, त्याने नकाशामध्ये हा दिवस दाखविला ज्या दिवशी चोपन्न (५४) रूग्ण माझ्या देखरेखीखाली होते आणि जे सर्व ठीकही झाले. म्हणजेच निकाल १०० टक्के यशस्वी झाला आणि माझ्या यशाची ती रेखा सर्वात उच्च स्थानी पोहोचली.

यानंतर वजीर-ए-बलदियात यांनी आपल्या भाषणात माझ्या धैर्याचे खूप कौतुक केले आणि सांगितले, हे जाणून लोकांना खूप आनंद होईल की बक्षी यांना त्यांच्या सेवेच्या बदल्यात लेफ्टनंट कर्नल बनवले जात आहे .

संपूर्ण सभागृह टाळ्यानी आणि आवाजाने भरून निघाले होते.

त्या टाळ्याच्या आवाजाच्या वेळी मी मान वर काढली. समितीचे अध्यक्ष आणि उपस्थित लोकांचे आभार मानून मी एक मोठे भाषण केले. ज्यामध्ये मी सांगितले की डॉक्टरांचे लक्ष फक्त रुग्णालये आणि क्वारंटाईन पुरतेच मर्यादित नव्हते, तर गरीब लोकांच्या घराकडेही होते. कारण ज्या लोकांना स्वत: ला मदत करणे शक्य झाले नाही आणि ते या साथीचे बळी ठरले. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी हा रोग वाढविणाऱ्या जागेचा शोध घेतला आणि आमचे लक्ष हा रोग मुळापासून काढून टाकण्यावर केंद्रित केले. क्वारंटाईन व रुग्णालय सोडून आम्ही आशा भयानक ठिकाणीही रात्री घालवल्या.

त्याच दिवशी, जेव्हा मी लेफ्टनंट कर्नल म्हणून ताठ मानेने, हाराने भरलेल्या मानेला उंच करत, लोकांनी दिलेली एक हजार आणि एक रुपयांची छोटी भेट घेऊन घरी पोचलो तेव्हा एका बाजूनं दबलेल्या आवाजात हाक आली. “बाबूजी … खूप खूप शुभेच्छा.”

भागूने अभिनंदन करताना त्याचा तोच जुना झाडू, त्या घाणेरड्या नळीच्या आवरणावर ठेवला आणि दोन्ही हातांनी गमछाची गाठ सोडली. मी तिथे स्तब्ध होऊन उभा राहिलो.

“तू आहेस …?” भागू भाऊ! मी मोठ्या अदबीने म्हणालो… “जग तुला ओळखत नसेल तर ना सही, मला माहित आहे, तुझ्या येशूला माहित आहे… पादरी लाम, अबेचे महान शिष्य…परमेश्वराचे तुझ्यावर आशीर्वाद राहतील…! ”

त्यावेळी माझा घसा कोरडा झाला. भागूची मरण पावणारी पत्नी आणि मुलाचे चित्र माझ्या डोळ्यांत तरळले. हारांच्या ओझ्यामुळे माझी मान तुटते आहे आणि पैशाच्या ओझ्यामुळे माझा खिसा फाटतो आहे असे वाटले. इतका आदर मिळाल्यानंतरही मला अपमानित झाल्यासारखे झाले आणि या मान दीलेल्या जगाचा शोक करू लागलो!

मुळातील उर्दू कथेचा ठकु पुजारी यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. त्या टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई येथे कार्यक्रम व्यवस्थापक (प्रोग्राम मॅनेजर) आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0