हिमालयातील भक्षकांना, मुख्यत्त्वे लांडग्यांना आणि काही प्रमाणात हिमबिबटे, लिंक्स आणि तिबेटी वाळवंटी कोल्ह्यांना कळपातील शेळ्या आणि मेंढ्या हे सोपे भक्ष्य वाटतात. यामुळे त्यांच्याकडून अधूनमधून एखाद्या जनावरावर हल्ला होतो. मात्र आपल्या जनावरांची अशी शिकार मेंढपाळांच्या पचनी पडत नव्हती. परिणामतः त्यांनी लांडग्यांना धडा शिकवण्यासाठी एक शक्कल लढवली, जिचे नाव होते शंगडोंग, अर्थात लांडग्याचा सापळा.
पर्वतराजीत वसलेल्या क्यामार व्हॅलीच्या एका बाजूला आम्ही आमची जीप लावली आणि झऱ्याजवळील एका निसरड्या अरुंद खडकावरून चालायला लागलो. आमच्या उजव्या हाताला साधारण वीसेक फूट खोल दरी तर डाव्या हाताला उंचच उंच पर्वत होते. अशा परिस्थितीतही कर्मा ले (ले हा लडाखी भाषेतील आदरार्थी शब्द आहे) एखाद्या बागेत चालल्याप्रमाणे चालत होता तर मी जितकी जास्त काळजी घेत होतो तितका जास्त घाबरत होतो. शेवटी कसेतरी मी ते अंतर पार केले आणि आम्ही एका हलक्या उताराच्या ठिकाणी आलो. “पूर्वी हा संपूर्ण रस्ता जीपने पार करता येत असे.” कर्मा ले सांगत होता. परंतु नुकताच या ओढ्याने हा रस्ता कापल्याने आता फक्त ही पायवाट तेवढी शिल्लक राहिली आहे.
ग्या गावातील कर्मा लेची रुम्त्से वस्ती आम्ही सकाळीच सोडली होती. समुद्र सपाटीपासून ४१५० मी. उंचीवरील, सिंधू नदीच्या एका उपनदीजवळून जाणारा लेह-मनाली हायवे आम्ही घेतला होता. आम्ही लेहकडून मनालीच्या दिशेने चाललो होतो. आमच्या डाव्या बाजूला एका खोल दरीतून वाहणाऱ्या त्या नदीच्या प्रवाहाविरुद्ध आमची गाडी चालली होती. लवकरच दरी संपली आणि नदी जवळपास आमच्या समांतर चकाकत वाहतांना दिसू लागली. नदीचे पात्र फारसे विस्तीर्ण नसलेल्या एका ठिकाणावरील पुलावरून आम्ही नदी ओलांडली.
आता आम्ही प्रवाहाच्या दिशेने चाललो होतो. पुढे या नदीला एक फेसाळता ओढा येऊन मिळाला. या संगमापासून आम्ही उजव्या बाजूला वळलो आणि वरच्या दिशेने जाऊ लागलो. आम्ही सॉल्ट रोडवरून जात होतो, या रोडवरून १९८० पर्यंत अतिउंचीवरील त्सो कार तलावातून लेहला मीठ आणले जात असे. गुराखी आपल्या शेळ्या आणि मेंढ्यांवर मिठाच्या गोण्या लादून येत आणि १५-२० दिवसांचे वास्तव्य आणि वस्तूविनिमयानंतर बार्ली लादून नेत असे. आज, हा रस्ता त्सो मोरीरीच्या प्रसिद्ध ट्रेकचा एक हिस्सा आहे.
दरी जशी रुंद होत गेली तसे आम्ही त्या ठिकाणी आलो जेथून आम्हाला ओढा ओलांडायचा होता. आम्ही थांबलो आणि कर्मा लेने पाण्याचा अंदाज घेतला. तो इतक्या काळजीपूर्वक पाण्याचा अंदाज घेत होता की जणू काही एखाद्याचा तळहात पाहून भविष्य वाचत असावा. हिमालयाच्या कुशीतून वितळून आलेल्या हिमाचे द्रवरूप असलेले ते पाणी बर्फासारखे थंड आणि अनमोल होते. त्या ओढ्यातून आमची जीप काढत आम्ही विस्तीर्ण आणि सपाट अशा क्यामार व्हॅलीत – ग्या गावाच्या गायरानात पोहोचलो.
“आपण एका अत्यंत विशेष स्थळाला, एका प्राचीन लांडग्यांच्या सापळ्याला भेट देत आहोत,” कर्मा लेने मला सांगितले. मी विचारात पडलो. या विशाल भूप्रदेशातील लांडग्यांचा सापळा कसा असेल? मला आपण मध्ययुगात असल्यासारखे वाटू लागले.
लडाखसारख्या उंच पठारावरील शीत वाळवंटी प्रदेशात गुरचराई हा उपजीविकेचा मुख्य स्त्रोत होता. १९७० पर्यंत ग्या गावातील १५० पैकी २४ कुटुंबे गुरचराईवर अवलंबून होती. आज तशी १४ कुटुंबे शिल्लक आहेत. त्यापैकी काहींकडे ४०० पर्यंत जनावरे आहेत. ग्यामधील गुरचराई न करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाकडे सुद्धा १०-१५ जनावरे आहेत. गुरचराई करणारे गावातील सर्व जनावरे चरायला घेऊन जातात. हिवाळ्यात गावातील सर्व गुरे क्यामार व्हॅलीतच मुक्कामाला असतात. येथील परिस्थिती अत्यंत बिकट असते – तापमान उणे ३० डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरते. त्याचबरोबर ताशी २५ किमी वेगाने वाराही वाहतो.
या प्रदेशांत भराल (ब्लू शिप), आयबॅक्स, अर्गाली, युरीअल आणि किआंगसारखे काही दुर्मिळ आणि काटक खुरवाले प्राणी तसेच ससा, पाईका आणि मर्मोटसारखे लहान जीवही वास्तव्यास असतात. परंतु हिमालयातील भक्षकांना, मुख्यत्त्वे लांडग्यांना आणि काही प्रमाणात हिमबिबटे, लिंक्स आणि तिबेटी वाळवंटी कोल्ह्यांना कळपातील शेळ्या आणि मेंढ्या हे सोपे भक्ष्य वाटतात. यामुळे त्यांच्याकडून अधूनमधून एखाद्या जनावरावर हल्ला होतो. मात्र आपल्या जनावरांची अशी शिकार मेंढपाळांच्या पचनी पडत नव्हती. परिणामतः त्यांनी लांडग्यांना धडा शिकवण्यासाठी एक शक्कल लढवली, जिचे नाव होते शंगडोंग, अर्थात लांडग्याचा सापळा.
खालच्या झुडुपात पक्षी, पाईका, सशासारखे लहान प्राणी बघत आम्ही जवळपास ४५ मिनिटे चालत होतो. अचानक कर्मा लेने काहीतरी दाखवण्यासाठी अंगुलीनिर्देश केला आणि जोरात “शंगडोंग” म्हणून ओरडला. जवळपास ५० मीटर अंतरावर मला एक दगडांनी बांधलेली भिंत दिसत होती. आम्ही जवळ गेल्यावर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना शंगडोंग हा एक विहिरीसारखा मोठा खड्डा होता. एखाद्या वाडग्यासारख्या आकाराच्या त्या खड्ड्याच्या भिंती साधारण सहा फुट खोल होत्या.
ते बांधकाम खूपच आकर्षक होते. त्यासाठी नक्कीच उच्च दर्जाचे कौशल्य आणि प्रचंड श्रम खर्ची पडले असावेत. त्याचे दगड मोठे, सपाट आणि आयताकृती होते, त्यातील अनेक दगड दोन फूट लांबीचे तर काही त्याहूनही लांब होते. हे शंगडोंग जवळपास ४० फूट रुंद होते. त्यासाठी वापरण्यात आलेले दगड नक्कीच खूप दूरवरून आणण्यात आले असावेत कारण त्या आकाराचे दगड आसपास कुठेच दिसत नव्हते.
एक लहान, तंदुरुस्त मेंढी आमिष म्हणून या शंगडोंगमध्ये ठेवली जात असे. मेंढीचे ओरडणे किंवा तिच्या वासामुळे आयत्या खाद्याच्या आशेने एखादा लांडगा तिच्याकडे आकर्षित होई आणि त्या खड्ड्यात उडी मारे – परंतु काही क्षणातच शंगडोंगच्या आंतरवक्र भिंतींमुळे आपली सुटका अशक्य असल्याचे त्याच्या लक्षात येई आणि तो तेथेच अडकून पडे.
नेचर कन्झर्वेशन फाउंडेशनने (एनसीएफ) नुकताच ‘शंगडोंग टू स्तूप’ हा १३ मिनिटांचा माहितीपट ऑनलाईन प्रसिद्ध केला. या माहितीपटात शंगडोंगचे वर्णन अधिक विस्ताराने करण्यात आले असून त्यात अडकलेल्या एका लांडग्याच्या दुर्दैवी मृत्यूचे चित्रणही त्यात आहे. कर्मा ले एनसीएफ सोबत फिल्ड मॅनेजर म्हणून काम करतो.
आम्ही पाहत असलेले शंगडोंग गेल्या काही काळापासून वापरले गेले नव्हते, त्यात झुडुपे वाढत होती. कर्मा लेला त्याच्या किशोर वयातला एक प्रसंग आठवला. त्या वर्षी त्याच्या कुटुंबाने ग्या गावच्या परिसरातील जमिनीच्या एका तुकड्यावर काहीतरी लागवड केली होती. या शेतासाठी जनावरांचे शेण आणायला कर्मा त्याच्या वडिलांसोबत घोड्यावर बसून क्यामार व्हॅलीत येत असे. एके सकाळी एका शंगडोंगशेजारी आरडाओरडा ऐकून ते त्याच्याजवळ गेले. तेथे गेल्यावर त्यांना त्यात एक मोठा, अंशतः काळ्या पाठीचा सुंदर लांडगा अडकलेला दिसला. मेंढपाळ त्याला दगड मारत होते. कर्मा लेनेही काही दगड गोळा करण्यास मदत केली आणि त्या बिचाऱ्या प्राण्याला मरतांना पाहिले. ही गोष्ट आहे ३५ वर्षांपूर्वीची. आज, कर्मा लेला लडाखच्या अमूल्य वन्यजीवांच्या संवर्धनाचे महत्त्व पूर्णपणे समजले आहे.
लांडग्याला सापळ्यात अडकवणे आणि त्याला ठेचून मारणे हा येथे एक उत्सव मनाला जाई. येथील रहिवासी लांडग्याचे मुंडके छाटून त्याची गावभर मिरवणूक काढी. मेंढपाळ कुटुंबे आळीपाळीने आपल्या प्रत्येक शंभर जनावरांमागे एक तरुण जनावर आमिष म्हणून वापरण्यास देई.
लांडग्यांचे जनावरांवरील हल्ले कमी करण्यासाठी शंगडोंग हा काही एकच उपाय नव्हता. लांडग्यांना हिवाळ्यात पिल्ले होतात. या काळात मेंढपाळ लांडग्यांच्या गुहा शोधून त्यातील त्यांची पिल्ले मारून टाकत आणि यासाठी त्यांना इतर गावकऱ्यांकडून बक्षीस म्हणून जव मिळे. शंगडोंग आता वापरात नसले तरी मेंढपाळ अजूनही पिल्ले मारतात ज्यामुळे हिमालयीन लांडग्याच्या अस्तित्त्वाला धोका आहेच.
समुद्र सपाटीपासून ४,००० मीटर उंचीवरील श्वास रोखणाऱ्या विरळ हवेत जगण्यास सक्षम असलेला आणि एक वेगळी प्रजाती म्हणून घोषित होण्याच्या मार्गावर असलेला हिमालयीन लांडगा हा एक असाधारण प्राणी असून खूपच कमी अभ्यासाला गेला आहे. याचे व्याप्ती क्षेत्र सिक्कीम ते लडाखपर्यंत विस्तारलेले आहे ज्यात तिबेटचा काही भाग, नेपाळ आणि स्पिटी व्हॅलीचाही समावेश होतो. आज नेमके किती हिमालयीन लांडगे जिवंत आहेत याची माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या संवर्धनाकडे हवे तितके लक्ष दिले गेलेले नाही. अजूनही ते दिले गेले नाही तर हे सुंदर प्राणी लवकरच नामशेष होतील अशी रास्त भीती संशोधकांना वाटते.
काळाच्या ओघात, गुरचराईच्या पद्धतीत बदल झाले आहेत, पर्यायी उपजीविका उपलब्ध झाल्या आहेत आणि लडाखच्या विलक्षण वन्यजीवांविषयी आज जास्त जागरुकता निर्माण झाली आहे. कर्मा लेने गेल्या दशकभरापासून एकही लांडगा मारला गेल्याचे ऐकलेले नाही आणि शंगडोंगही आता वापरले जात नाहीत. परंतु अजूनही लांडगा किंवा दुसरा एखादा प्राणी या खड्ड्यात पडून अडकण्याची भीती आहे. उंचावरील त्सो कार तलावाजवळील रोडच्या कडेला असलेल्या शंगडोंगमध्ये मला मेंढी आणि याकचे कातडे तसेच सापळे पडलेले दिसले, या वस्तू भक्षकांना आकर्षित करण्याची शक्यता होती.
एनसीएफचे रिंगझिन दोरजे यांच्या प्रयत्नांनी पूर्व लडाख आणि शाम व्हॅलीत पसरलेल्या अशा ८० सापळ्यांची नोंद करण्यात आली आहे. यातून शंगडोंगचा वापर किती व्यापक प्रमाणावर होत होता हेच दिसून येते. कर्मा लेच्या मते, लडाखमध्ये जवळपास दशकभरापूर्वीपर्यंत शंगडोंग वापरले जात होते आणि तिबेटच्या बाजूला ते अजूनही वापरत असल्याचे दिसून येते. दोरजे आणि त्यांचे सहकारी आता कारगिलसह या विस्तीर्ण प्रदेशातील इतर भागांचाही अभ्यास करण्याचे नियोजन करीत आहेत.
शंगडोंगचे रुपांतर प्रार्थनास्थळात करण्याची कल्पना २०१६ मध्ये आकारास आली. शंगडोंगचे रुपांतर स्तूपात करण्यासाठी एनसीएफने गाव प्रमुख – गोबा, गावातील तरुणांचे गट, महिला मंडळ, मेंढपाळ जमातींचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. २०१८ साली, एनसीएफचे चारुदत्त मिश्रा आणि चुशूलच्या लामायुरू मठाचे धर्मगुरु रंगडोल न्यीमा रीन्पोचे यांच्या चर्चेतून अशाप्रक्रारचे पहिले स्तूप साकारले गेले. ग्या गावातील उत्साही तरुणांच्या गटांनी गावकरी, धर्मगुरू, शासकीय अधिकारी आणि महत्त्वाचे म्हणजे मेंढपाळांमध्ये एकमत घडवून आणले आणि २०१९ साली ग्या हे गाव सुद्धा या प्रयत्नात सामील झाले.
चुशूलच्या रहिवाश्यांनी चार शंगडोंग उघडले आणि एका शंगडोंगचे स्तूपात रुपांतर केले तर लाटो जमातीने शंगडोंगवर मानी अर्थात प्रार्थना कोरलेला दगड बसवला. स्तूपांच्या उभारणीबरोबरच, या प्रदेशातील शेती-पशुपालनाच्या समृद्ध वारश्याचे प्रतिक म्हणून शंगडोंगचे जतन केले जात आहे (एखादा प्राणी त्यात पडलाच तर त्याला निघण्यासाठीचे छिद्र मोकळे ठेवले जाते)
चुशूल स्तूपला रंगडोल न्यीमा रीन्पोचे आणि या प्रदेशातील इतर धर्मगुरूंनीही भेट दिली आहे. या बाबतीत धार्मिक नेत्यांनीही पुढाकार घेतला आहे कारण यामुळे भूतकाळातील चुकीच्या गोष्टींचे प्रायश्चित होईल आणि सहअस्तित्त्वाला चालना मिळेल असा त्यांना विश्वास आहे.
आम्ही जर आणखी काही काळ तेथे थांबलो असतो तर मीही भूतकाळातील एखाद्या लांडग्याप्रमाणे त्या शंगडोंगमध्ये उडी मारली असती. कर्मा ले हिमालयीन लांडग्याप्रमाणेच कुल होता आणि ही भेट माझ्यासाठीही खूप विशेष होती. वातावरण आता ढगाळ आणि थंड होत चालेले होते म्हणून आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. त्या संध्याकाळी कर्मा लेला ग्या गावातील शंगडोंगवरील चर्चेत सहभागी व्हायचे होते.
आम्ही आमच्या जीपजवळ पोहोचेपर्यंत रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती, उंच प्रदेशात नक्कीच हिमवृष्टी होत असावी असं कर्मा ले म्हणाला. लडाखमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीची ही वेळ नव्हती.
मनाली-लेह रोडवरील ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी थांबवले असल्याची भीती कर्मा लेने व्यक्त केली. आम्ही त्याच रस्त्याने परत निघालो परंतु आमची दृष्टी आता बदलली होती. आम्हाला आता आमच्या चहूकडे लांडग्यांचे अस्तित्त्व जाणवत होते. येतांना आम्हाला अनेक ठिकाणी वन्यजीवांच्या विष्ठा आढळल्या. त्या लांडग्यांच्या असाव्यात किंवा हिम बिबट्यांच्या, पण कर्मा ले त्या लांडग्यांच्या असल्याचे म्हणाला. पर्वतांनी वेढलेला हा अतिविस्तीर्ण प्रदेश. त्यात राखाडी ठिपक्यांप्रमाणे शांतपणे फिरणाऱ्या लांडग्यांच्या कळपांचे कल्पनाचित्र आम्ही रंगवत आम्ही चाललो होतो. पक्षी आणि मर्मोट पाहण्यासाठी रस्त्यात एक-दोन ठिकाणी थांबलोही होतो.
शंगडोंगचे स्तूपात रुपांतरण होणे हे वन्यजीवांसाठी तर लाभकारक ठरले पण यामुळे मेंढपाळांचे नुकसान थांबणार नव्हते. यावर कर्मा ले म्हणाला की, मेंढपाळांच्या उपजीविका संरक्षणासाठी इतर उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, तो काम करीत असलेली एनसीएफ ही संस्था सुद्धा विमा योजना, भक्षकरोधी गोठ्यांची रचना आणि चराईमुक्त राखीव प्रदेशांची निर्मिती अशा काही गोष्टींसाठी गावकऱ्यांसोबत काम करीत आहे.
त्या दिवशी संध्याकाळी त्याने मला सांगितले की, शंगडोंगचे स्तूपात रूपांतर करण्यासंबंधी गावकऱ्यांबरोबरची बैठक सकारात्मकरीत्या पार पडली. मी दिल्लीला परत आल्यानंतर काही महिन्यांनी मला व्हॉट्सअपवर काही सुंदर चित्रे आली ज्यात आम्ही ज्या शंगडोंगला भेट दिली होती त्या ठिकाणी उभारण्यात आलेले स्तूप, त्यावर फडफडणारे प्रार्थना ध्वज आणि त्यापुढे पवित्र विधीसाठी राजेशाही पोशाखात उभे असलेले लामा दिसत होते.
एक लडाखी लोककथा आहे ज्यात शंगडोंगमध्ये अडकलेला लांडगा मेंढीला “माझी प्रिय बहिण” म्हणून तिच्याशी मैत्रीचे नाटक करतो आणि आशा करतो की असे केल्याने तरी मेंढपाळ त्याला सोडून देतील. मेंढी आणि लांडगा या दोघांसाठी ही परिस्थिती आनंददायीच ठरली असती. परंतु आता, सापळ्याचे रुपांतर स्तूपात होत असल्यामुळे ही कथा लवकरच केवळ एक जुनी आठवण ठरेल.
पियुष सेखसरिया, हे एक निसर्गप्रेमी आहेत.
अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी
मूळ लेख
COMMENTS