शेतकऱ्यांची आंदोलनाची मोठी तयारी

शेतकऱ्यांची आंदोलनाची मोठी तयारी

मी सिंघु बॉर्डरवर ३१ डिसेंबरला पोहोचलो आणि नवीन वर्षाचे स्वागत मी तिथेच शेतकरी मित्रांसोबत केले. तेंव्हा माझ्या लक्षात आले, की शेतकऱ्यांनी आंदोलनाची खूप मोठी तयारी केली आहे.

शेतकरी आंदोलनः शीख धर्मगुरुची आत्महत्या
सरकारी कारवाईने फुंकले शेतकरी आंदोलनात नवीन प्राण
दिल्ली-उ. प्रदेश सीमेवर आंदोलक-पोलिसांमध्ये तणाव

मी सिंघु बॉर्डरवर ३१ डिसेंबरला पोहोचलो आणि नवीन वर्षाचे स्वागत मी तिथेच शेतकरी मित्रांसोबत केले. तेंव्हा माझ्या लक्षात आले, की शेतकऱ्यांनी आंदोलनाची खूप मोठी तयारी केली आहे.

आंदोलनातील बऱ्याच शेतकऱ्यांना मी विचारले, की आपणास या कायद्यांमुळे काय त्रास झालाय? बऱ्याच अशिक्षित शेतकऱ्यांचे एकच मत होते, की आमची जमीन जाणार आहे. तसेच सुशिक्षित शेतकऱ्यांनी मात्र कायद्याच्या बाजू समजावून सांगितल्या व तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही या काळ्या कायद्या विषयी सांगा असा आवर्जून सल्ला दिला. थोडक्यात सांगायचं म्हणजे या पंजाबी शेतकऱ्यांची मुख्य धारणा हीच आहे, की या काळ्या कायद्यामुळे ‘आपली’ जमीन ‘आपली’ राहणार नाही. या शेतकऱ्यांचा मोदी सरकारच्या हेतूवर मात्र खूप अविश्वास दिसून आला.

गरीब व श्रीमंतांमधील दरी कमी करण्यापेक्षा बोटावर मोजण्यालायक उद्योजकांची कशी प्रगती होईल यावर सरकारचे खूप लक्ष आहे. प्रचारासाठी पैसे देतात म्हणून ध्येयधोरणे त्यांच्या मर्जीनुसार तयार करणे हे सार्वजनिक जीवनातील नितीमत्तेला शोभणारे नाही, असे या शेतकऱ्यांचे मत बनलेले आहे. थोडक्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा एक अस्तित्वाचाच प्रश्न बनलाय म्हणून त्यांना थंडी व पाऊस याचं काहीच वाटत नाही. मात्र शेतकऱ्यांनी आंदोलनाची मोठी तयारी केली आहे. हे आंदोलन अनेक दिवस चालले, तरी ते चालवण्याची शेतकऱ्यांची सगळी तयारी आहे.

आंदोलनातील व्यवस्था

आम्ही आंदोलनस्थळी खालसा एड(KHALSA AID) नावाच्या संस्थेमध्ये मुक्कामास होतो. संध्याकाळी सहा वाजता येथे झोपण्यासाठी (ज्यांची व्यवस्था झालेली नाही असे) गरजू कुपन घेतात व खालसा एड मध्ये झोपतात. इथे साधारण २०० ते २५० लोकं झोपतील अशी व्यवस्था आहे. ‘खालसा’ ही संस्था महापूर, भूकंप व इतर अनेक आपत्तीत जगभर सेवा पुरविते. इथे राहणे, किसान मॉल, लंगर, नाष्टा वाटप इत्यादी कामे मोठ्या प्रमाणात ही संस्था करते. खालसा एड द्वारा चालविलया जाणाऱ्या जाणारे ‘किसान मॉल’ मध्ये आंदोलक शेतकऱ्यांना अंतर्वस्त्रापासून टॉवेल,

किसान मॉल

किसान मॉल

कपडे, ब्लँकेट, स्वेटर, तंबूसाठी ताडपत्री, आरसा, केसांचे तेल, यांसहीत अनेक दैनिक वापराच्या वस्तू दिल्या जातात. हे वाटप दररोज हजारो शेतकऱ्यांना केले जाते. खालसा एड निवासी तंबू जवळच आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची, थंड पाण्याची व्यवस्था आहे. तसेच कपडे धुण्यासाठी वाशिंग मशीन आहेत. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी त्यांनी पडीक जमिनीवर ट्यूब वेल केल्या असून, पाण्याची गरज पूर्ण केली आहे.

ट्रॉलीच्या आतमधील व्यवस्था

ट्रॉलीच्या आतमधील व्यवस्था

बाकी ट्रॉल्यांमधील शेतकऱ्यांचा विचार केल्यास पंजाबमधील प्रत्येक गावातील सहा ते दहा ट्रॉल्या आंदोलनस्थळी आलेल्या आहेत त्यांनी बरोबर रोजची गरज भागवण्यासाठी आणि राहण्यासाठी सर्व वस्तू सोबतच आणलेल्या आहेत. महिनाभर पुरेल इतके रेशन एकाच वेळी जमा करून ठेवलेले आहे. एका ट्रॉलीमध्ये रेशन तर बाकी ट्रॉल्यांमध्ये झोपण्याची व्यवस्था आहे. मनोरंजनासाठी व दैनंदिन बातम्या बघण्यासाठी ट्रॉलीमध्ये स्वतंत्र टेलिव्हिजनची सुद्धा व्यवस्था बऱ्याच ठिकाणी केलेली आहे. काही स्वाभिमानी शेतकऱ्यांनी तर तिथे ‘विज कनेक्शन’सुद्धा घेतलेली आहेत.

झोपण्यासाठी बनवलेली ट्रॉली साधारणतः झोपडी प्रमाणे दिसते. पाणी व थंडीपासून बचाव करण्यासाठी संपूर्ण ट्रॉली प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकलेली असते. बऱ्याच गावकऱ्यांनी आपली रोजची पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी पाण्याचे टँकरसुद्धा आणलेले आहेत.

लंगर

‘शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांना लहानपणी त्यांच्या वडिलांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी २० रुपये दिले असता, त्यांनी त्या पैशांचा उपयोग भुकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी केला. वडिलांनी जाब विचारल्यावर त्यांनी सांगितले, की आज मी जे वीस रुपये खर्च केले, ती माझी भविष्यासाठी गुंतवणुक आहे.  ही परंपरा पुढे अशीच कायम राहिली आहे. आज सुद्धा सेवाभावी वृत्तीने सिख बांधव आपल्या उत्पन्नातील ठराविक रक्कम गुरुद्वाराला देण्यासाठी सदैव तत्पर असतात आणि या सर्व सेवा वृत्तीतूनच आज आंदोलन स्थळावर सेवा चालू आहेत. त्यातीलच एक म्हणजे लंगर व्यवस्था (माहिती स्रोत-हरप्रित सिंग,फगवाडा,पंजाब).

थोडक्यात ‘लंगर म्हणजे, गरजूंना अन्न उपलब्ध करून देणे व सेवा प्रदान करणे. ‘ग्रँड ट्रक’ रोडवर असलेल्या २५-३० किलोमीटरच्या परिसरात जागोजागी लंगर व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. सकाळी सातच्या सुमारास लंगरमध्ये काही बांधव चहा वाटप करतात तर काही जण भजे, तेलात तळलेले पाव, पनीरचे भजे, टोमॅटो सूप इत्यादी अनेक प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी तयार करतात. नाश्ता करण्यासाठी खूप शेतकरी येत असल्याने प्रत्येक लंगरमध्ये पहाटे चार वाजेपासूनच जय्यत तयारी केली जाते. रस्त्यावर ‘भजी खा भजी, गरमागरम भजी’ असे आवाज देवून शीख बांधव भजी खाण्याचा आग्रह करतात.

भटिंडा येथील लवजीत सिंग म्हणतो, “लंगरमध्ये कोणीही सेवा करू शकतो. मानवतेचे कल्याण हे एकच उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी लोक सेवा प्रदान करतात, दानधर्म करतात.” लंगरसाठी लागणारे धान्य आणि साहीत्य हे गावागावांतून जमा केले जाते.  गावांतील लोक शेतात पिकविलेला भाजीपाला रोज लंगरसाठी घेऊन येतात. चहाला लागणारे दूध आजूबाजूच्या गावागावांतून जमा केले जाते. काही दानशूर शेतकरी तर २-२ हजार लिटर दूध आंदोलनस्थळी रोज पाठवितात. आंदोलन यशस्वी व्हावे म्हणून गावातील सर्व लोक प्रयत्नशील आहेत.

पाण्याची व्यवस्था

आंदोलन हे अनेक दिवस चालेल म्हणून आंदोलकांनी आंदोलनस्थळी ट्यूबवेल खोदल्या आहेत. तसेच बरेच गावकऱ्यांनी गावाकडून पाण्याचे टँकर सोबत आणलेले आहेत. ट्यूबवेल व टॅंकरचे पाणी फक्त वापरण्यासाठी असते. पिण्यासाठी ‘बिसलेरीची’ पाणी बॉटल असते. पाण्याची मुबलक व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक लंगरमध्ये १५ दिवस पुरेल, इतक्या प्रमाणात बीसलेरी पाणी बाटल्यांचा साठा ठेवण्यात आला आहे.

स्वच्छता

स्वच्छतेसाठी स्वतंत्र कचरा गाड्या पंजाब हरियाणातून मागविलेल्या आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, म्हणून काही टीम नेहमी कार्यरत असतात. निवासी परिसरानजीकच शौचालयासाठी  आंदोलक व दिल्ली सरकारद्वारे फिरत्या शौचालयांची व्यवस्था केलेली आहे. सकाळी सकाळी ‘सतनाम वाहेगुरु’ म्हणत काही युवक परिसराची स्वच्छता करताना दिसतात. परिसराची स्वच्छता आणि आपल्या लंगर ट्रॉली जवळील स्वच्छता दिवसभर ही त्या-त्या गटांद्वारे केली जाते. रात्री सर्व कामे आटोपल्यावर संपूर्ण आंदोलन स्थळाची स्वच्छता केली जाते. यामध्ये सर्व परिसर झाडणे, कचरा जमा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करून नियोजित स्थळी कचरा पाठविणे, चिखल असलेला भाग पाण्याने स्वच्छ करणे इत्यादी कामे केली जातात व सकाळी पुन्हा वर्दळीच्या रस्त्यावर स्वच्छता केली जाते.

मेडिकल कॅम्प

आंदोलनस्थळी जागोजागी मेडीकल कॅम्प लावण्यात आले आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी तंबू उभारण्यात आले आहेत. काही मेडिकल कॅम्प केवळ दातांच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी आहेत. तर बाकी सर्व मेडिकल कॅम्पमध्ये सर्व प्रकारच्या गोळ्या, औषधे, डोळ्यांचे व इतर ड्रॉप मोफत दिले जातात. काही कॅम्प हे केरळमधून आलेल्या युवकांनी उभारले आहेत. तर काही इतर राज्यांतील युवकांनी उभारले आहेत.

आंदोलनस्थळी उपस्थित सर्व शेतकरी आपली दैनंदिन कामे आटोपल्यावर संध्याकाळी किसान संबोधन मंचाकडे येतात. तिथेच सकाळपासून वेगवेगळ्या राज्यातील शेती तज्ज्ञ, शेतकरी नेते आपआपली मते, विचार मांडतात. मोदी सरकारने जे कृषी कायदे लागू केलेले आहेत, ते कसे धोकादायक आहेत व आपले अस्तित्व कसे नष्ट करणारे आहेत, हे नेते मंडळी आत्मीयतेने सांगतात. या व्यासपीठावर वेगवेगळ्या राज्यातील तरुण मंडळी प्रबोधन गीत गातात, परिवर्तनवादी कविता सादर करतात. व्यासपीठावरील ज्येष्ठांचे विचार ट्रॉली परिसरात ऐकू यावेत, म्हणून जागोजागी साऊंड सिस्टिम जोडलेली आहे. प्रत्येक वक्ता रोजच्या या ‘किसान सभे’द्वारे आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

(सर्व छायाचित्रे प्रशांत ढेंगेपाटील)

प्रशांत ढेंगेपाटील, सध्या पुणे येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0