मुसलमान परके कसे?

मुसलमान परके कसे?

हिंदू-मुस्लिम संवाद - कुठलीतरी एक ऐतिहासिक लढाई झाली. ती लढाई भारतीय हरले. या लढाईनंतर लाखोंच्या संख्येने मुसलमान भारतात पसरले. त्यांनी बळजबरीने इथल्या लोकांना बाटवले आणि मुसलमान केले. म्हणून मुसलमान परके. अशी वस्तुस्थिती नाही. निदान इतिहासाची साधने असा हवाला देणार नाहीत.

लुंगी-टोपी घालून दगडफेक करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला अटक
शंकराच्या पिंडीवर बसलेला विंचू
राजस्थान पेचप्रसंगः पक्षांतरबंदी कायद्यातील धूसर रेषा

या देशात मुसलमान बाहेरून आले. त्यांनी इथे लुटालूट, जाळपोळ आणि नासधूस केली. मुसलमान स्वभावतःच क्रूर, कपटी आणि खुनशी. ते इथल्या लोकांना जबरदस्तीने, बळजबरीने मुसलमान करीत असत. आमच्या आयाबहिणींवर बलात्कार करीत असत. आमच्या बायका पळवून नेत असत. मंदिरे आणि धर्मस्थळे उध्वस्त करीत असत. अशी वर्णने लहानपणापासून ऐकली, वाचली होती. औरंगजेब तर या वर्णनातला दुष्टपणाचा मुकुटमणी! या आणि अशा वर्णनातला रीती भूतकाळ जसजसे वय वाढू लागले तसा खटकू लागला. औरंगाबादमध्ये प्रत्यक्ष मुसलमानांमध्ये वावरल्यावर तर या वर्णनांमधला फोलपणा लक्षात आला.

मुसलमान परके हे सातत्याने आपण ऐकत असतो. परका किंवा परके या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे, जे आपले नाही ते. किंवा जे आपल्या स्वतःहून वेगळे आहे ते. यासाठी इंग्रजी शब्द Foreign असा आहे. ज्याचा बोलभाषेतला अर्थ आहे, परदेशातला किंवा परदेशीय.

भारत या देशाचा विचार करता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, जागतिक संपर्क क्रांती झाल्यावर मागील शंभर वर्षांत आज ज्या अर्थाने आपण देश म्हणतो तसा आपला देश कधीच एकजिनसी देश नव्हता. भौगोलिक अनेक भेद होते. अफगाणिस्तानातल्या डोंगर रांगा आणि पर्वतीय प्रदेशाने भारत पश्चिम आशियापासून कायम वेगळा राहिला. हिमालयाच्या पश्चिम रांगांमुळे भारताची मुख्य भूमी कायम वेगळी राहिली. युरोपचा भारताशी असलेला व्यापार हा या भौगोलिक कारणांमुळे समुद्रमार्गे मुख्यत्वे होत असे.

भारतात उपलब्ध असणारा मोसमी पाऊस, बाराही महिने वाहणाऱ्या पश्चिम आणि पूर्ववाहिनी नद्या आणि भारतातली सुपीक आणि उपजाऊ जमीन यामुळे पश्चिम आणि मध्य आशियातून माणसांनी सातत्याने भारतात येऊन वसाहती करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. या भागातील अशा विशिष्ट भौगोलिक कारणांमुळे तर आपण आपल्या भारतीय भूभागाची ओळख भारतीय उपखंड अशी भूगोलात करून घेतो. भारतीय उपखंडातल्या जमिनींवर नदीच्या संगतीने वसाहती करण्याचा प्रयत्न पश्चिम आणि मध्य आशियातल्या लोकांनी ठाऊक असलेल्या इतिहासात सातत्याने केलेला आढळतो.

आजचा इराक आणि तुर्कस्तानपासून अफगाणिस्तान आणि मध्य आशियातले आजचे तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान आणि आजचा पाकिस्तान या प्रदेशांमधून माणसांची ये-जा, स्थलांतर हे ऐतिहासिक काळापासून सुरू आहे. नवीन वसाहती भारतात करण्यासाठीचे प्रयत्न हे संपूर्ण इतिहासात आहेत. भारतातील पंजाबच्या पूर्वेकडे भारतीय इतिहासात ज्याला आर्यावर्त म्हटले जाते तो गंगा, यमुना आणि इतर पूर्ववाहिनी नद्यांचा सुपीक प्रदेश सुरू होतो. पश्चिमेकडून भारताच्या या प्रदेशापर्यंत दोन तऱ्हेचे लोक फक्त मोठ्या संख्येने पोहोचू शकले. आर्य आणि  मुसलमान. फक्त आक्रमणांचा किंवा लढायांचा इतिहास जर तपासला तर पश्चिमेकडून निघून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत एक दोन पिढ्यांच्या कालावधीत कुणीही पोहचले नाही. इतिहासात तरी अशी उदाहरणे नाहीत इतका हा प्रदेश विस्तीर्ण आहे.

प्राचीन इतिहासात एखादा प्रदेश जिंकून तिथे निर्विवाद आणि निर्धोक वसाहत निर्माण करण्यातच पन्नास ते शंभर वर्षे म्हणजे चार पाच पिढ्यांचा अवधी लागत असे.

खैबर आणि बोलन या अफगाणिस्तानतल्या दुर्गम खिंडी ओलांडून भारतावर पहिले मुसलमानी आक्रमण हे मुहम्मद बिन कासीम याने इ. स. ६७३ मध्ये म्हणजे सातव्या शतकात केले होते. हा आजच्या सिंध प्रांतापर्यंत पोहोचला होता. नंतरची पाचशे वर्षे मुसलमान सिंधू नदी ओलांडून पूर्वेला आणि सिंधू नदीच्या दक्षिणेला येत राहिले. या आक्रमकांपैकी काही जणांचा भारतातल्या काही प्रदेशावर काही काळ संपूर्ण ताबा असे. तर इराक, इराण आणि अफगाणिस्तान या मूळ प्रदेशांमध्ये राजकीय उलाढाली झाल्या की यांनी ताबा मिळवलेल्या प्रदेशातील यांचे सरदार किंवा एतद्देशीय लोक परत आपले राजकीय वजन स्थापन करीत असत.

भारतातली मंदिरे आणि धार्मिक संस्थाने लुटून आणि भारतावर सातत्याने स्वाऱ्या करून इथली लूट आपल्या देशात घेऊन जाण्यासाठी इतिहासात बदनाम झालेला मुहम्मद गझनवी हा इ. स. १००० नंतरचा. इ. स. ६७३ पासून गझनवीपर्यंत सुमारे साडेतीनशे वर्षे उलटून गेली होती. या साडेतीनशे वर्षांत इराकपासून भारतातील सिंधपर्यंत पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे माणसे सातत्याने येत जात होती. याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत.

अकरावे आणि बारावे शतक हे इराकमधील अरबांच्या परमोच्च उत्कर्षाचे आणि ऱ्हासाचे आहे. बगदाद येथील अरब साम्राज्य मंगोलांनी अगदी थोड्या वेळात अक्षरशः नाहीसे केले. बगदाद हे तत्कालीन जगातले सर्वात प्रगत शहर आणि कला आणि संस्कृतीचे माहेरघर मंगोलांनी बेचिराख केले. असे म्हणतात की, टैग्रिस नदीतून सुमारे तीन आठवडे काळे पाणी वाहात होते. माणसांचे रक्त, कुजलेली प्रेते आणि बगदादच्या ग्रंथालयांमधल्या पुस्तकांची राख यामुळे टैग्रिसचे पाणी तपकिरी काळे झाले होते. याच सुमारास चेंगिझ खानाच्या फौजा भारताच्या सरहद्दीपर्यंत येऊन पंजाबातला कडक उन्हाळा सहन न झाल्याने परत गेल्या. हे आपण भारतीयांचे नशीब. कारण जगाच्या इतिहासातील सर्वात क्रूर कत्तली चेंगिझखानाने केलेल्या आहेत. अगदी दुसऱ्या महायुद्धाहूनही जास्त मानवी बळी चेंगिझ खानाच्या लढायांमुळे गेलेले आहेत.

भारताची पुराणकाळापासून असलेली राजधानी दिल्ली पहिल्या तीन चारशे वर्षांत कुणाही मुसलमानाला जिंकता आली नाही. भारतीय इतिहासात ज्यांचे साम्राज्य सुप्रसिद्ध आहे ते मुघलांचे. दिल्ली आणि बंगालच्या उपसागरापर्यंत सर्वत्र पोहोचलेले साम्राज्य मुघलांचे. हे मुघलही पूर्ण मंगोल नव्हेत. चेंगिझ आणि त्याचे वंशज तुर्कस्तान, इराक आणि मध्य आशियात प्रस्थापित झाल्यावर तुर्की आणि मंगोल यांचे जे मिश्रण झाले ते म्हणजे सुरूवातीचे मुघल.

पहिला मुघल राजा म्हणजे बाबर. हा सुप्रसिद्ध तैमूरलंगाचा थेट वंशज होता. याचा बाप तैमूरलंगाचा खापरपणतू. बाबराचे मूळ आजच्या उझबेकिस्तानात होते. याने पानिपतच्या पहिल्या युद्धात इ. स. १५२६ मध्ये इब्राहिम लोदी या सुलतानाचा पराभव केला आणि भारतात पहिली मुघल राजवट स्थापन केली. दिल्लीतली पहिली सत्ता मामलुकांची होती. (इ. स.१२०६-१२९०) मुघलांच्या आधीची साडेतीनशे वर्षे दिल्लीमध्ये खिलजी, तुघलक आणि लोदी या सल्तनती राज्य करीत होत्या.

भारतात मुघल सत्ता यायच्या आधी एकूण आठशे वर्षे मुसलमान पश्चिम आणि मध्य आशियातून येत राहिले. यातले फारच थोडे मुसलमान प्रत्यक्षात अरबस्तानातले होते. काळाच्या पटावर आठशे वर्षे हा लहान काळ नव्हे. महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर महाराजांच्या काळालाही अजून आठशे वर्षे पूर्ण व्हायची आहेत.

कुठलीतरी एक ऐतिहासिक लढाई झाली. ती लढाई भारतीय हरले. या लढाईनंतर लाखोंच्या संख्येने मुसलमान भारतात पसरले. त्यांनी बळजबरीने इथल्या लोकांना बाटवले आणि मुसलमान केले. म्हणून मुसलमान परके. अशी वस्तुस्थिती नाही. निदान इतिहासाची साधने असा हवाला देणार नाहीत.

आधुनिक वंशशास्त्र आणि इथल्या ऐतिहासिक लढायांचा आढावा मुसलमान या देशात परके नाहीत अशीच साक्ष देतात. मुसलमान परके या समजातील परकेपणाचे इतरही पैलू आपण बघणार आहोत.

राजन साने, हिंदू-मुस्लिम संबंधांचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0