महात्मा फुल्यांनी सत्य म्हणजे काय हे जाणण्यासाठी सत्यशोधक समाज काढला. सर्वांनी आनंदी व्हावे हे निर्मितीचे आदिकारण मानले. “सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर। जगामाजी सुख सारे, खास सत्याची पोरे।।” असे फुल्यांचा अखंड सांगतो. गांधी सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणत. या जगाच्या सुरुवातीला आणि शेवटी काही मंगलमय आहे अशी त्यांची धारणा होती. डॉ. आंबेडकरांनी सत्य अमूर्त संकल्पनेपेक्षा जगण्यातील मूर्त अनुभवांशी जोडले.
सत्त्योत्तर जगातल्या असत्याचा सामना कसा करायचा हा अतिशय गहन प्रश्न आहे आणि त्याची उत्तरे सामूहिकरीत्या आणि परस्परांशी संवादातूनच सापडू शकतात. हा शोध घेताना उपयोगी पडतील अशा काही बाबी इथे नोंदवत आहे. सुरुवात अगदी मूलभूत प्रश्नापासून करता येईल. आपली सत्याची व्याख्या काय? सत्य नावाची काहीतरी चीज आहे असे आपण मानतो का? महात्मा फुल्यांनी सत्य म्हणजे काय हे जाणण्यासाठी सत्यशोधक समाज काढला. सर्वांनी आनंदी व्हावे हे निर्मितीचे आदिकारण मानले. “सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर। जगामाजी सुख सारे, खास सत्याची पोरे।।” असे फुल्यांचा अखंड सांगतो. गांधी सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणत. या जगाच्या सुरुवातीला आणि शेवटी काही मंगलमय आहे अशी त्यांची धारणा होती. डॉ. आंबेडकरांनी सत्य अमूर्त संकल्पनेपेक्षा जगण्यातील मूर्त अनुभवांशी जोडले. आपली सत्याची धारणा काय आहे? जगात सर्वव्यापी असे काही एक सत्य आहे असे आपण मानतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्याला चिरकालीन वाटणारे सत्य काहीही असू शकते. उदाहरणार्थ, ‘बळी तोच कानपिळी’ असा कोणाचा दृष्टीकोन असू शकतो, किंवा मूल्ये / सिद्धांत हे निव्वळ पुस्तकी असतात, प्रत्यक्ष जगात त्याला काहीही अर्थ नसतो असे कोणाला वाटू शकते. माणसे अजिबात बदलत नाहीत, आहे तशीच ढिम्म रहातात असे कोणाचे मत असू शकते. हंटर बसल्याशिवाय माणसे हलत नाहीत अशी कोणाला खात्री असू शकते. आपण, आपली जात, धर्म, राष्ट्र हेच तेवढे श्रेष्ठ आणि बाकी सगळे दुय्यम आहेत असे कोणी म्हणू शकते. कोणाला माणूस मूलतः स्वार्थी वाटू शकतो तर कोणाला तो निरागस वाटू शकतो. माणसाविषयीचा किंवा एकूणच जगण्याविषयीचा असा दृष्टीकोन हा आपला समज आहे की की पडताळणी करून सिद्ध झालेले सत्य याचा शोध आपण घेतो का? आपल्याला जे पटते, ते केवळ आपल्याला पटते म्हणून सत्य असते का? आपल्याला जे सत्य वाटते त्याला छेद देणाऱ्या इतर सत्यांच आपण काय करतो?
आपल्याला उमगलेले सत्य हे आपल्यासह या जगात जन्मलेल्या सर्व माणसांना लागू होते की आपण त्यातून स्वतःची सुटका करून घेतो? म्हणजे आपण सर्व नियमांना अपवाद असतो की आपणही सर्व मानव जातीचा भाग असतो? गुरुत्वाकर्षणाच्या नियमासारखे जर आपले सत्य सार्वत्रिक नसेल तर ते तसे नसण्याचे विवेकाच्या कसोटीवर टिकेल असे कोणते कारण आपण पुढे करतो? याचाच दुसरा भाग म्हणजे आपल्या सत्याची अनुभूती आपल्या व्यतिरिक्त इतर कोणाकोणाला आली आहे? त्यात आपल्यासारखीच सामाजिक पार्श्वभूमी असलेले किती जण आहेत आणि आपल्यासारखी सामाजिक पार्श्वभूमी नसलेले किती जण आहेत? आत्मशोध यासाठी आवश्यक आहे कारण आपले सत्य हे केवळ आपले अनुभव आहेत, आपल्या जात, आर्थिक वर्ग, धर्म किंवा इतर समान सामाजिक संदर्भ लाभलेल्या व्यक्तींची समान अनुभूती आहे की सामाजिक पार्श्वभूमी काहीही असली तरी हीच अनुभूती लोकांना मिळाली आहे याचा लेखाजोखा आपल्याला आपल्या सत्याची व्याप्ती ठरवायला मदत करेल.
आपण आज अशा काळात जगत आहोत ज्यात आपले सत्य हे वैश्विक सत्य असण्याची गरज संपलेली आहे. किंबहुना वैश्विक चिरकालीन सत्य असे काही नसते. वास्तव हे मूलतः खंडित असते हा आजचा मान्यताप्राप्त दृष्टीकोन आहे. सत्य खंडित अनुभवातून उदयाला आलेल्या भिन्न दृष्टीकोनातून बनते ही भूमिका आपण स्वीकारली त्याला बराच काळ लोटला आहे. पोस्ट-ट्रुथचे युग अवतरण्यापूर्वी आपण सत्य नावाचे मेटा नरेटीव्ह म्हणजेच बृहद कथन जवळपास नाकारले होते. वैश्विक सत्य म्हणून केवळ समाजातील प्रस्थापितांचे अनुभव थोपवले जाण्याचे सत्ताकारण नाकारणे हे या दृष्टीकोनामुळे शक्य झाले. जागतिक दक्षिणेकडील अनुभव तसेच प्रत्येक समाजातील अनेक युगे दबलेल्या परीघावरच्या समूहांचे अनुभव हे ज्ञान निर्मितीचे स्रोत म्हणून पहाण्याचा सैद्धांतिक अवकाशही या दृष्टीकोनातून मिळाला. मात्र त्याचबरोबर वैश्विक सत्याचे अस्तित्वच नाकारल्यामुळे या खंडित वास्तवातील प्रत्येक अनुभवाला समान दर्जा देऊन त्या सत्यांना परस्परांशी जोडण्याची, तपासण्याची गरजही आपल्याला वाटेनाशी झाली. आपल्या सत्याच्या भूमीदृष्टीतून (स्टँडपॉईंट) इतरांचे अनुभव आणि सत्ये तपासण्याचा अवकाश आपण वापरला पण वेगवेगळ्या स्टँडपॉईंट्समधून दिसलेल्या वेगवेगळ्या सत्यांना एकमेकांच्या प्रकाशात अधिक लख्ख करण्याची गरज आपल्याला वाटली नाही. विविध अनुभवांमधील संवादाची भाषा बोलणारे आपल्याला समन्वयवादी (= तडजोडवादी = प्रतिक्रांतीकारी) वाटायला लागले. संवादाचा आग्रह आणि समरसता या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानण्यापर्यंत आपला क्रांतीकारी अभिनिवेश जाऊन पोहोचला. वंचीतता आणि शोषितता यातले नाते शोधणारे आपल्याला प्रस्थापित धार्जिणे वाटले आहेत.
क्रांतीचे तत्वज्ञान मांडणाऱ्या सर्वच विचारधारांनी क्रांतीचा अग्रदूत मानलेल्या ठराविक समूहाच्या अनुभव-आकलनापलीकडील अनुभवातील सत्याला एकूण परिवर्तन प्रक्रियेत जवळपास कुचकामी ठरवले. क्रांतीकारी वर्गाचा भाग नसलेल्या समूहांच्या जाणीवे-नेणिवेत प्रस्थापित व्यवस्थेला पूरक असेच अवशेष असणार यावर आजही क्रांतीकारी विचारधारांचा ठाम विश्वास आहे. त्यातून या जाणीवांना समर्पक अशी भूमिका न घेणारे हे जात्याच प्रतिक्रांतीकारी आहेत. त्यांच्या मुक्तीचा मार्ग हा क्रांतीदूतांचे निव्वळ राजकीय नेतृत्व स्वीकारण्यातून येत नाही तर त्यासाठी वैचारिक भूमिकेबद्दल सर्वकालीन अनुमोदनाची भूमिका स्वीकारणे आवश्यक असते. या अनुयायीत्वात प्रश्न विचारायची / वेगळा विचार करण्याची शक्यता किती असते याचे आत्मचिंतन क्रांतीकारी विचाराधारेचे पाईक म्हणवणाऱ्यांनी स्वतःचा केले पाहिजे. ‘क्रांतीकारी म्हणून आखून दिलेल्या व्यूहरचनेपेक्षा वेगळा विचार करणारे हे प्रतिक्रांतीकारी’ ही भूमिकाही सत्याच्या शोधापासून दूर नेणारी आहे. कारण इतर कोणत्याही सर्वंकषवादी विचाराधारेप्रमाणेच तीही सत्याचा एक कवडशालाच संपूर्ण सत्य मानण्याचा आग्रह धरते. सत्योत्तर जगात सत्याचा शोध घेताना डावे-उजवे-मध्यम मार्गी सर्वांनाच याचे भान आवश्यक आहे.
सत्याच्या अनुभूतीचे स्थान हे दैनंदिन जगण्यात आहे. प्रसार माध्यमे आणि सामाजिक माध्यमे इथे सत्य स्थानबद्ध नाही याचे उत्तरोत्तर भान आणि तसा व्यवहार आवश्यक आहे. सत्याच्या पुनःस्थापनेचे मार्ग माध्यमातील असत्याचा मुकाबला कसा करायचा, ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर कसे द्यायचे, त्यांची आय.टी. सेल असेल तर आमची का असू नये, त्यांचे ट्रोल हे पन्नास पैसेवाले आणि आमचे ते कार्यकर्ते’ अशा वादातून सापडणार नाहीत. उलट या चर्चांमध्ये अडकून रहाण्यातून शक्ती आणि वेळ यांच्या अपव्ययाखेरीज फारसे काही हाती लागेल असे नाही. सामाजिक माध्यमावर उपस्थित असणे म्हणजे सामाजिकता जपणे किंवा तरुणांशी संवाद वाढवणे या गैरसमजातून तातडीने बाहेर पडणे आवश्यक आहे. अनेकदा प्रस्थापित व्यवस्थेचे निर्णय आधीच झालेले असतात, त्यांना अधिमान्यता मिळविण्यासाठी किंवा ते लोकांच्या गळी उतरविण्यासाठी माध्यमांचा सुनियोजित वापर होत असतो. तिथे वेगळ्या भूमिकांचे ट्रेंड्स आपण सुरु केले तरी व्यवस्था तिला हवे तशीच वागणार आहे याचे भान हरपता कामा नये. विशिष्ट राजकीय उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी माध्यमांचा सोयीस्कर वापर हा व्यवस्थेतील मोठ्या बिघाडाचा एक दृश्य परिणाम आहे. माध्यमांवर बंधने घातल्याने, त्यावर सेन्सॉर बसवल्याने किंवा आत्मसंयमाने वागणारी आदर्श माध्यमे अवतरली तरीही व्यवस्थेतील व्यापक बिघाडाचा मुद्दा आपल्याआपण सुटणार नाही. तो बिघाड नेमका कशाने होतो आहे आणि तो कसा दुरुस्त करायचा याचे नव्याने आकलन होणे गरजेचे आहे. व्यवस्थेतील बिघाडाविषयी उदारमतवादी लोकशाही, समाजवाद, साम्यवाद, हिंदुत्ववाद या सगळ्यांचे काही ठराविक असे एक आकलन आहे आणि त्यावरचा ठराविक असा उतारा आहे. एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील औद्योगिक भांडवलशाही, राष्ट्र-राज्य व्यवस्था आणि तंत्रज्ञानात्मक प्रगतीची अवस्था हा या आकलनाचा संदर्भ होता. आता या सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत. तेव्हा डावे-उजवे-मध्यममार्गी सगळ्याच साचेबद्धतेतून मुक्त होण्याचा अवकाश शोधायला हवा.
व्यवस्थेत बिघाड निर्माण होण्यास कारणीभूत अनेक घटकांपैकी एक महत्वाचा घटक हा प्रातिनिधिक लोकशाहीच्या स्वरुपाशी निगडीत आहे. या व्यवस्थेत नागरिकांच्या सहभागापेक्षा त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाला अधिक महत्व आहे. जनमताचे काम हे राजकीय प्रतिनिधित्वाला निव्वळ अधिमान्यता पुरवण्याचे आहे. निवडणूकीत मतदानाद्वारे ही अधिमान्यता पुरवली जाते. मात्र त्यानंतर जनमताच्या प्रकटीकरणासाठी कोणतीही स्वायत्त आणि खात्रीलायक अशी तरतूद प्रातिनिधिक लोकशाहीत नाही. पुढची निवडणूक होईपर्यंत सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, प्रसार माध्यमे सर्वच जनमताच्या प्रकटीकरणाचे एकमेव माध्यम म्हणून दावा करत रहातात. प्रातिनिधिक लोकशाहीतील हा पेच दूर करण्यासाठी व्यापक पातळीवर नागरिकांचा सहभाग मतदानाखेरीज इतर लोकशाही प्रक्रियांमध्ये कसा वाढेल याचा दूरगामी कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. आधुनिक राष्ट्र-राज्याची अजस्त्र यंत्रणा आणि तिचा गावगाडा चालविणारी प्रातिनिधिक लोकशाही याचा एक पर्याय हा विकेंद्रीकरणातून सापडू शकतो असा एक मतप्रवाह आहे. महत्काय प्रकल्पांऐवजी छोटे उद्योग, छोटी धरणं, नैसर्गिक पर्यावरणाशी सौहार्द राखत आर्थिक विकास असा पर्याय सुचवला जातो. हे पर्याय स्वप्नाळू आदर्शवादी आहेत की इतिहासाच्या ज्या टप्प्यावर आता आपण येऊन पोहोचलो आहोत तिथे राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था यांचे विकेंद्रीकरण करता येईल याचा प्रामाणिक विचार व्हायला हवा. असे विकेंद्रीकरण शक्य असल्यास त्याचा चेहरामोहरा काय असेल, ते अधिक कार्यक्षम कसे बनवता येईल, त्याच्यासाठी पूरक मानसिकता व दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी आणि लोकसहभागातून ते साकारण्यासाठी काय करता येईल याचा सखोल विचार तेव्हाच होऊ शकतो ज्यावेळी माध्यमांतल्या सुरस रम्य चमत्कारिक करामतींवर खिळलेली आपली नजर आपल्या अवतीभवती काय घडते आहे त्याकडे वळेल. व्हर्च्युअल जगातून वास्तविक जगात येणे, वास्तविक जग नेमके कसे आहे हे समजण्यासाठी व्हर्च्युअल जगाच्या कुबड्या न वापरणे हे (सत्याच्या पुनःस्थापनेच्या) त्या दिशेने पहिले पाऊल असेल.
डॉ. चैत्रा रेडकर, गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या अभ्यासक असून, ‘आयसर’ पुणे येथे मानव्य व सामाजिक शास्त्रांच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत.
(लेखाचे चित्र – मिथिला जोशी)
COMMENTS