बहुसंख्यावादी हिंदुत्वाची वाटचाल

बहुसंख्यावादी हिंदुत्वाची वाटचाल

१९२४ साली लाला लजपत राय यांनी एका लेखात पंजाबची हिंदू व मुसलमान विभागात फाळणी करावी अशी मागणी केली. आकार पटेल म्हणतात १९४० पर्यंत ५६ वेळा फाळणीची मागणी झाली. या पैकी ३४ वेळा फाळणीची मागणी हिंदूनी केली होती.

ऐतद्देशीय व्यवस्थेशी एकरुपता
२ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मुभा
बुद्धीमान बंडखोर लेखिका

आज भाजप,नरेंद्र मोदी यांना लोकसभेत पूर्ण बहुमत आहे याचा अर्थ काय आहे, येवढं बहुमत भाजपला कां आणि कसं मिळालं याचं विश्लेषण ‘आवर हिंदू राष्ट्र : व्हॉट इट इज. हाऊ वी गॉट हिअर’ (Our Hindu Rashtra: What It Is.How We Got Here) या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकाश पटेल यांच्या पुस्तकात आहे.

१९०५ साली बंगालच्या फाळणीचा घाट ब्रिटीश सरकारनं घातला. त्याला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी १९०६ साली मुस्लीम लीग स्थापन झाली. मुस्लीम आणि ख्रिस्ती भारताचे नागरीक असू शकत नाहीत, अशी मांडणी करणारी हिंदुत्व ही पुस्तिका १९२३ साली विनायक दामोदर सावरकर यांनी प्रसिद्द केली. १९२४ साली लाला लजपत राय यांनी पंजाबची फाळणी हिंदू व मुसलमान अशा विभागात करा अशी मागणी केली. १९२५ साली रा.स्व.संघ स्थापन झाला. १९५१ साली दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाची स्थापना केली. १९८० साली भाजप स्थापन झाला. १९९२ साली बाबरी पडली. २०१४ साली भाजपला ५४३ सदस्यांच्या लोकसभेत २४३ जागा मिळाल्या.

भाजपचं राज्य म्हणजे बहुसंख्यावादाचं (majoritism) राज्य असं लेखक आकार पटेल म्हणतात.

नरेंद्र मोदी यांचं राज्य आल्यानंतर गोवधबंदीचा कायदा झाला, गोमांस बाळगलं-खाल्लं अशा संशयावरून मुसलमानांचे खून झाले. ३७० कलम रद्द झालं. नागरीकत्व सुधारणा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला. पोलिस, न्यायव्यवस्था, सरकार धार्जिण्या झाल्या, राममंदीराला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली. मुसलमानांमधे दहशत पसरली.

आकार पटेल, हिंदुत्व विजयाची सुरवात १८५७ या बिंदूपासून करतात. भारत हे आपलं राज्य ब्रिटीशांनी आपल्याकडून हिसकून घेतलं अशी मुसलमानांची भावना होती. ब्रिटीश असेपर्यंत आपल्याला झुकतं माप मिळालं पाहिजे आणि ब्रिटीश केल्यानंतर पुन्हा आपलंच राज्य स्थापन झालं पाहिजे अशी भावना मुस्लीम पुढाऱ्यांमधे होती.

सर सय्यद अहमद ब्रिटीशांना सांगत होते की मुसलमान ब्रिटिशांसोबतच आहेत, १८५७ च्या युद्धात अनेक मुसलमान ब्रिटिशांच्या बाजूनंच लढले होते, ख्रिस्ती आणि इस्लाम हे दोन्ही धर्म ” रिलीजन ऑफ बुक (बायबल-कुराण) ” असल्यानं दोन्ही धर्मियात एक नैसर्गिक जवळीक आहे.

ब्रिटीश राजवट  भारताभिमुख रहावी, भारताचे प्रश्न त्या राजवटीनं समजून घ्यावेत, भारतावर राज्य करताना भारतीयांचं सहकार्य ब्रिटिशांनी घ्यावं असा प्रवाह भारतात सुरु झाला. या प्रवाहाचं प्रतिनिधित्व करत १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली.

त्याच वेळी हिंदू आणि मुसलमानांत फूट पाडून राज्य करायचं असा विचार ब्रिटीशांनी केला (लॉर्ड डफरीन). काँग्रेसला शह देण्यासाठी मुस्लीम संघटना स्थापन करायला ब्रिटीशांनी फूस आणि मदत केली. मुस्लीमांना खुष करण्यासाठी बंगालची फाळणी ब्रिटीशांनी १९०५ साली योजली. काँग्रेसनं ती अमान्य करुन लोकचळवळ सुरु केली. मुसलमानांनी मुस्लीम लीग स्थापन करून फाळणीला पाठिंबा दिला. (काँग्रेसच्या चळवळीमुळं आणि आपल्यावर फूट पाडण्याचा आरोप येउ नये म्हणून ब्रिटीशांनी फाळणी रद्द केली.)

१९०६ साली मुस्लीम समाजाच्या हिताचं व हक्काचं रक्षण आणि ब्रिटीश राजवटीला पाठिंबा या दोन उद्दिष्टांनी मुस्लीम लीग स्थापन झाली. काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे, तो मुसलमानांच्या हिताकडं लक्ष देणार नाही असं लीगचं म्हणणं होतं. काँग्रेसनं हा आरोप नाकारला आणि काँग्रेस सर्व भारतीयांचा पक्ष आहे आणि भारतीय म्हणूनच ते सर्वांकडं पहातात असं काँग्रेसनं मांडलं.

१९०९ च्या आसपास आगाखान यांच्या नेतृत्वाखाली मुसलमानांनी भारतमंत्री मोर्ले आणि व्हाईस रॉय यांना भेटून विभक्त मतदार संघ आणि मुस्लीम अल्पसंख्य असतील त्या ठिकाणी मुसलमानांना लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्वाची मागणी केली.

आकार पटेल

आकार पटेल

काँग्रेसनं ती मागणी अमान्य केली.विभक्त मतदार संघ असणार नाहीत, राखीव जागा ठेवता येतील, लोकसंख्येच्या प्रमाणात समाजगटांना राखीव जागा ठेवायला हरकत नाही अशी काँग्रेसची भूमिका होती.

१९०९ पासून हा मुद्दा सतत धुमसत राहिला. धर्माच्या आधारावर प्रदेशाची विभागणी म्हणजे फाळणी असं कोणी म्हणत नव्हतं, धर्माच्या आधारावर मतदारसंघ अशा बुरख्याआड फाळणी हा शब्द लपला होता.

मुसलमानांना प्रतिनिधित्व कसलं देताय, ते तर भारताचे नागरीकही असू शकत नाहीत कारण त्यांची पुण्यभू भारत नाही अशी भूमिका १९२३ साली सावरकरांनी मांडली. त्यांनी मुसलमानांना एकदमच कटाप करून टाकलं.

१९२४ साली लाला लजपत राय यांनी एका लेखात पंजाबची हिंदू व मुसलमान विभागात फाळणी करावी अशी मागणी केली. आकार पटेल म्हणतात १९४० पर्यंत ५६ वेळा फाळणीची मागणी झाली. या पैकी ३४ वेळा फाळणीची मागणी हिंदूनी केली होती.

सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार पसरट होता. त्यांना हिंदुस्तानात विज्ञान हवं होतं, जाती नको होत्या, गाय ही पवित्र देवता नसून तो एक पशू आहे असं ते म्हणत. त्यांच्या मांडणीतला पसरटपणा काढून हिंदुत्वाला टोकदार सांस्कृतीक आकार १९२५ साली हेडगेवारांनी रा.स्व.संघ स्थापन करून दिला. नंतर संघाची बांधणी माधवराव गोळवलकर यांनी केली.

थेट १९४० पर्यंत जिना यांनी फाळणीची मागणी केली नाही. देशाच्या राजकारणात आपलं वर्चस्व निर्माण करून मुलसमानांच्या हाती निर्णायक किल्ल्या रहाव्यात, आपलं व्यक्तिगत नेतृत्व असावं याच खटाटोपात जिना राहिले. गांधी आणि नेहरूंनी राजकीय खेळात जिनांना हरवल्यानंतर हताश झालेल्या जिनांनी फाळणी स्वीकारली.

नेहरू आणि काँग्रेसनं फाळणी अटळ आहे असं लक्षात आल्यावर तिचा स्वीकार केला. जिना यांना धर्माच्या आधारे देश तयार करायचा असेल तर तो त्यांनी पाकिस्तानच्या रुपात करावा, भारत हा सेक्युलर देश असेल, कोणताही धर्म हा भारताचा आधार नसेल असं नेहरू आणि काँग्रेसनं जाहीर केलं. सेक्युलर भारताच्या उभारणीला त्यांनी सुरवात केली.

धर्म हा आधार नसलेला देश ही कल्पना सावरकर, गोळवलकर यांच्या विचारात बसत नव्हती. ते स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहिले कारण त्यांच्या मते काँग्रेस जो देश मिळवेल तो सेक्युलर असणार होता.

हिंदू महासभा आणि संघ यांच्या विचारानं चालणाऱ्या मानणाऱ्यांना लोकशाहीवादी सेक्युलर भारत जाचत होता. लोकशाही ही राजकारणाची पद्धत हिंदुत्ववाद्यांना सत्तेपासून दूर ठेवत होती ही गोष्ट त्यांना डाचत होती.

सावरकर, गोळवलकर यांच्या विचाराला दीनदयाळ उपाध्याय यांनी अधिक टोकदार रूप दिलं. पसरट, ते  सांस्कृतीक ते राजकीय अशी ही विचाररेषा आहे. दीनदयाळ  उपाध्याय यांनी मुसलमानांचा राजकीय पराभव करण्यासाठी १९५१ साली जनसंघ स्थापन केला.

स्वातंत्र्य चळवळीचा परिणाम, नेहरूंचं नेतृत्व या मुळं देशात सेक्युलर विचार प्रभावी होता. नेहरूंच्या मृत्यूनंतर हळूहळू काँग्रेस भ्रष्ट, बदनाम होत गेली, तिची लोकप्रियता ओसरू लागली. या स्थितीत आघाड्या करून जनसंघानं जनमानसात एक लिबरल देशभक्तांचा पक्ष अशी प्रतिमा निर्माण करून हातपाय पसरवले. पण त्यांची दिशा मात्र पक्की होती. १९९२ साली बाबरी पाडून भाजपनं आपला विचार आणि प्रतिमा पक्की केली. तिथून भाजप २०१४, २०१९ सालात बहुमताचा पक्ष झाला.

जिना आणि मुस्लीम बहुसंख्यावादीच होते, त्यांना मुस्लीम बहुसंख्यवाद हवा होता. पाकिस्तानच्या स्थापनेच्या वेळी त्यांनी पाकिस्तानात हिंदू,ख्रिस्ती,पारशी इत्यादींना मुसलमानांच्यासारखे समान अधिकार असतील असं म्हटलं. पाकिस्तानातली जनता नागरीक असेल ती या किवा त्या धर्माची नसेल असं जिना म्हणाले. ब्रिटनमधे सर्व लोक ब्रिटीश नागरीक असतात, ते कॅथलिक किवा प्रोटेस्टंट नसतात असं ते म्हणाले. पण हेच बोलत असताना बिगर मुस्लीमांना जिझिया कर द्यावा म्हणणारी इस्लामी व्यवस्था त्यांनी स्वीकारली. इस्लाममधे लोकशाही नाही हे माहित असूनही बॅरिस्टर जिना यांनी इस्लाम हा पाकिस्तानचा आधार केला.

नेहरूंनी सेक्युलर राज्यघटना स्वीकारतांना विचारांतली सुसंगती साधली, जिनांसारखा विसंगत व्यवहार केला नाही.

सावरकर, गोळवलकर, उपाध्याय यांच्या लिखाणातली अवतरणं लेखक आकार पटेल यांनी विपुलतेनं वापरली आहेत. भाजपच्या वेबसाईटवरून, भाजपच्या जाहीरनाम्यातली अवतरणं पुस्तकात आहेत. लेखकानं हिंदुत्व या मुद्द्यावर भरपूर वाचन आणि संशोधन केलेलं आहे हे पुस्तकात वापरलेल्या संदर्भावरून लक्षात येतं.

पटेल यांनी उपाध्याय यांची एकात्मिक मानवतावादाची मांडणी किती पोकळ होती ते दाखवलंय. उपाध्याय यांनी काही निमित्तानं केलेली तीन भाषणं एकत्र करून एकात्मिक मानवतावाद ही पुस्तिका जनसंघानं तयार केली. ही भाषणं प्रचारकी वक्तव्यं अशा स्वरूपाची आहेत, त्याला सिद्धांतांचा किंवा अभ्यासाचा आधार नाही हे ती भाषणं वाचून लक्षात येतं. अशी भाषणं हा एकाद्या पक्षाचा जाहीरनामा होतो ही गोष्ट अजब आहे.

एकदा उपाध्याय  विनोबांना भेटले असता  मुसलमान माणसं समुहात असली की कशी हिंसक होतात अशी चर्चा झाली. गप्पा मारतात तसं या चर्चेचं रूप होतं, सिद्धांत पुरावे वगैरे काहीही नाही. सारा मामला सांगोवांगी. या गोष्टीवरून मुसलमानांची ओळख, वैशिष्ट्यं उपाध्याय यांनी ठरवली. क्रिकेट मॅचमधे पाकिस्तान जिंकल्यावर मुसलमान फटाके वाजवतात अशी कहाणी भारतभर सांगितली जाते, मुसलमान देशद्रोही असल्याचा पुरावा आहे असं सांगितलं जातं. त्यातलाच प्रकार. गंमत म्हणजे ही गजाली एकात्मिक मानवतावाद या तथाकथित सिद्धांत पुस्तिकेत देण्यात आली आहे.

तथापि पुस्तकाच्या एकंदर सुत्राशी विसंगत असे मुद्दे दोन ठिकाणी येतात.

एका ठिकाणी ते जिनांच्या विचारातली विसंगती, जिनांचा बहुसंख्यावाद दुर्लक्षितात.

एका ठिकाणी ते नेहरूंना फाळणीसाठी जबाबदार धरतात. जिनांची विभक्त मतदार संघाची मागणी नेहरूनी स्वीकारली असती, कॅबिनेट मिशन योजना स्वीकारली असती तर फाळणीची पाळी आली नसती असं आकार पटेल सूचित करतात. हा नेहरूंवर अन्याय आहे. नेहरूंनी प्रथमपासून भारत धर्मावर आधारलेला नसेल, सेक्युलर असेल अशी भूमिका घेतली होती. त्यामुळं जिनांच्या मागण्या त्यांनी मान्य न करणं हे सुसंगत होतं.

एकूणात हिंदुत्वाची वाटचाल आकार पटेल यांनी सुसंगत रीतीनं पुस्तकात मांडली आहे. लेखकानं किती  संशोधन केलंय, संदर्भ गोळा केलेत ते पुस्तक वाचताना जागोजागी लक्षात येतं.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

Our Hindu Rashtra: What It Is. How We Got Here
Akar Patel

Westland

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0