सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग २

सत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग २

आपल्याला सोयीचा सत्याचा अंश कवटाळून आपण व्यापक सत्याचा खून करतो आहोत याची खंत वाटू न देता असत्य उपासनेचे जागरण अशाप्रकारे साळसूदपणे चालू ठेवण्यात आले. वृत्तवाहिन्या बिनदिक्कतपणे खोट्यानाट्या बातम्या देऊ लागतात. वरिष्ठ पत्रकार नावडत्या व्यक्तीला बोलू न देता तिच्यावर खेकसू लागतात. मोठ्या पदावर असलेल्या बुजुर्ग व्यक्तीही सामाजिक माध्यमांतून विरोधी मतांवर थिल्लर वक्तव्ये करू लागतात.

सार्वजनिक आरोग्य आणि कोकाकोलाचे हितसंबंध
शिक्षित व श्रीमंत कुटुंबात घटस्फोट जास्त – सरसंघचालक
सनातन जीवनलीला

व्यामिश्र, बहुपदरी सत्य नष्ट करणारी चर्चेची काही तंत्रे प्रसार माध्यमात प्रचलित झाल्याचे दिसते. ही आणि अशी तंत्रे अभावितपणे उदयाला आली की रणनीती म्हणून त्यांना जाणीवपूर्वक विकसित करण्यात आले हे कळणे कठीण आहे. त्यांचा वापर मात्र सर्रास होताना दिसतो. त्यापैकी काही प्रकार खाली नोंदवले आहेत.

  • घटनेचे वेगवेगळे पदर मांडताना तिच्याकडे वास्तवातील गुंतागुंत म्हणून न बघता विसंगती किंवा परस्परविरोधी बाब म्हणून सादर करण्याची ‘कळलावी पद्धत’.
  • जे प्रश्न विरोधात उपस्थित होत आहेत, त्यांचा धांडोळा घेऊन त्या प्रश्नांना अतिशयोक्त, विपर्यस्त किंवा त्रोटकपणे प्रस्थापितांना विचारून प्रश्नांतली हवा काढून टाकण्याची ‘आपण विरोधक-विरोधक खेळूया पद्धत’.
  • दोन घटना, व्यक्ती, धोरणे, सरकारे यांची तुलना करताना दोन्हीच्या संदर्भातील वेगळेपणाचा उल्लेख आवर्जून टाळण्याची ‘बादरायण पद्धत’.
  • व्यक्तीने काहीही वक्तव्य केले असले तरी समारोप करताना त्याचा अर्थ आपल्या सोयीनुसार काढून ‘सारांशात बोळा फिरवणे पद्धत’.
  • तटस्थ दिसण्यातून अधिमान्यता वाढते याचे भान ठेवत, विरोधी मतांवर अधूनमधून फुटकळ पण वादग्रस्त चर्चा आयोजित करून नंतर त्याविषयी माफी मागून टाकण्याची ‘मी तटस्थ होणारच पद्धत’.

यासारख्या तंत्रांचा प्रसार माध्यमांमध्ये इतक्या वेगाने वापर होत राहिला, की त्याची जाणीव होईपर्यंत आपल्यावर काहीतरी नवी गोष्ट येऊन आदळत राहिली. सातत्याने होत गेलेल्या या माऱ्यातून सामान्य माणूस मग त्याच्याही नकळत सत्याविषयीच्या एकांगी दृष्टीकोनाचा वाहक बनला. सत्योत्तर जगाचा मजबूत पाया यातून रोवला गेला.

सत्योत्तर जगाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे सत्य काय आणि असत्य काय याविषयीच्या जाणीवा इतक्या बोथट होत जातात की काही गोष्टी धादांत खोट्या आहेत, हे कळूनही त्यांचा स्वीकार करण्यात कसलाही संकोच वाटत नाही. संपूर्ण असत्य स्वीकारण्याची मानसिकता निर्माण होण्यासाठी आधी अत्यंत ठाम – घट्ट अशा आवडीनिवडी निर्माण होणे गरजेचे असते. समजा एखाद्याला कारल्याची अज्जिबात भाजी आवडत नसेल, तर कारले कोणत्याही स्वरूपात समोर आले, ते कितीही चविष्ट असले, ते आरोग्यासाठी कितीही उपायकारक असले, तरी त्याला ते ताटात नको असते. किंबहुना कारल्याविषयीची चर्चाच अप्रस्तुत वाटत रहाते. ते ताटात येणे ही मजबूरी असते. त्याला स्पर्शही न करणे, हे न्याय्य असते कारण हा शेवटी निवड स्वातंत्र्याचा मामला असतो. ‘तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू कडू’ म्हणून कारल्याला नाकारणे स्वाभाविक हक्क असतो. म्हणजे कारल्याचे कारले असणे हाच दोष बनतो.

माध्यमांनी अंगिकारलेल्या सादरीकरणाच्या पद्धतीतून ठराविक समुदाय, राजकीय नेते, पक्ष संघटना तसेच राजकीय मूल्ये याविषयी अशाप्रकारच्या घट्ट, अपरिवर्तनीय आवडीनिवडी तयार केल्या. एखादी गोष्ट का आवडते आणि का आवडत नाही यामागे बुद्धीला पटेल अशी कोणतीही बाब असण्याची गरज नसते. शिवाय अशा आवडीनिवडी जपणे हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग असतो. आपल्याला सोयीचा सत्याचा अंश कवटाळून आपण व्यापक सत्याचा खून करतो आहोत याची खंत वाटू न देता असत्य उपासनेचे जागरण अशाप्रकारे साळसूदपणे चालू ठेवण्यात आले. वृत्तवाहिन्या बिनदिक्कतपणे खोट्यानाट्या बातम्या देऊ लागतात. वरिष्ठ पत्रकार नावडत्या व्यक्तीला बोलू न देता तिच्यावर खेकसू लागतात. मोठ्या पदावर असलेल्या बुजुर्ग व्यक्तीही सामाजिक माध्यमांतून विरोधी मतांवर थिल्लर वक्तव्ये करू लागतात. आपल्या नावडत्या व्यक्तींचे माध्यामांवर चारित्र्य हननासाठी सभ्यतेच्या सर्व मर्यादा विनासंकोच ओलांडल्या जातात. आणि या सर्वात सुशिक्षित मध्यमवर्गाला काहीही गैर वाटेनासे होते. उलट आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्ती, विचार, नेता, समुदाय यांची कशी जिरली हे पाहून आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. आपणच एकमेव सत्याचे मक्तेदार हे इतके भिनलेले असते, की या ‘इतर खोटारड्या लोकांना त्यांच्या कर्माची फळं मिळणं’, म्हणजे दैवी न्याय वाटू लागतो

जे असल्या भानगडीत पडत नाहीत, ते ‘आम्हाला जे आवडते ते आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला जे आवडते ते तुम्ही स्वीकारा’, अशा भोंगळ उदारमतवादापाशी येऊन थबकतात. ‘तुम्हाला आवडते ते तुम्ही करा’ हे नुसते म्हणणे पुरेसे नसते, तर व्यवस्था त्यासाठी पूरक अशी तजवीज करते आहे का हेही पहावे लागते आणि तशी तजवीज केली जात नसेल तर त्याविरोधात भूमिका घ्यावी लागते; हे बहुतेकांच्या ध्यानीमनी नसते. शिवाय ‘नाही त्या लोकांसाठी’ जीवाला एवढी तोशिष लावण्याची इच्छा नसते. आपल्याला  व्यवस्था-पूरक भूमिकेच्या अभिव्यक्तीसाठी अवकाश मिळतो म्हणजे व्यवस्था विरोधी भूमिकांनाही मिळत असणारच असे सोयीस्कर गृहीत धरत आपण जन्मजात उदारमतवादी आहोत असा भ्रम पोसणे मध्यमवर्गाला आवडते. वैविध्याप्रतीची ही पोकळ उदारता कधी सुशिक्षित मध्यमवर्गाच्या प्रस्थापितधार्जिणेपणाचा पाया बनून वावरते तर कधी व्यवस्थेविषयीची उदासीनता पोसत राहते. हा भोंगळ बहुलतावाद (प्लूरलिझम) माध्यमातील खोटारडेपणा आणि आक्रमकता या दोन्हीकडे निर्विकारपणे बघायला शिकवतो. समाज स्वास्थ्य बिघडवणारा आक्रस्ताळेपणा अशाप्रकारे समाजाच्या अंगवळणी पडत जातो. . सत्योत्तर जगाचा पाया भक्कम होत असल्याची साक्ष मिळते. एखाद्या टग्या मवाल्याने वापरावी अशा भाषेतले हे मेसेजेस सामाजिक माध्यमातून ज्या सहजपणे पुढे पाठवले जातात त्यावरून सत्योत्तर जग आपल्या संवेदना कशा बधीर करत आहे याची प्रचीती मिळते.

सामाजिक माध्यमावर असत्य उपासनेची तंत्रे ही अधिक आक्रस्ताळी, हिंसक आणि उघडीनागडी आहेत. विशिष्ट विषयांवर सुनियोजित ट्रेंड्स सुरु करून जनमताच्या कौलाविषयी आभास निर्माण करणे, प्रसिद्ध व्यक्तींचे ट्रोलिंग करणे, त्याच्या खाजगी जीवनाविषयी अचकट विचकट कॉमेंट करणे, त्याच्याविषयी अर्वाच्य, अश्लिल लिहिणे, फोटोशॉप वापरून त्यांचे विकृत फोटो टाकणे, त्याच्या नावाचे फेक अकाउंट किंवा पॅरडी अकाउंट काढून त्या व्यक्तीच्या विचारांशी विसंगत अशी भाष्ये करणे, हे डिजिटल युगात अगदीच सामान्य ठरत आहे. ट्रोलिंग करताना काय लिहिले जातं यातही ठराविक पॅटर्न्स दिसतात.

  • तुमचे ते कलुषित आमचे ते संतुलित हे वारंवार ठसवण्याची ‘आपला तो बाब्या तुमचे ते कार्टं पद्धत’.
  • फक्त आपल्या सोयीचेच आणि अर्धवट असे उद्धृत करणारी ‘दृष्टीदोषनिर्मितीप्रकल्पपूरक मोडतोड पद्धत’.
  • ‘तेव्हा तुम्ही कुठे होता’ किंवा ‘आता कुठे गेले तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ असा जाब विचारणारे ‘कथित अनुपस्थितीभांडवलसंचयन पद्धत’.
  • तुमच्या भूमिकेसाठी तुम्हाला किती पैसे मिळाले ही विचारणा करणारे ‘क्रयविक्रय आरोपण पद्धत’.
  • पुरूषांसाठी ‘तू xx- नामर्द आहेस’ असे सुनावणारे आणि स्त्रियांसाठी ‘तुझा रेट काय’ अशी विचारणा करणारे ‘शिवीगाळीधिष्टीत उपमर्द मार्गे खच्चीकरण पद्धत’.
  • ‘तुझा कोथळा काढेन, तुझ्यावर अॅसिड फेकेन, तुला / तुझ्या आई-बहिण-बायको-मुलीला xxx’ ही ‘शारीरिक हिंसाकेंद्री धमकी पद्धत’.

सामाजिक माध्यमातील ट्रोलिंग, ट्रेंड्स आणि प्रसार माध्यमातील डिबेट्स हे निव्वळ मतमतांतरांचे निदर्शक नाहीत. तिथे घडवून आणलेले संघर्ष म्हणजे मतभेद व्यक्त करणे किंवा तीव्र शब्दांत टीका करणे नव्हे. पूर्वीही लोकांत वैचारिक मतभेद होते व त्यावरून वादही होत असत. अगदी कडाक्याची भांडणेही होत असत. पण प्रगल्भ वैचारिक वादविवाद हे सत्याच्या अधिक परिपूर्ण अशा आकलनाकडे जाण्याचा प्रवास म्हणून पाहिली जात. तशी ती पाहिली जावीत अशी किमान अपेक्षा तरी असे. संवादासाठी म्हणून उदयाला आलेल्या या माध्यमांच्या वापरात ती दृष्टी क्वचितच दिसते. आपल्यापेक्षा वेगळ्या विचाराला नष्ट करणे, नामोहरम करणे हा इथल्या वादंगांमागचा हेतू असतो. अर्थात हे कधीच उघडपणे म्हटले जात नाही. उलट आधुनिक नागरी समाजाने सर्वसहमतीने स्वीकारलेल्या मूल्यांचे दाखले अतिशय जोरदारपणे दिले जातात. आचरणातील सचोटी आणि त्यातून इतरांना मिळणारी अनुभूती याऐवजी श्राव्य (भाषा) आणि दृश्य (प्रतिमा) बाबीत धंदेवाईक चपखलपणा यावर भर दिला जातो. पोलिटिकल करेक्टनेस सांभाळला जातो. त्यातून सत्याला असत्य आणि असत्याला सत्य म्हणून पेश करण्याची किमया साध्य होते. परिणामतः व्यवस्थेच्या हेतूंविषयी समाजमनात साशंकता निर्माण होते. राजकीय नेतृत्वाची भाषा आणि माध्यमांतील व्यवहार  यांच्यात ताळमेळ दिसत नाही. राजकीय नेतृत्व उन्नत गोष्टी सांगत रहाते आणि माध्यमवीर त्याच्याबरोबर विरोध वक्तव्ये करतात. असभ्य भाषा वापरतात. ठामपणे आणि सातत्याने सार्वजनिकरित्या होत असलेल्या अशिष्ट भाषेच्या वापराने आणि खोटेपणाने सभ्य माणूस अवाक होतो. संतापाने तिळपापड झाल्यावर खाजगीत जे बोलले जायचे ते एवढे उघडपणे कोणी सार्वजनिकरीत्या बोलत किंवा लिहत असेल, तर काय करायचे हे सभ्य माणसाला कळेनासे होते. यातच व्यवस्था अशा असभ्य आणि खोटे बोलणाऱ्या लोकांवर काहीच कारवाई करत नाही याची जाणीव त्याला असते. त्यातून तो एकतर सार्वजनिक चर्चाविश्वाविषयी उतरोत्तर उदासीन तरी होत जातो किंवा भयग्रस्त तरी होतो. कसेही बोलले लिहिले तरी संबंधितावर काहीच कारवाई होत नाही हे जेव्हा दिसते, तेव्हा तोही ‘सूज्ञपणा’ दाखवत गप्प बसायला शिकतो. जगभरातील मानवी समाज आज आपल्या भयग्रस्ततेला सुज्ञपणाचे नाव देत सत्याविषयी अनास्था बाळगायला शिकला आहे. जी माणसे उदासीनही होत नाहीत आणि गप्पही बसू इच्छित नाहीत त्यांना या सर्वाचा सामना कसा करावा ते उमजत नाही. स्टँड-अप कॉमेडीयन आणि पोलिटिकल सटायरीस्टच्या माध्यमातून जेवढा काही ‘प्रोटेस्ट’ होतोय तेवढाच बापडा काय तो आपल्या ‘नशिबी’ आहे अशी स्वतःची समजूत घालू लागतो. सत्याचा शोध घेणे माणूस अशाप्रकारे सर्वार्थाने थांबवतो.

डॉ. चैत्रा रेडकर, गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या अभ्यासक असून, ‘आयसर’ पुणे येथे मानव्य व सामाजिक शास्त्रांच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत.

(लेखाचे चित्र – मिथिला जोशी)

भाग १

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0