‘टाइम स्टार्ट’ आणि ‘टाइम- अप’ची शिट्टी मारणारा रिंगमास्टर कोण होता ? कुठे बसून तो हे आदेश देत होता, हे या देशातल्या नागरिकांना कधीच कळणार नाही.
दिल्लीतल्या जातीय दंगलीच्या जखमा हिंदू-मुस्लिम या दोन्ही समाजात भळाभळा वाहत आहेत. दंगलीचा ‘टाइम अप’ होऊन पुरते दोन दिवसही उलटले नाही, तोच दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनात ‘देश के गद्दारों को, गोली मारों सालों को’च्या घोषणा दणाणल्या. गेली, दोन महिने चिथावणीखोर वक्तव्ये करणारा कपिल मिश्रा हा भाजपचा आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला नेता, शांती मोर्चामध्ये सामील झालेला दिल्लीने पाहिला. दिल्ली दंगलीत ज्यांचा चेहरा देशाला दिसला नाही, ते पोलीस प्रमुख कुणाच्याही नकळत पदावरून निवृत्त झाले. ‘कॅरिझ्मॅटिक’, ‘दी ग्रेटेस्ट ओरेटर ऑफ दी सेंच्युरी’, ‘वर्ल्ड लीडर’ अशा विशेषणांनी गौरवल्या गेलेल्या पंतप्रधान मोदींनी दंगलग्रस्तांना दिलासा देण्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालांवर सोपवली. दंगलीच्या काळात अदृश्य रुपात कार्यरत असलेले गृहमंत्री अमित शहा दंगलग्रस्त भागांना भेटी न देता वा माध्यमांसमोर न येता थेट ईशान्येकडेच्या राज्यात अवतीर्ण झाले. दिल्लीची दंगल विरोधकांमुळे, विशेषतः काँग्रेसने घडवून आणली, असा आरोप करत मी पुन्हा मैदानात उतरलोय, असा संदेश त्यांनी देशाला दिला. रविवारी सीएएच्या समर्थनार्थ शहा कोलकात्यात ‘अभिनंदन’ रॅलीस उपस्थित राहणार आहेत. दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या रॅलीचा अर्थ काय, हे पुरेसे स्पष्ट आहे.
‘मोदी के सन्मान में देशभक्त मैदान में’ हा शनिवारी दिल्लीत झालेल्या शांतता मोर्चातला नारा आहे. संशयित कपिल मिश्रा पोलिसांच्या संरक्षणात शांतीचा संदेश देत आहे आणि मोदींच्या नावाने चाललेल्या घोषणाबाजीबद्दल भाजप-संघ आणि मोदी यांचे काहीही म्हणणे नाही. मोर्चाला उत्तर मोर्चाने ही कार्यपद्धती सत्ताधाऱ्यांनी अवलंबली आहे. सरकारी धोरणांविरोधात विरोधकांनी धरणे-आंदोलन केले की, समर्थनार्थ आपली फौज उतरवायची हे धोकादायक चित्र आता देश अनुभवू लागला आहे. त्यातून संघर्षाच्या ठिणग्या उडणार. एकदा तसे घडले की, दंगलींना रान मोकळे, अशी ही साधीसरळ योजना आहे.
गेल्या आठवड्यात एकीकडे दिल्ली जळत होती, जगभरचा मीडिया ते टिपत होता, पण जणू या य:कश्चित भौतिक जगापासून अलिप्त होण्याची अलौकिक सिद्धीप्राप्त असल्यागत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलायना या विद्ध्वंसापासून अलिप्त होते. मेलायना ट्रम्प तर इतक्या भावविभोर होऊन गेलेल्या दिसल्या, त्यांनी मायदेशात परत गेल्यानंतर ‘थँक यू नरेंद्र मोदी फॉर वेलकमिंग Me and POTUS टु युवर ब्युटिफुल कंट्री. वुई हॅव डिलायटेड टु रिसिव्ह सच ए वॉर्म वेलकम फ्रॉम यू अँड पीपल ऑफ इंडिया…’असे हृदय ट्विट करून यजमानांनाही बहुदा भावूक करून टाकले. हायकोर्टात जसे दिल्ली पोलीस म्हणाले, आम्ही कपिल मिश्रा, परवेश वर्मा, अनुराग ठाकूर यांची चिथावणीखोर भाषणे बघितलीच नाहीत, तसे ट्रम्पही पत्रकार परिषदेत सांगून मोकळे झाले, ‘माझ्या कानावर आलेय काहीतरी, पण त्याबद्दल मला फारसे काही ठावूक नाही.’
अर्थात, ट्रम्प हे बोलून चालून व्यापारी गृहस्थ. पाहुणे म्हणून आले. यजमानाचे घर जळत असले तरीही, आपण कशाला नाक खुपसा असा व्यवहारी विचार करून गप्प बसले. त्यांना मतलब धंद्याशी, माझ्याकडून खरेदी करा, मी म्हणतो, तशा मला सवलती द्या, बाकीचे तुमचे तुम्ही बघून घ्या, असा रोखठोक पवित्रा घेऊन निघूनही गेले. जाताना ‘धार्मिक नि करड्या शिस्ती’च्या मोदींचे कौतुक करायला नाही विसरले.
पाहुणे ट्रम्प आपला मतलब साधून निघून गेले, तसे इथल्या मोदीप्रेमी मीडियाने झुंडीने आगीत तेल ओतायला सुरुवात केली. दंगलग्रस्तांचा आक्रोश टिपेला पोहोचलेला असताना, झुंडीनेच हा मीडिया ‘आप’चा संशयित नगरसेवक ताहीर हुसैनच्या ‘टेररिझम फॅक्टरी’त दाखल झाला. सगळ्या कोनांतून ताहीरच्या घराच्या गच्चीत, आवारात सापडलेले पेट्रोल बॉम्ब, लाठ्याकाठ्या, बंदुका, दगड, गिलोरी असे बरेच टाइट क्लोज-अपमध्ये दाखवत राहिला. पण, याच टेररिझमची फॅक्टरी असलेल्या इमारतीत अगदी गेल्या वर्षीपर्यंत कपिल मिश्राचे जनसंपर्क कार्यालय होते, हे या मीडियाने जनतेला सांगितले नाही. या मीडियाला दंगलीत सारख्याच प्रमाणात होरपळून निघालेल्या अल्पसंख्य मुस्लिम समुदायाकडे जाण्यास फारसा वेळही मिळाला नाही. ताहीरच्या गुंडांनी सगळ्या शस्त्रात्रांचा यथेच्छ वापर केला, पण ‘जय श्रीराम’चे नारे देत रस्त्यांवर उतरलेल्या ‘देशभक्तां’नी पेट्रोल बॉम्ब, लाठ्या, बंदुका यापैकी कशाचाही वापर केला नाही. कुणा तरी सिद्ध पुरुषाने मंत्र उच्चारले नि त्यात ‘देशद्रोही’ मुस्लिमांची घरे-दुकाने वस्तीतला दर्गाह असे सगळे खाक होऊन गेले.
दिल्ली पोलीस आणि मुख्यमंत्री केजरीवालांनी तर कहरच केला.. यानंतर निदान न्यायालय तरी धाडसाने पुढे येऊन सत्तेच्या राजकारणात शीर्षस्थ स्थान असलेल्या गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे आदेश देईल, अशी अंधुकशी आशा तेवत असताना, पोलीस आणि सत्ताधाऱ्यांना सामील होत या संस्थेनेही सामान्य भारतीयांचा विश्वासघात केला. ‘चिथावणीखोर नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी सध्या पोषक वातावरण नाही’, असे गर्भीत धमकीवजा युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान केला आणि न्यायालयाने एक महिन्यानंतरची तारीख देऊन, तपास यंत्रणांना हवे तसे पुरावे गोळा करण्यासाठी आवश्यक तो वेळ मिळवून दिला.
ज्येष्ठ पत्रकार-संपादक शेखर गुप्तांनी १९४७ पासून आजवरच्या दंगलींचे विश्लेषण करत, दिल्लीच्या दंगलीला सीएए नावाचा महाराक्षस बाहेर काढणारे सर्वोच्च न्यायालय पर्यायाने तसा निर्णय देणारे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई जबाबदार असल्याकडे लक्ष वेधून झालेल्या विश्वासघाताची पातळी नेमकी कुठवर गेली आहे, हे आपल्या लेखाद्वारे ध्यानात आणून दिले. क्रिस्तोफर जेफरलॉ नावाच्या भाष्यकाराने दिल्ली दंगल ही अल्पसंख्य समुदायाला धडा शिकवण्यासाठीची सूत्रबद्ध कवायत होती असे म्हटले. परंतु जेफरलॉ किंवा गुप्तांनी कशाला सांगायला हवेय, ज्यांची अजूनही बुद्धी आणि विवेक शाबूत आहे, ज्याच्यामध्ये अजूनही सहवेदना आणि संवेदनशीलता शिल्लक आहे, अशा देशातल्या सगळ्या वर्गातल्यांना या सूत्रबद्ध कवायतीचा पुरता अंदाज आलेला आहे. वेळ येताच कुणीतरी ‘अँड युवर टाइम स्टार्ट नाऊ..’ असे म्हणत ही दंगलीची कवायत सुरू केली आणि ‘टाइम-अप’ म्हणताच, सारे आपापल्या दिशेला पांगले. दंगल थांबली. रस्त्यावर हिंसाचार माजवणारे दोन्ही धर्मातले दंगलखोर ‘विथ इन नो टाइम’ अंतर्धान पावले. तो ‘टाइम स्टार्ट’ आणि ‘टाइम- अप’ची शिट्टी मारणारा रिंगमास्टर कोण होता ? कुठे बसून तो हे आदेश देत होता, हे या देशातल्या नागरिकांना कधीच कळणार नाही. केवळ नाईलाजाने हतबल-हताश दंगलपीडित जनता जगण्याच्या संघर्षात स्वतःला गुरफटून घेईल आणि आपापले राजकारण रेटण्यासाठी ‘हार्डकोअर हिंदुत्व’, ‘सॉफ्ट हिंदुत्व’, ‘सेमी-सॉफ्ट हिंदुत्व’ असे खेळ यापुढेही असेच सुरू राहतील. या खेळात सोयीचे असेल तेव्हा कन्हैया कुमारसारखा सत्तेचे लक्ष्य असलेला उगवता नेता विरोधकांचा डार्लिंग होऊन जाईल, आणि सोयीचे नसेल तेव्हा सत्ताधारी-विरोधक एकत्र येऊन त्याचाच बळी देत राहतील. त्यातूनच पेटत गेलेला हिंसाचाराचा वणवा निवडणूकरुपी ‘लोकशाही उत्सवा’च्या आगेमागे यापुढच्या काळातही निरपराध नागरिकांचे बळी घेत राहतील. तुम्ही कपिल मिश्रा असाल, तर तुम्हाला संरक्षण कवच लाभेल, तुम्ही ताहीर हुसैन असाल तर तुमच्यावर झुंडी सोडल्या जातील. तेव्हाही या कानठळ्या बसवणाऱ्या उत्सवाच्या दणदणाटात वणव्यात सापडलेल्या सामान्य माणसांचे आक्रोश कुठच्या कुठे विरून गेलेले असतील.
शेखर देशमुख, पत्रकार-लेखक आणि ग्रंथ संपादक.
COMMENTS