आमच्याकडे अजूनही सरकारसाठी संख्याबळ – पवार

आमच्याकडे अजूनही सरकारसाठी संख्याबळ – पवार

मुंबई : फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केला असला तरी सत्ता स्थापन करण्यास आवश्यक असलेले संख्या बळ राष्ट्रवादी काँग्रेस,

आगीनंतर तयारी वणव्याची…
पत्रकारांवर हल्लेः देशभरातून निषेध
तिहेरी तलाक आता फौजदारी गुन्हा : राज्यसभेचीही मंजुरी

मुंबई : फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केला असला तरी सत्ता स्थापन करण्यास आवश्यक असलेले संख्या बळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसकडे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

शनिवारी सकाळी राष्ट्रवादीचे एक नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या अशा निर्णयाने संभ्रम व संताप निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची व शिवसेना व काँग्रेसच्या एकूण भूमिका स्पष्ट करण्यासाठी शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवार यांनी आपल्यालाही अजित पवार काही आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत जातील याची कल्पना नव्हती याची कबुली दिली.

पवारांनी सकाळी सात वाजल्यापासूनचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले,

‘सकाळी साडेसातच्या सुमारास मला एका आमच्याच पक्षातील आमदाराचा फोन आला आणि त्यांनी आम्ही राजभवनावर जात असल्याचे सांगितले. नंतर अजित पवार यांनी काही राष्ट्रवादीच्या २० आमदारांसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतल्याचे नंतर कळाले. मला राज्यपालांची सकाळी सात वाजताची ही कार्यतत्परता पाहून आश्चर्य वाटले.

पण हा निर्णय राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधातला असून अनेक सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्याची कल्पना नसेल. जर पुरेसे संख्याबळ नसेल तर या आमदारांचे सदस्यत्व जाईल. जे आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत त्यांची नावे आता स्पष्ट होत आहेत. काही आमदारांनी माझी भेट घेऊन आम्हाला राजभवनावर अजित दादांनी बोलावलं म्हणून गेलो होतो पण आम्हाला तेथे नेमकं काय चाललेय याची कल्पना नव्हती असे स्पष्ट केले. जे सदस्य अजित पवार यांच्यासोबत राजभवनावर गेले असतील त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल. जे गैरसमजुतीतून गेले असतील त्यांच्याविरोधात पक्ष काही पावले उचलणार नाही पण ज्यांनी जाणीवपूर्वक अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल त्यांच्यावर शिस्तपालन समिती योग्य ती कारवाई करेल.’

अजित पवार यांनी ईडीच्या चौकशीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे काय या प्रश्नावर शरद पवार यांनी मला त्याची माहिती नाही असे स्पष्ट केले.

आम्ही एकत्र आहोत

राज्यातल्या या राजकीय नाट्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे सरकार येईल असे पुन्हा स्पष्ट केले. ते म्हणाले, राष्ट्रवादीकडे पक्षाच्या चिन्हाकडून निवडून आलेल्या आमदारांचे नाव, त्यांचा मतदारसंघ व त्यांच्या स्वाक्षऱ्या अशी यादी आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेनेचे एकूण संख्याबळ १५६ होत होते त्यात शिवसेनेसोबत जाणारे अपक्ष, राष्ट्रवादी व काँग्रेससोबत असणारे अपक्ष यांची संख्या मिळून १६९-१७० इतकी होती.

आम्ही सरकार बनवण्याची तयारीही केली होती. कारण आमच्याकडे बहुमताचा आकडा होता. पण हा आकडा भाजपकडे नसल्याने सरकार आमचेच येणार असे पवार यांनी ठामपणे सांगितले.

राष्ट्रवादीमधील या बंडाबद्दल शरद पवार यांनी हा अनुभव नवा नाही असे स्पष्ट केले. १९८०मध्ये माझ्या पक्षातले  ५८ आमदार फुटून गेले होते व ६ आमदार शिल्लक होते. पण पुढच्या निवडणुकीत आम्ही त्या सर्वांचा पराभव केला होता. उलट आमचा नंबर वाढला, असे ते म्हणाले.

राज्यपालांची फसवणूक झाल्याची शक्यता

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांची एक यादी राज्यपालांना दाखवल्याबाबत पवार म्हणाले, माझ्याकडे राष्ट्रवादीचे निवडून आलेल्या आमदारांची एक यादी आहे. यात आमदारांचे नाव, त्यांचा मतदारसंघ व त्यांची स्वाक्षरी आहे. ही यादी अजित पवार यांनी राज्यपालांना सादर केल्याची शक्यता आहे आणि या यादीवर विश्वास ठेवून कदाचित राज्यपालांनी त्यांना शपथ घ्यायला लावली असे मला वाटत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: