‘क्रिस्टो’ची ‘झाकले’ली कला !

‘क्रिस्टो’ची ‘झाकले’ली कला !

क्रिस्तो मूळचा बल्गेरियातला. तिथल्या कम्युनिस्ट दादागिरीला कंटाळून तो फ्रान्स, अमेरिकेत परागंदा झाला. १९६१ साली बर्लीनची भिंत उभारण्यात आली. क्रिस्टोला राग आला. तेव्हां तो पॅरिसमधे होता. त्यानं अडीचशेपेक्षा जास्त पिंपं गोळा केली, रंगवली आणि त्याची एक भिंत उभी केली.

न्यायाधीशांवर टीका: माजी न्या. कर्णन यांना अटक
तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार यांचे जामीन अर्ज फेटाळले
व्होडाफोन-आयडियामधील३५ टक्के हिस्सेदारी केंद्राकडे

पॅरिसमधील ‘आर्क डी ट्रायंफ’ ऊर्फ विजय कमान ही १५४ फूट उंचीची इमारत गेल्या महिन्यात पूर्णपणे झाकली गेली होती. ही इमारत मुळात १८०६ साली नेपोलियननं आपला विजय साजरा करण्यासाठी बांधली होती. झाकली म्हणजे तंबोऱ्याला जशी गवसणी घालतात तशी गवसणी त्या इमारतीला घातली गेली होती. उगवत्या सूर्याचा प्रकाश, मावळत्या सूर्याचा प्रकाश, पॅरिसचा बहुरंगी झगमगाट अशा सर्वात ही इमारत सतत वेगवेगळी दिसत असे. लाखो लोकानी इमारतीचं हे बदलतं रूप पाहिलं.

पॅरिसमधील ‘आर्क डी ट्रायंफ’ची मूळ इमारत.

पॅरिसमधील ‘आर्क डी ट्रायंफ’ची मूळ इमारत.

हा उद्योग क्रिस्टो जवाशेफ नावाच्या एका बल्गेरियन माणसाच्या आराखड्यानुसार करण्यात आला होता. क्रिस्टोनं या गवसणीचं ड्रॉईंगं आणि तपशील १९६२ सालीच तयार करून ठेवले होते. २०२० मधे ८४ व्या वर्षी तो वारला. त्याचा मुलगा आणि त्याचे चाहते यांनी १२०० कामगारांच्या मदतीनं हा उद्योग पूर्ण केला.

गवसणीसाठी २५ हजार पॉलिप्रोपेलिन कापड वापरलं. इमारतीतल्या रिलीफमधली शिल्पं सुरक्षित झाकण्यासाठी स्टीलच्या चौकशी वापरण्यात आल्या होत्या. त्यासाठी १५० टन स्टील लागलं. गवसणी गुंडाळण्यासाठी ७ किमी लांबीचे लाल दोरखंड वापरण्यात आले.

क्रिस्तो मूळचा बल्गेरियातला. तिथल्या कम्युनिस्ट दादागिरीला कंटाळून तो फ्रान्स, अमेरिकेत परागंदा झाला.

१९६१ साली बर्लीनची भिंत उभारण्यात आली. क्रिस्टोला राग आला. तेव्हां तो पॅरिसमधे होता. त्यानं अडीचशेपेक्षा जास्त पिंपं गोळा केली, रंगवली आणि त्याची एक भिंत उभी केली.

पॅरिसमधील ‘आर्क डी ट्रायंफ’ची झाकलेली इमारत.

पॅरिसमधील ‘आर्क डी ट्रायंफ’ची झाकलेली इमारत.

या कलाप्रकाराला तेव्हां इन्स्टॉलेशन म्हणत. नाना प्रकारच्या वस्तू एकत्र करून त्याची एक रचना उभी करायची. कोणत्याही वस्तू. टमरेलं. फुटकी भांडी. पेट्या, खोके. सुटे भाग. यंत्रांचे भाग. असं काहीही! ही रचना पहाणं हा एक स्वतंत्र आनंदाचा भाग असतो.

क्रिस्टोनं गवसणी हा एक नवा प्रकार सुरु केला. त्यानं एकदा पॅरिसमधला एक पूल त्यावरच्या दिव्यांसह कापडानं झाकला.

एकदा त्यानं बर्लीनमधली राईशटॅग ही संसदेची ऐतिहासीक इमारत पूर्णपणे झाकली. जर्मन लोकं जाम वैतागले. ऐतिहासिक इमारत अशा रीतीनं झाकण्याला काय अर्थ आहे, हा इतिहासाचा अपमान आहे वगैरे. जर्मन लोकमत आणि जर्मन सरकारचं मत या दोन्हींशी झगडा करून क्रिस्टोनं रिकस्टॅग झाकली.

एकदा त्यानं अमेरिकेतल्या कोलोराडोमधे दोन डोंगरांच्या मधला भाग भगवा पॉलीअमाईड कापड टांगून भरला. जणू कापडाची भिंत घालून तयार केलेलं धरण. त्यासाठी २ लाख चौरस फूट कापड वापरलं. कापड भिंतीची उंची ३६५ फूट आणि रुंदी १२५० फूट.

खूप जोराचा वारा आला. कापड फडफडलं, फाटलं. प्रयोग खतम!

बर्लीनमधली राईशटॅग ही संसदेची ऐतिहासीक इमारत पूर्णपणे झाकली.

बर्लीनमधली राईशटॅग ही संसदेची ऐतिहासीक इमारत पूर्णपणे झाकली.

एकदा २००५ साली त्यानं न्यू यॉर्कमधल्या उद्यानात २३ मैलाच्या पायवाटीवर लोखंडी कमानी उभारल्या आणि त्या कमानींना भगवं कापड टांगलं. ७५०३ कमानी. १० लाख चौरस फूट कापड. ५३९० टन स्टील.

एकदा तर त्यानं एका छोट्याशा बेटाभोवती कापड आंथरलं. त्या बेटावर जाण्यासाठी पाण्यावर तरंगणारी कापडी पायवाट तयार केली.

हे सर्व उद्योग तो स्वतःच्या खर्चानं करत असे. त्यानं एक कंपनी स्थापन केली होती. ती कंपनी नाना वाटांनी पैसे मिळवत असे आणि ते पैसे तो या उद्योगात घालत असे. तो सरकारी पैसा वापरण्याच्या विरोधात होता. कोणाहीकडून कोणतीही देणगी घेतली की घेणारा माणूस मिंधा होतो, देणाऱ्याचं ऐकत बसावं लागतं, आपल्याला स्वातंत्र्य रहात नाही असं त्याचं मत होतं.

कम्युनिस्टांची एक स्वतंत्र कलाशैली होती, जी क्रिस्टोला नापसंत होती. मार्क्स, लेनिन ते लोकांच्या बोकांडी मारत. त्यांचे भलेमोठे पुतळे. घट्टमुट्ट. एकदा उभे केले की मामला खतम. नंतर पुढच्या पिढ्या पिढ्यांनी ते तसेच पहायचे. क्रिस्टोला वाटे हा विचार, कला प्रत्येक पिढीला स्वतंत्र दिसली पाहिजे, अनुभवता आली पाहिजे.

शिल्प, पुतळा, पिंपांची भिंत. शिल्प, पुतळा एकदा झाला की संपलं. पिंपांची भिंत मोडा, नवी करा. त्या ऐवजी तिसऱ्याच कशाची तरी भिंत उभारा. प्रत्येक उभारणीत एक स्वतंत्र आनंद.

क्षणभंगूर कला. आस्वाद घ्या. संपवा.

अमेरिकेतल्या कोलोराडोमधे दोन डोंगरांच्या मधला भाग भगवा पॉलीअमाईड कापड टांगून भरला.

अमेरिकेतल्या कोलोराडोमधे दोन डोंगरांच्या मधला भाग भगवा पॉलीअमाईड कापड टांगून भरला.

विजयी कमान दोन आठवडे वेगळी दिसली. त्या दोन आठवड्यातही ती दररोज वेगळी दिसे आणि दिवसाच्या प्रत्येक प्रहरात वेगळी दिसे.

विजय कमान कोणा आर्किटेक्टनं कल्पिली, बांधली. तोही कलाकार होता, त्याचीही एक स्वतंत्र शैली होती. क्रिस्टोनं त्याच्या कलावस्तूला धक्का न लावता तीच कलाकृती काही वेगळ्या रीतीनं लोकाना दाखवली. जुनी कलाकृती पुन्हा तशीच सोडून क्रिस्टो मोकळा झाला.

एक तत्वज्ञानाच्या क्षेत्रातला विचार. वस्तू झाकणं आणि दाखवणं, एकाच वेळी. इमारत झाकली. पण तीच इमारत दाखवलीही, वेगळ्या रुपात.

पत्रकार क्रिस्टोला भेटायला येत, त्याची मुलाखत घेत. मुलाखत देताना क्रिस्टो एका जागी बसत नसे. येरझारा घालत बोलत असे.

वळवळ्या, सतत काही तरी करत रहाणारा माणूस. कोणी त्याला विचारलं की एव्हढी ऊर्जा त्याच्याकडं येते कुठून? क्रिस्टो म्हणे, सोपं आहे, कमी खा. क्रिस्टो सकाळी न्याहरीच्या वेळी थोडं दही आणि लसूण खात असे. नंतर दिवसभर काहीही नाही, एकदम रात्रीचं जेवण.

कम्युनिस्ट म्हणजे स्वातंत्र्याची गळचेपी असं त्याचं मत होतं. परंतू कम्युनिझमचं दुसरं टोक असं ज्याला म्हणतात तो बाजारवादही त्याला फोल वाटत असे. उदा. बाजारवादी जगात कलाकार चित्र काढतात, कॅनव्हासवर. उदा. मोनालिसाचं चित्र. मग ते चित्रं कोणी तरी जपतं, विकत घेतं. मग त्याची किमत वाढत जाते. नंतर त्या चित्राचा काळाबाजार सुरु होतं. केवळ बाजारामुळं एक रुपयाचं चित्र लाख रुपयांचं होतं. म्हणजे चित्र आणि चित्रकाराला किंमत नाही, बाजाराच्या मागणी पुरवठा या तत्वानुसार चित्राची किंमत बदलणार. कलेची किंमत आस्वादाशी संबंधीत नाही, कलाकृतीला किती मागणी आहे यावरून ठरणार.

क्रिस्टोनं ती भानगडच काढून टाकली. पूल झाकला, इमारत झाकली, पिंपांची भिंत केली. काही दिवसांचा मामला. खतम. कोणी ते विकत घ्या, त्यांचा बाजार मांडा ही भागनडच नाही.

क्रिस्टो स्वतःच्या मस्तीत जगला. रॅप हा नवा कलाप्रकार त्यानं हाताळला. अमेरिका, फ्रान्स या देशात असला चक्रमपणा करायला वाव असतो. विजय कमान झाकण्याला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी परवानगी दिली, उदघाटनाला ते स्वतः हजर होते. म्हणाले की कलाकाराला, कलेला स्वातंत्र्य असलं पाहिजे.

कोणी क्रिस्टोला तो शोमन आहे असं म्हटलं.

कोणी म्हणालं की तो भामटा आहे.

कोणी म्हणतात की तो कलाकार आहे.

कलाकार आणि कलाकृतीकडं माणसं त्यांच्या त्यांच्या परीनं पहातात. प्रत्येकाचं पहाणं वेगळं.

कोणी काहीही म्हणो.

क्रिस्टो नावाचा एक माणूस स्वतंत्रपणे शिल्लक उरतोच.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0