नेहरू-गांधी घराणं काँग्रेसचं नवसर्जन करू शकेल?

नेहरू-गांधी घराणं काँग्रेसचं नवसर्जन करू शकेल?

नेहरू-गांधी घराण्याशिवाय काँग्रेसला तरणोपाय नाही. नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्द्यावर संतुष्ट, असंतुष्ट आणि तटस्थ सर्वच नेत्यांचं एकमत झालं. प्रियंका गांधी यांना दोन मुलं आहेत त्यामुळे पुढची वीस वर्षं तरी काँग्रेसचं भवितव्य सुरक्षित आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या हिंदु बहुसंख्याकवादाच्या राजकारणावर हा पक्ष कुरघोडी करू शकेल का, हा प्रश्न अनुत्तरीत राह्यला आहे.

कोरोना : स्थलांतरित मजूरांवर सॅनिटायझरची फवारणी
ट्विटरचा भारताच्या राजकारणात हस्तक्षेपः राहुल गांधी
अमित शहा कुठे होते? ताहिर हुसैन, अंकित शर्माचे सत्य काय?

नेहरू-गांधी घराण्याशिवाय काँग्रेसला तरणोपाय नाही. नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्द्यावर संतुष्ट, असंतुष्ट आणि तटस्थ सर्वच नेत्यांचं एकमत झालं. प्रियंका गांधी यांना दोन मुलं आहेत त्यामुळे पुढची वीस वर्षं तरी काँग्रेसचं भवितव्य सुरक्षित आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या हिंदु बहुसंख्याकवादाच्या राजकारणावर हा पक्ष कुरघोडी करू शकेल का, हा प्रश्न अनुत्तरीत राह्यला आहे.

काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभा. तिच्यामध्ये राष्ट्रवादी, हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, समाजवादी, मार्क्सवादी, प्रांतवादी इत्यादी अनेक विचारधारांचे, भांडवलदार, जमीनदार, कामगार, शेतकरी, शेतमजूर, ब्राह्मण, शेतकरी जाती, ओबीसी, दलित, आदिवासी अशा विविध सामाजिक आधारांचे हितसंबंध सांभाळणारे नेते-कार्यकर्ते होते. त्यामुळे काँग्रेसच्या स्थापनेपासून या पक्षात फूट पडते आहे. काँग्रेस नेत्यांनी कधी होमरुल लीग स्थापन केली तर कधी स्वराज्य पार्टी काढून निवडणुक लढवल्या. लोकमान्य टिळक, सुभाषबाबू यासारख्या राष्ट्रीय नेत्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावं लागलं होतं. मात्र प्रदीर्घ काळ काँग्रेसचं स्वरुप फेडरल पार्टी असंच राह्यलं. त्यामुळेच या पक्षाने दीर्घकाळ देशावर राज्य केलं.

ब्रिटिशांनी भारतावर प्रदीर्घकाळ राज्य करण्यामागचं एक इंगित असं होतं की विविध धर्म, जाती, वर्ग, सुधारणावादी, यथास्थितीवादी इत्यादी सर्वांना ब्रिटिशांच्या शासनाचा आधार वाटत होता. परस्पर विरोधी हितसंबंध आणि वैचारिक संघर्षांना सामावून घेण्याची ही भूमिका स्वातंत्र्य आंदोलनात काँग्रेसने आणि स्वातंत्र्योत्तर काळात नेहरू-गांधी घराण्याने पार पाडली. भाषावार प्रांतरचना असो की फुटीर राष्ट्रवाद असो, राखीव जागा वा समाजवाद किंवा उदारीकरण हे देशापुढील सर्व प्रश्न काँग्रेसच्या व्यासपीठावर सोडवले जात होते. कारण या विषयांशी संबंधीत सर्व गट वा वर्ग काँग्रेसमध्ये होते. नेहरू असोत की इंदिरा गांधी वा राजीव वा सोनिया, यांच्याशी मतभेद असले, मतभिन्नता असली तरिही त्यांच्या नेतृत्वालाच सर्व गटांची मान्यता असायची. गांधी घराण्याला आव्हान देणार्‍या नेत्यांनी आपआपल्या राज्यात स्वतंत्र चूल बांधली परंतु राष्ट्रीय पातळीवर आव्हान उभं करण्यात त्यांना यश मिळालं नाही. जनता पार्टी आणि जनता दल असे दोन प्रयत्न या दिशेने झाले पण ते अळवावरच्या पाण्यासारखे ठरले.

आपण पारतंत्र्यात आहोत ही बाब १८५७ नंतर भारतीय उपखंडातील सुशिक्षितांच्या ध्यानी आली होती. मात्र स्वतंत्र व्हायचं तर राष्ट्राची उभारणी कशाच्या आधारावर करायची असा पेंच त्यांच्यापुढे होता. जगातले सर्व धर्म या देशात होते. त्याशिवाय वंश, भाषा, प्रांतिक अस्मिताही होत्या. त्यामुळे ब्रह्मदेश आणि सिलोन वगळता जे कोणी ब्रिटिश इंडियात राहातात ते सर्व भारतीय, अशी भूमिका राष्ट्रीय सभेने आणि त्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनाने घेतली. १८५७ चं स्वातंत्र्य समर या पुस्तकात वि. दा. सावरकरांनीही हीच भूमिका मांडली आहे. हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत अशी भूमिका सर सय्यद अहमद यांनी मांडली. मात्र त्यांनी १८७२ साली केलेल्या भाषणात सर्वधर्मसमभावासह पाश्चात्य उदारमतवादी मूल्यांचीच भलामण केलेली आढळते.

“मी शेखचिल्लीसारखा दिवास्वप्नं पाहात बोलतोय असं वाटेल, पण मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचं रुपांतर ऑक्सफर्ड वा केंब्रिजसारख्या विद्यापीठांमध्ये व्हावं हे ध्येय मी उराशी बाळगलं आहे. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज येथे चर्च आहेत त्याप्रमाणेच प्रत्येक महाविद्यालयाला संलग्न एक मशीद असेल. कॉलेजमध्ये एक दवाखाना असेल, डॉक्टर आणि मदतनीस असेल. त्याच्या शेजारी युनानी हकीमही असेल. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाच वेळा नमाज बंधनकारक असेल. मात्र अन्य धर्मीय विद्यार्थ्यांना त्यातून सूट दिली जाईल. शिवीगाळ करण्यावर सक्त निर्बंध असतील. खोटारडा हा शब्द शिवीसारखाच समजला जाईल. युरोपियन पद्धतीप्रमाणे भोजन टेबलावर वाढलं जाईल किंवा अरबी पद्धतीप्रमाणे चौकीवर. धूम्रपान-सिग्रेट आणि हुक्का, पान यांना बंदी असेल. विद्यार्थ्याला इजा होईल अशी कोणत्याही प्रकारची शिक्षा करणं मनाई असेल. महाविद्यालयात वा वसतीगृहात शिया आणि सुन्नी विद्यार्थ्यांना धार्मिक विषयांवरील मतभेदाची चर्चा करण्यास मज्जाव असेल. आज हे एक स्वप्न आहे, सर्वशक्तीमान ईश्वराला माझी प्रार्थना आहे की हे स्वप्न सत्य व्हावं. “

–सर सय्यद अहमद खान, १८७२ साली केलेले भाषण. विषय- मोहमेडन अँग्लो ओरीएंटल कॉलेज.

काँग्रेसला अभिप्रेत असलेल्या स्वतंत्र व लोकशाही भारतीय राष्ट्र-राज्यात हिंदू बहुसंख्यांक असतील, सत्ता त्यांची असेल. म्हणून त्यांनी हिंदू व मुसलमान ही स्वतंत्र राष्ट्रे आहेत अशी भूमिका मांडली. मात्र त्यांनाही मुस्लिम धर्मावर आधारित राष्ट्र नको होतं. खुद्द मोहंमद अली जिना यांनाही लोकशाही आणि सर्वधर्मसमभावावर आधारित पाकिस्तान अभिप्रेत होतं. त्यांच्या समाधीला भेट दिल्यावर लालकृष्ण आडवाणी ह्यांनी याच आशयाचं विधान केलं त्यामुळे भाजपमध्ये त्यांचं स्थान डळमळीत झालं.

फाळणी धर्माच्या आधारावर झाली हे सत्य आहे परंतु फाळणीचा तर्क – भारत हे हिंदू राष्ट्र असेल आणि पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र असेल, काँग्रेसच्या नेत्यांना आणि पाकिस्तानच्या शिल्पकारालाही मान्य नव्हता. १८५७ ते १९४७ पर्यंत भारतीय राष्ट्रवादात लोकशाही आणि सर्वधर्मसमभाव अनुस्यूत होता. मात्र धर्मावर आधारित राष्ट्रवादही होताच. हिंदू राष्ट्रवाद्यांनी गांधीजींचा खून केल्याने हिंदुमहासभा, रा. स्व. संघ आणि त्यानंतरचा जनसंघ लोकांमधून दूर फेकले गेले. पण ते कार्यरत होतेच. गांधीजींपासून कलबुर्गींपर्यंतचे सर्व बळी हिंदु राष्ट्रवादाने घेतले. फुटीर राष्ट्रवादाने इंदिरा गांधी यांचा बळी घेतला तर तमिळ म्हणजे वांशिक राष्ट्रवादाने राजीव गांधी यांची हत्या केली. ऑक्टोबर २०१४ मध्ये संघाचं मुखपत्र समजल्या जाणार्‍या केरळमधील केसरी या नियतकालीकात केरळ मधील भाजपनेते बी. गोपालकृष्णन यांनी म्हटलं होतं की नथूराम गोडसेने म. गांधींऐवजी जवाहरलाल नेहरू यांची हत्या करायला हवी होती. भारतीय जनता पक्षाने नेहरू-गांधी घराण्याला लक्ष्य केलेलं असलं तरिही निशाणा साधला आहे स्वातंत्र्य आंदोलनातून विकसित झालेल्या सर्वसमावेशक राष्ट्रवादावर.

इंदिरा गांधी यांच्या एकाधिकारशाही राजकारणामुळे फुटीर राष्ट्रवादाला चिथावणी मिळाली. मात्र राजीव गांधी यांनी पंजाब करार, आसाम करार, मिझो करार करून त्या राज्यांमध्ये केवळ शांतता प्रक्रियेलाच सुरुवात केली नाही तर बिगर काँग्रेस सरकारांचा सत्तेवर येण्याचा मार्गही मोकळा केला. पक्षाच्या हिताचा बळी देऊन त्यांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं. स्वातंत्र्य आंदोलनातील सर्वसमावेशक राष्ट्रवादाची पाठराखण केली.

नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तीला म्हणून राष्ट्रीय पातळीवर प्रतिसाद मिळतो. काँग्रेसमधील असंतुष्टांनी मांडलेले सर्व मुद्दे योग्यच आहेत. परंतु या पत्रावर स्वाक्षरी करणार्‍या एकाही नेत्याला राष्ट्रीय पातळीवर अनुयायी नाहीत. आपल्या मतदारसंघात वा राज्यात ते लोकप्रिय असतीलही परंतु देशातील सर्व राज्यांत त्यांना जनाधार नाही.

१९९९ पासून नेहरू-गांधी घराण्याकडे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आहे. प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांतून काँग्रेस सत्ता स्पर्धेतून दूर फेकली गेली. २०१८ साली काँग्रेसला गुजरातमध्ये यश मिळालं, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता मिळाली. मात्र त्यामध्ये नेहरू-गांधी घराण्याच्या नेतृत्वापेक्षा भाजपच्या विरोधातील असंतोष आणि राज्य पातळीवरील काँग्रेस नेतृत्वाचा मोठा वाटा होता.

गांधीजींच्या काळात काँग्रेस ग्रामीण भागात पोचली. मात्र शेतकरी जातींतील नेतृत्व नेहरू युगात तयार झालं. कामराज, यशवंतराव चव्हाण, प्रतापसिंग कैरो ही उदाहरणं वानगीदाखल देता येतात. इंदिरा गांधींनी या शेतकरी नेतृत्वाला धक्का दिला. ब्राह्मण, अल्पसंख्य, दलित आणि आदिवासी असा राष्ट्रीय पातळीवरील नवा जनाधार निर्माण केला. पक्षातील राज्य पातळीवर नेतृत्वाला म्हणजेच बव्हंशी शेतकरी जातींतील नेत्यांना त्यांच्यामागे फरफटत जाण्याशिवाय अन्य पर्याय उरला नाही. इंदिरा गांधींच्या या समीकरणाला काँग्रेस आणि पक्षश्रेष्ठी प्रदीर्घकाळ चिकटून राह्यले आहेत. तेच समीकरण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवत बसले आहेत. ब्राह्मण भाजपकडे आकर्षित झाले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अल्पसंख्यांनी यादवांचं नेतृत्व स्वीकारलं तर दलितांनी मायावती आणि नितिश कुमारांना साथ दिली. आदिवासींमध्ये भाजपने शिरकाव केला. पक्षाचा जनाधार वेगाने आकुंचन पावत गेला. नव्या प्रश्नांना, नव्या परिस्थितीचं आकलन काँग्रेस पक्षश्रेष्ठी म्हणजे अर्थातच सोनिया गांधीं वा राहुल गांधी जुन्याच समीकरणांच्या आधारे करतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाआघाडीला मान्यता देण्यासाठी काँग्रेस एक महिना चर्चा करत राह्यली.

सर्वसमावेशक राष्ट्रवाद, लोकशाही आणि उदारमतवादी मूल्यं यांची केवळ भारतातच नाही तर युरोप आणि अमेरिकतही पिछेहाट होताना दिसते. १९९० नंतर जागतिकीकरणामुळे पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल या समजूतीला धक्का बसला आहे. कारण त्या जागतिकीकरणाच्या (भांडवल, वस्तू व सेवा यांचा अनिर्बंध संचार) केंद्रस्थानी कॉर्पोरेट कंपन्या होत्या. जागतिक तापमानवाढ असो की कोव्हिड १९ या विषाणूचा प्रसार, हे सर्व प्रश्न जागतिक आहेत त्यासाठी नव्या जागतिक रचनेची गरज आहे. उदारमतवादी मूल्यं, सहिष्णुता आणि सर्वसमावेशक राष्ट्रवाद या आधारेच विविधकेंद्री जगाची पुनर्रचना शक्य आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाला वैचारिक मंथनाची गरज आहे. पक्षाचा अध्यक्ष कोणीही झाला तरी नेहरू-गांधी घराण्याला या पक्षात अढळ स्थान असेलच. पक्षाच्या वैचारिक आणि संघटनात्मक नवसर्जनाची बाब काही नेत्यांनी पक्षाच्या अजेंड्यावर आणली आहे. शेपूट हाती लागलं आहे, ते धरून हत्तीला खेचण्याची ताकद आणि युक्ती नेहरू-गांधी घराण्याने दाखवायला हवी.

सुनील तांबे, हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: