आघाडीची ‘राज’कीय समीकरणे

आघाडीची ‘राज’कीय समीकरणे

राज यांनी मोदी-शहा यांच्यावर टीका करण्याचा सपाटा लावलेला आहे म्हणजे त्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाला, ध्येयधोरणाला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. तशा प्रकारचे एकही वाक्य त्यांच्या भाषणातही नसते. यात राजकीय सोय असेल, निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडू नये म्हणून बाळगलेली सावधगिरी असेल अथवा त्यांची ती खरी भूमिकाही असू शकेल. परंतु भविष्यात हाच मुद्दा कळीचा असणार आहे. त्यासाठी आधी आपण विविध शक्यता लक्षात घेऊ.

युती ही भाजपा – सेनेची मजबुरी
‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटांचे खेळ : एक प्रचारकी खेळी
‘द्र’ – दिल्लीतला आणि मुंबईतला
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

राज ठाकरे सध्या ज्या पद्धतीने सभांमध्ये बोलत आहेत, तशा अभ्यासपूर्ण राजकीय भाषणांची आपल्याला आता सवय राहिलेली नाही. यापूर्वी ज्यांना आपण चांगले राजकीय वक्ते म्हणत होतो, त्यांच्याकडे इतिहासाचे आकलन, वर्तमानाचे विश्लेषण आणि भविष्याची दृष्टी असे. राज यांच्या भाषणांत त्यापैकी काहीही नाही. परंतु तरीही ती एका वेगळ्या अर्थाने अभ्यासपूर्ण आहेत. अव्वाच्या सव्वा आश्वासने देऊन मागाहून त्याच आश्वासनांची चुनावी जूमला म्हणून संभावना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची ते अक्षरशः ‘बिनपाण्याने’ करीत आहेत.
राज ठाकरे यांच्या या भाषणांचा, पुराव्यांसह भाजपच्या, मोदींच्या आणि शहांच्या त्यांनी केलेल्या या चिरफाडीचा काही उपयोग होईल का? या प्रश्नाचे अराजकीय उत्तर आजच्या घडीला कोणीच देऊ शकणार नाही. जे भाजपचे समर्थक आहेत त्यांना ‘राज ठाकरेंकडे केवळ गर्दी असते, मते नसतात’ या आजवरच्या वास्तवावर भरवसा ठेवला पाहिजे असे वाटते आहे. भाजपचा पराभव व्हावा अशी ज्यांची इच्छा आहे त्यांना राजच्या भाषणांमुळे भाजपच्या पायाखालील वाळू सरकली आहे, असे वाटते आहे. बुद्धिवाद्यांचा एरवी भविष्यकथनावर विश्वास नसला तरी निवडणुकीच्या वेळी त्यांनाही मनाला बरे वाटेल असे काही ऐकण्याची इच्छा असतेच असते. त्यामुळे सध्या आपण केवळ विविध शक्यता लक्षात घेऊ या आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा अंदाज बांधू या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यावेळच्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी ‘मोदी-शहा हटाव’  मालिकेतले पहिले वहिले भाषण केले त्याचवेळी, ‘द वायर मराठीवर लिहिलेल्या ‘राज ठाकरे आणि पेटीवर ठेवलेले आंबे’ या लेखात काँग्रेस-राष्ट्रवादीने राज यांची मदत घेऊन त्यांच्या घणाघाती भाषण शैलीचा आणि सध्याच्या राजकीय भूमिकेचा उपयोग करून घ्यावा असे म्हटले होते. प्रत्यक्षात या दोन पक्षांनी राज ठाकरेंशी काही गुप्त बोलणी, समझोता अथवा तोंडी करार वगैरे केला आहे का ते कळायला मार्ग नाही, परंतु ‘प्रतिसाद म्हणजे प्रत्यक्ष मत नसते’,  हा विचार तात्पुरता बाजूला ठेवला तर राजचे प्रत्येक भाषण हे लोकसभेच्या राज्यातील सत्तासंतुलनावर परिणाम करते आहे, असे वाटण्याजोगी वातावरण निर्मिती त्यांनी केली आहे. राज यांच्या, सेनेबाहेर पडल्यानंतरच्या वाटचालीचा विचार केला तर सध्या ते त्यांच्या राजकीय आयुष्यातला सर्वात मोठा जुगार खेळत आहेत आणि यातून वाईट झालेच तर आज जे आहे त्यापेक्षा अधिक वाईट काय होऊ शकते असा टोकाचा विचार त्यामागे दिसतो.
राज यांनी मोदी-शहा यांच्यावर टीका करण्याचा सपाटा लावलेला आहे म्हणजे त्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाला, ध्येयधोरणाला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. तशा प्रकारचे एकही वाक्य त्यांच्या भाषणातही नसते. यात राजकीय सोय असेल, निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडू नये म्हणून बाळगलेली सावधगिरी असेल अथवा त्यांची ती खरी भूमिकाही असू शकेल. परंतु भविष्यात हाच मुद्दा कळीचा असणार आहे. त्यासाठी आधी आपण विविध शक्यता लक्षात घेऊ.

‘ए लाव रे तो व्हिडीओ'

‘ए लाव रे तो व्हिडीओ’

राज यांच्या ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ या प्रकारच्या भाषणांचा काहीही परिणाम झाला नाही अथवा अगदीच किरकोळ परिणाम झाला, तर युती  राज्यात किमान ३५चा आकडा गाठू किंवा ओलांडूही शकेल. त्या परिस्थितीत राज हा केवळ ‘आवाज करणारा फटाका’ आहे, हे पुन्हा एकदा आणि कदाचित अखेरचे स्पष्ट होईल.
परंतु राज यांच्या कष्टाचा, तयारीचा युतीला फटका बसून काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने राज्यात किमान २५ किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळवल्या तर? तर राज्यात राजकीय हलचल होईल आणि येत्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण  लोकसभेच्या निकालाच्या दिवसापासून म्हणजे २३ मे पासूनच तापायला सुरुवात होईल. परिणामी विधानसभेत थेट ‘काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे’अशी न भूतो आघाडी मैदानात उतरू शकेल का? या प्रश्नाचे बरेचसे उत्तर महाराष्ट्रातला लोकसभा निकालाचा कौल आणि कल केंद्रातही दिसेल का, या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे. दोन्ही काँग्रेस आणि मनसे अशी आघाडी करायची ठरले तरी ती प्रत्यक्षात होणे काही एवढे सोपे नाही. या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होण्यात फार मोठी अडचण नाही, कारण त्या पक्षाचे आताचे सर्वेसर्वा राज यांच्या ‘टप्प्या’तले आहेत. त्यांच्या पक्षाच्या नावात ‘राष्ट्रवादी’ असले तरी सगळे निर्णय राज्य पातळीवरच होतात. परंतु काँग्रेसचे काय?
देशभरातील संस्थाने खालसा होऊनही गेल्या पाच वर्षात काँग्रेसला देशव्यापी असा दुसरा  कुठलाही पर्याय उभा राहू शकलेला नाही आणि पडत्या, पडझडीच्या काळातही काँग्रेस पक्षात  नेतृत्वासाठी  कोणीही गांधी घराण्याच्या पलिकडे पाहिलेले नाही, हे वास्तव आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने राजस्थान, मध्यप्रदेशासारखी महत्वाची राज्ये सर केल्यावर आता तूर्तास राहुल-प्रियांका हेच काँग्रेसची सूत्रे सांभाळतील असे चित्र आहे. काँग्रेसने मनसे सोबत आघाडीत सहभागी व्हायचे असेल तर त्याबाबतचा निर्णय केंद्रात घेतला जाईल आणि काँग्रेसचा मनसेकडे पाहण्याचा दृष्टीकोन, ‘ज्या पक्षाचा आजघडीला एकही आमदार नाही असा एक प्रादेशिक पक्ष’ असाच राहील. हा मुद्दा निकालात निघून आघाडी करण्याचा निर्णय झाला तरी जागावाटपाचा तिढा सुटणे त्याहूनही कठीण आहे. मनसेचा राजकीय प्रभाव असलेला इलाका म्हणून मुंबई, पुणे, नाशिक या परिसराचा विचार केला तर या भागातील राजकीय वर्चस्वात कुणाला तरी भागीदार करून घेणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना आवडणार नाही, परवडणारही नाही.
मनसेच्या या कथित प्रभावाखालील क्षेत्रात विधानसभेच्या शंभराच्या आसपास जागा आहेत. त्यातल्या २५ पासून तर पन्नासपर्यंत कितीही जागांची मागणी मनसे करु शकते. या महत्वाच्या आर्थिक क्षेत्रात मनसेला आपल्यात ‘बसू’देण्यास, ‘जरा सरकून घेऊन’ त्या पक्षाला जागा देण्यास, ना त्या पक्षांचे नेते तयार होतील ना कार्यकर्ते.  लोकसभेच्या निवडणुकीत मनसेमुळे आघाडीला केवळ थोडाफारच फायदा झाला आणि केंद्रात भाजपची सत्ताही कायम राहिली तर मात्र हे कोडे सोडवणे थोडे सोपे होईल. या तीन पक्षांची आघाडी होऊन निवडणूक लढवणे, जागा वाटप याबाबत सगळेच समजूतीची भूमिका घेतील.
परंतु अशीही शक्यता नाकारता येत नाही की राजकीय समीकरणात काहीही बदल न होता भाजपची ताकद आता आहे तशीच आणि जवळपास तेवढीच राहिली, किंवा त्यात अगदीच मामूली घट झाली आणि केंद्रात मोदी-शहा काम राहिले. तर मग राहुल गांधी लगेचच २०२४ च्या तयारीला लागतील आणि राज ठाकरे कदाचित हा शेवटचा जुगार खेळून झाला म्हणून विश्रांतीसाठी परदेशी जातील.
या ठोकताळ्यांच्या पलिकडलेही काही घडण्याची पूर्ण शक्यता आहे, म्हणून तर आपण  भारतीय राजकारणाला  सट्टाबाजाराची उपमा देतो. परंतु राज ठाकरे आज जे काही करत आहेत त्याचे विश्लेषण करताना, त्याचा विचार करताना ‘There is no such thing as a free lunch’  या सार्वकालिक व्यावहारिक सत्याचा विसर पडू देऊन चालणार नाही.

अगस्ती चापेकरघरंदाज राजकीय विश्लेषक असून लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0