मित्राचे घर कुठे आहे?

मित्राचे घर कुठे आहे?

अब्बास कियारोस्तामी म्हणाले होते, "माझ्या पहिल्या चित्रपटापासून माझा हा कटाक्ष असतो की मी कोणती गोष्ट सांगत नसतो. मी काही दाखवू इच्छितो. प्रेक्षकांनी ते बघितल्यावर, त्यातून त्यांनी स्वतः गोष्ट शोधावी."

म. प्रदेश गृहमंत्र्याचा मंगळसूत्राच्या जाहिरातीवर आक्षेप
चीन कम्युनिस्ट पार्टीची शक्तिशाली यंत्रणांमध्ये ‘घुसखोरी’?
लडाखमध्ये नव्या भागात भारत-चीन सैन्य भिडले

समजा की तुम्ही शाळेत जाणारा आठ वर्षाचा मुलगा आहात. एका कडक शिक्षकाने गृहपाठ देऊन, जर करून नाही आणला तर मोठी शिक्षा होईल, असे बजावले आहे. गृहपाठ करायला बसल्यावर तुमच्या लक्षात येतं की तुमच्या वहीबरोबर वर्गमित्राची वही चुकून तुमच्याकडे आलेली आहे. तर अशाप्रसंगी तुम्ही काय कराल ???
या प्रश्नांच्या अवतीभवती एक अख्खा चित्रपट अब्बास कियारोस्तामी या प्रतिभावान दिग्दर्शकाने  गुंफला आहे. त्याचं नाव आहे. Where is the Friend’s Home? ( मित्राचे घर कुठे आहे ?)
१९८७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने मोठा बदल जागतिक चित्रपटसृष्टीत घडवून आणला. एक तर या चित्रपटामुळे कियारोस्तामीच्या कामाची आणि इराणी चित्रपटांची दखल जागतिक सिनेमासृष्टीला घेणे भाग पाडले.

अब्बास कियारोस्तामी

अब्बास कियारोस्तामी

इराणचा इतिहास हा वैविध्यपूर्ण घटनांनी भरलेला, सतत बदलणारी सत्तेची गणित, उलटसुलट मतप्रवाहाने ढवळलेले सामाजिक जीवन, इस्लामी आक्रमक कट्टरता यामुळे एकंदरीतच इराणकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन हा काहीसा कलुषित होता. इराणला स्वतःचा असा वास्तुशास्त्र, कला, तत्वज्ञान, संगीत, काव्य, परंपरा यांचा समृद्ध वारसा आहे. इराणची ही समृद्ध बाजू जगासमोर फारशी आलेली नव्हती. इराणी सिनेमाने आपला सांस्कृतिक ठसा, तिथले जनजीवन याची ओळख करून दिली. समाजजीवनाचे अंतरंग इराणी सिनेमाद्वारे जगाला समजू लागले, भावू लागले. इराणी सिनेमाची दखल आदराने घेतली जाऊ लागली. त्याचे मोठे श्रेय जाते अब्बास कियारोस्तामी यांना.

अब्बास कियारोस्तामी हे ‘नव्या लाटे’तील मान्यवर दिग्दर्शकांपैकी एक. महायुद्धानंतर, जागतिक मंदीच्या सुमारास नववास्तववादाची मोठी लाट आली. त्याचे जागतिक स्तरावर परिणाम दिसून आले. पण नववास्तववादाचे जे रूप जगाला माहिती आहे, त्यापेक्षा त्यांची अजून विविध रूपं आहेत. यावर कियारोस्तामी याचा ठाम विश्वास होता. ती रूपं दाखवण्यात कियारोस्तामीचा अधिक रस होता.

कियोरोस्तामी हरफनमौला होते. चित्रकार, जाहिरात क्षेत्रातील नावाजलेले कमर्शियल आर्टिस्ट, स्टील फोटोग्राफर, पटकथा लेखक, फिल्म एडिटर, कला-निर्देशक, डॉक्युमेंटरी – निर्माता आणि मुख्य म्हणजे उत्तम कवी. कियारोस्तामीच्या भावविश्वात लहान मुलांचे मोठे स्थान होते. त्यांनी लहान मुलांना घेऊन १९७०ला ‘ ब्रेड ॲण्ड ॲली’  हा लघुपट आणि १९७४ला ‘ ट्रॅव्हलर’ असे दोन चित्रपट केले. त्यातील ‘ब्रेड ॲण्ड ॲली’ हा चित्रपट अभ्यासक्रमाच्या वर्गात आवर्जून दाखवला जातो.

‘मित्राचे घर कुठे आहे?’ या चित्रपटावर बालचित्रपटाचा शिक्का मारण्याची चूक करू नका. या चित्रपटाची व्यक्त होण्याची शैली, त्यातील अवकाश, एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाताना दिला गेलेला योग्य वेळ, पार्श्वसंगीत, विविध व्यक्तिरेखा हे सर्व घटक आपल्याला नकळत मर्मज्ञ अभ्यासक बनवतात.
कथानक – सुरवातीला शाळेतील एका वर्गाचे निळ्या रंगाचे वाऱ्याने हलणारे दार दिसते. पार्श्वभूमीवर मुलांचे बोलण्याचे, मस्ती करत असल्याचे आवाज ऐकू येतात. आणि धाडकन शिक्षक वर्गात प्रवेश करतात. मुलं घाईगडबडीत बाकावर बसतात. तेव्हा शिक्षक त्यातील एका मुलाला, अहमदला विचारतात, “तू सुद्धा मस्ती करत होतास? तू शहाणा मुलगा आहेस ना!” आपली अहमदची ओळख होते. व्यवस्थित, नीटनेटका, बोलक्या डोळ्याचा अहमद हा चित्रपटाचा नायक. शिक्षक गृहपाठ तपासायला सुरवात करतात. अहमदची वही तपासल्यावर, त्याच्या शेजारील मुलाची नेहमतजादेची वही तपासत असतांना शिक्षकांचा आवाज सप्त स्वरात ऐकायला येतो. कारण नेहमतजादेने गृहपाठ तर केलेला असतो पण चुकीच्या वहीत. म्हणून चिडून शिक्षक टर्रकन त्याची वही फाडून टाकतात. शिक्षकांचे ओरडणे आणि नेहमतजादेचे रडणे यात अहमद कावराबावरा होतो. शिक्षक अहमदची नीटनेटकी वही वर्गाला दाखवून, काम कसे व्यवस्थित करावे हे सांगतात. दुसऱ्या दिवशीचा गृहपाठ देत, तंबी भरतात की जो कोणी हलगर्जीपणा करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

अहमद शाळेतून घरी आल्यावर थोड्या वेळाने गृहपाठ करायला बसतो, तेव्हा त्याच्या लक्षात येत की नेहमतजादेची वही आपल्या दप्तरात चुकून आली आहे. अहमदला आता काळजी वाटायला लागते की जर नेहमतजादेला ही वही मिळाली नाही तर उद्या शिक्षक त्याच्यावर मोठी कारवाई करतील. ती वही आपल्या मित्राला परत करायला हवी. पण मित्राचे घर माहिती नसते. इराणच्या कोकर खेड्यात मुलांची शाळा असते. आणि आजूबाजूच्या खेड्यातील मुलं शिकायला तिथे येत असतात.

त्यामुळे नेहमतजादे याचे फक्त नाव अहमदला ठाऊक असते. तो मित्राकडून नेहमतजादेच्या चुलत्याचा पत्ता मिळतो आणि अहमदचा कोकर ते पाश्ते असा सहा-सात किलोमीटर पायी प्रवास सुरू होतो. उंचसखल असा टेकडीतून जाणारा वळणावळणाचा रस्ता आणि पळत जाणारा अहमद. मित्राचे संपूर्ण नाव, गाव माहिती नाही, पण केवळ मित्राला वही मिळावी म्हणून अहमदची धडपड मनाला स्पर्शून जाते. त्याला या प्रवासात वेगवेगळी नमुनेदार माणसं भेटतात. त्याच्या या प्रवासातून आपल्याला उलगडत जाते तिथली संस्कृती, रितीरिवाज, घरांचे विविध आकार, चढ उतारावरील पायऱ्या, जनावरं हे सर्व टिपत असतांना, एकीकडे आपलेही मन व्याकुळ होत, कधी एकदा अहमदला मित्राचे घर मिळेल?

खिडक्या, दारांतून डोकावून मित्राची चौकशी करणारा अहमद एव्हाना आपल्या मनात शिरलेला असतो. परिसरात खूप नेहमतजादे असतात. प्रत्येक वेळी त्यांच्या बरोबरीने आपल्याही आशा पल्लवित होतात, अरे, सापडला बरं का !! पण हा नेहमतजादे हवा असलेला नाही असं समजल्यावर थोडा नाराज झालेला अहमद परत जिद्दीने शोधायला लागतो. तसे आपणही औत्सुक्याने पुढे बघू लागतो. कोकर ते पाश्ते अशा त्याच्या तीन फेऱ्या दाखवल्या आहेत. इतक्या पायपिटीनंतर सुद्धा नेहमतजादेचं घर काही मिळत नाही.

दिवसभर भाबड्या आशेने धावपळ करणारा अहमद रात्रीच्या काळोखाला, कुत्र्याच्या भुंकण्याला घाबरतो. शेवटी दमून भागून आपल्या घरी परततो. वादळाला आणि पावसाला सुरवात होते. दमलेला अहमद अभ्यास करायला बसतो व नेहमतजादेचा अभ्यास स्वतःच करून टाकतो.
दुसरा दिवस. शाळेतील वर्ग भरलेला. नेहमतजादे बाकावर बसलेला पण त्याच्या शेजारील अहमदची जागा रिकामी असते. शिक्षक गृहपाठ तपासायला सुरवात करतात. नेहमतजादे मान खाली घालून बसलेला. सर जवळ जवळ येत असतात. तो अस्वस्थ होत जातो. तितक्यात अहमद वर्गात शिरतो. गृहपाठाच्या दोन्ही वह्या काढतो आणि एक वही मित्राला देतो. शिक्षक नेहमतजादेची वही तपासून सही करतात. तेव्हा वहीमध्ये ठेवलेलं फुल नजरेस पडते, जे कालच्या प्रवासात एका आजोबांनी अहमदला दिलेलं असत. ते फुल अहमदच्या निरागस परिश्रमाच्या फलश्रुतीची ग्वाही देत असते..

आssहा! अशी  आपल्या मनाची अवस्था झालेली असते. वरकरणी साधा विषय वाटला तरी त्यातील प्रत्येक फ्रेम, गोष्ट खूप निराळे अर्थ सांगतात.

शिक्षक वर्गात आल्याबरोबर दरवाजा आणि खिडकी बंद करतात. वर्गाला कोंडवाड्याचे आलेले स्वरूप दर्शवते. शाळा सुटल्यावर मुलाचा मोकळ्या हवेतील चिवचिवाट आणि मुक्त बागडणे, म्हणजे कोंडवाड्यातून सुटका. अहमद आणि नेहमतजादेची मैत्री छोट्या प्रसंगातून व्यक्त होते. घरी जातांना नेहमतजादे पडतो तेव्हा अहमद त्यांचे खाली पडलेले समान गोळा करतो व त्याला नळापाशी घेऊन जातो, त्याची जखम धुतो. अहमदचा चांगुलपणा छोट्याशा कृतीतून अधोरेखित होतो. पुढे मित्रासाठी पायपीट करत असताना विविध स्वभावाच्या लोकांशी गाठीभेटी होतात. त्यातील एक म्हणजे लोखंडी दरवाजा विकणारा विक्रेता. त्याची देहबोलीच त्याच्या उतावळ्या स्वभावाचे दर्शन देते. तो बोलता बोलता अहमदच्या हातातली वही घेतो, त्यातील एक पान टरकवतो, त्यावर ऑर्डर लिहून घेतो. त्याच्या बिनधास्त वही घेण्याने अहमदचा जीव कासावीस होतो. पुढे रात्री उशीरा भेटलेले म्हातारे सद्गृहस्थ, जे पंचक्रोशीतील सर्वांना ओळखत असतात. अगदी अहमद आणि नेहमतजादेच्या घरातील सर्व लोकांना देखील. परंपरेने चालत आलेले नक्षीदार दरवाजे, खिडक्या बनवण्याचा त्यांचा व्यवसाय असतो. नेहमतजादेचे घर दाखवण्यासाठी ते स्वतः अहमद बरोबर निघतात. पण नेहमतजादेचे घर बंद असते. रात्र झालेली असते. अंधार-प्रकाशाचा अप्रतिम वापर इथे केला आहे. त्या छोट्या प्रवासात आपल्याला नक्षीदार खिडक्यांच्या विविध प्रतिमा दिसतात. ते सर्व काम त्या म्हाताऱ्या बाबांनी केलेलं असत. ते नव्या लोखंडी दार- खिडक्या यांच्याबद्दलची कटू भावना अहमदकडे व्यक्त करतात.

जुन्या पद्धतीचे दरवाजे, खिडक्या आता नव्या लोकांना नको आहेत. बेगडी जगाकडे वाटचाल करणाऱ्या नव्या जमान्यात आपल्या शेजारी कोण राहतो ते माहिती नसते. ते शहरी वारं आता खेड्यातही पोहचले आहे, ही त्या बाबांची खंत.

अहमदची निरागस धडपड त्याच्या अनुभवी नजरेतून सुटत नाही. ते बोलता, न बोलता एक छोटंसं फुल अहमदला देतात. अहमदमुळे एक चांगला आशावाद म्हाताऱ्या बाबांना जाणवतो. ते छोटसं फुल म्हणजे चांगली परंपरा. रूढी जीर्ण होतात. त्यावेळीच बाद करायला हव्या. पण परंपरा मात्र चैतन्यमय असतात. त्यातील जिवंतपणा आणि खळखळतेपणा नव्या पिढीकडे सोपावणे इष्ट.

आपल्या मित्राच्या वाटचा गृहपाठ अहमद करायला घेतो, तेव्हा वादळी वाऱ्यामुळे खोलीचा दरवाजा उघडा होतो. बाहेरील वादळाकडे अहमद अभ्यास करतांना थांबून बघतो. ते वादळ आपल्याला अहमदच्या संस्कारी मनातील वादळ दर्शवते. मित्राचा अभ्यास करून, एकप्रकारे तो शिक्षकांची फसवणूकच करणार असतो. हा एक प्रकारचा गुन्हा वाटू शकतो. अहमद हा समंजस, आज्ञाधारक, गुणी मुलगा, त्याच्यासाठी ही लबाडी करणे म्हणजे त्याच्या संस्कारी मनाला मुरड घालून मित्रासाठी सद्भावनेतून केलेली कृती असते. मूल्यांमुळे जगणे उंचावले जायला हवे. त्यासाठी काहीवेळा काही मूल्य नजरेआड करावी लागतात. फक्त नेमकं चांगलं काय हे ठरवता आलं पाहिजे.

दुसऱ्या दिवशी ते फुल वहीत दिसणे म्हणजेच चांगल्या मूल्य निवडीबाबतची शाबासकी !!
त्यामुळेच वहीतले फुल दिसल्यावर आपलेही मन लख्ख होते…
‘संगमरवरातून संगमरवर वजा केल्यावर संगमरवर उरला पाहिजे.’
अस्सल गोष्टीतून केवळ अस्सल गोष्टीचं निर्माण होत असतात.

अहमदचे काम बाबेक अहमद याने अप्रतिम केलं आहे. यातील सर्व कलाकार हे नवोदित आहेत. चित्रपट बघताना सतत जाणवत की या सर्वांकडून अभिनय कसा करून घेतला असेल? इतका ताजातवाना, प्रफुल्लित करणारा जिवंत अभिनय आहे, की वाटतं आपल्या ओळखीची आजूबाजूची लोकच आहे ही. मुख्य म्हणजे यात कोणी हिरो नाही की कोणी खलनायक नाही तरी गोष्ट प्रभावी मांडली जाते.

अब्बास कियारोस्तामी म्हणाले होते, “माझ्या पहिल्या चित्रपटापासून माझा हा कटाक्ष असतो की मी कोणती गोष्ट सांगत नसतो. मी काही दाखवू इच्छितो. प्रेक्षकांनी ते बघितल्यावर, त्यातून त्यांनी स्वतः गोष्ट शोधावी.”

कियारोस्तामी यांनी १९६९च्या सुमारास ‘कानून’ नावाची एक फिल्म संस्था स्थापन केली. त्यांचा उद्देश छोटी मुलं, किशोर आणि तरुणांचा बौद्धिक विकास हा होता. त्या अंतर्गत ३० वर्ष काम त्यांनी केले. मुलांच्यात मूल्य, सौंदर्यदृष्टी  निर्माण करणं, वास्तववादी प्रश्नांचे आकलन, विनोदी बुद्धीचा विकास यावर अधिक भर देऊन, सहज सोपे समजतील असे २२ लघुचित्रपट बनवले. मोठ्या लांबीचे पकडून त्यांनी एकंदरीत ५२ चित्रपट केले.अब्बास कियारोस्तामी यांच्या उत्तुंग कारकिर्दीचा, पुरस्कारांचा आढावा एका लेखात घेणं अशक्य आहे. अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ते म्हणत, ‘मी तीन-चार वाक्यात कोणतीही गोष्ट नाही सांगू शकत.

तरीही एका वाक्यात सांगायचे तर ‘भूमीचे मार्दव। सांगे कोभांची लवलव।’

त्यांच्या लिखाणाबद्दल, काव्याबद्दल किंवा त्यांच्या फोटोग्राफीबद्दल, फ्रेमिंगबदद्द्ल अभ्यास करावा तितका कमी आहे. टेकड्या, नागमोडी वळणे असलेले रस्ते, दरवाजे, खिडक्या, पायऱ्या … या सर्वांची सदृश्य कविता त्यांनी मांडली आहे.त्यांना इराणी चित्रपटजगताचे सत्यजित राय म्हटले जायचे. दोघेही मातीशी जोडले गेलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व.

‘अप्पू ट्रायोलॉजी’ सारखीच त्यांची ‘कोकर ट्रायोलॉजी’ प्रसिद्ध आहे. त्याचाच पहिला भाग म्हणजे हा चित्रपट आहे.

आकिरा कुरोसवा एकदा म्हणाले होते, “सत्यजित राय वारले तेव्हा मला अत्यंत दुःख झाले होते. पण कियारोस्तामींचे चित्रपट पाहिल्यावर राय यांचा खरा वारसदार तयार झालेला आहे, याची खात्री पटली.”
४ जुलै २०१६ला वयाच्या ७४ वर्षी कियारोस्तामींचे निधन झाले.
त्या दिवशी घरातील वडीलधारी व्यक्ती गेली असं वाटलं..

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0