नरेंद्र मोदी. छत्रपती शिवाजी. हिटलर.

नरेंद्र मोदी. छत्रपती शिवाजी. हिटलर.

वर्तमान पत्रात फोटो झळकला. आजचा शिवाजी, नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा. भगवे दुपट्टे खांद्यावर मिरवत भाजपच्या माणसांनी या पुस्तकाचं प्रकाशन के

१९ लाख ईव्हीएमचा हिशेब सांगाः कर्नाटक काँग्रेसची मागणी
‘मोदींच्या राज्यात सामान्य, गरीब नव्हे तर अब्जाधीश सुरक्षित’
शासन बदललं, प्रशासन बदला!

वर्तमान पत्रात फोटो झळकला. आजचा शिवाजी, नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा. भगवे दुपट्टे खांद्यावर मिरवत भाजपच्या माणसांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. प्रकाशन भाजपच्या कार्यालयात झालं. पुस्तकात शब्दांनी तुलना केली आहेच परंतू मोदींचा फोटो आणि शिवाजी महाराजांचं रेखाचित्र एकमेकाशेजारी ठेवून दोघांचं सारखेपण ठळकपणे व्यक्त केलंय.

आपण कौतुकानं आपल्या मुलाबाळामित्रांची तुलना मोठे लोकं, संत, देव इत्यादींशी करत असतो. राग आला की त्यांची तुलना दुष्ट माणसांशी करतो. पण हे सारं आपण सीरियसली घेत नाही. शरद पवारांना जाणता राजा असं म्हटलं गेलं.  शरद पवार जाणते असतील पण राजे नाहीत. शिवाजींशी त्यांची तुलना त्यांच्या पुढं पुढं करणाऱ्या लोकांनीच केली होती.पवाराना मोठं म्हणायचं तर ते मोठेपण केवढं असावं असा विचार करून लोकांनी शिवाजी महाराजांशी तुलना केली येवढंच. कोणीही गंभीरपणे त्याना शिवाजी महाराज वगैरे मानत नाही, पवारही तशी तुलना केली की मनातल्या मनात हसत असतात, हांजी हांजी करणारी माणसं ओळखणं त्याना सोपं जातं.

हतबल भाजपचे लोक, बुद्धी शिणलेले तरूण, राजकारणात हताश झालेले हिंदत्ववादी इत्यादी लोकांना निदान कल्पनेच्या पातळीवर तरी कोणी तरी त्राता हवा होता. मोदींच्या रुपात तो त्याना मिळाला. आता आपल्या परंपरेनुसार त्यांचं कौतुक करणं भाग होतं, त्यांची आरती ओवाळणंही भाग होता. शिवाजी महाराजांशी तुलना करून ते मोकळे झाले. त्या माणसांनी कधी शिवाजीही धडपणे वाचला नसल्यानं तुलना करणं सोपं झालं.

तुलनेची निर्रथक सवय अंगी बाणलेली असूनही लोकं जाम खवळली. मोदी कोणीही असतील, पण शिवाजी महाराजांशी तुलना करू नये असं माणसं म्हणाली. अगदी सर्व प्रकारची माणसं, सर्व पक्षांची माणसं तसं म्हणाली. भाजपनं हात झटकले. पक्ष म्हणून आपला त्या पक्षाशी संबंध नाही असं जागोजागचे भाजपचे लोक म्हणाले. ज्या माणसानं पुस्तक लिहिलं प्रकाशित केलं तो माणूस काही मागं हटला नाही. मोदी आजचे शिवाजी आहेत असं तो ठासून म्हणाला.

संघ परिवाराला आतून काय वाटत असेल?

शिवाजी महाराज या राज्यकर्त्याच्या अनेक पैलूपैकी त्यांनी औरंगझेब इत्यादी मुघलांशी लढाई केली येवढाच एक पैलू संघ परिवाराला महत्वाचा वाटतो.( आणि अर्थातच ब्राह्मण प्रतीपालक.)  मोदीनी गुजरातेत मुसलमानांची कशी ठासली यांची रसभरीत वर्णनं करतांना संघ परिवाराला शिवाजी महाराज आठवतात. काश्मिर सबंधातले मोदींचे उद्योग म्हणजे तिथल्या मुसलमानांची कशी वाट लावली जातेय याचा आनंद व्यक्त करताना त्यांना शिवाजी महाराज आठवतात. बीफचं निमित्त करून मुसलमानांचं लिंचिंग करण्यातला आनंद व्यक्त करतांना त्याना मोदी आणि शिवाजी एकमेकाशेजारी उभे आहेत असं वाटतं. हे सारं शिवाजी महाराजांनी केलंच होतं असं संघवाले कल्पितात. इतिहास आपल्या राजकीय सोयीनुसार पहाण्याची सवय लागलेले संघवाले मनातल्या मनात जिरेटोप घातलेले मोदीच डोळ्यासमोर आणत असतात. मुसलमान या एकाच मुद्द्याभोवती संघ जन्मला वाढला असल्यानं शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानांचा निःपात करणारे राजे अशी समजूत ते करून घेतात.

संघ परिवाराची इतिहासाची आणि राजकारणाची समजूत अगदीच मर्यादित असल्यानं त्याना ” मुसलमानांना धडा शिकवणारा ” शिवाजी येवढाच शिवाजी महाराजांचा पैलू लक्षात येतो.

शिवाजी महाराजांना राज्य विस्तार करायचा होता आणि राज्यावर आक्रमण करणारे इतर राज्यकर्ते मुघल होते याला महाराजांचा इलाज नव्हता. स्वराज्यातल्या लोकांचं (हिंदुंचं) कल्याण करणाऱ्या अनेक गोष्टी (प्रशासनिक) त्यांनी केल्या. त्या करत असताना आड येणारे लोक हिंदूच नव्हे, आपल्यात जातीतलेच नव्हेत तर आपल्या परिवारातले असले तरीही शिवाजी महाराजांनी त्यांची गय केली नाही. आणि मुसलमान म्हणून कोणाला वगळलं नाही. राजकीय, प्रशासकीय कार्याचा केंद्रबिंदू न्याय असा होता, धर्म-जात हा त्यांच्या राज्यविषयक कल्पनेचा केंद्रबिंदू नव्हता. त्यांची न्यायाची जी काही कल्पना होती त्यात धर्म हा मुख्य बिंदू नव्हता.

शिवाजी महाराज एका हिंदू आई वडिलांच्या पोटी जन्मले होते,त्यांचा परिसर हिंदू होता, म्हणून ते हिंदू होते. ते सतरावं शतक होतं. त्या वेळी फाळणी झालेली नव्हती, त्या वेळी काँग्रेस, हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग नव्हती.

संघ परिवाराची शिवाजीबद्दलची कल्पना ही सर्वस्वी त्यांची आहे, उरलेलं जग शिवाजी महाराजांकडं तसं पहात नाही. मांजर डोळे मिटून दूध पीत असलं तरी जगानं डोळे मिटलेले नसतात.

नरेंद्र मोदी हे संघाचा प्रॉडक्ट आहेत, भाजपचा नव्हे. संघानं नाना आघाड्या करत, नाना राजकीय उड्या मारत नाना प्रकारची माणसं गोळा करत भाजपची उभारणी केली आहे. विखे पाटील काही संघाचे नाहीत. आज नरेंद्र मोदींना भरघोस मतं दिलेले तरूण संघाचे नाहीत. सत्ता बदल हवा असलेल्यानी, काँग्रेसला दूर सारण्याची इच्छा असलेल्या तरूणानी आणि प्रौढांनी, त्यात बहुसंख्य लोक धर्मानं हिंदू आहेत, भाजपला मतं दिली, ती मतं संघाला नव्हती. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना वाटलेली आपुलकी ही संघाबद्दलची आपुलकी नाही. संघ हुशारीनं मोदींबद्दल निर्माण झालेली जनरल आपुलकी संघाकडं वळवण्याच्या प्रयत्नात असतो. त्या प्रयत्नापैकी शिवाजी महाराज आणि मोदी यांना सारखंच मानणं हा एक आहे.

गंमत अशी की हिंदुत्व परिवार मोदींना शिवाजी मानत असतानाच हिंदुत्व परिवारानं प्रभावित नसलेली लोकं मोदीना हिटलर मानतात. मोदींच्या विरोधात बोलणारी माणसं सतत मोदींची तुलना हिटलरशी करत असतात.

हा एक अजब क्षण आहे. एकच माणूस लोकांना शिवाजी वाटतो आणि हिटलर वाटतो.

हिटलर.

कॅथलिकांमधे ज्यूंबद्दलचे गैरसमज आणि द्वेष जन्मजात असतो. ज्यूनी ख्रिस्ताचा खून केला असं कॅथलिकांना वाटतं. वास्तव वेगळंच आहे. ख्रिस्त निर्माण झाला तेव्हां ख्रिस्ती धर्मच नव्हता. माणसं ज्यू होती किंवा इतर धर्मपूर्व पंथांची होती. ख्रिस्त जन्मानं ज्यूच होता आणि त्याला मारणारे लोकंही ज्यूच होते. त्या काळच्या राज्यात लोकांवर अन्याय होत होता, विषमता होती, गरीबी होती, रोगराई होती. ते सारं दूर करण्याचा प्रयत्न ख्रिस्तानं केला म्हणून त्याला क्रूसावर चढवण्यात आलं.

हिटलर जन्मानं कॅथलिक होता. ज्यूंबद्दलचा द्वेष त्यानं राजकारणात वापरला. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीवर दोस्त देशांनी निर्बंध लादले होते, लष्कर वाढवायला बंदी घातली होती, खंडणी मागितली होती. जर्मनीची अर्थव्यवस्था कोसळली होती, गरीबी विषमता, बेकारी वाढली होती. हे सारं ज्यू माणसांमुळं झालं आहे, त्या माणसांचा नायनाट केला तरच जर्मनीची प्रगती होईल असं हिटलरनं जर्मन लोकांच्या मनावर जुमलेबाजी करून ठसवलं. हिटलरनं रस्ते बांधले, कारखाने उभारले, अर्थव्यवस्थेला गती दिली. परंतू ही गती युद्ध तयारीच्या बाजूनं दिली, एक सुखी देश तयार करण्याच्या दिशेनं नाही. जर्मन माणसं स्वतःच्या आर्थिक विकासाच्या भावनेनं भारलेली नव्हती, ज्यू द्वेष आणि आर्यवंशाच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेनं भारलेली होती.

जर्मनीची आर्थिक व इतर दुर्दशा ज्यूमुळं झाली असं हिटलरचं म्हणणं. भारतात जी काही दुर्दशा होती, आहे किवा येणार आहे तिचं कारण मुसलमान हेच असतं असं संघाचं म्हणणं.

इतिहास आपल्या सोयीसाठी वापराचं म्हटलं की कशी गोची होते पहा. संघाला हिटलरचं प्रेम. हिटलरच्या माईन काँफच्या प्रती संघवाले विकत घेतात,वाचतात, पसरवतात.पण त्या हिटलरनं ज्यांचा द्वेष केला आणि ज्याना घाऊक पद्धतीनं मारलं त्या ज्यूंबद्दल मात्र संघाला अतोनात प्रेम, इस्रायलकडं ही माणसं मावशीभूमी असल्यासारखं पहातात. कारण इस्रायलनं पॅलेस्टिनींना म्हणजेच मुसलमानांना झोडणं चालवलंय. हिटलरप्रेम, ज्यूप्रेम.

काही दिवसांनी वरील फोटोत झळकलेल्या लोकांनी आजचा हिटलर नरेंद्र मोदी अशीही पुस्तिका काढली पाहिजे.

विरोधी आणि सत्ताधारी यांच्यात एकमत झालंय, नरेंद्र मोदी हे हिटलर आहेत. शिवाजी महाराज या विषयावर मात्र अजून एकमत होत नाहीये.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0