चांदवा

चांदवा

कुट या पाणपक्षाचे मराठी नाव अगदी त्याच्या शारीरिक वैशिष्ट्यावरून प्रचलित झाले. गडद शामल अंग आणि माथ्यावरचा पांढरा शुभ्र भाग काळ्या रात्रीतल्या चंद्रासारखा दिसतो म्हणून “चांदवा” असे नाव पडले. वारकरी संप्रदायात माथ्यावर गंध लावण्याच्या पद्धतीप्रमाणे पांढरा गंध कुट पक्षात दिसतो म्हणून “वारकरी” असेही संबोधतात. सोलापुरातील सिद्धेश्वर तलाव यासाठी उत्तम अधिवास ठरतो. कारण वर्षभर वास्तव्य करण्यास सुरक्षित ठिकाण तसेच प्रजननास अनुकूल असा परिसर आहे.

गुपित महाधनेशाचे
स्थलांतरित पक्ष्यांचा सांभर तलावात गूढ मृत्यू
गा विहंगांनो….

सोलापूर शहराची प्रथम दर्शनी ओळख म्हणजे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्वर.  शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले अध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व नैसर्गिक सौदर्याने नटलेला नयनरम्य परिसर होय.  भूरचनेत खोलगट भाग असल्याने तलावाची निर्मिती झाल्याचे दिसून येते.  तलावाच्या पूर्वेकडे जुनी रिपन हॉलची इमारत आणि माझी शाळा सिद्धेश्वर प्रशाला स्थित आहे. उत्तरेकडे गणपती घाट असून पश्चिमेकडे इतिहासाची साक्ष देणारा भुईकोट किल्ला तलावाची खंबीरपणे पाठराखण करतोय. मंदिराचा प्रवेशद्वार दक्षिणेकडून आहे. तलावाचा परिसर रमणीय बनविणारे विविध घटक येथे पाहायला मिळतात.  नारळाच्या झाडींचे कुंपण, किल्ल्याच्या बाजूने असलेली गर्दराई विविध सजीवांचे पोषण करतात. प्रभात फेरीसाठी ही जागा खूप लोकप्रिय आहे.  साऱ्याच ऋतूमध्ये याचे सौदर्य पाहण्याजोगे असते परंतु श्रावणात इथली मजा अवर्णनीय. सततच्या बरसणाऱ्या सरीने पाण्याची पातळी वाढत राहते. उंचीवरून वाहत येणारे झरे तळ्यात मिसळतात. जलचर प्राणी व पाण्याच्या सहवासात अधिक काळ जगणाऱ्या सजीवांची रेलचैल वाढते.

पिल्लांची सुश्रुषा करताना चांदवा नर व मादी

पिल्लांची सुश्रुषा करताना चांदवा नर व मादी

कुट या पाणपक्षाचे मराठी नाव अगदी त्याच्या शारीरिक वैशिष्ट्यावरून प्रचलित झाले. गडद शामल अंग आणि माथ्यावरचा पांढरा शुभ्र भाग काळ्या रात्रीतल्या चंद्रासारखा दिसतो म्हणून “चांदवा” असे नाव पडले.  वारकरी  संप्रदायात माथ्यावर गंध लावण्याच्या पद्धतीप्रमाणे पांढरा गंध कुट पक्षात दिसतो म्हणून “वारकरी” असेही संबोधतात. हा पक्षी सर्व प्रकारच्या गोड पाण्याच्या पाणवठ्यावर राहणे पसंत करतो.  सोलापुरातील सिद्धेश्वर तलाव यासाठी उत्तम अधिवास ठरतो. कारण वर्षभर वास्तव्य करण्यास सुरक्षित ठिकाण तसेच प्रजननास अनुकूल असा परिसर आहे.

जून महिन्याचा पहिला आठवडा. तलावावर विविध पक्षांची हालचाल चालू होती. पाणबुडी अन्नाच्या शोधात पाण्यात बुडायची. पुढे जाऊन काही अंतरावर डोके काढायची. पाण्याच्या आधे-मधे पडलेल्या एक एक दगडाच्या टोकावर पाणकावळे पंख पसरवून ऊन-वाऱ्याचा फायदा घेत होते. नर चांदवा मदमस्त आवाजात चक्यावss…चक्यावss…गात होता. तेव्हा तळ्यात इतर माद्यासुद्धा होत्या. बाहेरून एखादा नर स्वतःचा दबदबा प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न होता. तर गवतात दडलेला दुसरा नर त्यावर वेगाने धावून गेला. पहिल्या नराने पळ काढला. त्याने प्रतिउत्तर काही दिले नाही. वारकरी पक्षाच्या पायाच्या बोटांमध्ये पसरट त्वचा असल्यामुळे पाण्यावर किवा पानांवर चालायला सोपे जाते.  पाण्याच्या प्रतलावर वेगाने धावताना पाणी उंच उडले. दोघे दूरपर्यंत धावून गेले.

एकमेकांची पसंती असलेली नरमादीची जोडी तीन दिवस सोबत फिरत होते. मिळून संपूर्ण तलाव परिसरात विहार करीत. अन्न शोधून उपजीविका केली. त्या दरम्यान नर हळूच मादीच्या मागून येऊन पाठीवर बसला. ५ ते १० सेकंदाचा समागम झाला. १०-१५ मिनिटाच्या अंतराने हा क्षण होई. मादीने पाचवेळा या घटनेला साद दिली. नर मादीवर बसताना चोचीने तिच्या मानेवर टोचायचा. अर्धे शरीर पाण्यात बुडून मान वर करून मादिने प्रणयाराधनेला संमती दिली.

समागमनानंतर घरटे बांधण्याच्या कामाची सुरुवात झाली. तळ्याच्या काठावर उगवलेली पाणगवत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत होते.  मादीने मजबूत काठ्यांचा पाया रचून त्यांना गवतपात्यांनी बांधले.  पुढील दोन – तीन दिवस घरट प्रतलावर तरंगत वाहून जाऊ नये म्हणून यांनी हत्ती गवताच्या कुंपण वजा संरक्षित जागेत आपले बस्तान थाटले.  गवत गोळा करण्यात नराने मदत केली. मादीने ते गवत घरट्याभोवती विणले. अनेकवार त्यामध्ये बसून पाहिले, मजबूत बांधकामाची खात्री केली. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने घरटे बनले. दोन दिवसानंतर त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ दिसले. घरट्यात एक अंडी दिसू लागली. पाच दिवसाअंती चांदवा कुटुंबात एकूण चार सदस्यांची भर्ती झाली.

चांदवा आपल्या घरट्याची पाया बांधणी करताना

चांदवा आपल्या घरट्याची पाया बांधणी करताना

मादीचा सबंध दिवस अंड्यांना ऊब देण्यात जायचा. अन्नाच्या शोधात मोजक्या वेळी ती तळ्यात उतरायची. तेव्हा नर तिची जबाबदारी सांभाळायचा. तब्बल १६ दिवसांनी प्रतीक्षा संपली. सकाळी अंड्यातून चार पिल्ले बाहेर आली. त्यांचे पालक कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होते.   गोंडस लुडबुडणारे शरीर, लुकलुकणाऱ्या पापण्या, लालबुंध डोक, मानेवरची पिवळी लवपिसे आणि आई-बापासारखे काळेकुट्ट शरीर.

चारही पिल्ली बाहेर आल्यानंतर नराने अंड्याची कवचे दूर काठावर नेली. प्रत्येक तुकडे वेगवेगळ्या दिशेने टाकून आला. शिकाऱ्यांना याचा वास पोहोचू नये म्हणून हा खटाटोप. तासाभराने चांदवा दांपत्याने आपली पलटन घेऊन उपजीविकेसाठी तळ्यात उतरले. पालक पाण्यातले जलपर्णी, हत्तीगवताच्या मुळांशी असणारे कीटक, बिया, पाण्यातले न दिसणारे सजीव तसेच मृदुकाय प्राणी टिपून पिल्लांना खावू घालत होते. चार पोट भरविणे म्हणजे खूप जिकीरीचे काम. वारकरी पक्षाचे पालकत्व अगदी पाहण्याजोगे होते.

घरट्यातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन देताना मादी चांदवा

घरट्यातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन देताना मादी चांदवा

हवामानात होणारे बदल भूमीवरील जीवनांवर परिणामकारक ठरतात.  अचानक पाऊस धारा बरसू लागली जलजीवन जणू स्तब्ध झालं. तळ्याच्या संथ प्रतलावर थेंब पडत होती. लहानसहान थेंबामुळे पाण्यावर लहरींची छोटी छोटी वलये बनू लागली; पुसू लागली.  चांदव्याची मादी आपल्या पिलांसह घरट्याकडे परतली. मातृत्वाच्या उबदार पंखाखाली तिने आपल्या चारही पिल्लांना स्वतःमध्ये सामावून घेतलं. पावसाची सरी वाढू लागली सोबत वाऱ्याने जोर धरला.  पाण्यावर घरटे डगमगू लागले. तात्कालीन परिस्थिती पाहता नराने आपली समय सूचकता दर्शवली. तो घरट्याच्या सुरक्षिततेच्या कामाला लागला. आणखी गवतकाड्या एकवटू लागला. गवतकाड्या मादीला आणून द्यायचा. मादी घरट्यात बसूनच घरट्याची पुढील बांधणी करत होती.

दुसऱ्या दिवसाची सकाळ. लख्ख प्रकाशाने आसमंत चमकत होता.  चहूकडे ताजेतवाने वातावरण होते. रातोरात चांदवा जोडप्याने ढिगभर गवत गोळा करून ऐसपैस घरटं तयार केल होतं. दिवसावार पिल्ले अधिकच सक्रीय होत होती. पालकांसोबत तळ्यात फिरताना सैरावैरा चालायची. इतर पक्षांचा अंदाज घेऊन आई त्यांना हाक देवून जवळ बोलवायची. गवतांच्या भूलभुलैयामध्ये भटकल्यावर त्यांचा आवाज वाढायचा तेव्हा दोघे नर-मादी त्यांच्यावर नजर ठेवून असायचे. वारकरी कुटुंबाचा सबंध दिनक्रम असा चालायचा. दिवस जसजसा मावळतीकडे झुकतो त्या त्या वेळची सजीवसृष्टी पाणवठ्याकडे प्रस्थान करते. रिपन हॉलच्या भोवताली असणाऱ्या झाडांमध्ये फ्लायिंगफॉक्स वाघळ वास्तव्याला होती. सायंकाळच्या वेळेला त्यांची सकाळ झाली. पाणी पिण्यासाठी शेकडो वाघळ तलावावर घिरट्या घेऊ लागली. पाण्याचा एक घोट पिण्यासाठी त्यांना प्रतलावर झेप घ्यावी लागते. तलावाच्या सगळ्या परिसरात यांची गर्दी झाली.  भयानक आकृती, रंग व वेग पाहून चांदव्याची पिल्ले घाबरून पालकासोबत घरट्याकडे परतली.

अन्नाच्या शोधात निघताना चांदवा कुटुंब

अन्नाच्या शोधात निघताना चांदवा कुटुंब

जलाशय हा अधिवास अनेकविध सजीवांना आश्रयस्थान बनला आहे.  सस्तन प्राण्यापासून ते सरपटणाऱ्यापर्यंत, पक्षापासून ते किटकांपर्यंत प्रत्येकांना परिस्थितीकीय नियमानुसार स्थान मिळाले आहे. चांदवा कुटुंब एकेदिवशी अन्नाच्या शोधात विहार करत होते. घरट्यापासून बरीच अंतर दूर निघून गेली होती. पिलांची नेहमीप्रमाणे दंगा-मस्ती चालली होती. मादी पुढे होती. तिच्या मागे चार पिलांची टोळी आणि त्यामागे नर असा मोर्चा निघाला होता. पिलांचा चिवचिवाट, पाण्यावर जोरजोरात पाय आपटत चालणे, पुढे – मागे करणे. इतर सर्वांना सहजच समजावे की चांदवा कुटुंब बाहेर पडले आहेत. त्याच वेळी पाणदिवड शिकारीच्या शोधात निघाला होता. पिल्लांच्या हालचालीवर नजर रोखून होता. सापानेही संधी आजमावण्याची योजना आखली. त्याने मादीवर समोरून हल्ला चढविला. थव्यात हडकंप माजला. सगळे आपापल्या दिशेने धावले. मादी जोरात किंचाळली. सापाचा हल्ला निष्फळ ठरला. नराने पुढे येऊन कमान सांभाळली. तो दिवडावर धावून गेला. चोचीने सापाला हिसकावून लावला. दरम्यान मादीने पिल्लांना एकवटून जवळच्या पाणगवताच्या आडोश्याला घेऊन जावू लागली.   साप पाण्यात बुडून स्वतःच रक्षण करत होता. सापाची छोट्यातली छोटी हालचाल दिसताच नर हल्ला करत होता. पाण्याच्या प्रतलावर खूप खळबळलेल्या वलयांच्या गोंधळात पाणदिवड नाहीसा झाला. तो कुठे निघून गेला कळलेच नाही. चांदव्याची सारी पिल्ल सुखरूप होती. नर मादी सहकुटुंब घरट्याकडे परतली.

सिद्धेश्वर तलावात चांदव्याचे जीवन जितके मनोहारी आहे तितकेच शर्तीचे सुद्धा. यांच्याकडून अनेकविध शिकवण मिळते. त्यांची कष्ट करण्याची प्रवृत्ती, स्वतःच्या भूमिकेतली कर्तव्यनिष्ठता दिसून येते. पालकत्वाचा उत्तम उदाहरण यांच्याकडे पाहून आपण मनुष्यप्राणी शिकूया की संकटाना सामोरे जाताना चांदव्याचे मनोधैर्य अंगी बाळगले पाहिजे.

लेखक राघवेंद्र वंजारी – राघवेंद्र हे अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळुरू येथे संशोधन सहयोगी म्हणून कार्यरत आहेत. तर राहुल वंजारी – राहुल हे सोलापूरमध्ये कार्यरत आहेत. हे दोघे बंधू निसर्गप्रेमी आहेत.  निसर्गासंबंधी निरीक्षणे नोंदविणे हे यांचं मनपसंत काम आहे. शालेय विद्यार्थी दशेपासून या कामात स्वतःला जोडले आहेत. NatureNotes

(सर्व छायाचित्रे राहुल वंजारी) 

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन’ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास खालील फॉर्म भरा.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0