‘लौंडा डान्स’चे जनक रामचंदर मांझी यांचे निधन

‘लौंडा डान्स’चे जनक रामचंदर मांझी यांचे निधन

वयाच्या १२ व्या वर्षापासून ते आजतायागत तोंडाला पावडर आणि ओठांना लिपस्टिक लावून ‘नाच’ करणाऱ्या पद्मश्री रामचंदर मांझी यांचे बुधवारी रात्री पटना येथील रुग्णालयात दु:खद निधन झाले. भोजपुरीचे शेक्सपिअर म्हणून ओळखले जाणाऱ्या भिखारी ठाकूर यांचे मांझी सहयोगी होते. अश्लील, बीभत्स अशी निर्भत्सना करत ज्या व्यवस्थेने सांस्कृतिक परिघाच्या आजूबाजूलाही फिरकू दिले नाही, त्या ‘लौंडा नाच’ या लोककला प्रकाराची आणि या कलेस मानाचा सन्मान मिळवून देणाऱ्या रामचंदर माझी यांची ही चित्तवेधक कहाणी...

काव्य-संगीताचे आदानप्रदान
महाराष्ट्राची ‘कला’ का नाही?
केरळ : मुस्लिम असल्याने मंदिराने नृत्यास परवानगी नाकारली

आईये, आईयेअब आप के सामने आ रही है अपने जमाने के

शिरीदेवी

ना ना

तो, अमिताभ बच्चन

अरे ना रे माधे

वो तो अपने रामचंदर मांझी है रे…”

प्रचंड टाळ्या आणि शिट्यांच्या कडकडाटात घागरा-चोळी, कानात झुमके, गळ्यात नेकलेस, माथ्यावर बिंदी आणि ओठांना लालभडक लिपस्टिक अशा पेहरावात स्टेजवर तब्बल ९३ वर्षांचा ‘लौंडा’ रामचंदर मांझी यांची एन्ट्री होते. आपल्या खास भोजपुरी शैलीत रामचंदर गाऊ लागतात, ढोलकच्या ठेक्यावर कमरेला लटके देत नृत्य करू लागतात. गाण्याचे बोल असतात… 

घर में रहे दूध पांच सेर, केहू जोरन दिहल एक धार.

का पंचाईत होखत बा, घीव साफे भईल हमार…’

याचा अर्थ, माझ्या घरी जर पाच शेर दूध असेल आणि जर का कुणी त्यात विरजण घातले, तर यात पंचायतीचा काय संबंध? त्यातून तयार होणारे तूप हे सरळ सरळ माझेच असणार आहे.

जिचा नवरा कामाचे निमित्त सांगून घरदार सोडून पळून गेलाय, तिथे जाऊन त्याने दुसरे संधान बांधले आहे आणि अशा परिस्थितीत त्याची पत्नी इतर कोणाकडून गरोदर राहिली तर… इतकाच कुतूहल चाळवणारा या गाण्याचा अर्थ नाहीये, तर मी कुणाशी संबंध ठेवावेत हा फक्त माझा प्रश्न असून माझ्या गर्भावर पूर्णपणे माझाच हक्क आहे, त्यात पंचायतीला नाक खुपसायचं काहीएक कारण नाहीये, असा थेट सवाल एका स्त्रीने व्यवस्थेला विचारला आहे! आणि हा सवाल केव्हा विचारलाय, तर जेव्हा ‘द सेकंड सेक्स’ (१९४९) हे सिमोन द बोव्हारचं क्रांतिकारक मानलं जाणारं पुस्तकही प्रकाशित झालेलं नव्हतं अशा काळात.

लौंडा नाचचा सन्मान 

स्त्रीचा वेष धारण करून रामचंदर मांझी हे जे गाणं सादर करतात, ते गाणं लिहिलेलं असतं, त्यांचे गुरु भिखारी ठाकूर यांनी आणि मांझी ज्या पद्धतीने हे गाणं आणि नृत्य सादर करतात त्या सादरीकरणाला संबंध बिहारमध्ये ओळखलं जातं ‘नाच’या नावाने. ‘नाच’ म्हणजे, केवळ नृत्य नव्हे, तर स्त्रियांसारखी वेशभूषा करून गाणं, नृत्य आणि पौराणिक कथांचे सादरीकरण अशा एकत्रित लोककलेच्या फॉर्मला ‘नाच’ म्हटलं जातं. वयाच्या १२ व्या वर्षापासून ते आजतायागत तोंडाला पावडर आणि लिपस्टिक लावून ‘नाच’ करणाऱ्या रामचंदर मांझी यांची अनेक वर्षापासूनची तपश्चर्या अखेर यावेळी फळाला आली, जेव्हा दोन वर्षांपूर्वी त्यांना प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला… हा सन्मान फक्त रामचंदर मांझीचा नाहीये तर हा सन्मान ज्यांनी ‘नाच’ जन्माला घातला, ते त्यांचे गुरू ज्यांना ‘बिहारचे शेक्सपिअर’ म्हणून ओळखले जाते, त्या भिखारी ठाकूर यांचा आहे! अश्लील, बीभत्स अशी निर्भत्सना करत दलितांच्या, उपेक्षितांच्या, शोषितांच्या या ‘नाच’ नावाच्या लोककलेला ‘लौंडा नाच’ असे हिणवत ज्या व्यवस्थेने सांस्कृतिक परिघाच्या आजूबाजूलाही फिरकू दिले नाही त्या ‘लौंडा नाच’चा हा सन्मान आहे…

दलित समाजाचे रामचंदर मांझी वयाच्या ११ व्या वर्षी भिखारी ठाकूर यांच्या पथकात सहभागी झाले होते. “माझं सगळं आयुष्य मी भिखारी ठाकूर आणि ‘नाच’ला समर्पित केलं होतं. इतकं की माझ्या लग्नाच्या दिवशीही मी कार्यक्रम सादर करून आलो होतो आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीही ‘नाच’ करायला गेलो होतो. सुरैय्या, मधुबाला, साधना या जुन्या नट्यांसोबत मी ‘नाच’ केलाय. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, जयप्रकाश नारायण, जगजीवन राम, नितीश कुमार, शरद यादव, रामविलास पासवान यांच्यासमोर माझे कार्यक्रम झाले असले तरी, राजकीय नेत्यांमध्ये लालूप्रसाद यादव यांनी मात्र माझ्यावर खूप प्रेम केलं. जेव्हाही लालूप्रसाद मला भेटत, तेव्हा ते नेहमी हेच म्हणायचे की, ‘रामचंदरजी आप जबतक जियें, भिखारी ठाकूरको जिंदा रखें.’ मात्र इतकं करूनही माझ्या कुटुंबाने मात्र आजपर्यंत माझा कार्यक्रम पाहिलेला नाही. याच कारण आमच्या या कलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन.”

आपल्या सबंध आयुष्याचा विस्तारपट उलगडून सांगताना रामचंदर मांझी यांच्या बोलण्यातून त्यांचे गुरू भिखारी ठाकूरबद्दल प्रचंड आदर व्यक्त होत असतो. आणि का नाही होणार, ज्या भिखारी ठाकूरला भोजपुरीचे शेक्सपिअर आणि तुलसीदास म्हणून संबोधिले जाते, ज्या महापंडित राहुल सांकृत्यायनने त्यांचा ‘अनगढ हिरा’ म्हणून गौरव केला आहे त्या लोककवी भिखारी ठाकूरमुळेच तर आज भोजपुरीचे सांस्कृतिक स्थान उभे राहिले आहे. प्रख्यात कवी केदारनाथ सिंह म्हणतात… ‘ठनकता था गेंहुअन, तो नाच के किसी अंधेरे कोने से, धीरे धीरे उठती थी, एक लंबी और अकेली भिखारी ठाकूर की आवाज.’

भिखारी ठाकूर : भोजपुरीचे शेक्सपिअर

बिहारच्या छपरा येथे नाभिक समाजात जन्मलेले भिखारी ठाकूर रोजगाराच्या शोधात इतर बिहारी-युपी तरुणांप्रमाणेच कोलकाताला आणि त्यानंतर पुरी येथे स्थलांतरित होतो काय… तिथली लोक संस्कृती, तिथल्या लोककला पाहून भारावून जातो काय, बिहारमधल्या सांस्कृतिक दारिद्र्याबद्दल आसवं गाळतो काय, आणि पुन्हा बिहारला परतून पुरुषांनीच स्त्रियांच्या भूमिका साकारणारे स्वत:चे एक सांस्कृतिक विश्व जन्माला घालतो काय… दलितांचं, वंचितांचं जिणं एका वेगळ्याच कलेच्या माध्यमातून समाजासमोर प्रस्तुत करतो काय, सारंचं थक्क करणारं. ‘बिदेसिया’ (परमुलुखात गेलेल्या कर्त्या पुरुषाची आळवणी करताना स्त्री मनाचं दु:ख, वेदना, हुरहूर आदी भावनांचं दर्शन घडवणारा कलाप्रकार) ही भिकारी ठाकूर यांची नृत्य-नाट्य असलेली एक अजरामर १९१७ मध्ये सादर केलेली कलाकृती. उत्तरेकडे असा एकही कलावंत नसेल, ज्याने रंगमंचावर ‘बिदेसिया’ केलं नसेल… ‘बिदेसिया’च्या आजवर किती आवृत्त्या निघाल्या हेदेखील कोणी ठामपणे सांगू शकत नाही.

बिदेसिया : एक अजरामर कलाकृती

‘बिदेसिया’चा एक अनोखा किस्सा रामचंदर मांझी सांगतात. भिखारी ठाकूर यांचे ‘नाच पथक’ प्रचंड लोकप्रिय झाले होते, आणि देशभरात अनेक ठिकाणी ‘बिदेसिया’चे प्रयोग व्हायचे. असाच एक प्रयोग कोलकाताला पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी पोलिस येऊन धडकले. भिखारी ठाकूर यांच्याविरुद्ध कोलकाताच्या काही मिल मालकांनी पोलिस तक्रार केली होती की, ‘बिदेसिया’ या नृत्य नाटिकेमुळे आमच्या कंपन्यांना टाळं लावण्याची वेळ आली आहे, कारण हे नाटक बघून आमच्या मिलचे कामगार घरच्या ओढीने न सांगताच थेट त्यांच्या गावी निघून जातात. अशाप्रकारच्या तक्रारीमुळे पोलिसही बुचकळ्यात पडले होते. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मग फर्मान सोडले की, बघूया तरी ‘बिदेसिया’ काय आहे. पोलिस स्थानकातच मग स्टेज उभारण्यात आले, आणि ‘बिदेसिया’चा प्रयोग पार पडला.

प्रयोग संपला, तेव्हा तो पोलिस अधिकारी मोठमोठ्याने रडू लागला आणि भिखारी ठाकूरला म्हणाला, उद्याच मी माझ्या गावी, माझ्या कुटुंबाकडे निघून जाणार आहे…

‘बिदेसिया’ पाठोपाठ भिखारी ठाकूर यांच्या प्रतिभेतून आणखी काही कलाकृती साकारल्या गेल्या. स्त्रियांच्या अधिकारांवर आधारित ‘गबरघिचोर’, बालविवाह आणि भ्रूणहत्येविरोधात ‘बेटी बचवा’ आणि वृद्धाश्रमवर आधारलेले ‘बूढशाला का बेयान’… आणि परखड सामाजिक भाष्य करणाऱ्या या कलाकृतींचा काळ होता विसाव्या शतकातला…

अब देखल जाय कि गाय वास्ते गौशाला खुल गइल

गरीब वास्ते धर्मशाला खुल गइल, गंवार वास्ते पाठशाला खुल गइल.

बड़ा अच्छा भइल. अब बूढ़ खातिर बूढ़शाला खुल जाइत, बहुत अच्छा रहल ह;

काहे कि बूढ़ के बड़ा तकलीफ बीतत बा.. बूढ़ के खइला के फिकिर ना रहे.

गायींसाठी गोशाळा सुरू झाल्या, गरिबांसाठी धर्मशाळा… निरक्षरांसाठी शाळा सुरू झाल्या आता वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू झाले तर किती बरं होईल… असा विचार भिखारी ठाकूर यांनी त्यावेळी मांडला होता. रोजगारासाठी, पैसे कमवण्यासाठी गावातले तरुण आता इतर राज्यात कायमचेच स्थलांतरित झाल्यामुळे, गावात फक्त हालअपेष्टांचा सामना करत वृद्ध आईवडीलच मागे राहिले आहेत ही सल त्यांना त्रास देत होती.

लौंडा नाचला अश्लील ठरवले

भिखारी ठाकूर यांच्या इतके प्रखर सामाजिक भाष्य करणाऱ्या कलाकृती असतानाही त्यांच्या कलेला कधीही अभिजात दर्जा दिला गेला नाही. भिखारी ठाकूर यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या रामचंदर मांझी यांच्यासारख्या अनेक कलाकारांना कायम दुर्लक्षित केले गेले. एकेकाळी जवळपास दीडशे ते दोनशे ‘नाच पथक’ एका मोठ्या वर्ग समूहाचे मनोरंजन करत असताना, त्यांच्या सामाजिक जाणिवांना जागृत करत असतानाही ही कला कायम बहिष्कृतच राहिली. आता आतापर्यंत या रामचंदर मांझीना कोणीही ओळखत नव्हतं. ‘नाच’ची परंपरा जपणारे, ऑर्केस्ट्राकरण झालेला ‘लौंडा नाच’ आजही पारंपरिक पद्धतीनेच सादर करणारे रामचंदर मांझी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळावा, यासाठी त्यांचे अनेक शिष्य गेल्या काही वर्षांपासून अथक प्रयत्न करीत होते. भिखारी ठाकूरसोबत ज्या कलाकारांनी काम केलंय त्यापैकी आता फक्त रामचंदर मांझी हेच हयात आहेत, त्यामुळे अशा कलाकाराचे दस्ताऐवजीकरण व्हावे, त्यांच्या या कलेचे जतन-संवर्धन व्हावे, असे खरं तर कुणालाच वाटू नये? असे कुणाला वाटणारही नाही, कारण जिथे रामचंदरच्या गुरूला म्हणजे भिखारी ठाकूर यांनाच इथल्या समाज व्यवस्थेने लाथाडले तिथे रामचंदरची काय कथा? या सगळ्याचे मूळ हे जातीच्या उतरंडीत आहे. श्लील-अश्लीलतेत आहे. अभिजात-अभिरुचिहीन या तुलनेत आहे. सांस्कृतिक पर्यावरणारक्षकांमध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘लौंडा’ या शब्दामध्ये आहे!

भारतीय जातिव्यवस्थेने सांस्कृतिक क्षेत्राला दिलेल्या वळणांकडे पाहिले, असता कला क्षेत्रातले जातवास्तव अधिक ठळकपणे दिसते. भारतातल्या उच्च समजल्या जाणाऱ्या जातींनी ज्या दुय्यम दर्जाच्या कला आहेत, त्या समाजातल्या खालच्या जातींमध्ये वाटून आपल्या सांस्कृतिक आचरणात जातवर्चस्वाची झूल शाबूत राहील, याची सतत दक्षता घेतली आहे. भारतात कुठेही गेलो तरी लोककला प्रवाहित करणारे कलावंत, हे खालच्या जातीतलेच दिसतात. पण, लोककला जर आजच्या आधुनिक कलांच्या उद्गगात्या असतील, तर भारतीय लोककलांची सतत उपेक्षा का होत राहिली?

बिहारचा ‘लौंडा नाच’ याच सांस्कृतिक राजकारणात जखडला गेलाय. ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्यानंतर उत्तरेकडे ‘लौंडा बदनाम हुआ, नसिबन तेरे लिए’ या ताराबानो फैजाबादीच्या भोजपुरी गाण्याने लोकप्रियतेचा कळस गाठला. गाण्याचे हेच शब्द नेमके ‘लौंडा नाच’ला तंतोतंत लागू पडतात. ‘लौंडा’ या शब्दाचा सरळसरळ अर्थ म्हणजे मुलगा. बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात जी मुलं बायकांप्रमाणे वेशभूषा करून नाच-गाणी करतात, त्यांना ‘लौंडा’ म्हणूनच ओळखलं जातं, आणि त्या नृत्याच्या प्रकाराला ‘लौंडा नाच’ म्हणून. आता एकदा का ‘लौंडा’ म्हटलं की, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार हे निश्चितच आणि झालंही नेमकं तसंच. त्यात खतपाणी घालण्याचं काम अगदी प्रकाश झा ( हमरी चढ़ल बा जवनिया गवना ले जा राजा जी – चित्रपट ‘दामुल’) आणि अनुराग कश्यप (गँग्स ऑफ वासेपुर) या फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांपासून लालूप्रसाद यादव, मुलायम सिंह यादव या राजकीय दिग्गजांनीदेखील केलं. लालूप्रसाद यादवांचे ‘लौंडा नाच’ वरचे प्रेम जगजाहीर आहे. त्यांच्या अनेक राजकीय रॅलीची आणि सभांची सुरुवात ‘लौंडा नाच’नेच होत असे. इतका मोठा लोकाश्रय आणि राजाश्रय मिळूनही, असं नेमकं काय झालं, की लोककलावंत म्हणून सुरूवात करणाऱ्या या कलाकारांचा प्रवास ‘लौंडा’ या अश्लील आणि बदनामीकारक शब्दापर्यंत येऊन थांबला.

‘तेहलका’ या मासिकात ‘लौंडा नाच’वर एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. ज्येष्ठ नाटककार आणि लोककला अभ्यासक हसन इमाम या संदर्भात म्हणतात, की ‘लौंडा नाच’ असा कुठलाही फॉर्म लोककलेमध्ये कधीच नव्हता. इतिहासातही तसे दाखले मिळत नाहीत. १९व्या शतकांपासून आजही भारताच्या गावांगावांमध्ये जी नाटके होतात, रामलीला, रामायण, महाभारताचे प्रसंग नाच-गाण्यातून सादर केले जातात, त्यात अनेक तरुणांनी स्त्रीपात्र रंगवले आहे, त्या सगळ्यांना आपण ‘लौंडा’ म्हणतो का? मनोहर श्याम जोशी, बालगंधर्व इतकेच नव्हे तर हबीब तनवीर, रतन थिय्याम यांच्या नाटकातही पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका साकारल्या आहेत… बिरजू महाराज किंवा इतर अनेक दिग्गज कथ्थक नर्तक जे महिला नर्तकींप्रमाणे नृत्य सादर करतात त्यांनाही आपण ‘लौंडा’ म्हणणार का?

पूर्वी राजदरबारात नर्तकी नाचायच्या. पण, राजे-महाराजांचे युग संपले आणि तवायफ, कोठेवाली, बायजींचे युग सुरू झाले. सामंती वर्चस्ववादी पुरुषी मानसिकतेने पैशाच्या-बळाच्या जोरावर त्यांना आपल्या ताब्यात ठेवले. इतर समाजातील महिलांना तर धर्मशास्त्राने नाच-गाणं सादर करण्याची परवानगीच नाकारली होती. त्यामुळे एक खूप मोठा उपेक्षित, शोषित वर्ग नृत्यासारख्या मनोरंजनापासून वंचित राहिला होता. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी एका वेगळ्या शैलीचा जन्म झाला… पुरुषांनीच स्त्रिया बनून नाच-गाणं करण्याचा. अल्पावधीतच कलेचा हा फॉर्म इतका लोकप्रिय झाला, की त्यातून अनेक नाच-गाण्याची पथके तयार झाली, नाच-गाण्यांचा आनंद लुटण्याची मक्तेदारी ज्या सावकार-जमिनदारांकडे होती त्याला फक्त या कलेने आव्हानच नाही दिले, तर स्वत:चे नायक जन्माला घातले. संस्कृतीच्या ठेकेदाऱ्यांना, सांस्कृतिक पर्यावरणरक्षकांना अर्थातच हे मान्य होणारं नव्हतं आणि मग या कलेला सामाजिक मान्यता मिळू नये म्हणून सुरू झालं सांस्कृतिक राजकारण. या कलेला हिणवण्यासाठी, त्यावर अश्लिलतेचा शिक्का मारण्यासाठी ‘लौंडा नाच’ हा शब्द खास तयार करण्यात आला आणि मग काय…? शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या लोककलेला आता इतक्या वर्षानंतर म्हणजे २०१८ मध्ये संगीत नाटक अकादमीने पुरस्कृत करून सामाजिक मान्यता देण्याचा प्रयत्न झाला यातच सगळं काही आलं!

या इतक्या प्रदीर्घ कालावधीत ‘लौंडा नाच’चे अनेक दिग्गज कलावंत काळाच्या उदरात गडप होऊन गेले. त्यातलाच एक होता रसूल… इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात रसूलदेखील सहभागी झाला होता, परंतु तो ‘नाच’मधून समाजप्रबोधन करायचा… हजारोंच्या गर्दीला रसूलच्या ‘नाच’मधून प्रेरणा मिळायची. नथूराम गोडसेने महात्मा गांधीची हत्या केल्यानंतर रसूलने गाणं लिहिलं होतं… ‘के मारल हो, हमरा गांधी के तीन गो गोली, धकाधक…!’ कोण ओळखतं या रसूलला आणि या रसूलला आपण फक्त ‘लौंडा’ म्हणून खड्यासारखं बाजूला फेकून देणार. चाई ओझा हा असाच एक लोकप्रिय कलाकार, परंतु फक्त फरक इतकाच चाई ओझा हा दलित समाजापैकी नसून ब्राह्मण जातीचा होता. वयाच्या १२व्या वर्षापासूनच चाई ओझाला या ‘नाच’ कलेबद्दल आकर्षण वाटू लागलं. पुढे पुढे तर त्याने त्याकाळी दलित वस्तीत जाऊन आणि दलित कलावंतांना सोबत घेऊन स्वत:चे नाच पथक तयार केलं. चाई ओझाचे राज्याराज्यात कार्यक्रम होऊ लागले, मात्र इतकी लोकप्रियता असतानाही, चाई ओझाला समाजातून, गावातून बहिष्कृत करण्यात आलं. शेवटपर्यंत त्याला समाजाने स्वीकारलं नाही. आजही त्या भागात त्याचं नाव घेतलं की कौन वो ‘लौंडा चाई ओझा’ असं म्हणूनच हिणवलं जातं.

काळ बदलला

एकेकाळी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणारी, ही कला आता खरोखरच अश्लील संवाद, अचकट-विचकट हावभाव अशा स्वरुपात सादर केली जाते. पूर्णपणे ऑर्केस्ट्राकरण झालेल्या या जमान्यात पारंपरिक कलावंत भरडले जात आहेत. आणि म्हणूनच पारंपरिक नाच करणाऱ्या अनेक कलावंतांनी त्याकडे पाठ फिरवायला सुरूवात केली आहे. २००० नंतर इथली अनेक नाच पथके बंद पडली. आता आसाम, बांगलादेश, नेपाळमधून मुली येतात. रामचंदर मांझी म्हणतात, “आजकल के युवा गहराई से बहुत कम सोचते है… इसी कारण उन्हें, सस्ता मनोरंजन पसन्द है… भिखारी ठाकूर के नाटक आपको सोचने पर मज़बूर करते हैं…”

मात्र काहीही झाले तरी भिखारी ठाकूर यांची परंपरा जिवंत ठेवायचीच, या निष्ठेने जैनेंद्रकुमार दोस्तसारखे तरूण आजही प्रयत्नशील आहेत. जैनेंद्र हा बिहारचाच तरुण जेएनयुमध्ये ‘लौंडा नाच’ आणि ‘बिदेशिया’वर पीएचडी करतोय. त्यासाठी त्याने भिखारी ठाकूर रेपेट्री (Repertory) प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू केलंय. भिखारी ठाकूरसोबत काम केलेल्या पाच कलावंतांवर जैनेद्रने ‘नाच भिखारी नाच’ ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे.

‘लौंडा नाच’ अशी सतत हेटाळणी होत असल्यामुळे आपल्या अखेरच्या काळात भिखारी ठाकूर म्हणतात…

अबहीं नाम भईल बा थोरा, जब यह छूट जाई तन मोरा

तेकरा बाद पचास बरिसा, तेकरा बाद बीस दस तीसा

तेकरा बाद नाम हो जईहन, पंडित कवि सज्जन जस गईहन

आता कुठे जरासं नाव झालं आहे… जेव्हा हे शरीर मोकळं होईल, तेव्हा कदाचित पन्नास वर्षांनंतर किंवा दहा-वीस वर्षांनंतर नामांकित झालेलो असेन… पंडित, कवी आणि सज्जन मंडळी माझ्या यशाचे गोडवे गात असतील…

असं खरंच होतंय का?

प्रशांत पवार हे ज्येष्ठ पत्रकार असून ते लोककलेचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0