डॉ. ढेरे, देशात कोणती शाही आहे? – जयंत पवार

डॉ. ढेरे, देशात कोणती शाही आहे? – जयंत पवार

देशामध्ये हिटलरशाही नाही, असे वक्तव्य करणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे यांना गेल्या ५ वर्षांतील घटनांचा आढावा घेत, लेखक जयंत पवार यांनी दिलेले उत्तर.

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री
शांतता! खेळ सुरू आहे…
नागपूर पोलिसांकडून सर्वांत जुना रेड लाइट एरिया अचानक बंद

९२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर काल भाष्य केले. त्या म्हणाल्या, की जर एखाद्याने वेगळी भूमिका घेतली, की लगेच त्याने एका विचारधारेचा झेंडा हातात घेतलाय, असं होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्वजण सुजाण नागरिक आहेत.’

जयंत पवार

जयंत पवार

शुक्रवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारावर टीका केली होती. ‘देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे’, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यावर एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर ढेरे यांनी हे मत व्यक्त केलं. साहित्यिकांवर कोणताही दबाव नाही असंही त्या म्हणाल्या.

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरू आहे. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या भाषणात देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, “लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हा देखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असे जेव्हा जेव्हा घडते, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागिरकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी व विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असे मला वाटते.’

डॉ. अरुणा ढेरे यांच्या वक्तव्यावर साक्षेपी लेखक, नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांनी दिलेले उत्तर.

काही दिवसांपूर्वीच देशात भेदाचे वातावरण निर्माण झाल्याचे आणि सर्वसामान्यांच्या पायाखालची विश्वासाची भूमी हिरावून घेतल्याचे वक्तव्य करणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे यांनी संमेलनात, आता मात्र देशात हिटलरशाही नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होत नाही असे वाटते. आपण आधी फारच बोलून गेलो की काय, या धास्तीने त्यांनी ही सारवासारव केलेली दिसते.

डॉ. अरुणा ढेरे

डॉ. अरुणा ढेरे

त्या नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या विसरल्यात की काय? पेरुमल मुरगन, पुलियार मुरगेसन आणि अशा अनेक लेखकांना ठराविक विचारसरणीच्या संघटनांकडून चारित्र्य हनन, मारहाण व बहिष्कार आदी दिव्यांना गेल्या पाच वर्षांत सामोरे जावे लागल्याच्या घटना त्यांना ठाऊक नाहीत काय? ५० अल्पसंख्याक लोकांना केवळ संशयावरून झुंडीने ठेचून मारल्याच्या घटना त्यांनी विस्मृतीत ढकलल्यात की काय?

या सर्व प्रकारांत शांत राहिलेल्या पंतप्रधानांचे, त्यांच्या सरकारचे, सरकारच्या इशाऱ्यावर गप्प बसणारे, वा त्याला हवी तशीच कृती करून बळी पडलेल्यांनाच आरोपी बनवणारे पोलिस, समाज माध्यमांतून विरोध करणाऱ्या माणसांवर अश्लाघ्य भाषेत तुटून पडणारे सरकार पुरस्कृत सायबर सैनिक, यांचे त्या समर्थन करतात काय? देशभर सरकारला संशयास्पद वाटणाऱ्या नाटकांचे प्रयोग पोलिस अडवतात, त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावतात, आपली दहशत निर्माण करतात, हे कदाचित अरुणा ढेरे यांच्या गावीही नसावे. गेल्या १५ आगस्टला पुण्यात आणि त्याआधी काही दिवस मुंबईत असे दोन प्रकार घडले आहेत.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

गेल्या साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांना न येऊ दिल्याने ढेरे बाईंनी व्यक्त केलेली चीड खोटी होती की काय? आणि स्वतःच संमेलनाच्या उद्घाटन सत्रात केलेल्या आपल्या भाषणातले आरोळ्या मारणाऱ्यांबद्दल केलेले वक्तव्य कोणाविषयी होते असे त्यांना वाटते?

आज देशात नागरिकत्वाच्या आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने निर्माण झालेली अशांतता त्यांना कशाची निदर्शक वाटते? ज्यांना गुजरात दंगलीनंतरही मोदींची अमानुषता जाणवली नाही, असे लोक मोदींना हिटलर म्हणताच चिडतात. खवळतात. आतादेखील देशात हिटलरशाही अवतरली आहे म्हटल्यावर त्यांना सात्त्विक राजस आणि तामसी असा सर्व प्रकारचा संताप येतो. एक खरे आहे की हिटलरने लाखो ज्यूंना मारले तशा सामूहिक कत्तली झालेल्या नाहीत. तशा झाल्यावर कदाचित काही लोक बोलतील. पण सध्या देशात चालू असलेला सरकार पुरस्कृत खोटा प्रचार, राष्ट्रवादी उन्माद, जनमानसात रुजवलेला अन्य विशिष्ट धर्मीयांबद्दलचा द्वेष आणि सतत युद्धजन्य मानसिकता तयार करून जनतेला दिली जाणारी गुंगी, ही हिटलरशाहीची लक्षणे नाहीत काय?

ठीक आहे, तरी देखील अरुणा ढेरे यांना कुठेही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत नाही आणि देशात हिटलरशाही नाही असे म्हणायचे असल्यास म्हणू दे, पण मग देशात कुठली ‘शाही’ आहे, हे तरी त्यांनी सांगावे. मोदीशाही की अमितशाही?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0