बाबाने केवळ ‘अ’ ला नाही तर अख्ख्या बाराखडीला आणि आकड्यांना नवं रुपडं बहाल केले. आसपासचे लोक म्हणत, ‘आता हे कसलं वेड?’ त्यावर बाबा म्हणायचा, “आता मी बालवाडीत आहे आणि बालवाडीतच राहणार आहे!”
सूर्य रोज मोठ्या उत्सुकतेने उगवायचा. सारं जग एका वर्तुळात फिरत असतांना, सूर्याला मात्र एका माणसाचे जाग होणं अधिक महत्त्वाचे वाटायचे. कुतूहल हा ज्या माणूसाचा स्थायीभाव आहे, त्याचे सततचे ‘कार्यरत’ असणे, चकित करणारे असायचे. आज काय नवीन करतो हा पठ्ठ्या? या ‘कुतूहलापोटी’ तो या माणसाचा सतत पाठलाग करायचा. मावळताना चंद्रावर पुढील कामगिरी सोपवायचा. वृत्तांत कसा हवा, यासाठी ‘रिपोर्टिंगचे दिवस’ हे पुस्तकं खास भेट दिलं होतं. ‘असेच रिपोर्टिंग करत जा!’ असा सज्जड दम भरून मगच मावळायचा. एकदा न राहून चंद्राने विचारलं, “असं काय खास आहे या माणसात?” एरवी सूर्य क्रोधित झाला असता. पण ज्या माणसाचा तो डाय- हार्ड फॅन झाला होता. त्याची बोलण्यातली ऋजुता आठवली आणि तो सौम्य स्वरात म्हणाला, “त्या माणसाचे नाव आहे अनिल अवचट उर्फ बाबा. आपण वर्षानुवर्षे एकच काम करतोय. कंटाळा आला तरी. पृथ्वीवर देखील माणसं साधारणतः असेच चाकोरीबद्ध आयुष्य जगतात. काही असतात वेगळी जगणारी ‘माणसं’ पण हा गडी विविध क्षेत्रांत, गोष्टीत रस घेतो. कुठेही गेला तरी त्या क्षेत्राला, गोष्टीला आपलं हक्काचे घर करून टाकतो. त्यासाठी जो कोणी या घराचा खरा मालक असतो, ज्याला या घराबद्दल ममत्व आहे, अशा व्यक्तीला तो गुरू करतो. मग ‘शिकविले ज्यांनी’ अशी व्यक्ती वयाने लहान- मोठी असा कोणताच अडसर त्याच्यासाठी नसतो. त्याला पडलेले ‘प्रश्न आणि प्रश्न’ तो मोठ्या जिज्ञासू वृत्तीने विचारतो. गुरू सोबत आख्या घराचा कोपरा न् कोपरा हा धुंडाळत बसतो. एखादा दुर्लक्षित कोनाडा, अडगळीच्या खोली असो अथवा एखादी प्रकाशाची तिरीप अथवा उकिरडा, हा बाबा उत्साहाने सर्वत्र बागडतो. मग ज्ञात झालेल्या गोष्टीवर सर्वांगाने विचार करतो. एखादी साधी गोष्ट जरी हाती लागली तरी आssहा अशी बाबाची अवस्था असते. त्या घराला ‘आपलेसे’ केले की हा इतर लोकांना गृहप्रवेश करायला लावतो. त्या घराची माहिती इतकी रंजक, सोप्या पद्धतीने सांगतो की बाबांचे हे पिढीजात घर आहे, असे वाटते. एका घराचा ताबा मिळवला की हा गडी वळाला दुसऱ्या घराकडे. असं करत-करत या बेट्याने अख्खी नगरी थाटली आहे. मग इतरांना तो हसतमुखाने बोट धरून या नगरीची सैर करून आणतो. याहून मोठं गुपित सांगू? अरे तो कोणाशीही गप्पा मारू शकतो. सजीव- निर्जीव सारे त्यांच्याशी बोलतात. पंखा, डोंगर, दगड कोणीही…कहर म्हणजे तो डासांशी देखील बोलतो, बुरशी त्याला भयंकर प्रिय आहे.” चंद्र म्हणाला, “काय अफाट अवलिया माणूस आहे. उगाचच माझा वेळ उनाडक्या करण्यात घालवत होतो. आता मी या बाबांवर चांगलं लक्ष देतो. तेवढे शिकायला मिळेल.” दिवसभराची मुसाफिरी करून जेव्हा बाबा शांत झोपी जायचा,तेव्हा चंद्र देखिल भान हरपून त्याचं निष्पाप रूप बघत बसायचा. कधी, कधी रात्री – अपरात्री बाबाला जाग यायची. तेव्हा तो काहीतरी उद्योग करत बसायचा. कधी गाणी आठवायचा, रेघोट्या मारायचा, अक्षरांशी खेळायचा, काष्ठशिल्प बनवायचा. मग चंद्राला कधी एकदा ‘दिसले ते’ सूर्याला सांगू असं व्हायचे. अगदी परवा पर्यंत हा सिलसिला सुरू होता. मग चंद्र-सूर्याने ठरवलं बस्स झाली ही दुर वरूनची टेहळणी. पृथ्वीवरचा हा हरहुन्नरी माणूस आता आपल्यासोबत असायला हवा. इथे देखील त्याची गरज आहे. आणि दोघांनी संगतमताने या माणसाला पृथ्वीवरून पळवले. ‘सृष्टीत…गोष्टीत’ ‘वनात जनात’ ‘बाबा ss बाबा’ असा आक्रोश सुरू झाला.
‘अ’ अक्षराला तर स्वतःचा वजूद नाहीसा झाल्यासारखे झालं, इतका तो सैरभैर झाला की विचारता सोय नाही. इंदोरच्या चिंचाळकर गुरुजींनी बाबाला अक्षरांतील सौंदर्य बघायला शिकवलं होत. अक्षरांत दडलेलं सौंदर्य समजायला वेगळी दृष्टी लागते. नाहीतर लोकं पहिलीपासून मुळाक्षरे शिकत असतात की ! त्यांना कुठे दिसतं असे सौंदर्य-बिंदर्य? ‘अ’ ला आठवलं, एकदा रात्री बाबा माझ्याकडे बघत बसला होता, कितीतरी वेळ. बाबा स्वतःशी बोलत होता. “जन्मभर आपण हे अक्षर लिहितो आलो, विचित्र कसे नाही वाटले? दोन वाट्या, त्याही उभ्या. मागे आधाराला काठी.. तो टक्क लावून बघत असतांना त्याने मला रेखाटायला सुरवात केली. माझ्या वेटोळीला सुंदर पानांचा आकार दिला. अगदी पिंपळपान. किती छान! मग त्याने सूक्ष्म रेषा आणि अतिसूक्ष्म जाळेही काढलं. वर स्वतःच “वा: वा: ‘अ’ भाऊ तुम्हारी कमाल, तुझे सलाम,” असे म्हणाला. बाबांच्या नावाची व आडनावाची सुरवात ‘अ’ ने होते. त्या दिवशी ‘अ’ला थोडी ‘ग’ ची बाधा झाली. ‘अ’ झालेल्या ग्रुमिंगच्या खुशीत गाणं म्हणत होता.
“पहचान तो थी पहचाना
नहीं मैंने
अपने आप को जाना नहीं..”
बाबाने केवळ ‘अ’ ला नाही तर अख्ख्या बाराखडीला आणि आकड्यांना नवं रुपडं बहाल केले. आसपासचे लोक म्हणत, ‘आता हे कसलं वेड?’ त्यावर बाबा म्हणायचा, “आता मी बालवाडीत आहे आणि बालवाडीतच राहणार आहे!” हे ऐकून सारी अक्षर मंडळी आनंदाने टाळ्या पिटत होती. सर्व आकडे, अक्षरं आसवं ढाळत, हे आठवत बसली होती.
तिकडे ओरिगामी अनाथ झाली. गेली कित्येक वर्ष ओरिगामी म्हणजे बाबा असे समीकरण झालं होतं. ‘जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती’ असे दोघांचे नातं. जपानी पेन-फ्रेंडने भेट म्हणून दिलेल्या कागदी छोट्या पक्षामुळे बाबा ओरिगामीच्या अवकाशात भराऱ्या घ्यायला लागला. मग जपानी सबुरो कासे याला गुरुजी करून, त्याच्याकडून अजून शिकत गेला. जेव्हा कागदाच्या घड्या मनाजोगत्या जमायला लागल्या तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावर हासू आणण्यासाठी, त्यांना बोलकं करण्यासाठी दिसेल त्या कागदाला वेगळे आकार देत बसायचा. ओरिगामीच्या समोर तरळून गेले असंख्य निरागस हसरे चेहरे. बिन वापराच्या कागदाला लोक कस्पटासमान वागवतात. बाबाने करोना काळात पालकांना, मुलांना घरातील कागदाचा सन्मान करायला शिकवले. जपान इतकीच ‘मजेदार ओरोगामी’ महाराष्ट्रात बाबाने रुजवली. त्याचे ‘छंद’ त्याच्या जगण्याची ऊर्जा होते.
प्रथमच मुंग्यांनी आपलं काम थांबवलं. आज काही सुचत नव्हतं. अगदी मोठ्याने भोकाड पसरून रडावं, असं प्रत्येकीला वाटत होतं. बाबाचे मोठे उपकार होते त्यांच्यावर. एकदा त्यांच्यातील खोडकर चिंटी कोणालाही न जुमानता रांग सोडून मुक्तपणे भटकत बसली, या माणसाच्या अंगावर. या बेभानपणाची तिला मोठी किंमत चुकवावी लागणार होती, पण या प्रेमळ माणसाने तिला अलगद सोडून दिले. आपल्या घराला शोधत असतांना, रासायनिक हाकांमुळे परतली चिंटी सुखरूप आपल्या आईच्या कुशीत. बाबाने ही गोष्ट लिहून मुलांपर्यंत पोहचवली. तेव्हापासून काही शहाणी मुलं आम्हाला चिरडत नाही. त्याने ही गोष्ट लिहिलेल्या पुस्तकाला ‘साहित्य अकादमीचा पहिला बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला. त्यावेळी मुंग्यांनी साखर वाटून आनंद साजरा केला. आज बाबाच्या जाण्याने सतत ‘कार्यमग्न’ असलेल्या मुंग्यां अगदी हातपाय गाळून बसल्या होत्या.
बाबाने निर्माण केलेलं अद्भुत जग आज सुन्न पडलं होतं.
त्याची ‘माझी चित्तरकथा’ आज विरहाने व्याकुळ झाली होती.
शेवटी न राहून झाड बोललं, “माझ्याशी निगडित प्रत्येक घटकाला त्याने स्पेशल बनवलं. अगदी माझे वाळलेलं ‘लाकूड कोरताना’ बघितलं का तुम्ही? जीव ओतून त्याला घडवत असे. रस्ता म्हणाला, “फतकल घालून तो माझ्याशी बोलायचा. माझा ‘कोंडमारा’ मोकळ्या मनाने त्याच्याशी व्यक्त करता आला. तो चांगला समुपदेशक होता.
हे ऐकून बासरीने कमालीचा आर्त हुंदका दिला. कृष्णाची बासरी ही माझी ओळख फार जुनी झाली होती. अनेक मोठे कलाकार बासरीला नादमधुर वाजवतात. पण बाबांचे वाजविणे हे माणुसकीला साद घालणारे असायचे. बाबा श्वासाच्या जोडीला आपुलकीची फुंकर घालायचा. अशा वेळी स्वतः बासरी तल्लीन व्हायची. त्यावर धरतीने मोठा सुस्कारा सोडला. ती वडीलधारी असल्याने समजुतीच्या स्वरात म्हणाली, “बाबा जाण्याचे दुःख सर्वांना आहे. माझ्या जन्मापासून मी सृष्टीचे नियम बघत आली आहे. माझ्या अंगाखांद्यावर खेळलेल्या प्रत्येकांचा वियोग मला सहन करावा लागला. पण मला कायम वाटते की काही गोष्टी, व्यक्ती अमर असायला हव्या. त्याच्या असण्याने माझ्यावरील भार कमी होतो म्हणून नाही तर अशी माणसं मला आतून बळ देत असतात. त्यातला एक अनिलबाबा होता. कोणी किती ‘हवेसे’ वाटत असले तरी काही गोष्टी स्वीकारायला हव्या. असा माणूस पुन्हा होणार नाही! त्यांच्या जाण्याने खूप काही गमावलं असलं तरी त्याच्या मागे तो बरंच काही सोडून गेला आहे आपल्यासाठी, पुढच्या पिढीसाठी. आता तो वारसा आपण चालवू या. त्याचे लिखाण, विचार वाचून, ऐकून काही माणसं संवेदनशील बनतील. त्याच्या ‘जगण्यातले काही’ आपण आत्मसात करून घेऊ. जरा आशेने बघूया. आणि अजून एक वरती आकाशात वाईट परिस्थिती आहे. दूषित पर्यावरणाचे दुष्परिणाम केवळ आपण नाही तर ते देखील सोसतात. वरती देखील अनेक घटकांचे मनस्वास्थ बिघडले आहेत. ढग, हवा, पाणी, प्रकाश यांना आपल्या बाबाची खूप गरज आहे रे… आपण कायमच राहू त्याच्या ‘आप्त’, ‘जिवाभावाचे’,
‘मोर’ आपली मान आकाशाकडे करून काही खुणावत होता.
सर्व जण वर बघू लागले तेव्हा….
ढग आपले आकार बदलत होते. नवनवीन आकार घेऊन इकडेतिकडे नाचत होते. बाबाला आता ढगांना ओरिगामी शिकविण्याचे ‘वेध’ लागलेले दिसतात. त्याबद्दल कोणताच ‘संभ्रम’ उरला नव्हता. स्वस्थ बसेल तो बाबा कसला!
(छायाचित्र – श्रीराम पत्की)
COMMENTS