आता ‘व्हीआरडीई’ महाराष्ट्रातून हलवणार ?

आता ‘व्हीआरडीई’ महाराष्ट्रातून हलवणार ?

एखाद्या राज्याकडे आकसाने पाहण्याची केंद्र सरकारची भूमिका गेल्या काही काळापासून सातत्याने जाणवत असून त्याचाच परिपाक राज्यातील नगर येथील केंद्रीय संरक्षण विभागाची वाहन संशोधन आणि विकास संस्था (व्हीआरडीई) ही मोठी संस्था आता महाराष्ट्रातून चेन्नईत हलविण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे तब्बल १ हजार कुटुंबीयांना त्याचा फटका बसणार आहे.

केंद्रीय संरक्षण विभागाच्या देशभरात वाहन विकास आणि संशोधन करणाऱ्या ५२ शाखा असून त्यापैकी एक महाराष्ट्रात आहे. नगर ते दौड या रस्त्यावर ही संस्था असून त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेकडो एकर जागेवर ही संस्था गेल्या काही तपापासून म्हणजे १९४७ पासून कार्यरत असून येथे आतापर्यंत अनेक उपयुक्त आणि मोठी संशोधन झाली आहेत. अनेक लांब पल्ल्याच्या तोफांचे तसेच युद्ध सामुग्रीचे येथे संशोधन होऊन त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा झाले आहे. संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि अन्य सामुग्री येथे विकसित झालेली आहेत. तसेच वाहनांची तपासणी करून त्यांना विशेष प्रमाणित करणारा देशातील एकमेव ट्रॅक येथे आहे. आता मात्र ही संस्था येथून चेन्नई अथवा अन्यत्र हलविण्यात येणार असून तशा हालचाली सुरू आहेत.

देशाच्या संरक्षण विभागात नगर येथील संस्थेचे विशेष महत्व आहे. १९४७ मध्ये ही संस्था नगरला आणण्यात आली. सुरुवातीला ती जामखेड येथे होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता ही संस्था अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली दिल्ली पातळीवर सुरू आहेत. येथील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे संकेत मिळाले आहेत. याबाबत असेही समजते की देशपातळीवर विखुरलेल्या संरक्षण विभागाच्या संस्था विशेषतः प्रयोगशाळा यांचे एकत्रीकरण करण्याचे केंद्राने ठरवले असून त्याचाच हा एक भाग आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. त्याबाबतचे निवेदनही त्यांनी पवार यांना दिले. याविषयी लंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही स्थितीत राज्याची आणि नगरची विशेष ओळख असलेली ही संस्था बंद करून अन्यत्र हलवून दिली जाणार नाही असे सांगितले. या संस्थेची शेकडो एकर जमीन असून त्यावर काही लोकांचा डोळा असून त्यामधून हे कारस्थान शिजल्याचा संशय लंके यांनी व्यक्त केला. यावर सुमारे एक हजार कुटुंबीय अवलंबून असून संस्था अन्यत्र हलविली तर त्यांचे मोठे नुकसान होईल तसेच येथील विकासावर विपरीत परिणाम होईल, असे लंके म्हणाले. याप्रश्नी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे असे ते म्हणाले.

दरम्यान या प्रश्नात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. ही संस्था नगरमधून बाहेर जाऊ नये यासाठी व्यापक आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS