काश्मीर: तीन आदिवासींना अटक, पोलिसांवर प्रश्नचिन्ह

काश्मीर: तीन आदिवासींना अटक, पोलिसांवर प्रश्नचिन्ह

द रेझिस्टन्स फ्रंटसाठी काम केल्याबद्दल तीन आदिवासींना पीएसए अंतर्गत अटक करण्यात आली आहे. रेझिस्टन्स फ्रंटने काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. रेझिस्टन्स फ्रंट ही बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैय्यबाची उप-संघटना असल्याचे मानले जाते. पोलिसांच्या डॉसिअरमध्ये, तिघांवरही आधुनिक संवाद तंत्रज्ञान वापरण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र एकाच्या नातेवाईकाने सांगितले, की तिघेही निरक्षर आहेत आणि त्यांनी कधीही स्मार्टफोन वापरलेला नाही.

बांदीपोरा: आदिवासी महिला फातिमा बेगम यांना धक्का बसला आहे आणि तिला विश्वास बसत नाही की तिच्या मुलावर ‘ओव्हर ग्राउंड वर्कर’ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओव्हर ग्राउंड वर्कर म्हणजे जे दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट, रोख रक्कम, निवारा आणि इतर मूलभूत सुविधांची मदत करतात.

फातिमा बेगम (७०) यांचा मुलगा अरमीम गोजर याला द रेझिस्टन्स फ्रंट(टीआरएफ)चा ओव्हर ग्राउंड वर्कर असल्याच्या कारणावरून सार्वजनिक सुरक्षा कायदा (PSA) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.

काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली आहे. या हल्ल्यांत हिंदू आणि शीख समुदायातील व्यक्तींच्या चार हत्या झाल्या असून, तीन काश्मिरी मुस्लिम आहेत. सुरक्षा एजन्सी टीआरएफला बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैय्यबाची उप-संघटना मानतात.

व्यवसायाने सुतार असलेल्या अरमीम (४५) व्यतिरिक्त अब्दुल बारी (५०) आणि सुलेमान गोजर (५०) यांच्यावरही अशाच आरोपाखाली पीएसए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल बारी यांची पत्नी

अब्दुल बारी यांची पत्नी

त्यांना ८ ऑक्टोबर रोजी बांदीपोरा पोलिसांनी बोलावले आणि नंतर त्यांच्या घरापासून ३०० किमीपेक्षा जास्त लांब असलेल्या जम्मूमधील कोट भलवाल तुरुंगात नेले.

फातिमाने ‘द वायर’शी केलेल्या संभाषणात सांगितले, की  तिचा मुलगा निर्दोष आहे आणि त्याचा दहशतवाद्यांशी काहीही संबंध नाही.

त्या म्हणाल्या, “आम्ही गरीब लोक आहोत आणि आमचा अतिरेक्यांशी दूरवरचाही संबंध नाही. हे आरोप निराधार आहेत. कोट भलवल तुरुंगात नेण्यापूर्वी मला माझ्या मुलाने मला मिठी मारली आणि लहान मुलासारखा रडला. तो निरपराध असल्याचे मला वारंवार सांगत होता आणि त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करायला सांगत होता. मी काय करू शकते हे मला माहीत नाही.”

फातिमाप्रमाणेच या आदिवासी भागातील इतर स्थानिक लोकांनीही हे तिघे निर्दोष असल्याचे संगत त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले.

एका तरुणाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “आम्हाला शिक्षा का दिली जात आहे? आमचा काय दोष? आमच्या भागातील कोणीही दहशतवादात सामील झालेले नाही. पण आमच्या लोकांना अजूनही सोडलेले नाही. आम्ही गेल्या तीन दशकात निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान केले आहे आणि कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी झालेलो नाही. शांततेत जगण्याचे हे बक्षीस आहे का?”

आणखी एका व्यक्तीने सांगितले, “आम्ही पंतप्रधान मोदी आणि उपराज्यपालांसह प्रशासनाला या प्रकरणात लक्ष घालण्यास आणि न्याय देण्यास सांगितले आहे.” जर या लोकांचा दहशतवादाशी  किंचितही संबंध असेल, तर त्यांना आमच्या लोकांना शिक्षा करू द्या, पण ते निर्दोष असतील तर ज्यांनी त्यांना फसवले त्यांना शिक्षा झाली पाहिजे.”

फातिमाचा दुसरा मुलगा मुहम्मद मुबीन गोजरने ‘द वायर’ला सांगितले, “आम्ही सर्व तिथे गेलो आणि नंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या कॅम्पमध्ये आम्हाला हलवण्यात आले. आम्हाला दोन दिवस छावणीत ठेवण्यात आले आणि तेथून बांदीपोरा पोलीस ठाण्यात नेण्यापूर्वी आमची चौकशी करण्यात आली.”

त्यांनी सांगितले की, २१ ऑक्टोबर रोजी त्याला कळले की त्यांच्या भावासह तिघांना पीएसएअंतर्गत ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांना जम्मूला हलवण्यात आले.

उजव्या हाताला अर्धांगवायू झाल्यामुळे २०१० पासून अंथरुणाला खिळून असलेला मुबीन म्हणाला, “२० ऑक्टोबर रोजी त्यांना तुरुंगातून कपडे आणि ब्लँकेटसह बाहेर येण्यास सांगण्यात आले. मला वाटले की त्यांची सुटका होत आहे. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सहकारी कैद्यांकडून ऐकले तेव्हा मला धक्का बसला, की त्यांना जम्मूला नेण्यात आले.” मुबीनची २३ ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटका झाली आहे.

अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या अब्दुल बारी यांच्या कुटुंबावरही शोककळा पसरली आहे. अब्दुल बारी यांची पत्नी सकिना बेगम म्हणाली, “माझे पती घर चालवण्यासाठी छोटी-मोठी नोकरी करायचे. तुम्ही गावातल्या कुणालाही त्यांच्याबद्दल विचारू शकता. त्याच्याविरुद्ध कोणीही चुकीचे बोलणार नाही.”

सकीनाला चालता येत नाही आणि बांदीपोरा येथे तिच्या पतीला भेटलिही नाही. जिथे तिचा पतीला १२  दिवस पोलिस कस्टडीमध्ये होता.

सकिना म्हणाली,  “माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. माझ्याकडे जम्मूला जाऊन त्यांना भेटण्यासाठी आणि खटला लढण्यासाठी वकिलाची व्यवस्था करण्यासाठीही पैसे नाहीत.”

अटक करण्यात आलेल्या तीन लोकांपैकी एक असलेल्या मुहम्मद सुलेमान गोजरची पत्नी परवीना बेगम यांनी ‘द वायर’ला सांगितले, “माझे पती मेंढपाळ म्हणून काम करतात आणि त्यांचे उत्पन्न फारच कमी आहे आणि त्यातून कुटुंबाचा दैनंदिन खर्च जेमतेम भागतो.

मुहम्मद सुलेमान यांचे कुटुंब

मुहम्मद सुलेमान यांचे कुटुंब

परवीना आणि तिची मुले अजूनही तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहेत. तिने सांगितले की तिच्या पतीला ताब्यात घेतल्यावर, तिने मेंढ्या त्यांचा मालकाला परत केल्या आहेत.

ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याची केस पुढे लढवायची, की घर चालवण्यासाठी काही करायचं या द्विधा मनस्थितीत मी आहे. माझ्या पतीच्या अनुपस्थितीत माझ्या मुलांची काळजी कोण घेईल.”

पोलिस डॉसिअरमध्ये काय म्हटले आहे

पोलिसांनी तयार केलेल्या आणि बांदीपोराच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी स्वाक्षरी केलेल्या तीन स्वतंत्र कागदपत्रांमध्ये, तिन्हींवर लावण्यात आलेले आरोप सारखेच आहेत.

डॉसिअरनुसार, तिघांवरही टीआरएशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्वांचे वय ४५ वर्षे असल्याचा दावा डॉसिअरमध्ये करण्यात आला आहे. मात्र, बारी आणि सुलेमान यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ते ५० वर्षांचे आहेत.

विशेष म्हणजे हे डॉसिअर त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या कोणत्याही एफआयआरवर आधारित नाही. या दस्तऐवजात म्हटले आहे, की त्यांना अगोदर कलम १०७ आणि १५१ अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते.

तिन्ही कुटुंबांचा असा दावा आहे, की त्यांना पोलिसांनी बोलावले होते त्या दिवशी म्हणजे ८ ऑक्टोबरपूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आले नाही.

सीआरपीसीच्या कलम १०७ आणि १५१ अंतर्गत तिघांना १९ ऑक्टोबरपर्यंत ताब्यात घेण्यात आल्याचे डॉसिअरमध्ये म्हटले आहे. १९ ऑक्टोबरलाच त्यांना पीएसए अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा यंत्रणांना चुकवण्यासाठी आधुनिक संवाद तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अटक केलेल्यांपैकी एकाचे नातेवाईक गुलाम मुस्तफा गोजर यांनी सांगितले की त्यांच्यापैकी कोणीही स्मार्टफोन वापरलेला नाही.

तो म्हणाला, “ते अशिक्षित आहेत, कधी शाळेत गेलेले नाहीत. ते आधुनिक संवाद अॅप्स कसे वापरू शकतील? त्यांचे फोन अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत.”

तो म्हणाला, की २३ ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटलेल्या मुबीनकडेच स्मार्टफोन होता, जो त्याने कोविड-19 नंतर मुलांसाठी ऑनलाइन क्लासेससाठी घेतला होता.

बांदीपोराचे वरिष्ठ अधीक्षक जाहिद मलिक यांनी सांगितले, “ डॉसिअरमध्ये सर्व काही तपशीलवार आहे. यावर मी अधिक काही बोलू शकत नाही.”

बांदीपोराचे उपायुक्त ओवेस अहमद म्हणाले, की अटकेच्या आदेशात काही तफावत आढळल्यास ताब्यात घेतलेल्या व्यक्ती कायदेशीर मार्ग स्वीकारू शकतात.

मूळ वृत्त

(वृत्त छायाचित्र – अरमीम गोजर यांची पत्नी आणि आई)

COMMENTS