हेन्री डेव्हिड थोरो हा प्रख्यात अमेरिकन लेखक आणि विचारवंत. मागील वर्षी त्याच्या जन्माला दोनशे वर्षे पूर्ण झाली. उणेपुरे ४५ वर्षांचे आयुष्य थोरोच्या वाट्याला आले. मात्र त्यानंतरच्या दीड शतकावर थोरोच्या विचारांचा अमीट ठसा उमटला आहे.
आपले जीवन किती का क्षुद्र असेना? त्याला सामोरे जा आणि ते जगा. त्याच्यापासून तोंड वळवून दूर जाऊ नका; आणि त्याला नांवेही ठेवीत बसू नका. जीवन कसेही असले तरी तें काही तुमच्या आमच्या इतके खचित वाईट असत नाही.[१]
- हेन्री डेव्हिड थोरो
हेन्री डेव्हिड थोरो हा प्रख्यात अमेरिकन लेखक आणि विचारवंत. मागील वर्षी त्याच्या जन्माला दोनशे वर्षे पूर्ण झाली. उणेपुरे ४५ वर्षांचे आयुष्य थोरोच्या वाट्याला आले. मात्र त्यानंतरच्या दीड शतकावर थोरोच्या विचारांचा अमीट ठसा उमटला आहे. काळ लोटेल तसे त्याच्या विचारांचे महत्त्व अधिकाधिक सुसंगत ठरत आहेत. थोरोचे ग्रंथ, त्याची रोजनिशी, असंख्य लेख आणि पत्रे यांमधून थोरोने मांडलेले विचार बदलत्या काळानुसार अधिक परिणामकारक ठरत आहेत. मात्र थोरोला खऱ्या अर्थाने कुठल्या गोष्टीने प्रसिद्धीच्या शिखरावर नेले असेल तर त्याने वॉल्डनकाठी केलेल्या प्रयोगाने.
थोरोने आपल्या जीवनात एक अभिनव प्रयोग केला. त्या प्रयोगाने त्याला आधुनिक काळातील मिथक बनविले. साचेबद्ध जीवन जगणे त्याला कमालीचे कंटाळवाणे वाटे. आपल्या सभोवतालची सारी माणसे ज्या पद्धतीच्या जीवनाचा अवलंब करतात ती पद्धत केवळ रीत म्हणून स्वीकारणे म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या जीवनाचा उपमर्द करणे असे तो म्हणे. आपण जगतो त्याहून अधिक अर्थपूर्ण आणि हेतुपुरस्पर जीवन जगणे अगदीच शक्य आहे, तसे करण्याची धमक मात्र आपण दाखविली पाहिजे असे त्याला वाटे. आपल्या स्वप्नातील जीवन जगून दाखविण्याचे धैर्य थोरोने नक्कीच दाखविले.
आदिम युगातील माणसाच्या जीवनातील साधेपणाचे त्याला आकर्षण होते. निसर्गाचा यात्रेकरू म्हणून जीवन कंठावे असे त्याला वाटे. अन्न आणि निद्रा यांनी ताजेतवाने होऊन प्रभाती उठावे, साध्या झोपडीत राहावे, पायी मैदाने ओलांडावीत, दऱ्याखोऱ्यातून मार्ग शोधून काढावेत, तर कधी शैलशिखरांवर चढून जावे, भूक लागली की मुक्तपणे झाडांची फळे तोडून खावी, निवाऱ्यासाठी झाडाखाली उभे राहावे, अशा प्रकारे निसर्गाशी नाळ जोडून जगण्याचे त्याचे स्वप्न होते. तसे त्याने जगूनही दाखविले. त्यासाठी आपल्या शहरी जीवनाचा त्याग करून थोरो ‘वॉल्डन’ नावाच्या तळ्याकाठी विजन अरण्यात झोपडी बांधून राहू लागला. राहाण्यासाठी त्याने स्वत:च्या हातांनी घर बांधले, उपजीविकेसाठी स्वत:च शेती केली, स्वत:च्या हातांनी अन्न शिजवून खाल्ले, आणि आधुनिक जगासाठी ‘वॉल्डन’ या नव्या ग्रंथाची रचना केली.
वॉल्डनकाठी एकांतवास पत्करून राहण्यामागील आपली भूमिका थोरोने ‘वॉल्डन’ या ग्रंथात दिली आहे.
‘‘मी रानांत राहायला गेलो ते अशासाठी की जीवन हेतुपूरस्सर जगावे, जीवनाच्या मूलभूत तथ्यांना सामोरे जावे, जे इतरांना शिकवायचे ते आपल्या स्वत:ला शिकता येते कि नाही ते पाहावे आणि या मरतेवेळीच आपण जगलो नाही हें उमगू नये म्हणून.”[२]
वरील उक्तीतून, थोरोचा अरण्यवास स्वीकारून राहण्याचा उद्देश तसा स्पष्ट होतो मात्र थोरोच्या चरित्राकडे अधिक काळजीपूर्वक पाहिल्यास थोरोच्या या निर्णयामागे दुसरेही काही कारण आहे हे लक्षात येणे कठीण नाही. जीवनाच्या मूलभूत तथ्यांना तर तो नेहमीच सामोरे जात होता. आजचे जगणे उद्यावर न ढकलता जीवनाच्या हरेक क्षणाचा रसरसून उपभोग घेत होता. त्याच्याच उक्तीप्रमाणे- ‘लिहणे हे केवळ रिकाम्या वेळचा छंद म्हणून न करता जीवित कार्य म्हणून करायचे’ तर तसे त्याला शहरातल्या घरी राहूनही करता आले असते. एकांतासाठी दिवसातल्या काही घटका निर्जन स्थळी घालविता आल्या असत्या जसे त्याकाळचे अनेक लोक करतही होते. मात्र थोरोने तसे न करता पूर्णवेळ या निर्जन अरण्यात येऊन का राहावे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोरोच्या आयुष्यात थोडे मागे जाऊन पाहावे लागणार आहे.
१८३९ साल. हे वर्ष थोरोच्या उमेदीचे वर्ष होते. या वर्षभरात त्याने समाजांत आपले स्थान निर्माण केले होते. त्याचवेळी तो कविता आणि लेख लिहू लागला होता आणि साऱ्यांवर कडी म्हणजे तो चक्क प्रेमात पडला होता. २० जुलै १८३९ रोजी एलेन सेवाल तिच्या मावशीसोबत सुट्टी घालविण्यासाठी काँकॉर्डला आली होती. एलेनला पाहताच थोरोच्या मनात अनुरूक्तीचे अंकुर फुटू लागले. थोरो त्यावेळी एलेनला प्रथमच पाहात होता असे नाही. याआधीही अनेकवार एलेनला त्याने पाहिले होते. बालपणी त्याच्या खेळातली ती सवंगडी होती. पण यावेळी काँकॉर्डला आलेली ती लहान मुलगी नव्हती. सतरा वर्षांच्या विलक्षण सुंदर आणि बुद्धिमान तरुणीत तिचे रूपांतर झाले होते. एक अत्यंत हळूवार आणि सुंदर भावनेने थोरोवर गारूड केले. थोरोने त्याला कसलाच अडकाव केला नाही. समोरून येणाऱ्या त्या मुग्ध अनुभवाला थोरो त्याच्या समग्र अस्तित्वानिशी सामोरा गेला.
त्या मंतरलेल्या दिवसांत थोरो आणि एलेन नेमके त्याच गोष्टी करत होते ज्याची यौवनात पदार्पण करणाऱ्या कोवळ्या जीवांना आस लागून राहिलेली असते. थोरो तिला कुरणांवर फिरायला घेऊन जाई, टेकड्यांवर रानटी फळे गोळा करायला तिला सोबती घेई, नदीवर नौका घेऊन दोघे मनसोक्त विहार करीत. थोरो तिचे मूक अनुनय करीत होता. त्याचा अबोल आणि गंभीर स्वभाव जरी त्याच्या प्रेमाच्या प्रकटीकरणाचा मार्ग अवरूद्ध करीत होता, तरी थोरो त्याची भरपाई कवितेतून करीत होता. त्या काळात थोरोने अतिशय सुंदर कविता लिहिल्या. त्या कविता पाहून इमर्सन म्हणाला, ‘अमेरिकेला अखेर तिचा अस्सल कवी गवसला आहे’.
एलेनने एकूण दोन आठवडे काँकॉर्डला मुक्काम केला. हे दोन आठवडे तिच्या जीवनातील सर्वात सुंदर काळ होता असे तिला वाटले. माघारी जाण्याची वेळ आली तेव्हा आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात ती म्हणाली, “हा काळ मी किती मजेत घालवला त्याच्या अर्धी गंमत सुद्धा मी तुम्हाला सांगू शकणार नाही.” परतीच्या प्रवासात पूर्णवेळ तिला रडू रोखून धरणे मुश्कील झाले. आसक्तीच्या मोहमयी भावनेने तिच्यावरही आपले पंख पसरले होते. मात्र एलेनवर जीव जडलेला थोरो एकटाच नव्हता. थोरोने कुणा प्रतिस्पर्ध्याची पर्वाही केली नसती. मात्र त्याची मुख्य स्पर्धा होती त्याचा सख्खा मोठा भाऊ जॉन याच्याशी. हेन्री आणि जॉन दोघांना या स्पर्धेची जाणीव होती. एका विचित्र पेचात दोघे सापडले होते. एकमेकांवर निरतिशय प्रेम करणाऱ्या दोघां भावांत एक अस्पष्ट तणाव डोकावू लागला. ऑगस्ट महिन्यातील अखेरच्या दिवशी जेव्हा दोघे काँकॉर्ड नदीवर नौकाभ्रमंतीसाठी निघाले तेव्हाही त्यांच्यामध्ये हा तणाव कायम होता.
काँकॉर्ड नदीवरील थोरो बंधूंच्या प्रसिद्ध भ्रमंतीनंतर दोघे परत आले तेव्हा हेन्रीने स्वत:ला एका साहित्यिक अंकासाठी लेख लिहिण्यात बुडवून घेतले. जॉन मात्र त्यावेळी निराळेच बेत करीत होता. जॉनचा स्वभाव थोरोच्या अगदी विरोधी बोलका, अतिउत्साही, विनोदी असा होता. एलेनचे मन जिंकायचेच असा त्याने जणू निश्चय केला. सप्टेंबर महिन्याच्या ३० तारखेला जॉन ‘स्कीट्युएट’ला एलेनच्या घरी जाऊनही आला.
त्यानंतर बराच काळ काहीच विशेष घडले नाही पुढील वर्षाच्या जुलै महिन्यात एलेनच्या मागील वर्षाच्या भेटीला वर्ष पूर्ण होत आले तेव्हा मात्र जॉनला एलेनसाठी काहीतरी करावे असे वाटू लागले. त्याने थेट ‘स्कीट्युएट’चा रस्ता धरला. एलेनने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. एके दिवशी जॉन, एलेन आणि तिची ‘पृडन्स’ मावशी समुद्र किनारी भटकायला गेले. भरपूर भटकंती केल्यानंतर पृडन्स दमून एका मोठ्या खडकावर विसावली. या संधीचा फायदा घेऊन जॉनने एलेनला तिच्यापासून दूर नेले आणि तिला लग्नाची मागणी घातली. एलेनने लगेच होकार दिला मात्र लवकरच ती पस्तावली. पुढे तिने कबूल केले, तिचे प्रेम जॉनवर नव्हते तर हेन्री थोरोवर होते; पण हेन्रीने तिला याबद्दल कधी विचारलेच नाही. एलेनचा निर्णय समजताच तिच्या आईवडिलांनी जोराचा विरोध केला. दोन दिवसांनी जॉन दुर्मुखला होऊन काँकॉर्डला परतला.
त्यानंतर मात्र हे प्रकरण विसावल्यासारखे वाटत होते मात्र तसे व्हायचे नव्हते. आता हेन्री थोरोने आपले नशीब आजमावून पाहावे असे ठरविले. नोव्हेंबर महिन्यातील एके दिवशी त्याने एलेनला पत्र लिहिले आणि तिला लग्नासाठी मागणी घातली. मात्र तोवर फार उशीर झाला होता. एका भावाला नकार देऊन दुसऱ्या भावाला होकार देणे तिच्याकडून झाले नसते. शिवाय घरच्या विरोधाचा प्रश्नही होताच. तिने थोरोला नकार कळविला. थोरोने आपल्या पत्रासोबत तिच्यासाठी एक कविता पाठविली होती, ती कविता मात्र एलेनने आयुष्यभर सांभाळून ठेवली. मूळच्या आनंदी आणि उत्साही स्वभावाने जॉनला त्याच्या दु:खातून सावरायला फार वेळ लागला नाही. थोरोला मात्र उदासीने घेरले. तो अधिकाधिक आपल्या कोशात राहू लागला. थोरोने त्यानंतर एलेनवर फारशी वाच्यता कधी उघडपणे केली नाही मात्र एलेनवर त्याने आयुष्यभर अपार प्रेम केले. थोरो मृत्युशय्येवर होता तेव्हांही एलेनचे नांव त्याच्या ओठांवर आले. ‘मी आजीवन तिच्यावर प्रेम केले; आजीवन’ असे काळीज पिळवटून टाकणारे शब्द त्याने मरतेवेळी काढले. थोरोच्या भावजीवनांतले एलेनचे स्थान एवढे मोलाचे होते.
त्यानंतर वर्षभराचा तणावग्रस्त काळ गेला. एलेनचे प्रकरण आता कायमचे निकाली लागल्यासारखे वाटत होते. तशातच जॉनला एके सकाळी दाढी करताना बोटाला कापण्याचे निमित्त झाले. जखम मामुली होती. जॉनने त्याकडे दुर्लक्ष केले. दोन दिवसांनी जॉनला संपूर्ण शरीरभर वेदना जाणवू लागल्या. जखमेभोवती काळेनिळे व्रण दिसू लागले. जॉनने डॉक्टरांना दाखविले मात्र काय झाले आहे हे समजण्याआधीच जॉनची प्राणज्योत मावळली. जॉनला धनुर्वाताची लागण झाली होती. जॉनचे वय तेव्हा अवघे २६ वर्षांचे होते. जॉन शेवटच्या घटका मोजीत असताना हेन्री त्याच्यासोबत होता. शेवटपर्यंत जॉनची वाचा शाबूत होती, मात्र त्या अखेरच्या घटकांत जॉन आणि हेन्री यांच्यात काय संवाद झाला यावर थोरोने अखेरपर्यंत मौन पाळले.
जॉनच्या मृत्यूने थोरो कोलमडून पडला. जॉन त्याचा केवळ मोठा भाऊ नव्हता तर त्याच्या आत्म्याचा अंश होता, त्याच्या आत्म्याचा तो उत्तम असा अंश होता असे थोरो म्हणे. जॉनच्या मृत्यूचे दु:ख डोंगराएव्हढे होते. त्यात आणखी एक गोष्ट थोरोचा जीव कुरतडत होती. जॉनच्या अखेरच्या काळात तो त्याच्या प्रेमातला प्रतिस्पर्धी झाला होता.
जॉनच्या मृत्यूचे दु:ख थोरो कधीच विसरू शकला नाही. त्याच्या जीवनात एक मोठीच पोकळी निर्माण झाली. हेन्री थोरोच्या जीवनातील हरेक घटनेचा जॉन केवळ साक्षीदारच नव्हता तर तो संवगडी होता. रानावनातील भटकंती असो, नदीवरील भ्रमणे असोत की हेन्रीच्या शाळेतला सहकारी अध्यापक, हेन्री थोरोच्या हरेक महत्त्वपूर्ण घटनेत जॉन त्याचे अभिन्न अंग होता. जॉनच्या मृत्यूनंतर हेन्रीने इमर्सनच्या संगतीत आपले दु:ख विसरण्याचा प्रयास केला मात्र त्याच काळात इमर्सनच्या लहानग्या मुलाचा मृत्यू झाला. धीरगंभीर इमर्सनही या आघाताने कोलमडला. थोरो आणि इमर्सन दोघे एकमेकांच्या संगतीत आपले दु:ख सावरू पाहत होते. इमर्सनच्या होऊ घातलेल्या व्याख्यानांवर दोघे चर्चा करीत. त्यांनी सुरू केलेल्या साहित्यिक मासिकाच्या पुढील अंकावर चर्चा करीत. कुठला नवा कवी काय लिहितो आहे यावर तासन्तास मंथन होई. मात्र या साऱ्याखाली ज्वालीमुखीसारख्या खदखदत असलेल्या दु:खाची जाणीव दोघांनाही होती. थोरो अधिकाधिक अबोल आणि गंभीर होऊ लागला. त्याची भटकंती जरी अजून चालू होती तरी निराळेच बेत त्याच्या डोक्यात शिजू लागले होते. त्याची एक जुनीच इच्छा पुन्हा जोमाने मूळ धरू लागली. थोरोला वॉल्डनचे तळे आणि त्याला वेढलेले अरण्य खुणाऊ लागले होते. आणि त्याला रोखून धरेल असे काहीही सध्या काँकॉर्डमध्ये दिसत नव्हते. एलेनचा दुरावा आणि जॉनच्या मृत्यूने थोरोच्या सुप्त इच्छेला गती मिळाली. थोरो गांभीर्याने त्यावर विचार करू लागला. मार्गारेट फुलरशी त्याने यावर चर्चाही केली. घरच्यांना त्याचा निर्णय सांगितला. त्याची आई आणि बहिण याने काळजीत पडल्या मात्र त्याच्या निर्णयाचा त्यांनी आदर केला. थोरो पूर्णत: अरण्यवासी होणार नाही तर किमान आठवड्याच्या शेवटी त्यांना भेटायला येईल, असे त्याच्याकडून वचन घेतले. थोरोने प्रस्थानाचा दिवस ठरविला, १८ मार्च १८४५.
वॉल्डनच्या शक्य तेवढ्या जवळ घर बांधण्याचे थोरोने ठरविले. तळ्याच्या दिशेने असलेल्या उतारावर देवदार वृक्षांनी वेढलेले रमणीय स्थळ घरासाठी निवडले. प्रथम देवदाराची काही उंच, टोकदार आणि अजून तारुण्यात असलेली देवदारांची झाडे कापून जागा मोकळी केली. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला त्याने जेम्स कॉलिन्स नावाच्या गृहस्थाचे मोडकळीस आलेले खोपटे ४ डॉलर आणि २५ सेंट देऊन विकत घेतले. त्याचे खिळे काढून ते सुटे केले. आणि गाडीत भरून थोडेथोडे असे तळ्याकाठी आणले. घर बांधायच्या त्या जागेवर सहा आणि सात फूट चौरस असे तळघर बनविले. देवदाराच्या एका आख्या वृक्षाला आधारासाठी उभे पुरले. त्याभोवती फ्रेम उभी केली. आणि काही मित्रांच्या सोबतीने घराची चौकट बसविली. जुलै महिन्याच्या चौथ्या तारखेला त्याने तिथे राहायला सुरवात केली. पण राहायला येण्यापूर्वी धुराड्याच्या चिमणीचा पाया एका कडेला घातला. त्यासाठी दोन गाड्या भरून होतील इतके दगड डोंगराजवळच्या तळ्यावरून स्वत:च्या हातांनी वाहून आणले. हिवाळा सुरू होईतो धुराडे पुरे झाले. वर्षाच्या कोठल्याही हंगामात राहता येईल असे त्याचे घर आता सज्ज झाले.
घर बांधण्यासाठी त्याला साधारण २८ डॉलर इतका खर्च आला. थोरोने वॉल्डनमध्ये लिहिले, “केंब्रिजच्या कॉलेजात विद्यार्थ्याच्या खोलीचे भाडेच नुसते ३० डॉलर इतके आहे”. म्हणजे विद्यार्थ्यांच्या खोलीचे वर्षभराचे जेवढे भाडे होते त्याहून कमी पैशात थोरोने घर उभे केले. महत्त्वाचे म्हणजे, आपले घर स्वत:च्या हातांनी बांधण्याचे स्वप्न त्याने सत्यात उतरविले. त्याविषयी तो म्हणतो, “पक्षी आपले घरटे आपण स्वत:च बांधतो, त्यांत जे औचित्य आहे, तेच औचित्य माणसाने स्वत:चे घर स्वत:च्या हातांनी बांधण्यात आहे. जर माणसे स्वत:ची घरे स्वत:च्या हातांनी बांधीत आली असती, आणि स्वत:चे व स्वत:च्या कुटुंबाचे अन्न स्वत:च्या हातांनीच प्रामाणिकपणे तयार करून, सरळपणे पुरवीत राहिली असती, तर कवित्वाची शक्ति विश्व व्यापून उरली नसती काय?”[३]
घराचे काम पूर्ण झाल्यानंतर थोरोने शेतीच्या कामांकडे लक्ष द्यायला सुरवात केली. प्रथम त्याने काही अवजारे आणली, नांगरणीसाठी बैल आणले, बैल हाकण्यासाठी एक मुलगा कामाला बोलाविला आणि त्याच्यासोबतीने एकूण अडीच एकर शेती नांगरटीखाली आणली. त्या हलक्या वाळूमिश्रीत जमिनीत त्याने शेंगांची शेती केली. त्याबरोबर हंगामानुसार बटाटा, वाटाणे, पिवळा मका, गोड मका पिकविला. कंद लावले. आणि शेताभोवती तारांचे कुंपण घातले.
या साऱ्यासाठी त्याला १४ डॉलर खर्च आला. पिक आल्यानंतर थोरोने पुन्हा ताळा केला तेव्हा त्याला एकूण २३ डॉलर ४४ सेंट इतकी प्राप्ती झाल्याचे दिसले. जमाखर्च जाता ८ डॉलर ७१ सेंटची शिल्लक उरली. त्याच्या सालभराच्या राहण्या-खाण्याचा, कपडा-लत्त्यांचा खर्चही नेमका तेवढाच होता. पण –‘माझ्या आजूबाजूचे शेतकरी कमवतात त्याहून अधिक नफा मी कमी श्रमात मिळविला’- असे थोरोने म्हटले. अधिक धनाची तर त्याला आवश्यकताही नव्हती. ‘आत्म्याची एकही गरज पुरी करण्यास धनाची आवश्यकता नाही’, या त्याच्या धारणेला हे सारे साजेसेच होतें.
थोरोने एकूण दोन वर्षे, दोन महिने व दोन दिवस वॉल्डनकाठी काढले. त्या दोन वर्षांत थोरोने काय केले याचा वृत्तांत थोरोने ‘वॉल्डन’ या ग्रंथात दिला आहे. मुख्य म्हणजे थोरोने आपल्या स्वप्नांना अनुसरीत, आत्मविश्वास बाळगून, स्वत: कल्पिलेले जीवन जगण्याची तडफ दाखविली. स्वत:च्या हातांनी आपले घर बांधले, स्वत: शेती केली, स्वत:च्या हातांनी अन्न शिजवून खाल्ले, निसर्गाचा पाईक बनून जीवन कंठले. मात्र थोरोने त्याचे वॉल्डनकाठचे जीवन केवळ एवढ्या गोष्टींत मर्यादित केले नाही. त्याला अतिप्रिय असा एकांत त्याने आपलासा केला, त्या एकांताला सर्वात जवळचा सोबती माणले, त्याला ज्याची आस होती असे मुक्त स्वातंत्र्य भरभरून अनुभवले, भूक लागली तेव्हा रानटी फळे वेचून खाल्ली, तहानेसाठी घरात भांडे ठेवले नाही, वॉल्डनच्या तळ्यावर जाऊन तरतरी आणणारे पाणी पिले, प्रभातीच्या वेळी रानांत, कुरणांवर, डोंगरावर पायी भ्रमंती केली, घरामागच्या दाट झाडीत बसून होमरच्या महाकाव्यांची पारायणे केली, दुपारी पोहत पोहत तळे पार केले, उन्हे कलती होऊ लागली तेव्हा मका उकडून खाल्ला, आणि रात्री आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत आपल्या प्रयोगाचे मूल्यमापन केले, कधी जनसंगत करावी म्हणून गावांत फिरावयास गेला तर कधी घरी आलेल्या अभ्यागताचे मन:पूर्वक स्वागत केले, बदलत्या ऋतूंसोबत बदलणाऱ्या निसर्गाच्या रूपाचे निरीक्षण केले, ते नोंदवून ठेवले, रानटी जनावरांचा माग घेतला, कुठलाही मागमूस मागे न ठेवता आकाशात विहारणाऱ्या पक्ष्यांचा हेवा केला, गावावर संकट आले की पूर्वीची माणसे असतील तेथून अंगावरच्या कपड्यानिशी गांव सोडून दुसरीकडे जात, ही माणसे आपल्या भवतालाप्रती जेवढी आसक्त असत, तेवढीच आसक्ती त्याने आपल्या भवतालाप्रती ठेवली, आणि प्रचंड मनन केले. त्या मननातूनच ‘वॉल्डन’ सारखा नितांतसुंदर ग्रंथ लिहिला. शेकडो वेळा तुम्ही न थकता वाचू शकाल आणि तरीही प्रत्येक नव्या वाचनात तुम्हाला अपरिचित असे नवे काही देऊन जाईल असा आधुनिक ग्रंथ आधुनिक मानवासाठी निर्माण केला. आजच्या धकाधकीच्या, उद्योग हेच सर्वस्व मानणाऱ्या आणि जगण्याचे मुख्य प्रयोजनच हरवून बसलेल्या मानवासाठी याहून योग्य दुसरा ग्रंथ नाही.
………………
अवतरणे [१], [२], [३], ‘वॉल्डनकाठी विचारविहार’मधून साभार.
संदर्भ:
- Henry David Thoreau: A life – Laura Dassow Walls
- The Journal 1837-1861 – Henry David Thoreau
- वॉल्डनकाठी विचारविहार – हेन्री डेव्हिड थोरो, अनु. दुर्गा भागवत.
- वॉल्डन आणि हेन्री डेव्हिड थोरो यांचे संक्षिप्त चरित्र – जयंत कुलकर्णी
- Familiar Letters – Henry David Thoreau
- कॉंकॉर्डचा क्रांतिकारक – ऑगस्ट डेर्लेथ, अनु. दुर्गा भागवत
COMMENTS