दोन पोप: त्यांच्यातले संघर्ष आणि संवाद

दोन पोप: त्यांच्यातले संघर्ष आणि संवाद

टू पोप्स या नावाची फिल्म मुंबईच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट उत्सवात दाखवली गेली.

मंदीर, मस्जिद, चर्च आणि कोरोना
आमार कोलकाता – भाग ८ :भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर
आमार कोलकाता – भाग ७ – कोलकात्यातील चीनी

एक पोप निवृत्त होतात. पोपनं निवृत्त व्हायची परंपरा नसतांनाही. कारण आपण पाप केलंय, आपण आता शरीराच्या हिशोबात कामं पार पाडायला असमर्थ आहोत असं त्याना समजलेलं असतं. तू निवृत्त हो असा संदेश त्यांच्याशी अबोला धरून परमेश्वरानं त्यांना दिलेला असतो.

त्यांच्या जागी नव्या पोपची निवड होते.

पण प्रकरण इतकं साधं नसतं.

निवृत्त होणारे पोप कर्मठ आणि सनातनी असतात. पर्यावरण संकट, नाना देशांत होणारी स्थलांतर, विषमता, गरीबी, समलैंगिकता इत्यादी वास्तव स्वीकारायला ते तयार नसतात.

नव्यानं निवडून आलेले पोप आधीच्या पोपांच्या नेमक्या विरोधी विचारांचे असतात. चर्चमधे सुधारणा व्हावी, चर्चमधे होणाऱ्या भ्रष्ट व्यवहाराबद्दल संबंधितांवर कारवाई करावी, जगामधे घडत असलेल्या बदलांची दखल घेऊन चर्चनं सक्रीय व्हावं असं त्यांचं मत असतं.

वैचारिक मतभिन्नता असणारे, व्यक्तीमत्वही भिन्न असणारे दोन पोप एकमेकांना भेटतात, संयमित पद्धतीनं भांडतात, एकमेकाला समजून घेत मित्र होतात अशी ही टू पोप्सची गोष्ट आहे.

चित्रपटात व्हॅटिकनचं वैभव दिसतं, कायच्या काय लांब रूंद उंच दालनं आणि चॅपेल दिसतात. कायच्या काय मोठे चौक आणि प्रासाद दिसतात. नक्षीदार खुर्च्या आणि टेबलं दिसतात, डिझायनर ड्रेसेस दिसतात, दागिने आणि टोप्या दिसतात, अत्यंत देखणे पोशाख दिसतात. राजेशाही थाटात वावरणारा पोप दिसतो. लोकांमधे न मिसळणारा पोप दिसतो. सारं कसं देखणं.

चित्रपटात अर्जेंटिनातली दाट ओंगळ वस्ती दिसते. चित्रपटात गरीब माणसं दिसतात, संकटग्रस्तांचं महास्थलांतर दिसतं. साध्या कपड्यात गरीब वस्तीतून फिरणारा कार्डिनल दिसतो.

राजासारख्या वावरणाऱ्या पोपांच्या दृश्यांबरोबरच  झांगड रेस्तोरंटात वर्ल्ड कप पहाताना किंचाळणाऱ्या कार्डिनलचं दृश्य दिसतं.

पोप आणि कार्डिनल तात्विक कीस पाडताना आणि भांडताना दिसतात, एकमेकांचं ऐकताना दिसतात, आपापली पापं शेअर करताना दिसतात, बियरचा मग उंचावत मॅच पहाताना दिसतात, पिझ्झा खाताना दिसतात आणि शेवटी टँगो हे नृत्य करताना दिसतात.

ख्रिस्ती धर्मातला मुख्य मुद्दा असा. देवानं सफरचंद खाऊ नकोस असं सांगितलं असताना माणसानं ते खाण्याचं पाप केल्यानं देवानं पापी माणसाला पृथ्वीवर ढकललं. पापी माणसाला मुक्ती देण्याची सोय देवानं केली. पापांची कबूली दिली की देव क्षमा करतो, पाप्याला स्वर्गात प्रवेश देतो. एके काळी प्रीस्टांनी मुक्तीचे परवाने विकून धंदा केला. तेव्हांच मार्टिन लुथरनं बंड करून प्रोटेस्टंट हा नवा पंथ निर्माण केला.

क्षमा याचना करणं, क्षमा करणं या गोष्टी चांगल्याच आहेत. त्यात एक उदात्तता असते. योग्य अयोग्यता हा त्यातला महत्वाचा मुद्दा असतो. अयोग्य कृत्य केल्याची कबूली दिलीत म्हणून क्षमा. योग्य कृत्य करताय म्हणून पापातून सुटका. शहाणी, अनुभवी माणसं समाजाला योग्य मार्गदर्शन करत असतात. ते मार्गदर्शन परमेश्वरच करतो असं धर्माळू माणसं मानतात.  त्यातला देवाचा भाग सोडला  तर योग्य काय आणि अयोग्य काय याचा विवेक अद्यात्मिक असतो.

टू पोप्समधे हाच विषय मांडलेला आहे.

चर्चचे अनेक प्रीस्ट अल्पवयीन मुलांचा लैंगिक गैरवापर करतात. हा गैरव्यवहार माहित असूनही पोप बेनेडिक्ट तिकडं दुर्लक्ष करतात. गुन्हे करणाऱ्या प्रीस्टाना सेक्युलर कायद्यानुसार तुरुंगवास झाला पाहिजे, चर्चचे सर्वोच्च अधिकारी या नात्यानं पोपनंही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं आधुनिक लोकशाही म्हणते. हा झाला कायदा-लोकशाहीचा न्याय. चर्चची परंपरा  अपराधी प्रीस्ट आणि पोप यांचा कबूलीजबाब घेऊन त्याना क्षमा करते. हा चर्चचा न्याय.

आपली चूक झाली आणि देवानं मला त्याची जाणीव करून दिली आहे असं बेनेडिक्ट म्हणतात,  कार्डिनल त्याना क्षमा करतात, असं दृश्य चित्रपटात आहे.

याच चित्रपटात दुसऱ्या एका संभाषणात कार्डिनल बेर्गोलियो (विद्यमान पोप फ्रान्सिस) सांगतात की केवळ क्षमा करून भागणार नाही,  पाप ही जखम आहे, क्षमा करून भागत नाही, ती जखम भरून काढायला हवी, जखमीला सुख द्यायला हवं.

लग्न करू नकोस, प्रीस्ट हो असं एका शहाण्या माणसाच्या करवी देवानं बिशप बेर्गोलियोला सांगितलं. देवानं काही अर्जेंटिन बिशपना लष्करी हुकूमशहाचे अत्याचार दाखवले आणि त्यांच्या विरोधात लढ असं सांगितलं. त्याच देवानं मेणबत्तीचा धूर आकाशाकडं पाठवायच्या ऐवजी जमिनीकडं पाठवून बेनेडिक्टना सांगितलं की त्याना पद सोडावं (चित्रपटातली दृश्यं)

धर्माच्या चौकटीपलीकडचा एक अद्यात्मिक भाग धर्म-चर्चमधे आहे असं  धर्म न मानणाऱ्या लोकांनाही वाटतं. टू पोप्समधे पोप फ्रान्सिसची भूमिका करणारे नट जोनाथन प्राईस अश्रद्ध आहेत. त्यांना पोप फ्रान्सिस भेटले तेव्हां बरं वाटलं, तुम्हाला मी क्षमा करेन असं फ्रान्सिस म्हणाले तेव्हां धर्माच्या पलिकडचं एक अद्यात्मिक सुख आपल्याला लाभलं असं प्राईस म्हणाले.

दिद्गर्शक मिरेलेस अश्रद्ध असूनही त्याना चर्च आणि पोप हे विषय हाताळावेसे वाटले,   त्यात माणसाच्या मूलभूत भावना आणि गरजा गुंतलेल्या आहेत हे त्याना समजत होतं. मिरेलेस यांनी एक कलाकार या भूमिकेतून चित्रपट निर्मिला, एक धार्मिक प्रवचन म्हणून नव्हे. पोप फ्रान्सिनना एब्बा या आलबममलं डान्सिंग क्वीन हे गाणं आवडतं आणि त्याना जॅझ संगित आवडतं हे मिरेलेस यांनी ठळकपणे दाखवलं, कर्मठ पोपना अभिजात जर्मन संगीत आवडतं हेही दाखवलं.

मिरेलेसनी ब्राझीलच्या टीव्हीसाठी आणि नेटफ्लिक्ससाठी अनेक मालिका निर्मिल्या आहेत, दिग्दर्शित केल्या आहेत. चित्रपटाची, त्यातल्या दृश्यांची गती ते कुशलतेनं हाताळतात. प्रभाव साधण्यासाठी ते गतीचा उपयोग करतात. कधी दृश्यं वेगानं एकामागोमाग येतात तर कधी ती संथपणे पुढं सरकतात. दोन व्यक्तीमधील संबंध, संवाद, संघर्ष हा चित्रपटाचा गाभा असल्याना दोन पोप जेव्हां दिसतात तेव्हां कॅमेरा रेंगाळतो, चेहरे अगदी जवळून दाखवतो.

मिरेलेस यांचा या आधीचा सिटी ऑफ गॉड हा चित्रपट रियो या शहराच्या उपनगरातले गुन्हे आणि हिंसेवर आधारलेला आहे. तिथं माणसं महत्वाची नाहीत, त्यांनी तयार केलेल्या टोळ्या आणि हिंसा महत्वाची आहे. त्या चित्रपटात कॅमेरा माणसांवर रेंगाळत नाही, शहर दाखवतो, टोळ्या दाखवतो, गोळीबाराचे आवाज ऐकवतो.

टू पोप्समधे दृश्य कधी वेगानं सरकतात तर कधी संथपणे. सिटी ऑफ गॉडमधे चित्रपटभर दृश्यं फार वेगानं सरकतात. एका दृश्यामधे  काय पाहिलंय असा विचार आपण करत असतो तोवर आणखी दोन दृश्यं डोळ्यासमोरुन जातात.

टू पोप्स देखणा आहे, त्यात प्रसन्नता आहे. सिटी ऑफ गॉड काळोखात, संधी प्रकाशात घडतो. प्रत्येक रंगात तिथं काळा रंग दाटपणे मिसळलेला दिसतो. काळ्या पांढऱ्या रंगातली दृश्यं हिंसा, क्रौर्य, भीषणता या गोष्टी गडद करतात. टू पोप्समधे काळं पांढरं चित्रण कमी आहे, रंगीत उत्तेजक चित्रण अधिक आहे.

काय गंमत आहे पहा. दिद्गर्शक मिरेलेस ब्राझिलियन आहेत, त्यांची भाषा आहे पोर्तुगीझ. पटकथा लेखक अमेरिकन आहेत, त्यांची भाषा आहे इंग्रजी.  मुख्य भूमिका करणारे अँथनी हॉपकिन्स आणि जोनाथन प्राईस हे वेल्श आहेत, त्यांची भाषा आहे वेल्श. सिनेमात भाषा आहे लॅटिन, स्पॅनिश, जर्मन आणि इटालियन.

कोणीही माणूस कोणत्याही देशाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही भाषेत सिनेमा करू शकतो. पीटर ब्रूकनं महाभारत केलं. अॅटेनबरोनी गांधी केला. सिनेमा ही दृश्य कला आहे. भूमिकेतला माणूस कोणत्या देशातला आहे, त्याच्या कातडीचा रंग आणि त्याची भाषा दुय्यम असते. गोष्ट महत्वाची, गोष्ट दिसणं महत्वाचं. म्हणूनच तर टू पोप्समधे जर्मन पोप आणि अर्जेंटिन पोप यांच्यातला संवाद आणि संघर्ष पहाताना मजा येते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0