माणसाला माणसावाचून पर्याय नाही आणि परस्परव्यवहारांवर त्याचं नियंत्रणही नाही. म्हटली तर ही सनातन कोंडी. आशा-निराशा, सुख-दुःख आदींचा स्त्रोतही. हे जीवनसूत्र ज्याला आकळलं, त्याने आत्मशोधातून स्वतःचा कायापालट घडवून आणला. त्यातून सुंदर जगातल्या तितक्याच सुंदर कहाण्या जन्माला येत गेल्या. यथावकाश त्या रुपेरी पडद्यावरही अवतीर्ण झाल्या. त्यातून उजळून निघालेले आत्मोत्कर्षाचे क्षण टिपणारा हा मनोवेधक लेख...
व्यवहारी जगाचे ठोके ऐकू येतात..
डोळे उघडतात…
आपला ‘बूट’ स्वप्नात ठेऊन,
आपण वास्तवात येतो…
प्रत्येकात दडलेली असते एक ‘सिंड्रेला’..
वास्तवाची जाणीव कायम जगण्याचा पैस मर्यादित ठेवत असते. आणि या मर्यादित पैसचा आब राखण्यात अख्खं आयुष्य खर्ची पडतं. त्यांची किंमत काही स्वप्नं, आवड, इच्छा मागे ठेवून मोजावी लागते. मग कधी तरी हा बूट स्वप्नात येऊन तकलीफ देतो. स्वप्नंच ते… असे म्हणत पायातल्या बुटाला पॉलिश करून, करून चमकविण्यात धन्यता मानतो. पण काही लोकांना हा स्वप्नातील बूट दिवसाढवळ्या देखील खुणावतो. नुसत्या कल्पनेनेच ते कमालीचे प्रफुल्लित, उत्साहित होतात. “Enthusiasm is the greatest power. For one endowed with enthusiasm nothing in this world is impossible.” वास्तव आणि स्वप्नं याचा विस्मयकारक मेळ घालत ते लोक बूट शोधायला निघतात. काहींची ही बूट शोधण्याची धडपड इतरांसाठी प्रेरणादायी ठरते तर काहींसाठी हा शोध स्वतःपुरता समाधानकारक, अर्थपूर्ण ठरतो. तर काहींसाठी हा बूट आत्मशोधाचे होकायंत्र बनते. त्यांची ही शोधमोहीम परिकथेसारखीच सुरस व रोमहर्षक असते. नव्या वर्षात प्रवेश करताना उमेद जागवणाऱ्या या अशाच काही कहाण्या.
बर्टचा वेग आणि आवेग
असाच एक बूटशोध्या माणूस म्हणजे ७४ वर्षाचा बर्ट मुनरो. न्यूझीलंडमधील इन्वरकार्गिल या छोट्याशा गावात राहणाऱ्या बर्टला जगातली वेगवान मोटारबाइक बनविण्याच्या वेडाने पछाडलेलं असतं. त्यासाठी तो गेली २०वर्षे इंडियन स्काऊट या ४७ वर्ष जुन्या बाइकवर काम करत असतो. त्यासाठी स्वयंपाकघरातील उपकरणे, भंगारातील वस्तू यांचा वापर करतो. अमेरिकेतील ‘बोनविले सॉल्ट फ्लॅट्स’ (bonneville salt flats) इथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याचे त्याचे स्वप्न असतं. एका सकाळी त्यांच्या छातीत कळ येते आणि तो कोसळतो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्याला सांगतात की हा अँजायनाचा अटॅक होता. यापुढे स्वतःची काळजी घेणं गरजेचं! बर्टला आपल्या भावाचे मरण आठवतं. लहानपणी त्याच्या डोळ्यादेखत झाड कोसळल्याने भावाचा मृत्यू झालेला असतो. जीवन किती क्षणभंगुर आहे,ते त्याने जवळून बघितलं असतं. आता तर त्याला त्याचं स्वप्न अधिक ठळकपणे खुणावू लागतं.
त्यासाठी लागणारा पैसा त्याच्याकडे नसतो. तो कर्ज काढून आपलं स्वप्न साकार करायला निघतो. तेही पैसे फारसे पुरेसे नसतात व जुनं समान वापरून बनवलेली बाइक म्हणावी तशी मजबूत, सुरक्षित नसते पण मजबूत इरादा घेऊन बर्ट निघतो. शेजारच्या छोट्या मुलांना म्हणतो, ‘जर तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही एखाद्या भाजीप्रमाणे मिळमिळीत आयुष्य जगत असता. स्वप्नं ही जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत स्वप्नंच असतात. ‘त्याला मुक्कामाला पोहचेपर्यंत अनेक अडथळे पार करावे लागतात. पण त्याचा हरहुन्नरीपणा आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व यामुळे वेळोवेळी मदत मिळत जाते. तो स्पर्धेच्या ठिकाणी पोहचतो. तिथे गेल्यावर त्याचे वय, त्याची धक्कास्टार्ट बाइक व रायडिंगचा ड्रेस, पॅराशूट नसणं यामुळे बर्टला परवानगी मिळत नाही, पण तो आयोजकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करतो. शेवटी त्याची जिद्द बघून परवानगी मिळते. बर्टला परवानगी देताना लांबून आलेल्या एका हट्टी म्हाताऱ्याची इच्छा पूर्ण करण्याचे समाधान, बस इतकाच आयोजकाचा उदात्त हेतू असतो. त्याच्या बाईकचा एक्झॉस्ट फॅन खूप लवकर तापत असतो. म्हणून बर्ट पायाला जाड कपडा बांधतो, पण त्या कपड्यामुळे अडथळा निर्माण होतोय, हे बघून बर्ट तो कपडा काढून टाकतो.
आपली हृदयविकाराची गोळी घेऊन, हा ७४ वर्षांचा तरुण आपल्या जुन्या धक्कास्टार्ट बाइकवर सवार होतो. प्रत्येक ट्रॅकगणिक त्याचा वेग वाढत जातो. वेगामुळे त्याचा गॉगल उडून जातो. एकीकडे एक्झॉस्ट फॅन गरम झाल्याने पाय भाजत असतो. तरीही बर्ट थांबत नाही. आणि आठव्या ट्रॅकवर सर्वांची बोलती बंद होते कारण आता ताशी २०१.८५१ किलोमीटर वेगाने बर्ट बाइक चालवत असतो आणि हे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ झालेलं असतं. त्यानंतर बर्टने सतत ९ वर्ष या ट्रॅकवर बाइक चालवली आणि नवनवीन विक्रम रचले. त्याने १००० cc खालील गटात ताशी २९५.४५३ किलोमीटर वेगाचा उच्चांक प्रस्थापित केला. हा विश्वविक्रम
आजतागायत अबाधित आहे. त्याने जगाला दाखवलं की वेगाचे गणित पदरी केवळ उत्तमोत्तम बाइक आहे, म्हणून जमत नाही तर बाइक वेगाने चालवायला जी जिगर लागते, ती माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तीत असावी लागते. त्याला एकदा छोटा टॉमी विचारतो, की वेगाने बाइक चालवताना तुला मरणाची भीती नाही वाटत? त्यावर बर्ट म्हणतो”. वेगाने जेव्हा बाइक चालते तेव्हा मला सर्व काही मिळाल्यासारखे वाटते. त्या पाच मिनिटांत मी संपूर्ण आयुष्य जगलेलो असतो, ते क्षण मला जगण्यापेक्षा जास्त अनमोल वाटतात” त्याच्या जीवनावर काढलेला चित्रपटाचे नाव आहे- ‘The world’s fastest Indian.’
नात्याची हिरवळ
बर्टच्या वेगवान प्रवासाच्या उलट गोगलगायीच्या गतीने लॉन मोवेरने प्रवासाला निघालेला ७३ वर्षाच्या अल्विनला सतवणारा बूट असतो, तो भावाच्या भेटीचा. काही कारणाने दोन्ही भावात दहा वर्षांपासून अबोला असतो. अल्विनची स्वतःची प्रकृती फारशी चांगली नसते. पाय कमजोर व नजर अधू झाल्याने ड्रायव्हिंग लायसन्स रद्द झालेले असते. एका रात्री त्याची मुलगी सांगते की अंकल लॉनला हार्टअटॅक आला आहे. तेव्हापासून अल्विनला आपल्या भावाला भेटायला जायची इच्छा स्वस्थ बसू देत नाही. आणि तो लॉन मोवरला ट्रॉली बसूवून, त्यात खाण्यापिण्याचे समान भरून ३५०मैल दूर असलेल्या भावला भेटायला निघतो. त्या लॉन मोवरचा जास्तीत जास्त स्पीड असतो ताशी ५ मैल. अल्विनचा हा संपूर्ण प्रवास हेलावून टाकणारा आहे. अनेक संकटं हालअपेष्टा सहन करत ६ आठवडे प्रवास करत जेव्हा आपल्या भावाच्या घरापर्यंत पोहचतो. तेव्हा काही काळ तो स्तब्ध उभा राहतो मग धीर एकवटून आपल्या भावाला हाक मारतो. भाऊ बाहेर येतो. दोघांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येतं. लॉन मोवेरने दोघांच्यात माजलेल्या गवतातल्या अनावश्यक तणाला छाटून, त्यांच्यातली हिरवळ अधिक सुशोभित केलेली असते. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाचे नाव आहे- ‘The straight story.’
आत्मशोधाचा थरार
फुटलेल्या आरशासम विखुरलेल्या आयुष्याला गोळा करून त्यातून परत उभं राहाताना, कधीकधी विपरित परिस्थिती आत्मशोधाचे होकायंत्र बनते. ‘Wild’ एका सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या सुरवातीला एक मुलगी हायकिंग करत असताना तिचा शूज निघून दरीत पडतो. तिच्या पायात खिळा घुसून जखम होते. ती रागाने आपला दुसरा शूज दरीत फेकते आणि सँडल्स घालून पुढच्या प्रवासाला निघते. या मुलीचे नाव शेरील स्ट्रेड. हिचा नुकताच घटस्फोट झालेला असतो. पण त्या आधी तिच्या आईचा कॅन्सरमुळे मृत्यू झालेला असतो. आईचं असं अचानक निघून जाणं शेरील सहन करू शकत नाही. ती डिप्रेशनमध्ये जाते. त्यातून ती एका मागून एक चुका करत जाते. ती ड्रग्ज घ्यायला लागते, सेक्स अॅडिक्ट होते. रस्त्यावर रहाते. या सर्वांची परिणती घटस्फोटात होते. विनाशाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तिची मैत्रीण एम्मी तिला या ट्रेकवर पाठवते. शेरीलदेखील या गोष्टीला तयार होते. नवा अनुभव घेण्यासाठी, ती स्वतःला एक संधी देते. या प्रवासात अनेकदा तिला मागे फिरावेसे वाटते. सुरवातीला आपण हा चुकीचा निर्णय घेतला असं वाटतं राहतं. पण ती तरी पुढे, पुढे जात राहाते. प्रवास नेहमी अनुभवाच्या कक्षा रुंदावतो. रोज रात्री तिला आलेले अनुभव ती लिहीत जाते. त्यातून तिला आपल्या चुका उमजतात. आत दडलेलं स्वतःचं अपरिचित व्यक्तित्व तिला सापडायला लागतं. परिस्थितीवरील राग, राग करण्यातला फोलपणा आतून कळतो. आतून शांतता मिळत जाते. एकटीनेच ती १,१०० मैल पॅसिफिक क्रेस्ट ट्रेल पूर्ण करते. जगताना प्रवाही होणं महत्त्वाचे! स्वतःला माफ करण्याचे धैर्य तिच्यात आलेलं असतं. आज ती यशस्वी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे.
दुर्दम्य सिंड्रेला मॅन
वर्तमानाची दादागिरी सहन करत असताना, अचानक एक संधी समोरून चालत येते, तेव्हा वर्तमानाची दादागिरी मोडीत काढायला, तितकंच तुल्यबळ स्वप्न हवं.
‘From man to myth’ असं सन्मानाने ज्याचं नाव घेतलं जातं, त्या जेम्स जे. ब्रॅडॉकच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचे नाव आहे, ‘सिंड्रेला मॅन.’ ज्या प्रमाणे सिंड्रेलाच्या सुखी आयुष्यात तिच्या सावत्र आईच्या येण्याने उलथापालथ होते. परिस्थितीला शरण जाण्याखेरीज कोणता पर्याय उरत नाही. सर्व बाजूने कोंडमारा होत असताना राजकुमाराच्या वाढदिवसच्या निमित्ताने एक संधी चालून येते आणि आयुष्याचा कायापालट होतो. गोष्टीतल्या परिस्थितीचे इतकेच साम्य अधोरेखित करत, या चित्रपटाचे नाव ‘सिंड्रेला मॅन’ ठेवले आहे. जेम्स उर्फ जिमी एका क्लबचा हुकमी बॉक्सर असतो. त्याचं जगज्जेता होण्याचं ध्येय असतं. पण काही काळानंतर जिमीचा खेळ खालावत जातो. एका मॅचच्या दरम्यान त्याच्या उजव्या मनगटाला गंभीर दुखापत होते. क्लब त्याने बॉक्सिंग लायसन्स रद्द करते. त्यामुळे जिमीचं बॉक्सिंग करियरबरोबरच त्याचं स्वप्न देखील संपुष्टात येतं. ही घटना घडते तेव्हा अमेरिकेत ‘द ग्रेट डिप्रेशन’ सुरू झालेले असतं. घर वगळता जिमिकडे फारसं काही उरत नाही. बायको आणि तीन मुलं यांच्यासाठी तो शिपिंग यार्ड येथे हमालीचे काम करायला सुरुवात करतो. ते काम रोज मिळेल याचा भरवसा नसतो. मिळकत आणि थकलेली बिलं, उधारी यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत असते. सरकारकडून मिळणारा बेरोजगार भत्ता घ्यायला जिमीचे स्वाभिमानी मन तयार होत नसते, पण नाईलाजाने घ्यावा लागतो. पण तो ही पुरेसा नसतो. शेवटी ज्या क्लबमध्ये त्याने नाव कमविले असतं, तिथेच लोकांसमोर हॅट पुढे करून भीक मागण्याची त्याच्यावर वेळ येते. हे केवळ तो आपल्या कुटुंबासाठी करत असतो. जेव्हा परिस्थिती सतत मत्सर करत असते. तेव्हा सर्व मार्ग बंद होतात. पण एक दिवस क्लबचा मॅनेजर एक मॅच खेळण्याचा प्रस्ताव ठेवतो. सराव, लायसन्स आणि खेळण्याचे वय नसताना समोर आलेला हा प्रस्ताव चकित करणारा असतो. पण मग कळतं की क्लबने कॉर्न ब्रिफिंग या ताकदवान खेळाडूंसोबत एक मॅच ठरवलेली असते. पण स्पर्धेचा लागणारा एकतर्फी निकाल जगजाहीर असल्याने, त्याच्याशी लढण्यास कोणी तयार नसतं. म्हणून क्लबला जिमीची आठवण येते. त्या बदल्यात त्याला २५०डॉलर्स मिळणार असतात. ते जिमीसाठी गरजेचे असतात. त्यापोटी जिमी लढतीला तयार होतो. लोक कॉर्न ब्रिफिंगला बघायला गर्दी करतात. बॉक्सिंग रिंगमध्ये जिमी उभं रहातो, तेव्हा त्याचं स्वप्न कोच बनून उभं रहातं. सारं प्रेक्षकगृह कॉर्न ब्रिफिंगच्या नावाचा जयघोष करत असतं तेव्हा स्वप्नाच्या प्रोत्साहनाचा आवाज त्याच्या कानात गुंजतो. आणि…. ती मॅच जिमी जिंकतो. झालं असं असतं, की उजव्या हाताचे मनगट दुखावल्यामुळे हमालीचे काम करताना जिमी डाव्या हाताचा वापर करत असतो. त्यामुळे त्याच्या डाव्या हातात अफाट ताकद आलेली असते. त्यानंतर जिमी मागे वळून बघत नाही. पैसा, प्रतिष्ठा हे पूर्वीपेक्षा जास्त मिळत जातं. जास्त पैसे मिळाल्यावर तो सरकारकडून घेतलेल्या बेरोजगार भत्त्याचे पैसे परत करतो. तो क्षण लख्ख करणारा. पुढे त्याची लढत ‘killer in the ring.” म्हणून ओळखली जाणाऱ्या मॅक्स बेअरशी असते. त्याच्या बायको- मुलांबरोबर क्लबचा मॅनेजरही त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा जिमी म्हणतो,” ही लढत भयानक आहे?त्यापेक्षा गरिबीशी लढणं अधिक भयानक होतं. ही लढत बरोबरीला सुटते. गुणांच्या आधारे जिमी जगज्जेता होतो.
‘फॉरेस्ट गम्प’ या अप्रतिम चित्रपटाच्या सुरवातीला बसस्टॉपवर बसलेल्या फॉरेस्ट गम्पच्या व्यक्तिमत्वाची ओळख त्याच्या मळक्या बुटाने करून दिलेली आहे. त्यानंतर त्याची कहाणी उलगडताना बसस्टॉपवरील येणाऱ्या लोकांची सुंदर, चकचकीत पायताणं आणि याचे मळके बूट यामुळे फॉरेस्ट गम्पचं वेगळेपणं ठळकपणे दिसून येतं. या मळक्या बुटाबाबत एक तत्वज्ञान फॉरेस्टच्या तोंडी आहे ते असेः “My mama always said you can tell a lot about a person by their shoes, where they going, where they been.”
पॉलिश केलेल्या बुटापेक्षा स्वप्नांचा पाठलाग करणारे असे मळके बूट अधिक संपन्न असतात नाही का?
देवयानी पेठकर, लघुपटकार आणि कला आस्वादक आहेत.
(१ जानेवारी २०२२ ‘मुक्त-संवाद’ नियतकालिकातून साभार)
COMMENTS