प्रसिद्ध चित्रपट निर्माता,दिग्दर्शक, पटकथालेखक अनुराग कश्यप याने वाढत्या झुंडशाहीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या देशातील ४९ मान्यवरांच्या पत्रावर सही केली. त्याच्या या सरकारविरोधी भूमिकेवर बॉलीवूडमधील त्याच्या काही सहकाऱ्यांनी ‘तुम्ही त्यावेळी कुठे होता’ अशा नेहमीच्या थाटात प्रश्न विचारले. प्रत्यक्षात प्रस्थापित व्यवस्थेवर राजकीय-सामाजिक भाष्य करणारा आधुनिक काळात अनुराग सारखा कलावंत आढळत नाही. त्याच्या कलाकृती त्याची भूमिका काय ते स्पष्ट करतात. त्याच्या भूमिकेचा घेतलेला हा धांडोळा.
“It’s only because of their stupidity that they’re able to be so sure of themselves.”
अनुरागच्या आवडत्या काफ्काच्या आवडत्या ‘द ट्रायल’ मधलं हे वाक्य. कश्यपच्याच ‘नो स्मोकिंग’ मधल्या मुख्य पात्राचं नाव ‘के’ असतं . के फॉर कश्यप. के फॉर काफ्का. सोशल मीडियावर कश्यपच्या मागे असणाऱ्या दारूच्या बाटलीभोवती वर्तुळ करून त्या फोटोला असंस्कारी, धर्मबुडव्या, देशद्रोही असे हॅशटॅग लावणारे फोटो सर्क्युलेट आणि रिट्विट व्हायला लागले की साहेबांविरुद्ध कुठलंतरी ‘संस्कारी’ सोशल मीडिया कॅम्पेन सुरू झालंय हे लगेच कळतं.
हे बदनामी अभियान ‘पद्मावत’च्या वेळेस सुरू झालं होत, ‘उडता पंजाब’च्या वेळेस सुरू झालं होत, ‘सॅक्रेड गेम्स’च्या वेळी सुरू झालं होत आणि ‘सॅक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनच्या वेळेस पण सुरू होणार आहे. मार्क माय वर्ड्स.
बॉक्स ऑफिसवर नसलं तरी प्रत्यक्ष आयुष्यात कश्यपने प्रत्यक्ष आणि वर्चुअल आयुष्यात वादग्रस्त राजकीय मत मांडण्यात कसलं सातत्य जपलं आहे. नाही? पण अनुरागचं सोशल मीडियावरच्या ट्रोलांबद्दलच मत हे वरच्या काफ्काच्या मतासारखंच असणार हे नक्की.
आपल्या देशात निर्भीडपणे आणि राजकीय पक्षांची भीड न बाळगता स्वतःची राजकीय आणि सामाजिक मत मांडणारी जी काही मोजकी लोक आहेत, त्यांच्यापैकी एक अनुराग आहे. नुकतंच देशातल्या काही कलावंतांनी आणि बुद्धिजीवी मंडळींनी पंतप्रधान मोदींना देशात वाढत चाललेल्या लिंचिंग संस्कृतीबद्दल काळजी व्यक्त करणार पत्र लिहून पंतप्रधानांनी दलित -मुस्लिम नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात जातीनं लक्ष घालावं अशी मागणी करणार जाहीर पत्र लिहिलं. आणि वादाला तोंड फुटलं.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पण काहीजणांनी जाहीर पत्रक काढून भाजपला मत देऊ नये असं आवाहन केलं होत. ते व्यक्तिशः मला पटलं नव्हतं पण त्याची कारणमीमांसा करण्याची जागा ही नाही. तर पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रानंतर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया आल्या. पंतप्रधानांनी या पत्राकडे आपल्या नेहमीच्या शैलीत दुर्लक्ष केलं. मोदीसमर्थक काही कलावंतांनी -विचारवंतांनी (हे नेहमीच प्रतिक्रिया मोडमध्ये असतात) पण मोदींच्या समर्थनात पत्र लिहिलं. त्या पत्रात एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की, ज्या लोकांना दलित-अल्पसंख्य समूहांच्या सद्य परिस्थितीबद्दल काळजी वाटते ते इतर वेळेस (उदा. १९८४ची शीखविरोधी दंगल किंवा काश्मिरी पंडितांचे दहशतीच्या बळावर झालेले विस्थापन) का अशा भूमिका घेत नाहीत, अशा अर्थाचा.
त्या पत्रात सिलेक्टीव्ह आउटरेज (‘Selective Outrage’) असा एक शब्दप्रयोग होता. हल्ली आपल्याकडे प्रत्येक राजकीय वादात ‘तेव्हा तुम्ही कुठं होता?’ किंवा ‘अमुक तमुक घटनेनंतर तुम्ही काही भूमिका का नाही घेतली,’ असा युक्तिवाद करण्याची जी प्रथा पडली आहे, त्याला अनुसरूनच हे झालं. वादविवादात Whataboutaryचं स्वतःच असं एक महत्त्व असतंच, पण ते काही वादविवादाचं एकमेव हत्यार होऊ शकत नाही. शिवाय ‘तेव्हा तुम्ही कुठं होता’, असा आक्रमक सवाल विचारणाऱ्यानी स्वतः तरी कुठं प्रत्येक मुद्द्यावर मत मांडलेलं असतं? प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येकाला मत व्यक्त करणं शक्य नसतं. त्यामागे अनेक कारण असतात. म्हणून Whataboutaryच्या हमाममध्ये सगळेच नंगे आहेत.
तुम्ही पक्ष कुठलाही असो, राजवट कुठलीही असो, नेता कुठलाही असो स्वतःची मत निर्भीडपणे मांडताय की नाही हा खरा मुद्दा असावा. अनुराग कश्यपसारख्या कायम प्रस्थापितांविरोधी भूमिका घेणारा माणूस हा कायमच वैयक्तिक आयुष्यातून आणि त्याच्या सिनेमातून बेधडक त्याच्या भूमिका मांडत आला आहे. लोकांची पर्वा न करता. त्याच्या या भूमिकांचं त्याच्या सिनेमातून उत्तमरित्या डॉक्युमेंटेशन झालं आहे तेव्हा त्याला तरी, ‘अमुक पक्ष सत्तेवर असताना तमुक करत असताना तू कुठे होतास?’ असा बालिश प्रश्न विचारण्याची गरज नाही.
अनुरागचे लेखक -दिग्दर्शक -निर्माता म्हणून सहभाग असणाऱ्या बहुतेक सिनेमात नेहमीच सामाजिक -राजकीय अंडरकरंट्स असतात. सिनेमा ही फक्त काही घटका मनोरंजन करणारी पलायनवादी (म्हणजे राजकीय भूमिका घ्यायचं टाळणारी) कला आहे, या भूमिकेला उभाआडवा छेद देणारे सिनेमे अनुरागचे असतात. टीव्ही चॅनलमुळे ‘कल्ट’चं स्थान प्राप्त झालेल्या शंकरच्या ‘नायक’ सिनेमाचे संवाद अनुरागचे आहेत. दिल्लीमध्ये भाजप आणि काँग्रेससारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांचा पराभव करून अरविंद केजरीवाल सर्वप्रथम सत्तेत आले, त्याला अनेक सामाजिक आणि राजकीय घटक कारणीभूत होते. ‘आप’च्या समर्थकांनी अतिशय चतुराईनं केलेल्या सोशल मीडिया कॅम्पेनचा या विजयात वाटा होता. वाचकांना आठवत असेल तर ‘नायक’ या चित्रपटामधल्या शिवाजीराव गायकवाड या राज्याच्या भ्रष्ट आणि गर्विष्ठ मुख्यमंत्र्याला आवाहन देऊन एक दिवसाचा मुख्यमंत्री बनणाऱ्या पात्राचा केजरीवालांची प्रतिमानिर्मिती करण्यासाठी ‘आप’च्या मीडिया मॅनेजर्सनी खुबीनं वापर करून घेतला होता. त्या कॅम्पेनमध्ये ‘नायक’ मधल्या प्रस्थापित नेत्यांविरुद्ध आग ओकणाऱ्या नायकाचे जे संवाद अनुरागने लिहिलेले होते ते समाविष्ट केले होते.
मणिरत्नमच्या राजकारणाकडे वेगळ्या वेगळ्या दृष्टीने तीन युवकांची गोष्ट सांगणाऱ्या प्रभावी ‘युवा’चे संवाद पण अनुरागचेच होते. मुंबईतल्या पाणी माफियांविरुद्ध उभ्या राहणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या भारतीय सुपरहीरोची गोष्ट सांगणाऱ्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’मध्ये पण पाणीचोरीच्या मागे उभी असणारी राजकीय यंत्रणा-पोलीस यंत्रणा दाखवली होती. त्या सिनेमाचा स्क्रीनप्ले -संवाद अनुरागचेच होते. पण सिनेमा हे नेहमीच दिग्दर्शकाचं माध्यम असतं. अनुराग जेव्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीवर असतो, तेव्हा हे सामाजिक राजकीय संदर्भ जास्त तीव्रतेने दिसतात.
दिग्दर्शक म्हणून अनुरागच्या नावावर २३ सिनेमे आहेत. त्या २३ पैकी कुठलाच सिनेमा गुडी गुडी ला ला लँडमध्ये घडत नाहीत. ते गजबजाटी, अनागोंदीने भरून राहिलेल्या भारतीय भवतालात घडतात. ज्या भवतालाचा राजकारण हा अविभाज्य हिस्सा आहे. अगदी त्याच्या ‘देव डी’मध्ये पण स्त्री पुरुष नात्यातलं सनातन राजकारण सतत येत राहतं. पण तरीही अनुरागच्या फिल्मोग्राफीमधले तीन सिनेमे याबाबतीत जास्त महत्त्वाचे.
‘गुलाल’, ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘मुक्काबाज’ हे ते तीन सिनेमे. राजकीय संदर्भ आणि त्यावरच बोचरं भाष्य ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘नो स्मोकिंग’ , ‘रामन राघव २.०’ आणि काही प्रमाणात ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये पण आले आहेतच.
पण वर उल्लेख केलेले तीन सिनेमे अनुरागच्या राजकीय भूमिकेवर प्रकाश टाकतात. ‘गुलाल’ हा सिनेमा बनणं आणि रिलीज होणं यात नऊ वर्षाचं अंतर होत. ‘गुलाल’मध्ये एका बाजूला अतिशय क्रूर विद्यार्थी संघटनांचे राजकारण आहे, तर दुसरीकडे स्वतंत्र राजपुतानासाठी भूमिगत चळवळ चालवणारा दुकी बना (केके मेनन) आहे. या कर्तव्यकठोर दुकी बनाचा एक लेनिनवादी भाऊ आहे जो गळ्यात जॉन लिननची तसबीर टांगून फिरत असतो. तो जगासाठी वेडा आहे, पण सिनेमात सगळ्या शहाणपणाच्या गोष्टी तोच करत असतो. दुकी बना लोकांसमोर स्वतंत्र राजपुतानासाठी प्रक्षोभक भाषण करत असतो तेव्हा हा वेडा म्हणत असतो,
ओ रे बिस्मिल काश आते आज तुम हिन्दोस्तां
देखते कि मुल्क सारा ये टशन में थ्रिल में है
आज का लौंडा ये कहता हम तो बिस्मिल थक गए
अपनी आजादी तो भइय्या लौंडिया के तिल में हैं
या पृथ्वी बनासोबत (पियुष मिश्रा) कायम एक अर्धनारी नटेश्वर सावलीसारखा फिरत असतो. त्या पात्राबद्दल अनेक जणांनी अनेक मत आहेत. माझ्या मते ते पात्र दुकी बनाच्या अर्धजागृत सद्सद्विवेकबुद्धीचं प्रतीक आहे. जी एक थियरी मी वाचली आहे त्यानुसार दुकी हा जर सिनेमात दुर्योधन वृत्तीचं प्रतिनिधित्व करत असेल तर तो अर्धनारेश्वर कृष्णाचं प्रतिनिधित्व करतोय. अजूनही काही थियरीज आहेत.
दस्तुरखुद्द अनुरागने ‘रेडिट’ या वेबसाईटवरच्या चर्चेत त्या पात्रामागे काहीही वैचारिक भूमिका नाही. ते फक्त पडद्यावर इंटरेस्टिंग दिसतं म्हणून केलं आहे अशी भूमिका घेतली आहे. पण ते काही खरं वाटत नाही. भारतासारख्या देशात अनेक फॉल्टलाईन्स सतत धगधगत असतात. मात्र स्वतंत्र राजपुताना या इतिहासाने फारशी नोंद न घेतलेल्या चळवळीची नोंद ‘गुलाल’ हा सिनेमा फार प्रभावीपणाने घेतो. चित्रपटात एक शिक्षक पात्र जेव्हा वर्गात शिकवायला येते तेव्हा मागे ब्लॅकबोर्डवर एका विद्यार्थ्याने ‘Nihilism’ असं लिहून ठेवलेलं असतं. ज्या सिनेमात प्रत्येक पात्राचा राजकीय आणि वैयक्तिक उद्देश आहे, तिथे हा सीन वेगळं भाष्य करून जातो.
२०१४ नंतर देशातल्या बदललेल्या राजकीय वातावरणाची प्रभावीपणाने नोंद घेणारा ‘मुक्काबाज’ हा सिनेमा आहे. सिनेमाची मूळ कथा जरी विनीत सिंगची असली तरी स्क्रीनप्ले लिहिणाऱ्या अनुरागने त्यात आपला खास ‘कश्यपीझम’ आणला आहे. सिनेमा खेळातल्या जातीव्यवस्थेवर प्रभावी भाष्य करत असतानाच ‘भारत माता की जय’, अशा घोषणा देत फिरणारे हिंसक गोरक्षकांचे थवे सिनेमाच्या कथानकात प्रवेश करतात आणि सिनेमाच्या गोष्टीला वेगळंच वळण मिळतं. .
आपल्याकडचे बहुतेक स्पोर्ट्स बायोपिक हे शेवटी नायकाच्या /नायिकेच्या जिंकण्याच्या स्वप्नाळू नोटवर संपतात. ‘मुक्काबाज’ मधला निम्न जातीचा नायक मात्र शेवटी हरतो. स्वतःच्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्थेसमोर शरणागती पत्करतो.
गोरक्षकांचा आणि गायीच्या मांसाचा स्वतःचे राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी माध्यम म्हणून कसा वापर केला जातोय हे दाखवण्याचं धाडस अनुरागशिवाय मेनस्ट्रीममधला दुसरा कुठला दिग्दर्शक करेल असं वाटत नाही. तुमच्याकडे कितीही गुणवत्ता असो या देशात तुम्हाला अनेक शक्तिस्थळांसमोर लवून मुजरा करावा लागतोच. ‘मुक्काबाज’ मधला विनीतकुमारचा बॉक्सर अनेक दरवाजांना ठोठावतो. पण त्याच्या जातीमुळे आणि अंगभूत बंडखोरीमुळे प्रत्येक दरवाजा तोंडावर आपटून बंद केला जातो.
सिनेमात दोन राजकारण समांतरपणे चालू आहेत. एक क्रीडाक्षेत्रातलं राजकारण तर दुसरं समाजात चालू असलेलं जातीय -धार्मिक विभाजनाचं राजकारण. नायक आपल्या दुबळ्या ताकतीने दोन्ही आघाड्यांवर लढतोय आणि नॉक आउट होतोय. पण तो एक शेवटची महत्त्वाची लढाई जिंकतो.
खेळाचा ठेकेदार बनून बसलेल्या भगवान मिश्राला शेवटी ‘भारत माता की जय’, अशा घोषणा देत त्वेषाने ठोसे मारून रक्तबंबाळ करतो तेव्हाच तो एक प्रातिनिधिक छोटी लढाई जिंकलेला असतो. हा सीन उपरोधिक आहे. जेव्हा विनीतचा बॉक्सर ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत मिश्राला ठोकून काढत आहे तेव्हा समोर पोलीस पण उभे आहेत. पण ते काही करत नाहीयेत. कारण समोरचा भारतमातेच्या नावावर घोषणा देऊन बुकलून काढत आहे. एकप्रकारे ही घोषणा म्हणजे मारहाण करण्याचं जणू काही लायसन्सचं काही लोकांसाठी बनलं आहे. व्यवस्थेसमोर त्याला शेवटी स्वीकारावा लागणारा पराभव सुसह्य करणारा हा छोटा विजय त्यामुळेच महत्त्वाचा.
मध्यंतरी ट्विटरवर एक ट्रोल अनुरागला तू फक्त हिंदूंनाच आणि हिंदू संघटनांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं का करतोस असा प्रश्न सातत्याने विचारत होता. अनुरागने ‘ब्लॅक फ्रायडे कुणी बनवला मग’ असं उत्तर देऊन गप्प बसवलं होत. उत्तरातले काही असंसदीय शब्द अर्थातच इथं घेतलेले नाहीत. ‘ब्लॅक फ्रायडे’ मधला त्याचा बादशहा खान हे पात्र मला सगळ्यात जास्त भावतं.. पात्राचं नाव बादशहा खान असलं तरी त्या पात्राच्या नशिबी एक केविलवाणी फरफट आहे. एका साधा सरळ माणूस धर्माच्या नावावर भडकावला जातो. तो मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात अडकतो. पण त्याला या कटात सामील करून घेणारा टायगर मेमन चंबूगबाळ आवरून पाकिस्तानात निघून जातो. बादशहा आणि त्याच्यासारख्या कित्येक प्याद्यांना वाऱ्यावर सोडून. सर्वस्व हरवलेला विमनस्क बादशाह खान दिल्लीपासून जयपूरपर्यंत पोलिसांपासून वाचण्यासाठी फिरत राहतो. एका लॉजमध्ये जाऊन ‘एक सस्ता कमरा चाहिये, सस्ता’ असं पिळवटून तो बोलतो तेव्हा हा बॉम्बस्फोटातला आरोपी आहे असं माहीत असून पण बादशहा खानसाठी काहीतरी तुटतं.
एका प्रसंगात के के मेनन आणि आदित्य समोरासमोर येतात तो प्रसंग चित्रपटाचा हायलाईट आहे. देशातल्या मुसलमानांवर बाबरी मशीद पाडल्यानंतर कसे अत्याचार झाले याचं थोडं खरं आणि बरचसं अतिरंजित (टायगरने डोक्यात भरवलेलं ) वर्णन बादशहा खान करतो. वर ‘अल्ला हमारे साथ था, इसलिये हम ये जंग जीत गये’, अशी मखलाशी करून स्वतःची केविलवाणी समजूत घालून घेतो. मग केके ‘इस बार अल्ला हमारे साथ था’, अशी सुरूवात करून मग त्याच्या युक्तिवादाच्या चिंधड्या करतो. अतिशय प्रभावी आणि अंगावर काटा आणणारा सीन. हा सीन जितका के केचा आहे तितकाच आदित्यचा आहे. कुठल्याही धार्मिक संघटनेच्या / पक्षाच्या प्रपोगंडाला बळी पडून आयुष्याची होळी झालेल्या प्रत्येक माणसाचं प्रतीकात्मक मूर्त स्वरूप म्हणजे बादशहा खान.
धार्मिक ध्रुवीकरणाच्या या काळात देशात कानाकोपऱ्यात सर्वधर्मीय बादशहा खान तयार होत असताना खरं तर ‘ब्लॅक फ्रायडे’ पुन्हा प्रदर्शित करायला पाहिजे. लोकांना भडकवणारे नेते ऐषआरामी आयुष्य जगत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था होत असते ते या चित्रपटातली बादशहा खानची शोकांतिका बघून किमान काही लोकांना तरी कळेल.
त्यात एक प्रसंग आहे. बादशहा खानला रूममध्ये बोलवून टायगर, “किधर का बादशाह तू ?’ असं गुर्मीत विचारतो आणि त्याला लंबचौड भाषण देऊन कटात सामील करून घेतो. अजून एका सीनमध्ये तो बॉम्बस्फोटांची आखणी आयएसआयच्या लोकांसोबत बसून करतो. मुंबई ही भारताची लाईफलाईन आहे आणि आपण तिथंच घाव घातला पाहिजे, असं तो निक्षून सांगतो. दंगलीमध्ये त्याचं दुकान जाळल्यावर ‘अख्खी बम्बई जला देगा मै’, अशी धमकी ओरडून देतो. सिनेमा मुंबई बॉम्बस्फोटासाठी कुठल्याही एका समूहाला सरसकटपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं नाकारतो पण बॉम्बस्फोट करण्यामागच्या धार्मिक प्रेरणा पण उघडपणे दाखवतो. हा सिनेमा बघितल्यावर तरी किमान ‘तेव्हा तू कुठं होतास’ असा प्रश्न विचारण्याचं धाडस अनुरागला कुणी करू नये.
अनुरागसारख्या माणसाचा प्रॉब्लेम हा आहे की त्याला सत्तेत असणाऱ्या लोकांशी नेहमीच प्रॉब्लेम असतो. सत्तेत असणाऱ्या लोकांना सतत प्रश्न विचारत राहिलं पाहिजे असं त्याच मत आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘गँग्ज ऑफ वासेपूर’च्या प्रदर्शनासाठी त्याने एक मोठी लढाई खेळली आहे. ही लढाई अर्थातच तत्कालीन काँग्रेस सरकारशी होती. त्या वेळेस त्याने मनमोहन सिंग यांच्या सरकारवर पण टीकेची संततधार धरली होती. ‘उडता पंजाब’ सिनेमाच्या वेळेस त्याने अकाली दलाशी पंगा घेतला होता. डिसेंट करत राहणं हा या माणसाचा स्थायीभाव राहिलेला आहे. दुर्दैवाने सरकारविरुद्ध डिसेंट म्हणजे देशद्रोह असं समीकरण असण्याच्या काळात हा डिसेंट चांगल्या पद्धतीने रिसिव्ह केला जात नाहीये. या डिसेंटला पक्षीय उतरवून सकारात्मक पद्धतीने बघण्याची गरज आहे. मात्र ‘तुम्ही आमच्यासोबत नसाल तर आमच्या शत्रुपक्षात आहात’, असा जॉर्ज बुशिझम जोरात असताना असं होण्याची शक्यता कमी आहे. ‘गुलाल’मध्ये अल्कोहल ड्रिंकला ‘डेमोक्रसी’ नाव देणारा आणि ‘रिपब्लिक बियर’ दाखवणारा अनुराग काळाच्या किती पुढं होता हे मात्र सतत जाणवत राहतं
अमोल उदगीरकर, हे चित्रपट अभ्यासक आहेत.
COMMENTS