‘96 मेट्रोमॉल’ समजावून घेताना…

‘96 मेट्रोमॉल’ समजावून घेताना…

‘युटोपिआ’ याचा अर्थ कल्पनेत रममाण होणं. एका भासचित्राचा आधार घेत काहीतरी कल्पनारंजित असं वास्तव निर्माण करणं आणि संपूर्ण कथानक त्याभोवती फिरवणं. त्याचा वास्तव जीवनाशी संबंध जवळ जवळ नसतो. प्रणव सखदेव यांची ’96 मेट्रोमॉल’ ही कादंबरी हाती आली आणि पुरती खात्री पटली, की ही त्या प्रकारातील रचना आहे.

काही वर्षांपूर्वी वि.वा. शिरवाडकर यांची ‘कल्पनेच्या तीरावर’ नावाची कादंबरी वाचनात आली होती. मराठीतील ती ‘यूटोपिआ’ प्रकारातील कादंबरी होती. अशा प्रकारच्या कादंबऱ्या इंग्रजीत लिहिल्या गेल्या आहेत. पण मराठीत शिरवाडकरांनी लिहिलेली ही कादंबरी पहिली मानावी लागते आणि तशी चर्चाही झाल्याचं माझ्या पाहण्यात आलं होतं.

‘युटोपिआ’ याचा अर्थ कल्पनेत रममाण होणं. एका भासचित्राचा आधार घेत काहीतरी कल्पनारंजित असं वास्तव निर्माण करणं आणि संपूर्ण कथानक त्याभोवती फिरवणं. त्याचा वास्तव जीवनाशी संबंध जवळ जवळ नसतो. ‘कल्पनेच्या तीरावर’नंतर अशी दुसरी कादंबरी माझ्या वाचनात नव्हती. प्रणव सखदेव यांची ’96 मेट्रोमॉल’ ही कादंबरी हाती आली आणि पुरती खात्री पटली, की ही त्या प्रकारातील रचना आहे.

’96 मेट्रोमॉल’ या शीर्षकावरून ही कादंबरी एका मॉलसंबंधीचे अनुभव चित्रित करत असावी असं सूचन होतं आणि ती तशी आहेही. लेखकाने त्याकरिता मयंक हे पात्र निर्माण केलं आहे. ‘96 मेट्रोमॉल’ नावाच्या मॉलमध्ये मयंक नावाच्या तरुणाला आलेले हे अनुभव.‌ पण ते सरळ रेषेत जाणारे नाहीत, कारण लेखकाने इथे ‘अद्भुतिका’ लिहिण्याचं ठरवलेलं आहे.

सुरुवातीला ‘अॅलिसच्या वंडरलॅंडला’ ही या कादंबरीची अर्पणपत्रिका येते. प्रणव सखदेव यांनी ‘अॅलिस इन वंडरलॅंड’चं मराठी रूपांतर केलं. ते करीत असताना तिच्यातील अद्भुताच्या चित्रणानं ते भारावून गेले आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आपणही मराठीत स्वतंत्रपणं कादंबरी लिहावी असं त्यांना वाटलं. त्यानुसार त्यांनी ही कादंबरी लिहिली. स्वाभाविकच ती त्या ‘अॅलिस इन वंडरलॅंड’ या कादंबरीला अर्पण करावी असं त्यांना वाटलं.

दुसऱ्या महायुद्धाच्या भीषण संहारानंतर युरोप अमेरिकेत कल्पनारंजित लेखनाचे आकर्षण वाढले होते. त्याचा परिणाम म्हणून अशा लेखनाला वाचकांची विशेष पसंती लाभली. (गेल्या काही वर्षांपूर्वी जे.के. रोलिंग या लेखिकेचे ‘हॅरी पॉटर’ हे पुस्तक आणि पुढे त्याच्यावर झालेल्या सिनेमाने जगभरातील असंख्य वाचक आणि प्रेक्षक वेडे झाले होते.)

आपल्याकडेही तसाच कल राहिल्याने तशा लेखनाचे अनुवाद होऊ लागले. असे रूपांतरण करताना प्रणव सखदेव यांच्यासारख्या सर्जनशील लेखकाच्या मनात त्या दिशेने विचार येणं आणि त्यातून एक आगळेवेगळे कथानक सुचणं ही प्रक्रिया सुरू झाली. ’96 मेट्रोमॉल’ हे त्याचे अपत्य आहे.

’96 मेट्रोमॉल’च्या निर्मितीच्या प्रेरणा सांगताना ते प्रास्ताविकात लिहितात, “२०१२च्या सुमारास मी ‘अॅलिस इन वंडरलॅंड’ या प्रसिद्ध‌ अद्भुतिकेचं मराठी रूपांतर ‘आर्याची अद्भूतनगरी’ (ज्योत्स्ना प्रकाशन) या नावे केलं. हे रूपांतर करत असतानाच, एकीकडे मला ’96 मेट्रोमॉल’ कादंबरीचं कथाबीज सुचलं.” म्हणजे प्रणव सखदेव यांना अद्भुतिका लिहिण्याचं जबरदस्त प्रलोभन पडलं आहे आणि त्याच वेळी वास्तव जीवनातील घटनाप्रसंगांवरील त्यांची पकड घट्ट असल्याचंही दिसतं. त्यामुळे त्यांनी भूत आणि वर्तमानकाळाचं बेमालूम मिश्रण केलं आहे. म्हणजे ही कादंबरी वाचकाला अशा दोन काळातील अनुभवांचं संमिश्र चित्रण दाखवते.

ते लिहितात, “जर अॅलिस इन वंडरलॅंड’मधली अॅलिस आज अवतरली, तर काय होईल आणि ती कोणत्या प्रदेशात प्रवेश‌ करेल, या प्रश्नामधून मला ‘मेट्रोमॉल’चं प्रारंभिक सूत्र सुचलं. नंतर अधिक विचार केल्यावर असं‌ वाटलं‌ की, अॅलिसकडे असलेल्या निरागसतेचा आता जवळपास लोप झालेला आहे. कारण आजच्या बाजारपेठेने काबीज केलेल्या काळात तिचा उपयोग फारसा नाही. त्यामुळे आपण ज्या काळात राहतो, त्या काळात होत असलेल्या उपभोगवादावर, उपयुक्ततावादावर माणसाच्या वस्तुकरणावर, ग्राहकीकरणावर‌ अद्भुतिकेतून काही भाष्य करता येईल का, असा प्रश्न माझ्या मनात खोल बुडून गेला.’ त्यामुळे त्यांच्या मनात केवळ ‘अद्भुतिका’ लिहिणं हाच एक हेतू या लेखनप्रसंगी नाही, तर आजच्या ‘काळात होत असलेल्या उपभोगवादावर, उपयुक्ततावादावर माणसाच्या वस्तुकरणावर, ग्राहकीकरणावर‌ अद्भुतिकेतून काही भाष्य’ करण्याचा हेतूही आहे.

आजकाल शहराशहरातून अनेक मॉल निर्माण झाले आहेत. टाचणीपासून मोटारगाड्यांपर्यंत त्यामध्ये अगणित वस्तू विक्रीस असतात. त्यांचे निर्माते आपल्याकडे ग्राहक खेचण्याचा सदैव प्रयत्न करत असतात आणि येनकेनप्रकारेण आपले उत्पादन ग्राहकाच्या माथी मारीत असतात. ग्राहकही त्यांच्या प्रलोभनांना बळी पडत असतो. याचं चित्रण करावं आणि उत्पादक आणि ग्राहक यांच्या या वृत्तीवर भाष्य करावं हाही या कादंबरी लेखनामागील लेखकाचा हेतू आहे, असे वाटते.

“96 मेट्रोमॉल’ अद्भुतिका आहे. ती पूर्णत: वेगळ्या विश्वात घडते, हे विश्व निर्माण केलेलं, घडवलेलं आहे आणि त्यातल्या पात्रांवर कल्पना-वास्तवाच्या मिसळणीचा लेप आहे. आणि ही अद्भुतिका जरी एका काल्पनिक जगात घडत असली, तरी ती जे सांगते आहे ते आपल्या, इथल्या जगाबद्दल!”, असंही लेखकानं सांगितलं आहे. लेखकानं ‘मनोगता’त मोकळेपणानं लिहलेल्या या निवेदनामुळं ही कादंबरी कोणत्या पार्श्वभूमीवर लिहिली गेली आहे आणि लेखनप्रसंगी लेखकाची मानसिकता काय होती, लेखनहेतू काय होता, हे कळायला मदतच होते.

रचनेचं वेगळेपण

१.

’96 मेट्रोमॉल’ या कादंबरीची ही रचना :

प्रणव सखदेव नावाच्या कथाकारांनी एक निवेदक निर्माण केला आहे. या निवेदकाच्या पत्नीने अॅमेझॉनवरून एक चामड्याची बॅग विकत घेतली. तिच्यात कागदाची वेटोळी भरण्यात आलेली. ते चुरगळलेले कागद निवेदक सरळ करतो गादीखाली ठेऊन पुढे नीट लावतो. तेव्हा त्याला त्या कागदांवर एक कादंबरी लिहिलेली आढळते. ती तो वाचकांसाठी सादर करतो.

कादंबरीच्या पहिल्याच पानावर लेखकाचं हे निवेदन येतं. (इथं संपूर्ण पानावरच्या मजकुराला दोन्ही बाजूंना उभे दंड दिले आहेत, ते लक्षात घ्यावेत.) तर कादंबरीच्या बाराव्या आणि शेवटच्या ”मयांकाना’ची गोष्ट सफळ संपूर्ण!’ या भागानंतर निवेदक क्र.१चं निवेदन आहे. (यालाही हेतूत: दोन्ही बाजूंना दंड आहेत, हेही लक्षात घ्यावेत.) इथेही रचनेचं सौंदर्य कसं तोलून धरलंय ते पाहा.

या लेखकाला ही कादंबरी अॅमेझॉनवर मिळते का ते कुतूहल वाटते.

“मी मोबाईलवर मयांकना असं सर्च केलं. आणि घडाघडा माझ्यासमोर लिंक्स दिसू लागल्या. त्यातली एक लिंक या कादंबरीची होती. अमेझॉनडॉटकॉमची.

96 मेट्रोमॉल, लेखक : प्रणव सखदेव, ५० टक्के डिस्काउंट

१५० वर (फुली) आणि ७५ रुपये (ठळक)

दोन‌ दिवसांत डिलिवरी, शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा”

इथं लेखक प्रणव सखदेव यांनी कल्पकतापूर्ण केलेला आपल्याच कादंबरीचा मार्केटिंगचा भाग म्हणून केलेला उपयोग लक्षणीय वाटला.

अशा रीतीने कादंबरीच्या आसपासनंतर आणि शेवटच्या पानावर हा निवेदक (क्र.१) आपल्याला भेटतो. तो, त्याची बायको, त्यांनी अॅमेझॉनवरून विकत घेतलेली चामड्याची बॅग हे एक वर्तुळ इथं संपतं.

२.

’96 मेट्रोमॉल’ ही कादंबरी लहान लहान १३ भागात विभागली गेली आहे. तिचं दुसरं प्रकरण हे हस्तलिखित कादंबरीतील पहिलं प्रकरण आहे. त्याचं शीर्षक ‘मूळ पुरुषाच्या शोधात’ असं असून तिथं निवेदक (हा हस्तलिखित कागदावर असलेल्या कादंबरीचा निवेदक असल्यानं त्याला आपण निवेदक क्र.२ म्हणू.) आणि त्याचे आजोबा यांचा संवाद दिला आहे. हे आजच्या वास्तवातील आहेत. कित्येक शतकांपूर्वी अमेझॉनच्या जंगलात गेलेल्या आपल्या पूर्वजांचा शोध घेण्याचा ध्यास निवेदक क्र.२च्या आजोबांना लागला आहे आणि त्या संबंधात ते आपल्या नातवाला म्हणजे निवेदकाला सांगत आहेत. त्यानुसार निवेदक क्र.२चं कुतूहल चाळवलं जातं नि तो इंटरनेटवर शोध घेतो, अमेझॉनच्या जंगलात पोचतो. तिथल्या एका वृद्धाला भेटतो. तो त्याच्या हातात “पार्लेमानो” हे पुस्तक ठेवतो. ते त्यांचं बायबल असतं. त्यात निवेदक क्र.२च्या पूर्वजाची कहाणी असते. स्वाभाविकच निवेदक क्र.२ ला “पार्लेमानो” वाचणं भाग होतं.

”मयांकाना’ची गोष्ट सफळ संपूर्ण!’ या शीर्षकाखालील तीन परिच्छेद हे निवेदक क्र.२ चं निवेदन आहे. हा निवेदक ‘पार्लेमानो’ मधल्या मयंकचा आणि त्याच्या पूर्वजाचा संबंध जोडून देतो. हा पूर्वज दुसरा कोणी नसून मयंक असल्याचे तो स्पष्ट करतो.

कादंबरीच्या प्रारंभी निवेदक आपल्या ज्या पूर्वजाचा शोध घ्यायला गेला होता, त्याचं काय झालं आणि मयंक कथेशी त्याचा संबंध काय असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. त्याची सांधेजोड लेखकाने अशी केली आहे —

“मयंक थेट अमेझॉनच्या जंगलात पळून आलेला. नंतर इथला जंगलनिवासी झालेला. मग त्याने इथेच आपला वंश‌ वाढवला आणि हळूहळू त्यातून एक जमातच निर्माण झाली…”

इथं सुट्या चुरगळलेल्या कागदांवरील कादंबरीच्या निवेदक क्र.२चं कुतूहल क्षमतं.

३.

पार्लेमानो” : पुस्तकातलं पुस्तक

हे “पार्लेमानो”मधलं कथानक आता आपल्यासमोर उलगडलं जातं.

‘मैं नशेमें हूं…’ पृष्ठ १५ इथपासून ते पृष्ठ १२७ वरील पहिल्या तीन ओळींपर्यंतचा मजकूर म्हणजे ‘पार्लेमानो’मधील भाग होय. ते लेखकानं सर्वसाक्षीभावाच्या निवेदन शैलीत लिहिलं आहे.

पूर्वजांचा शोध असला, तरी वर्णन आजचे आहे. निवेदकाच्या पूर्वजांसंबंधीची माहिती अशी आता वाचकांना कळणार असते, ती ‘पार्लेमानो’ या पुस्तकातील वर्णनातून. पण हे वर्णन प्रत्यक्षात मॉल संस्कृतीचं म्हणजे आधुनिक काळातील आहे. कुठल्याही मॉलमध्ये विद्युत रोषणाई, फ्रिज, टीव्ही, रेकॉर्ड प्लेअर्स… अशा असंख्य इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची विक्री, त्यासंबंधीच्या तिथं आलेल्या ग्राहकांचे लक्ष वेधणाऱ्या असंख्य निऑन प्रकाशाच्या जाहिराती यांचं आपल्याला दर्शन घडतं. आपल्या कल्पकतेनं बेमालूम वापर लेखकानं करून घेतला आहे. त्या त्या वस्तूंना सजीव रूप दिलं आहे. त्या मयंकबरोबर बोलतात, खेळतात आणि त्याला खेळवतात…

मयंक आणि मॉलमधील वस्तू यांच्या करामतींचं चित्रण कादंबरीतील मधल्या प्रकरणांमध्ये चित्रित करण्यात आले आहे. मयंकने केलेल्या करामतींना आणि घेतलेल्या भल्याबुऱ्या अनुभवांना उद्देशून ‘भयानक नाईटमेअर’ असा शब्द मयंक वापरतो. तिथं तो म्हणतो, “मला एक भयानक नाईटमेअर पडलं होतं..”

आता या नाईटमेअरसंबंधी कादंबरीच्या शेवटी त्यानं म्हटलं आहे, “त्याला धावत येणारा मोबाइल ड्यूड आठवला, ती लिफ्ट आठवली, त्यातल्या जाहिराती आठवल्या, मग टीव्ही-फ्रीज-मायकोवेव्ह, हॉर्नीपॉर्नी, तिचे चाबकाचे फटके आठवले, कॅंडीजची तोडफोड आठवली, रेडिओचा खरखर आवाज आठवला आणि शेवटी त्याला निऑनसाईन दिसू लागली – 96 मेट्रोमॉल.’

ही शोधकहाणी आदिपुरुषाची आहे. तो इथला नायक. या व्यक्तीसंबंधी “पार्लेमानो” या पुस्तकात माहिती आहे. तो म्हणजे मयंक. मयंक, त्याचा मोठा भाऊ, आई-वडील हे एक कुटुंब. (पण त्यांच्याविषयी तशी फारशी माहिती येत नाही.) ही मूलभूत चौकट. मयंक, त्याचा मोठा भाऊ आणि त्यांचे मित्र एका मित्राच्या पार्टीत जातात आणि मद्यधुंद होतात हे एका प्रकरणात येते. पुढे मयंक एक मॉलमध्ये जातो आणि तिथे तो जे अनुभव घेतो त्याचे चित्रण हा या कादंबरीतल्या कादंबरीचा गाभा आहे.

त्याविषयीचा ब्लर्बवरील मजकूर पुढील प्रमाणे आहे : ’96 मेट्रोमॉल मयंक एका काल्पनिक ‌जगात प्रवेश करतो, हे जग असतं वस्तूंचं -आपण रोज वापरत असलेल्या वस्तूंचं! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात. आणि यातून‌च घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर‌ अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी, ’96 मेट्रोमॉल!”

या कादंबरीविषयी फेसबुकवरील ‘वाचनवेडा समूहा’वर निरंजन नंदकुमार कुलकर्णी यांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे- “काही प्रसंग इतके भन्नाट आहेत की, लेखकाच्या कल्पनाशक्तीला माझा सलाम. जसं गॅजेटच्या दुनियेत एकदा पुस्तक आलं आणि बोलायला लागलं तर सगळ्या गॅजेट्सचं डोकं फिरलं, लायटरने ते पेटवूनच दिलं, त्यांच्या दुनियेत म्हणे अभि तो पार्टी सुरू हुई है, हे म्हणे राष्ट्रगीत आहे, हेरून हेरून सगळ्या विरोधाभासावर शालजोडीतून असे फटके मारले आहेत, की पुस्तकाच्या शेवटी वाचकाला विचार करणं भाग आहे की आपण नक्की कुठे चाललो आहोत? कुठल्या गोष्टीला महत्त्व देतोय? पूर्ण गोष्ट किंवा कथास्वरूप सांगत नाही, कारण ती अनुभवायची गोष्ट आहे.

एक अजून आवडलेली गोष्ट म्हणजे जो नायक आहे पुस्तकाच्या त्याच्या बाबतीत जी विअर्ड गोष्ट घडलीये त्याने तो अजिबात भांबावलेला कधीच दिसला नाहीये, जे काफ्काच्या पुस्तकातसुद्धा नेहमी जाणवतं. म्हणजे नायक त्या गोष्टीला इतका सहज समोरा जातो की, ते सुद्धा आजच्या तरुणाईचं प्रतीकच म्हणावं लागेल. म्हणजे खरोखर हा विरोधाभास सोडला तर तरुणाईपुढे असंख्य प्रश्न आहे, पण त्याला ही तरुणाई धीरोदात्तपाने सामोरी जाणार हे निश्चित!”

००

जुन्या चार्ली चाप्लीन यांच्या इंग्रजी मूकपटांतून वा बोलपटांतून वा वॉल्ट डिस्ने यांच्या व्यंगचित्रपटांतून भांडी वा वस्तू उडतात, एकमेकांवर आपटतात, परस्परांशी बोलतात, भांडतात. तेव्हा ही कल्पना अगदीच नवखी होती असं नव्हे. पण त्यानुसार मोबाईल, टेलिव्हिजन, टेलिफोन, फ्रीज आणि अन्य वस्तूंचं परस्परांशी कल्पनेनं नातं निर्माण करून ते कथानक काही काळ गतिशील ठेवणं आणि त्यातून आपल्याला अपेक्षित कलात्मक अर्थनिर्मिती करणं, वाचकाला त्यात अखंड गुंतवून ठेवणं ही किमया खास प्रणव सखदेव यांची आहे. शिवाय व्हर्च्युअल मयंक, लिपस्टिक, मिडियाराणी, काजल पेन्सिल, पोकेमन गो, पबजी, कॅंडीक्रश, हॉर्नीपॉर्नी माचोमॅन यांच्यासारख्या पात्रांची निर्मिती लेखकाची सर्जनशीलता दाखवते.

मयंकच्या संदर्भातल्या चित्रणात लेखकानं वापरलेला सगळा कच्चा मसुदा हा आजच्या विद्यमान विज्ञान युगातील प्रगतीवर आधारलेला असून त्यातील विश्व आपल्या प्रतिभेनं‌ लेखकानं सशक्तपणं उभं केलं आहे. आणि ते ‘पार्लेमानो’ या भूतकालीन पुस्तकाचा भाग म्हणून मेक बिलिव्हच्या तत्त्वावर तोलून धरलं आहे.

यात आणखी एक गोष्ट साधण्यात आली आहे आणि ती म्हणजे आजच्या आपल्या समाजातील वृत्तीप्रवृत्तींचं चित्रण. उदाहरणार्थ, १- हल्ली कोण एवढं धुतल्या तांदळासारखं असतं? सारेतर पितात, सिग्रेटी ओढतात. (पृ. १५/१६), २- मग कशाला ‘हाईड अॅंड सीक खेळा. ट्रूथ सांगितलेली बरी.(१६), ३- ..रेव्ह पार्टीला जाणं.(४१), ४-‘या नव्या पिढीशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. उलट उत्तरं देण्यात तर माहीर आहांतच तुम्ही. पण अनुभवी माणसाशी कसं बोलायचं याचीही बूज नाहीये तुम्हांला..(४६), ५-‘हल्ली म्हणे लोक अंगातली चरबी काढण्यासाठी अशा झुंबा डान्सच्या क्लासेसमध्ये जातात. (४८), ६-‘काय जमाना आलाय, भावनांची कदर नाहीये कोणाला, प्रेमाची तर राहिलेली नाहीये..(५५), ७- तिला झिरो फिगर व्हायचं वेड लागलंय. वेड कसलं व्यसनच म्हणा.(५७), ८-असं पाहा, आपण सण उत्सव साजरे करतो. तर उत्सव-सण म्हणजे पार्ट्याच तर असतात एक प्रकारच्या.(९७)

आपल्या समाजातील या प्रवृत्तींवर प्रकाश टाकणं हा लेखकाचा हेतू असा कादंबरीच्या अंतरंगाशी एकरूप होऊन ठिकठिकाणी व्यक्त होतो. प्रणव सखदेव यांच्या निरीक्षणशक्तीला कथावस्तूच्या गुंफणुकीतील चातुर्याला, कलात्म तपशील भरण्याच्या सामर्थ्याला आणि आवश्यक तिथं अधूनमधून कवितांमधून आशय अधिक उत्कटत्वानं पोहोचवण्याच्या शक्तीला दाद द्यायला हवी.

96 मेट्रोमॉल
रोहन प्रकाशन
किंमत – १५०

COMMENTS