‘शेतकर्‍यांच्या लंगरला वित्तपुरवठा थांबवण्यास सांगण्यात आले’

‘शेतकर्‍यांच्या लंगरला वित्तपुरवठा थांबवण्यास सांगण्यात आले’

अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे अब्जाधीश दर्शनसिंग धालीवाल यांना २३-२४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अमेरिकेतून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिल्ली विमानतळावरून परत पाठवले. धालीवाल ६ जानेवारीपासून सिंघू सीमेवर शेतकऱ्यांच्या लंगरला निधी देत ​​आहेत. याआधीही त्यांनी भारतीय लोकांना मदत केली आहे.

शेतकऱ्यांची आंदोलनाची मोठी तयारी
शेतकरी संघटना-सरकारची ४ जानेवारीला पुन्हा बैठक
शेती कायदाः रखवालदार म्हणून चोराची नेमणूक

अमेरिकेतील भारतीय वंशाचे अब्जाधीश दर्शनसिंग धालीवाल, यांना नुकतेच दिल्ली विमानतळावरून पुन्हा अमेरिकेत परत पाठवण्यात आले होते. त्यांनी म्हटले आहे, की ते शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत असल्याने आणि लंगरसाठी पैसे पाठवत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

२३-२४ ऑक्‍टोबरच्या मध्यरात्री ते अमेरिकेतून आल्यानंतर अधिकार्‍यांनी त्यांना दिल्ली विमानतळावरूनच परत पाठवले होते. दिल्लीतील सिंघू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांसाठी लंगर आयोजित केल्याची ‘शिक्षा’ म्हणून त्यांना हे कृत्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

धालीवाल हे अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे राहतात. ते आपल्या भाचीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. त्यांनी फोनवर ‘द वायर’ला सांगितले, की त्यांना भारतात पुन्हा यायचे असेल, तर असे लंगर बंद करावे लागतील, असे सांगण्यात आले आहे.

त्यादिवशी धालीवाल नेदरलँडच्या त्यांच्या पत्नी डेब्रासह सुमारे पाच तास विमानतळावर थांबले, पण त्यांना भारतात प्रवेश मिळाला नाही.

धालीवाल म्हणाले,  “मी जेव्हा इमिग्रेशन काउंटरवर गेलो तेव्हा अधिकाऱ्यांनी मला थांबायला सांगितले. मी विमानतळावर तासभर थांबलो. मी त्याला पुन्हा विचारले काय चालले आहे पण त्यांनी मला थांबायला लावले. दोन तासांनंतर त्यांनी मला सांगितले, की मला अमेरिकेला परत जावे लागेल.”

ते पुढे म्हणाले, “मी जेव्हा विचारले की मला भारतात प्रवेश का दिला जात नाहीये, तेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तेच तेच प्रश्न विचारले, जे प्रश्न मला ते अगोदरपासून विचारत होते. ‘मी सिंघू सीमेवर लंगर का आयोजित केला आणि त्याचे पैसे कोण देत आहेत. मला भारतात प्रवेश करायचा असेल तर मला या लंगरचा निधी थांबवावा लागेल’, असे ते म्हणाले.”

दर्शनसिंग धालीवाल सिंघू सीमेवर शेतकर्‍यांची सेवा करताना .

दर्शनसिंग धालीवाल सिंघू सीमेवर शेतकर्‍यांची सेवा करताना .

धालीवाल यांनी पुन्हा विचारपूस केली असता इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सांगितले ‘वरून आदेश आहेत.’

ते पुढे म्हणाले, “विमानतळावर मला घेण्यासाठी आलेला माझा भाऊ सुरजितसिंग रखडा, भारताचे कौन्सुल जनरल, वॉशिंग्टनमधील भारतीय राजदूत, पंजाबचे मुख्य सचिव आणि राज्य आणि केंद्र सरकारचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी मी बोललो. पण ते काहीच करू शकले नाहीत.”

धालीवाल म्हणाले, “माझ्याशी ज्याप्रकारे व्यवहार करण्यात आला, ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. मला आणि माझ्या पत्नीला २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास त्याच विमानाने अमेरिकेला परत यावे लागले.”

दर्शनसिंग धालीवाल म्हणाले की, जेव्हापासून त्यांनी लंगर आयोजित करण्यास सुरुवात केली तेव्हापासून ते तीनदा भारतात आले आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही शेतकर्‍यांना का पाठिंबा देत आहात. ते म्हणाले, की भारतातील शेतकरी आंदोलनाला त्यांचा पाठिंबा कायम राहील.

ते म्हणाले, “माझ्यासोबत हे घडू शकतं, तर कुणासोबतही होऊ शकतं. मला भारतीय वंशाचा असल्याचा अभिमान आहे, पण ज्यांनी हे केले, ते खरोखरच वाईट आहे. मी ७१ वर्षांचा आहे आणि मला अमेरिकेत परत येण्यासाठी विमानात पुन्हा ४० तास घालवावे लागले, जे थकवणारे होते. पण यामुळे माझा उत्साह कमी होणार नाही आणि सिंघू सीमेवर लंगर सुरूच राहील. मला लोकांना खायला घालण्याची काळजी आहे आणि यापुढेही राहील.”

धालीवाल ६ जानेवारीपासून ‘सुभेदार कर्तारसिंग धालीवाल चॅरिटेबल ट्रस्ट’अंतर्गत आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सिंघू सीमेवर लंगरसाठी निधी देत ​​आहेत.

पंजाब आणि पंजाबी समाजाच्या लोकांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

बादल यांनी मोदींना सद्भावना म्हणून वैयक्तिकरित्या धालीवाल यांना आमंत्रित करण्याची विनंती केली आहे, ज्यामुळे अनिवासी भारतीयांमध्ये चांगला सकारात्मक संदेश जाईल.

बादल म्हणाले, की ‘लंगर’ सारख्या पवित्र सामाजिक-धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणे किंवा प्रायोजित करणे हे शीख धर्माच्या प्रत्येक अनुयायासाठी नेहमीच सर्वोच्च आणि उदात्त कर्तव्य मानले गेले आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे ‘राष्ट्रीय चळवळ’ म्हणून वर्णन करताना, बादल म्हणाले, की या ‘सुसंस्कृत, शांततापूर्ण आणि लोकशाही आंदोलनात सहभागी झालेल्यांना मदत करण्यात काहीही गैर किंवा बेकायदेशीर नाही.

धालीवाल यांचे धाकटे बंधू आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुरजित सिंह रखडा आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC) चेअरपर्सन बीबी जागीर कौर यांनीही मोदी सरकारच्या वृत्तीवर टीका केली आहे.

१९७२ मध्ये अमेरिकेत गेलेल्या धालीवाल यांचे विस्कॉन्सिन, कॅन्सस, इलिनॉय, इंडियाना, मिशिगन आणि मिसूरी या राज्यांमध्ये शंभरहून अधिक पेट्रोल आणि गॅस स्टेशन आहेत.

धालीवाल यांनी तमिळनाडूमध्ये २००४ च्या त्सुनामीनंतर मोठी मदत केली. भारत आणि परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली असून, सुमारे २ हजारहून अधिक भारतीयांना अमेरिकेत व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली आहे. पंजाबमधील शैक्षणिक संस्थांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, मिलवॉकीमध्ये सॉकर ग्राउंड तयार करण्यासाठी १ अब्ज अमेरिकन डॉलर दान केले आहेत.

ते म्हणाले, “आज सरकारचा दृष्टिकोन भलेही बदलला असेल, पण माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जेव्हा अमेरिकेत आले होते तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ मी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. स्नेहभोजनाच्या वेळी उपस्थित असलेल्या एकूण ३३ पैकी ११ काँग्रेसजनांचे मी नेतृत्व करत होतो.”

१९९० च्या दशकात, पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांनी पूरग्रस्त पंजाबला वाचवण्यासाठी मदत मागितली, तेव्हा धालीवाल यांनी १० लाख रुपयांची देणगी दिली होती. जी त्यावेळी मोठी रक्कम मानली जात होती.

यापूर्वी, आनंदपूर साहिब येथील दशमेश अकादमी बंद होण्यापासून वाचवण्यासाठी बादल यांनी मदत मागितली, तेव्हा धालीवाल यांनी ४० लाख रुपये दिले होते. ते म्हणाले, “माझ्या मातृभूमीची सेवा करण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे आणि यापुढेही करत राहीन.”

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0