नवी दिल्लीः देशातील अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर निर्माण झालेल्या अराजकात श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे (७६) यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा
नवी दिल्लीः देशातील अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर निर्माण झालेल्या अराजकात श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे (७६) यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. देशात एकता कायम राहावी व देश संकटातून बाहेर पडावा यासाठी महिंदा राजपक्षे यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव सर्वच थरातून वाढत गेला होता.
महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा असा दबाव राष्ट्रपतींकडूनही वाढत होता. राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर हंगामी राष्ट्रीय परिषद स्थापन करण्याचे राष्ट्रपतींचे प्रयत्न सुरू आहेत. ही परिषद स्थापन झाल्यानंतर नव्या पंतप्रधानांची व मंत्रिमंडळाची नियुक्ती केली जाणार आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे महिंदा राजपक्षे यांचे धाकटे बंधू आहेत. महिंदा राजपक्षे यांच्यासोबत अन्य दोन कॅबिनेट मंत्र्यांनीही राजीनामे दिल्याचे पीटीआयचे वृत्त आहे.
सोमवारी महिंदा राजपक्षे यांच्याकडून राजीनामा देण्याआधी राष्ट्रपतींच्या निवासस्थानापुढे हजारो आंदोलकांनी निदर्शने केली. यावेळी सरकारसमर्थक व आंदोलक यांच्यात चकमक झडल्या. या घटनेत ७८ जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण देशात आणीबाणी घोषित केली आहे.
COMMENTS