मुलांकडून उसना लोलक मागायचा आहे..

मुलांकडून उसना लोलक मागायचा आहे..

कोरोनामुळे एकत्र घरात राहायची वेळ आली आहे. संकटाला संधीच रूप द्या. मुलांना वेळ देता-देता आपले ताण कमी होतील. त्याच्या बरोबर आकाशाचे वेगवेगळे आकार बघतांना जगण्याची छान लय सापडून जाईल.

‘कोविडचा धोका टाळण्यासाठी जबाबदार नागरिक बना’
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० ने वाढ
भिवंडीत अडकले लाखो कामगार

एक छोटी मुलगी समुद्रावर शंख-शिंपले गोळा करते. मग ती रमत- गमत एका दुकानात जाते. अँटिक वस्तूच्या त्या दुकानात एक गिऱ्हाईक किंमतीबाबत घासाघीस करत असतो. मालक अगदी खडूसपणे त्याला नकार देतो. वैतागून तो गिऱ्हाईक निघून जातो. ही चिमुरडी तिथल्या नोकराला बाहुली दाखवायला सांगते. तो तिला बाहुली दाखवतो, ती आपल्या छोट्याशा पर्समधून खुळखुळत मूठभर शंख-शिंपले काढून काऊंटरवर ठेवते. नोकर चपापून आपल्या मालकाकडे बघतो. मालक काऊंटरपाशी येतो. शंख- शिंपले गोळा करतो खडूस नजरेने त्या मुलीकडे बघतो, त्यातील तीन-चार शिंपले तिच्याकडे सरकवत म्हणतो, “हे जास्त आहेत.’ बाकीचे शंख-शिंपले गल्ल्यात टाकतो आणि तिला बाहुली देतो.

ही गोष्ट आपल्याला काय देते?

एक मस्त सोनेरी गिरकी घेत, एका परिकथेतील किल्ल्याचा पत्ता देते. त्या किल्ल्याच्या प्रवेशासाठी उसनी का होईना निरागसता ही हवीच. नाहीतरी त्या किल्ल्याचे स्वयंम् घोषित रखवालदार आहोत की आपण!
आता आपल्या हातात आहे की जागता पहारा देणारे रखवालदार बनायचं का? स्वतःची उंची कमी करून त्या किल्ल्यात प्रवेश घ्यायचा आणि मनसोक्त हुंदडायचं, बागडायचं..
त्या किल्ल्याचं नावं आहे-बालपण.
हा काय आचरटपणा आहे?असं वाटण्याची दाट शक्यता आहे. पण थांबा..
या आचरटपणात एक सामाजिक स्वास्थ दडलंय.
मुलांच्यात संपत चाललेली निरागसता ही एक पिळवटून टाकणारी समस्या आहे.
हिंसक आणि असुरक्षित जगाची ओळख मुलांना त्यांच्या जन्मापासून आपोआप होत आहे. आक्रस्ताळेपणा आणि आक्रमकता हा त्यांच्या पिढीचा सहजभाव बनत चालला आहे. त्या कारणाची इथे चर्चा नको करायला.
काही झालं तरी निरागसतेची जपवणूक ही व्हायलाच हवी!

मोर आंब्याच्या वनात नाचलाच हवा..

चॉकलेटचा बंगला चंदेरी, सोनारी चमकायला हवा..

बाहुलीचे लग्न झोकात लागून, विहीणबाईनी भातुकलीचा चट्टामट्टा करायला हवा..

कारण एका निष्पाप,भाबड्या जगात होणारा हा मुक्त वावरचं, त्याच्यातील उद्याचा सजग नागरिक घडणार आहे.

विंदाची एक सुंदर कविता आहे.

‘परीचा पडला दगडावर पाय,

दगड म्हणाला आsय आsय

परी म्हणाली,  “तू तर दगड, तुला का होते परी जड?

दगड म्हणाला, “इथे पहा!

परीला दिसल्या जखमा दहा

तेव्हापासून सर्व परी,

चालू लागल्या अधांतरी.

चित्र - मिथिला जोशी

चित्र – मिथिला जोशी

परीचा नाजूक पाय दगडावर पडला असता, दगड कळवळतो. दगडालाही जीव असू शकतो या फँटसीतून बाहेर आल्यावर पुढे जाऊन जो दगड मला लागतो, तोच दुसऱ्यालाही लागू शकतो ही जाण आयुष्यातील किती तरी अनर्थ टाळू शकते.

सूर्य, चांदोमामा, चांदण्या, पानं-फुल माझ्याप्रमाणे सर्वाचं आहे. या शेअरींगच्या भावनेतून बंधुभाव वाढीस लागू शकतो. भुंग्याना, फुलपाखरांना दोऱ्यात न बांधणारी संवेदनशील मन दुसऱ्याच्या हक्कावर अतिक्रमण करणार नाहीत. फुलांशी, पक्ष्यांशी बोलणारी कोवळी मनं, सद्सद्विवेक बुद्धीने निश्चितच वागू शकतील.

तर्कशुद्ध, विवेकनिष्ठ दृष्टिकोन निर्माण करणं या वाढत्या वयाच्या पायऱ्या निश्चितचं आहेत. बालपणाची साथ कधी ना कधी सुटणार आहेच. बालपण ही फक्त भावी जीवनाची नुसती पूर्वतयारी नसून एक महत्त्वाचा काळ आहे. बालपण अस्सल, स्वच्छ नितळ खरेखुरे असते. या काळात मुलांची वाटचाल कोणी घडविली? त्याच्या मनावर कशाचा प्रभाव पडतोय? त्यांना काय आकलन होतंय? अशा विविध घटकांनी त्या मुलातून कोणत्या प्रकारचा माणूस घडेल, याची जडणघडण होत असते. त्यासाठी आपण मुलं बनून त्यांचा सहप्रवासी होणं गरजेचं.

मंगेश पाडगावकरांनी एका लेखात वयानुसार निबर होणाऱ्या मानसिकतेबद्दल अतिशय मार्मिक लिहिलं आहे. ते म्हणतात, माणसे मोठी झाली की लहानपण विसरतात. वयाबरोबर मनेही प्रौढ होतात. जाड काचेच्या चष्म्यातून डोळे किलकिले करून मोठ्या गंभीरपणे जीवनाकडे पाहू लागतात. प्रौढपणाच्या त्या जाड काचेतून तर्काला दिसणारे सत्यच तेवढे त्यांना पटते.

पाऊस = पाणी= H2O इतकं त्यांना कळते. पावसात श्रावणाच्या नाजूक सरीत चंद्र कसा भिजतो, खोटा पैसा दिला की चिडून पाऊस कसा मोठा होतो हे त्यांना कळू शकत नाही. जादूचे हे सारे जग त्यांना हास्यास्पद वाटू लागते.

‘देवळातील झुंबरातून सापडलेला काचेचा लोलक हरवला माझ्याकडून….

आणि मग दिसू लागली माणसे पुन्हा परत माणसासारखी…

गवत पुन्हा हिरवे आणि आकाश पुन्हा निळे..
बऱ्याच वर्षांनी एक लहान मुलगी धावत आली

आणि म्हणाली, आजी, गवत नसते नुसतेच हिरवे

आणि आकाश नसते नुसतेच निळेशार.

माणसे असतात इंद्रधनुष्याची बनलेली…
अरेच्या माझा हरवलेला लोलक हिला कुठे सापडला बरे??
त्या देवळातील झुंबराला अजून असे किती लोलक आहेत कुणास ठाऊक?

– शांता ज. शेळके

‘संवेदनक्षमता व भावनाक्षमता हे माणुसकी टिकवून ठेवणारे गुण आहेत’, अल्बर्ट आईन्स्टाईन याचं एक विधान आजच्या जगात विचार करायला लावणारं आहे “तुमची मुलं ‘बुद्धिमान’ बनायला हवी असली तर त्यांना परीकथा वाचून दाखवा, तुम्हाला तुमची मुलं ‘जास्त बुद्धिमान’ बनायला हवी असली तर जास्तीत जास्त परीकथा वाचून दाखवा.

‘अँलिस इन वंडरलँड’ मधला “अरे बापरे! फारच उशीर झालाय, अरे बापरे..असं म्हणत, कोटाच्या खिशातील घड्याळ काढून बघणारा ससा आठवतो?

तो भेदरलेला ससा सतत धावत सुटलेला असतो नंतर तो खोलखोल जाणाऱ्या एका बिळात शिरतो.

आपणही तो ससा झालो आहोत का? धावपळीच्या आयुष्याचे, डेडलाईनच्या प्रेशरचे बळी..

स्पर्धेच्या या खोल बिळात स्वतःला ढकलताना कोणी अँलिस आपला पाठलाग करत तर नाहीये ना? याचा थोडं थांबून विचार करायला हवा..

बालसाहित्यात अव्वल ठरलेल्या ‘विनी द पुह’ या पुस्तकाची जन्मकथा खूप बोलकी व विचार करायला लावणारी आहे.

जंगलातल्या घरामध्ये चार वर्षाचा एक मुलगा ज्याचं नाव ख्रिस्तोफर आणि त्याचे वडील ही दोघंच फक्त आहेत. आई नाराज होऊन काही दिवसांसाठी शहरात गेलेली. त्याला सांभाळणाऱ्या नॅनीला, आई आजारी पडल्याने अचानक जावं लागतं. वडील अँलन मिलने हे लेखक. पहिल्या महायुद्धात भाग घेऊन आल्यापासून ते कमालीचे अस्वस्थ असतात. त्यांना लोकांसाठी काही आश्वासक लिहायचं आहे. पण काही केल्या जमत नाहीये. त्यामुळे त्यांच्या कामात व्यत्यय येईल असं वागायचं नाही, हेच ख्रिस्तोफरच्या बालमनावर आतापर्यंत बिंबवलं गेलेलं असत. असं पण त्याची नॅनी, त्यांची खेळणी म्हणजे सॉफ्ट टॉईज् आणि जंगल हेच त्याच भावविश्व असतं. इतरवेळी आईवडील मित्र, पार्ट्या, क्लब यात रमलेले. आणि अचानक या दोघानां एकत्र राहण्याची वेळ येते. एकमेकांच्या सानिध्यात वेळ घालवत असतांना हळूहळू त्या दोघांच्यात मैत्री निर्माण होते. मुलाबरोबर त्याच्या निरागस जगात वावरतांना युद्धाचे ओरखडे धूसर होतं जातात. आपल्या मुलाबरोबर घालवलेले दिवस नवसंजीवनी देऊन जातात. त्या लेखकाला आपल्याला काय लिहायचं आहे हे लख्ख जाणवत. नंतर चमत्कार झाला. आपल्या मुलगा व त्याच्या सॉफ्ट टॉईजवर लिहिलेल्या ‘विनी द पुह’ या पुस्तकाने अवघ्या जगाला भुरळ घातली.

ही गोष्ट सांगण्याचं कारण कोरोनामुळे एकत्र घरात राहायची वेळ आली आहे. संकटाला संधीच रूप द्या.

मुलांना वेळ देता-देता आपले ताण कमी होतील. त्याच्या बरोबर आकाशाचे वेगवेगळे आकार बघतांना जगण्याची छान लय सापडून जाईल. लोलकातून

बघताना माणसं इंद्रधनुची दिसतील..

खूप काही बिघडलेलं नाहीये फक्त चुरगळलेल्या आभाळाला थोडं ठीकठाक करायचं आहे..

क्रेडिट कार्डसोबत शंखशिंपले ठेवायचं आहेत. मुलांकडून उसना लोलक मागायचा आहे.. अँलिससारखं छोटं-मोठं होण्याची किमया शिकायला हवी.

अरे, जमेल की न जमायला काय झाले? कधीकाळी आपणही मूल होतोच ना!!

(चित्र सौजन्य बी सी मिडीया, सोशल मिडीया)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0