आ लौटके आजा मेरे मीत……

आ लौटके आजा मेरे मीत……

(मुकेश १९२३ - १९७६) - प्रसिद्ध गायक मुकेश यांचा आज ४३ वा स्मृतीदिन. हिंदी चित्रपटसृष्टीतील ३० वर्षांची त्यांची कारकीर्द हे एक वेगळेच पर्व होते. मुकेश आणि अन्य असे हे समीकरण होते.

पियुष गोयल यांचा बॉलीवूड शो फसला
चित्रीकरण परवानगीः एक खिडकी योजना राज्यात लागू
बॉलीवूडमध्ये दिसणारे छोट्या शहरातील नायक नेहमी उच्च-वर्णीयच का असतात?

हिंदी सिनेमा संगीताच्या प्रभावापासून सामान्य तसेच असामान्य कुणीही दूर राहू शकलेले नाही. चित्रपटात फिल्मी गीते लोकप्रिय करण्याचे संपूर्ण श्रेय स्वर्गीय कुंदनलाल सैगल यांना जाते. चाळीसच्या दशकापासून फिल्मी गीते चित्रपटाचा अविभाज्य अंग झाले. प्रत्येक तरुणाचे स्वप्न सैगलसारखे गायक/नायक व्हावे हेच होते. सैगलनंतर चित्रपटसृष्टीत अनेक गायक आलेत. बहुतेक गायकांवर सैगलच्या गायकीचा स्पष्ट प्रभाव होता. याच काळात सिनेसृष्टीत एक नवीन गायक आपले नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करीत होता, त्याचे नांव मुकेशचंद्र माथूर. आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा मुकेश सैगल सारखाच नायक/गायक होण्यास आला होता. मुकेशला सिनेसृष्टीत आणण्याचे संपूर्ण श्रेय त्याकाळचे लोकप्रिय कलाकार मोतीलाल यांना जाते. मोतीलाल मुकेशला पहिला ब्रेक देण्यास कारणीभूत ठरले.

‘पहली नजर'(१९४५) या मोतीलाल अभिनित चित्रपटात मुकेशने पार्श्वगायन सुरू केले. !दिल जलता है तो जलने दे’ हेच ते गीत, जे खूप लोकप्रिय झाले. संगीत निर्देशक अनिल बिस्वास फिल्म संगीतातील दिग्गज. अनिल बिस्वासने अनेक होतकरू कलाकारांना ब्रेक दिला. तलत मेहमूद, सुधा मल्होत्रा, मुकेश इत्यादी. सैगलला सुद्धा प्रश्न पडला की हे गीत त्यांनी केव्हा गायले, एव्हढा मुकेशच्या गायकीवर सैगलचा प्रभाव होता. त्यांनी मुकेशला ऐकण्यासाठी बोलावून घेतले. मुकेशला ऐकल्यावर त्यांची खात्री झाली की चित्रपटसृष्टीला एक उमदा गायक मिळाला म्हणून.
गायक म्हणून ओळख मिळाल्यावर मुकेशचे नायक म्हणून स्थिरावण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ‘निर्दोष’ या चित्रपटात नायक म्हणून काम पण मिळाले. पण हा चित्रपट सपाटून आपटला. पुढे नायक म्हणून त्यांनी कधी काम केले नाही.

१९५५/५६ क्या दरम्यान मुकेश ने ‘अनुराग’ नामक चित्रपटास संगीत दिले. ‘किसे याद रक्खू किसे भुल जाऊं’, ‘पलभरकी ही पहचानमे परदेसी बलमसे’ ही त्यांनीच गायलेली गीते खूप लोकप्रिय झालीत. संगीतकार म्हणून पुढे त्यांनी प्रयत्न केला नाही. “आग’ चित्रपटातील राम गांगुली यांनी संगीतबद्ध केलेले व मुकेश ने गायलेले “जिंदा है इस तरहके गमे जिंदगी नहीं’ हे गीत अतिशय लोकप्रिय झाले. पडद्यावर हे गीत अभिनित केले होते राज कपूरने. येणाऱ्या काळात मुकेश-राज कपूर लोकप्रियतेचे समीकरणच झाले. भविष्यात या जोडगोळीने रसिकांना शेकडो नितांत सुंदर गीते दिलीत. मुकेश राज कपूरचा आवाज म्हणून ओळखला जाऊ लागला. आवारा, अनाडी, आह, फिर सुबह होगी, दुल्हा दुल्हन, संगम, मेरा नाम जोकर, तीसरी कसम सारख्या अनेक चित्रपटात मुकेशने राजकपूरसाठी अप्रतिम गाणी गायली.

नौशादने ‘अंदाज’ साठी मुकेशच्या आवाजातील गाणी दिलीपकुमारला व रफीचा आवाज राजसाठी वापरला. हाच प्रयोग त्याने ‘मेला’ चित्रपटात पण केला. सगळी गीते खूप लोकप्रिय झालीत. एकापेक्षा एक सुंदर गीतांमुळे मुकेशने आपले स्थान गायक म्हणून फिल्म उद्योगात बळकट केले. त्याकाळी रफी, मन्ना डे, हेमंतकुमार, तलत मेहमूद, किशोरकुमार सारखे सुप्रसिद्ध गायक होते. पण प्रत्येकाची गायन शैली एकदम भिन्न असल्याने प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांच्या आवाजाचा वापर करण्यात येत असे. (रफी-दिलीप), (मुकेश-राज), (किशोर-देव) अशा गायक नायकांच्या जोडगोळया झाल्यामुळे गायकांमध्ये जीवघेणी स्पर्धा उरली नाही.

मुकेशने नौशाद, शंकर जयकिशन, सचिन देव बर्मन, रोशन, खय्याम, सलील चौधरी, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल इत्यादी यशस्वी संगीतकारांसोबत भरपूर काम केले. त्याचबरोबर एस.एन. त्रिपाठी, दान सिंग, उषा खन्ना, सोनिक ओमी, सपन जगमोहन यांच्याबरोबर सुद्धा काम केले व हिट गाणी दिलीत. राहुलदेव बर्मन या गुणी संगीतकाराने मुकेशच्या आवाजाचा फारसा वापर केला नाही. ‘इक दिन बिक जाएगा माटीके मोल’, ‘जिस गली में तेरा घर न हो बालमा’ ही गीते लोकप्रिय झालीत. मदन मोहन, जयदेवसारख्या शास्त्रीय बाज असणाऱ्या संगीतकारांनी सुद्धा त्याच्या आवाजाचा वापर अगदीच कमी केला. मुकेशने कारकिर्दीच्या सुरवातीस जगन्नाथ प्रसाद यांच्याकडून संगीताचे धडे घेतले होते. पण ‘मतवाली नार ठुमक ठुमक चली जाय’ सारखा दुर्मिळ अपवाद वगळता मुकेशच्या आवाजात शास्त्रीय संगीतावर आधारीत गीते ऐकावयास मिळाली नाहीत.

मुकेशचा आवाज किंचित अनुनासिक, सरळ सोपा पण ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करणारा होता. त्यात एक नैसर्गिक दर्द असल्याने त्याच्या वाटेला प्रकर्षाने दुःखी गाणी आलीत. याचा अर्थ असा नाही की मुकेशने फक्त दुःखीच गाणी गायली. उडत्या चालीची गाणी ‘ऐ दिले आवारा चल’, ‘ऐ मेरे दिल लहराके चल’, ‘मेरे मनकी गंगा’, ‘सात अजुबे इस दुनियामे’, ‘मेरा जूता है जापानी’ सारखी गाणी सुद्धा गायली. अनेक तरल आणि हळूवार प्रेमगीते त्याच्या खात्यात जमा आहेत. उदाहरणार्थ ‘गोरे गोरे चांदसे मुखपर’, ‘कही करती होगी वो मेरा इंतजार’, ‘चांद आहे भरेगा’, ‘तुम्हारी मस्त नजर’, ‘सावन का महिना’, ‘दिलकी नजरसे’, ‘चले जाना जरा ठहरो’, ‘एक मंजिल राही दो’, ‘देखती ही रहो आज दर्पणमे तुम’, ‘दिल तडप तडप के कह रहा आ भी जा’, ‘चांद को क्या मालूम’, ‘चंचल शीतल निर्मल कोमल’ इत्यादि.

मुकेशच्या आवाजाने खरा परिणाम साधला तो त्याने गायलेल्या दुःखी गाण्यांनी. त्याने गायलेल्या शेकडो दर्दभऱ्या गीतांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. ‘जुबांपे दर्दभरी दास्तान चली आयी’, “मुझे तुमसे कुछ भी न चाहिए’, ‘दीवानोसे ये मत पूछो’, ‘तुम बिन जीवन कैसे बीता’, ‘चांदी की दीवार न तोडी’, ‘हम छोड चले है महफिलको’, ‘भूली हुई यादो’, ‘टुटेना दिल टुटेना’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘मुझको इस रातकी तन्हाईमे आवाज न दो’, ‘सारंगा तेरी यादमे’, ‘राम करे ऐसा हो जाये’, ‘मेरे टुटे हुए दिलसे’ अशी असंख्य गीते कोण बरं विसरू शकेल.

मुकेशला अजरामर बनविले ते काही वैशिष्ट्य पूर्ण गीतांनी.

फिर सुबह होगी :- वो सुबहा कभी तो आयेगी…. आशा भोसलेबरोबर गायलेले हे गीत खय्यामने संगीतबद्ध केले होते. मुकेशने या गीतात प्राप्त सामाजिक परिस्थितीमुळे आलेले नैराश्य, सोबतच नायकाचा दुर्दम्य आशावाद हे दोन्ही भाव फार अप्रतिमरीत्या व्यक्त केले आहे. ‘फिर सुबह होगी’च्या संगीताने खय्यामला फिल्म उद्योगात पुनर्जीवित केले. याच चित्रपटात ‘चीनों अरब हमारा हिंदोस्ता हमारा’ गीतातील उपहास मुकेशने सुंदर दाखविला आहे, पडद्यावरील राज कपूरच्या जिवंत अभिनयाने या गीताने आवश्यक तो परिणाम साधला.

संगम :- दोस्त दोस्त ना रहा….. गैरसमजातून प्राप्त झालेले दु:ख, त्यातच विश्वासघात झाल्याची प्रबळ भावना आणि त्यातून आलेली विफलता हे सगळे भाव मुकेशने अतिशय प्रभावी आणि हळूवारपणे दाखविले आहेत.

ओ मेरे सनम :- शंकर जयकिशन यांनी त्यांच्या आवडत्या शिवरंजनी रागात हे गीत संगीतबद्ध केले आहे. मुकेश व लतादीदींच्या आवाजातील हे युगुल गीत अविस्मरणीय.
“सुनते थे प्यार की दूनियामे दो दिल मुश्किलसे समाते है,
क्या गैर यहां अपनो तक के सायेभी न मिलने पाते है’… या ओळी गाव्या तर मुकेशनेच.

जिस देश में गंगा बहती है :- ‘आ अब लौट चले’… लताचे आलाप, शिस्तबद्ध व सुरेल कोरस यांच्या साथीला मुकेशचा आश्वस्त करणारा आवाज यामुळे हे गीत अविस्मरणीय झाले. डाकुंच्या स्वैच्छीक समर्पणाचा प्रसंग. नायिका साशंक पण नायकाला स्वतःवर विश्वास की डाकू शांतपणे समर्पण करतील म्हणून. गीताचे बोल मनात विश्वास निर्माण करणारे. मुकेशने गीत कमाल गायलेले आणि तितकेच सुंदर चित्रित केलेले. ‘होठोपे सचाई रहती हैं’, मधील मुकेशच्या आवाजातील भोळा भाव लक्षात राहणारा.

अनाडी :- ‘सब कुछ सिखा हमने ना सिखी होशियारी’…. स्वतःला अनाडी म्हणतं विदीर्ण मनातल्या भावना हसत हसत नायिकेपर्यंत पोहचवण्याचे कसब मुकेशच्या आवाजात व राज कपूरच्या नजरेतच असू शकते हे परत एकदा सिद्ध झाले. मुकेशला सर्वोत्तम गायकाचे फिल्मफेअर याच गीतासाठी मिळाले. फिल्मफेअरने गायकांसाठी पुरस्कार पहिल्यांदाच दिला होता. ‘दिलकी नजरसे’, ‘किसीकी मुस्कराहटोपे हो निसार’ ही गाणी मुकेशच्या आवाजाची छाप सोडणारी.

शोर :- ‘इक प्यारका नगमा है’ …. राज कपूरनंतर गाणी उत्तमपणे चित्रित करणारा मनोजकुमारच. या गीतात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी मुकेशच्या आवाजाचा वापर अतिशय सुरेख केला. प्यारेलालजींचे व्हायोलिन ऐकणाऱ्यांचे मन हेलावून टाकते.

“तू धार है नदियाकी मै तेरा किनारा हुं, तू मेरा सहारा है मै तेरा सहारा हुं, आंखोमे समंदर है आशाओंका पानी है’, या ओळींचा गर्भितार्थ ऐकणाऱ्यांपर्यंत पोहचवावा तो मुकेशनीच.

पूरब और पश्चिम :- कल्याणजी आनंदजी जोडीने मुकेशच्या आवाजाचा योग्य वापर करून खूप सुंदर गीते दिली आहेत. त्यातलाच एक मैलाचा दगड म्हणजे ‘कोई जब तुम्हारा हृदय तोडदे’ हे गीत. विदेशी वातावरणात वाढलेली नायिका जिला भारताच्या रुढी परंपरांची, प्रेम, विश्वास, त्याग, समर्पण इत्यादी भावनांची अजिबात जाणीव नाही. जिवापाड प्रेम करणाऱ्या नायकाने नायिकेशी साधलेला एकतर्फी संवाद म्हणजे हे गीत. नायकाच्या मनातील भावनांचे काहूर नायिकेपर्यंत व रसिकांपर्यंत मुकेशने समर्थपणे पोहचविले.

बंबई का बाबू :- ‘चल री सजनी अब क्या सोचे’…. सचिन देव बर्मनने मुकेशचा आवाज मोजक्या गीतांसाठी वापरला. त्यापैकी हे एक गीत. मुलगी सासरी जातांना बापाच्या जीवाची घालमेल व्यक्त करणे हे शिवधनुष्य मुकेशने समर्थपणे पेलले.

अन्नदाता :- ‘नैन हमारे सांज सकारे’ …. सलील चौधरीच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेलं हे गीत फारच सुंदर. स्वप्न पाहणे हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार. पण स्वप्नपूर्ती होईलच याची खात्री नाही. हीच विसंगती, अस्थिरता उरापोटाशी बाळगत व्यक्त केलेल्या भावना म्हणजे हे गीत. इथे सुद्धा मुकेशचा आवाज बाजी मारुन जातो.

रानी रुपमती :- ‘आ लौटके आजा मेरे मीत’…. एस.एन.त्रिपाठीच्या संगीत दिग्दर्शनाखाली एका अजरामर गीताचा जन्म झाला. रानी रूपमती period film, costume drama. संवाद, दिग्दर्शन, संगीत सब कुछ त्रिपाठी. मुकेश व लता यांनी वेगवेगळे गायलेले गीत. पण मुकेशच्या आवाजाची खुमारी न्यारीच. मुकेशच्या असंख्य गीतापैकी एक सुंदर गीत. पंडित भरत व्यासने लिहिलेल्या विरह व्यथेला शतप्रतिशत न्याय दिला तो मुकेशच्या गायकीने.

परवरिश :- ‘आंसुभरी है ये जीवन की राहे’….. यमन रागातील ही रचना दत्तारामनी स्वरबद्ध केली. पडद्यावर राज कपूरने अभिनित केलेलं हे गीत. मुकेशच्या दर्दभऱ्या आवाजाने गीताला पूर्ण न्याय दिला. हसरतच्या प्रत्येक शब्दाला मुकेशने भावपूर्ण पद्धतीने गायले व राज कपूरच्या अभिनयाने रसिकांच्या चिर स्मरणात नेऊन बसवले. “आंसुभरी है ये जीवन की राहे’ मुकेशची कायमस्वरूपी ओळख म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मेरा नाम जोकर :- ‘जाने कहां गये वो दिन’….. मुकेशच्या सांगीतिक कारकीर्दीचे अत्युच्च शिखर. राज कपूरचा महत्वाकांक्षी चित्रपट. शंकर जयकिशन, शैलेंद्र, हसरत यांच्या सिनेसफरीतील मैलाचा दगड. जोकर म्हणजे तीन प्रेमभंग झालेल्या राजची कहाणी. जोकरचे हृदय छिन्न विछिन्न झालेले. अशा भणंग अवस्थेत मनाने दिलेली साद म्हणजे ‘जाने कहां गये वो दिन’. पराकोटीच्या दुःखापलीकडले. गीताच्या चित्रीकरणात राज कपूरचा कल्पनाविलास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा. मुकेश ‘जाने कहां’ गायला नाही तर जगला. प्रत्येकजण आपल्या क्षमतेचे शतप्रतिशत देतो तेंव्हा अशी अजरामर कलाकृती जन्मास येते. जोकर प्रदर्शित झाल्यावर मुकेश ऊणेपुरे चार वर्षे जगला. ‘जाने कहां’ मुकेशच्या सांगीतिक जीवनाच्या मुकुटातील शिरपेच.

मुकेशला चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.

अनाडी(१९६०) – सब कुछ सीखा हमने.
पहचान(१९७१) – सबसे बडा नादान वो ही है.
बेईमान(१९७३) – जय बोलो बेईमानकी.
कभी कभी(१९७७) – कभी कभी मेरे दिल में.
१९७५ मधे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार रजनीगंधा – ‘कई बार युहीं देखा है’

तीस वर्षाची कारकीर्द. वयाच्या अवघ्या त्रेपनव्या वर्षी मुकेश जग सोडून गेला. हे काही जाण्याचे वय नाही. रफी, किशोरने तरी काय केले. साठीच्या आत हे गायक आपल्याला सोडून गेले. सिनेसंगीताला पोरके करून गेले. अमेरिका व कॅनडाच्या स्टेज शोसाठी गेलेला असताना २७ ऑगस्ट १९७६ रोजी मुकेशचे हृदयविकाराने दुदैवी निधन झाले. “छोटीसी ये जिंदगानी रे, चार दिनकी कहानी तेरी’ हे बोल सार्थ करत मुकेश निघून गेला, कधीही परत न येण्यासाठी. अशा मनस्वी गायकाच्या स्मृतिदिनानिमित्त ही आदरांजली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: