नेमबाज भारताचा ऑलिम्पिक इतिहास बदलतील का?

नेमबाज भारताचा ऑलिम्पिक इतिहास बदलतील का?

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धांत ९ ते १० पदकांपर्यंत भारताची झेप जाईल, असे भारतीय प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.

राज्यांत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण
राज्यात फिफा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार
युद्धामुळे तेलाच्या किमती प्रती बॅरल १०० डॉलरच्या पुढे

अखेर टोकियो ऑलिम्पिक प्रत्यक्षात अवतरलं! यावेळी भारतीय खेळाडू भरघोस पदके आणतील असा दावा अनेकांनी केलाय. जगातील आघाडीची डेटा कंपनी ‘ग्रेसनोट’ला वाटतंय भारत तब्बल १९ पदके पटकावेल. त्यातील चक्क ४ सुवर्णपदके असतील. असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेला भारतीय या वेळी १४ ते १५ पदके पटकावेल असे वाटते. त्यामध्ये त्यांनी शूटिंगमध्ये भारताला चक्क ५ सुवर्णपदके मिळतील असे भाकीत केले आहे. भारतीय प्रसिद्धी माध्यमांनी मात्र ९ ते १० पदकांपर्यंत भारताची झेप जाईल, असे म्हटले आहे. मात्र या सर्वांच्या अंदाजांना निवडणुकांच्या अंदाजाइतकेच महत्त्व आहे.

निवडणूक पूर्वीचे अंदाज, आडाखे जसे कोलमडतात तसे कदाचित किमान खेळाच्या बाबतीत होणार नाही. कारण हे अंदाज-आडाखे त्या त्या खेळाडूंच्या सद्य कामगिरीवर, मानांकनावर आधारित आहेत. भीती फक्त या गोष्टीची वाटते, ती म्हणजे सर्वांनाच भारताला यावेळी शूटिंगमध्ये अधिक पदके आणि तीही सुवर्णपदके मिळतील असे वाटते.

शूटिंग हा खेळ पूर्णपणे मानसिक क्षमतेचा आहे. त्या क्षणी काय होईल याचा अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही. भारतीय नेमबाजांकडून प्रत्येक वेळी अशीच अपेक्षा केली जाते. त्या अपेक्षांची पूर्तता कधीच झाली नव्हती. तरीही ऑलिम्पिकपूर्वीचा भारतीय खेळाडूंचा फॉर्म आणि कोरोनामुळे अव्वल दर्जाच्या खेळाडूंची गैरहजेरी यामुळे या पूर्वीच्या सहभागाच्या आपल्या सर्व ऑलिम्पिक स्पर्धांपेक्षा अधिक पदकांची अपेक्षा करायला हरकत नाही.

सर्वप्रथम आपण सुवर्णपदकांची अपेक्षा केली गेली आहे, त्या नेमबाजांवर नजर टाकूया.

यंदाची नेमबाजी (शूटिंग) स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धांच्या पदकांचा शुभारंभ करणारी ठरणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतचा नेमबाजीतील सर्वात मोठा चमू उतरवला आहे. १५ नेमबाजांचा सहभाग टोकियो ऑलिम्पिकमध्ये असेल. रायफल, पिस्तुल आणि शॉटगन प्रकारांमध्ये भारतीय नेमबाज सहभागी झाले आहेत. या पैकी काही जणांच्या नावावर विश्वविजेतेपद, विश्व क्रमवारीत अव्वल किंवा माजी विश्व अव्वल क्रमांकाची बिरुदावली आहे. तुलनेत भारताचा हा चमू अधिक तरुण आहे. १५ पैकी ४ जणांचे तर हे पहिलेच ऑलिम्पिक आहे.

महिलांच्या १० मीटर एअऱ रायफल स्पर्धेने टोकियो ऑलिम्पिकला सुरूवात होत आहे. पुरुषांमध्ये भारताच्या दिव्येश सिंगकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे. तर महिलांमध्ये अंजुमला पदक मिळेल असा अंदाज व्यक्त होत आहे. २०१८च्या राष्ट्रकुल आणि त्या नंतरच्या एशियाडमध्ये याच भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट केली होती. २०१९च्या विश्वकप स्पर्धेत ३० पदकांमध्ये २१ सुवर्णपदके जिंकून भारताने सांघिक विजेतेपदही पटकावले होते.

त्याच वेळी २०२० या वर्षांतील सर्वच खेळांच्या स्पर्धा बहुतांशी रद्द झाल्या होती, हेही लक्षात ठेवले पाहिजे. नेमबाजी हा खेळही त्याला अपवाद ठरला नाही. भारतातील प्रदीर्घ काळाच्या लॉकडाऊनमुळे अनेक नेमबाजांना सराव करता आला नव्हता. प्रशिक्षकही आपली पूर्ण सेवा देऊ शकले नव्हते. त्यामुळे २०१९-२०च्या हंगामातील नेमबाजांना गवसलेला सूर आतापर्यंत कायम असेल अशी अपेक्षा करणे चूक आहे.

त्यातही नेमबाजी स्पर्धा म्हणजे, त्या त्या क्षणाची किंमत. अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकाची कामगिरी मी प्रत्यक्ष तेथे पाहिली आहे. चीनचा विश्वविजेता आरामात सुवर्णपदकाकडे वाटचाल करत होता. सातव्या फेरीअखेर त्याचे काही तरी बिनसले आणि स्कोअर १० अंकाच्या आत आला. तोपर्यंत पहिल्या पाचात असलेल्या अभिनवला नेमका अखेरच्या तीन फेर्यांमध्ये सूर गवसला. म्हणजे विश्वविजेत्याची कामगिरी खराब होणे आणि अभिनवची सर्वोत्तम होणे, हाच तो ‘योग’ होता, जो भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक देऊन गेला.

असे योग फारवेळा येत नाहीत. मात्र शूटिंगसारख्या खेळात चमत्कारासाठी अशाच ‘क्षणांची’ आवश्यकता असते. टोकियोतील असेच काही क्षण भारताला नवी उमेद, आशा देऊन जातील.

सुदैवाने २०२१मधील स्पर्धांमध्ये भारतीयांना आपल्या उणिवा कळल्या. त्या दूर करण्यासाठी नंतर पुरेसा अवधीही मिळाला. संघातील तरुण खेळाडूही ताकद आहे का कच्चा दुवा हे अद्यापी कळायचे आहे. राही सरनोबत (२५ मीटर पिस्तुल), अपूर्वी चंडेला (१० मीटर एअर रायफल), संजीव राजपूत (५० मीटर रायफल, थ्री पोझिशन) आणि मईराज यांनी याआधी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

एशियन चॅम्पियनशीप सौरभ चौधरी, मनू भाकर, माजी विश्वविजेता दिव्येश सिंग, इलावेनील वेलारिवन ही तरुणाई भारताला आशेची किरण दाखवत आहे.

खरंतर दिव्येश सिंग, अभिषेक वर्मा, यशस्विनी देस्वाल. चिंकी यादव, सौरभ चौधरी, मनू भाकर या खेळाडूंना जाणकारांनी सुवर्णपदकासाठी पसंती दिली आहे. मात्र शूटिंग हा असा खेळ आहे की, काही सेकंद जरी तुमचे नसले तरीही गतकामगिरी तुमच्याकडून होत नाही. किंवा त्या गुणसंख्येपर्यंत पोहोचता येत नाही. एकदा का मागे पडलात की, सावरणे कठीण जाते. भारतीय नेमबाजांच्या बाबतीत असं बरेच वेळा झालंय. म्हणून गळ्यात सुवर्ण किंवा कोणतेही पदक पडेपर्यंत छातीठोकपणे अंदाज व्यक्त करता येत नाही. ऐश्वरी तोमर, अंजुम, सौरभ चौधरी, राही सरनोबत, इलावेनील या सर्वांकडून किमान पदकांची अपेक्षा ठेवू या.

यंदा १२७ खेळाडूंचा भारतीय चमू आहे. भारताची गेल्या काही ऑलिम्पिकमधील कामगिरी वाईटही नाही. अथेन्स ऑलिम्पिकपासून भारतीय क्रीडापटूंनी पदकांची कमाई करण्यास सुरवात केली आहे. वेटलिफ्टिंग, नेमबाजी, बॉक्सिंग, अथलेटिक्स, तिरंदाजी, कुस्ती, बॅडमिंटन, टेनिस आदी खेळांमध्ये भारतीयांना यावेळी पदके मिळण्याची आशा आहे.

रिओ ऑलिम्पिकला ११७ जणांचे भारतीय खेळाडूंची पदक गेले होते. दोन महिलांनी मिळवलेल्या साक्षी मलिक (कांस्य पदक) व पी. व्ही. सिंधू (रौप्य पदक) वगळता सर्वांच्या हाती निराशा आली होती. त्या तुलनेत लंडन ऑलिम्पिक भारतीयांसाठी सुदैवीच म्हणावे लागेल. ८३ जणांच्या चमूने १३ क्रीडाप्रकारात भाग घेतला होता. त्या आधीच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अवघे ५७ जण १२ खेळांच्या स्पर्धेत उतरले होते. अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकाने नवा अध्याय लिहिला. मात्र त्याच ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ १९२८पासून पहिल्यांदाच हॉकी स्पर्धेत खेळण्यास पात्र ठरला नव्हता.

यावेळी सारंच वेगळं असेल. कोरोनामुळे तमाम क्रीडाविश्वावर मोठा प्रभाव पडला आहे. आघाडीच्या खेळाडूंचे सराव तुटले आहेत. फिटनेसच्या समस्या आहेत. भारतीय खेळाडूही या गोष्टीला अपवाद नाहीत. ऑलिम्पिक स्पर्धा होणार किंवा नाही याबाबत शाश्वती नव्हती. तरीही पदकांची अपेक्षा असणार्या खेळाडूंना भारताने प्रशिक्षणासाठी आधीपासूनच परदेशात पाठवले होते. नेमबाज मॉस्कोमध्ये सराव करत होते. नेत्रा कुमानन, विष्णू सरवाना, के.सी. गणपती, वरुण ठक्कर हे यॉटिंग स्पर्धेचे स्पर्धक युरोपात सराव करत होते.

महिलांच्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीचे रॅकिंग पहिल्या क्रमांकाचे आहे. या रँकिंगला साजेशी कामगिरी करून त्या अव्वल क्रमांकाला दीपिकाला पदकामध्ये परावर्तीत करायचे आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपिका पदकाच्या जवळ पोहोचली होती, खराब हवामानाने तिची व भारताची पदकाची संधी हुकवली होती. यावेळी तिरंदाजांकडून यापूर्वीपेक्षा अपेक्षा केली जात आहे.

बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम या अनुभवी महिला स्पर्धकाप्रमाणेच लेविना बोरगोहेन या आसामच्या महिला खेळाडूकडून अपेक्षा आहे. पुरुषांमध्ये हरियाणाचा अमित पोंगल, विकास किशन यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे. कुस्तीमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रविकुमार यांच्यापैकी कुणीतरी पदक मिळवेल अशी आशा आहे. महिलांमध्ये विनेश फोगाट पदकाची दावेदार मानली जात आहे. तिरंदाजीत दीपिका कुमारीकडून रौप्य पदकाची तर मिश्र सांघिक रौप्य पदकाची अपेक्षा करण्यात येत आहे. पी. व्ही. सिंधू रिओच्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी आशा आहे. घोडा मैदान दूर नाहीच.

विनायक दळवी, ज्येष्ठ क्रीडापत्रकार असून त्यांनी अनेक ऑलिम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0