पाब्लो नेरूदा आणि इल पोस्तिनो

पाब्लो नेरूदा आणि इल पोस्तिनो

नेरूदा आणि त्यांच्या कवितेमुळे भारावून गेलेल्या एका सामान्य मनुष्याचा गौरव करणारा मासिमोचा ‘इल पोस्तिनो’ हा सिनेमा एका काव्यात्मक वारसासारखा आपल्याजवळ सुरक्षित राहिला आहे.

१२ वी निकालाची टक्केवारी ९९.६३, कोकणाची सरशी
इंदिरा जयसिंग यांचे सरन्यायाधिशांना पत्र
आदरणीय गृहमंत्री, मला कोणत्या कायद्याखाली स्थानबद्ध केलेय?

एका सामान्य माणसाच्या जीवनात कविता किती महत्त्वाची असते? शोषण, दमन आणि अभावाने घेरलेला मनुष्य हवा, पाणी आणि खाणे यांसारख्या आवश्यक जीवन-तत्वांसाठी कवितेकडून काय अपेक्षा ठेवू शकतो? जमिनीवरील खऱ्याखुऱ्या संघर्षासाठी उपयोगी पडतील, अशी कुठली हत्यारं त्याला कवितेतून मिळू शकतील?

अमूर्त अभिव्यक्तीच्या बौद्धिक शब्दजाळात फसलेल्या कवितेसाठी हा प्रश्न एक मोठे आव्हान आहे; आणि आपल्या आधुनिक विश्वात पाब्लो नेरूदा बहुधा असे एकमेव कवी आहेत ज्यांची कविता हरएक देश आणि काळात, भाषांतराच्या साऱ्या जोखमा झेलूनही एक सहज आणि प्रभावशाली म्हणींच्या रूपात अभिव्यक्ती आणि भौतिक व्यवहार्यतेच्या सर्वात कठीण अटींची पूर्तता करते.

पाब्लो नेरुदाच्या कवितेतील प्राण-तत्वांना सेल्युलॉइडच्या माध्यमातून सिनेरूपात प्रस्तुत करण्याच्या अशक्य अशा चमत्काराला ‘मायकल रेडफोर्ड’ यांनी आपल्या बहुचर्चित ‘इल पोस्तिनो’ (The Postman) या इटालियन सिनेमात शक्य करून दाखविलं आहे. हा सिनेमा पाब्लो नेरुदाच्या जीवनातील एक सुंदर अध्याय आपल्यासमोर मांडतानाच सोबत कवितेची संरचना, कवितेचा प्रभाव आणि तिची व्यवहार्यता यांचे सशक्त रूप प्रेक्षकांसमोर आणण्यात यशस्वी झाला आहे. याला केवळ एक योगायोग म्हणावं की कल्पना आणि वास्तव यांच्या एकीकरणाचे अद्भुत उदाहरण म्हणावे ते समजत नाही; कारण हा सिनेमा एका तिसऱ्या स्तरावर नेरुदासोबतच सिनेमातील प्रेरक व्यक्तिमत्व, निर्माता आणि चित्रपटात सामान्य पोस्टमनची भूमिका निभावणारा इटालियन अभिनेता मासिमो त्रोयसी याची अखेरची पण अविस्मरणीय स्मृती आहे.

'द पोस्टमन' चित्रपटाचे पोस्टर

‘द पोस्टमन’ चित्रपटाचे पोस्टर

पाब्लो नेरुदांच्या कवितेच्या प्रेमात असलेला मासिमो अनेक वर्षांपासून या सिनेमाच्या निर्मितीचे स्वप्न पाहत होता. त्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची त्याने जुळवाजुळवही केली होती. पण तोवर मासिमोला आजाराचा सामना करावा लागत होता. त्याची प्रकृती फार खालावली होती आणि हृदयाची तत्काळ शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली. सिनेमाचे दिग्दर्शक रेडफोर्ड यांनी मासिमोला त्याचा आजार लक्षात घेता सिनेमात मुख्य भूमिका करू नये असा सल्ला दिला. मात्र मासिमोला रोखणं त्यांना शक्य झालं नाही. नेरुदांचे व्यक्तिमत्व आणि कृतत्व यांनी भारावून गेलेल्या मासिमोला या सिनेमात काम करण्यापासून रोखणं अशक्य झालं. त्यासाठी त्याने अत्यंत तातडीने करावयाची शस्त्रक्रिया पुढे ढकलली आणि या सिनेमात आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ भूमिका निभावली. सिनेमाशी संबंधित प्रत्येक पैलूशी तो अखेरपर्यंत सक्रिय होता. मात्र या साऱ्या प्रक्रियेतील सर्वात दुःखद प्रसंग तेव्हा आला जेव्हा सिनेमाचं चित्रीकरण पार पडलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी मासिमोला हृदयविकाराचा धक्का बसला.

या सिनेमातील कवितेसाठी आपलं प्राण त्यागणाऱ्या सामान्य पोस्टमनसारखंच, आपल्या महत्त्वाकांक्षेच्या उच्च शिखरावर असताना सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच मासिमोने प्राण सोडला. परंतु नेरूदा आणि त्यांच्या कवितेमुळे भारावून गेलेल्या एका सामान्य मनुष्याचा गौरव करणारा मासिमोचा हा सिनेमा एका काव्यात्मक वारसासारखा आपल्याजवळ सुरक्षित राहिला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जगभरच्या संवेदनशील चाहत्यांनी ‘इल पोस्तिनो’ला डोक्यावर घेतलं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासोबत पाच इतर अकादमी पुरस्कारांसाठी सिनेमाला नामांकन मिळाली. एकट्या न्यू-यॉर्कमध्ये हा सिनेमा दोन वर्षांपर्यंत चालू राहिला.

प्रसिद्ध इटालियन लेखक अंतोनिओ स्कारमेता यांच्या कादंबरीवर आधारित असणारा हा सिनेमा कल्पना आणि सत्य यांचे अद्भुत असे मिश्रण आहे. इटलीच्या एका छोट्याशा बेटावर घडणाऱ्या या कथेचे मुख्य पात्र आहे, एका गरीब कोळ्याचा अशिक्षित परंतु अत्यंत संवेदनशील मुलगा मारियो. मारियोला आपल्या पारंपरिक व्यवसायाची चीड आहे. केवळ एका सायकलच्या साहाय्याने त्या छोट्याशा सुंदर बेटावर पोस्टमनचे काम मिळविण्यात तो यशस्वी झाला आहे. दूर पहाडावर राहणाऱ्या एकुलत्या व्यक्तीला त्याला आलेली पत्रं आणि पार्सल नेऊन देणं हे त्याचं काम आहे.  तो एकुलता व्यक्ती दुसरं तिसरं कुणी नसून स्वतः पाब्लो नेरूदा आहे.  पन्नासच्या दशकात नेरुदावर त्याच्या देशाने प्रवेशबंदी घातली होती तेव्हा इटली सरकारच्या सौजन्याने काही काळ या छोट्या बेटावर त्याने व्यतित केला होता.

नेरुदाला रोज जगभरच्या विविध भागातून पत्रं येत असतात. निष्पाप बुद्धीचा अशिक्षित मारियो फार आश्चर्यचकित झाला आहे; कारण आयुष्यात प्रथमच त्याला अशा मोठ्या व्यक्तीचा परिचय करून घेण्याची संधी मिळालेली असते. मारियोवर हे काम सोपवताना त्याला सांगण्यात येतं की, पाब्लो नेरूदा फार मोठा कवी आहे; त्यामुळे पत्र देण्याखेरीज इतर कुठल्याही गोष्टीत मारियोने दखल देऊ नये. मारियो रोज त्या बेटावरील सुंदर नैसर्गिक प्रदेशातून नेरुदांच्या घरापर्यंत पत्र पोचविण्यासाठी जाऊ लावतो आणि तिथूनच मारियो आणि पाब्लो नेरूदा यांच्यामधील विलक्षण नात्याला सुरवात होते.

'द पोस्टमन' चित्रपटातील एक दृश्य.

‘द पोस्टमन’ चित्रपटातील एक दृश्य.

तसं पाहिलं तर नेरुदासारखा मोठा कवी आणि एक अशिक्षित, गावठी युवक यांच्यात संवादासाठी पार्श्वभूमी तयार होणं शक्य तरी कसं आहे? परंतु हळूहळू कुठल्याही पूर्वसंकेताविना मारियो आणि पाब्लो नेरूदा यांच्या नात्यात घनिष्टता येऊ लागते. मारियो जेव्हा एका स्थानिक मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याच्यासाठी नेरुदाच्या साहाय्याने कवितेच्या गाभ्यापर्यंत पोहचणं आणि काव्यात्म अभिव्यक्तीने त्या मुळीच हृदय जिंकून घेणं फार आवश्यक बनतं. मारियोच्या निष्पाप सरळपणापुढे नेरुदाची अलिप्तता गळून पडते. आणि एक जिवलग दोस्तासारखे नेरूदा मारियोला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी झटू लागतात.

नेरुदाच्या मदतीने मारियो शेवटी आपले प्रेम जिंकून घेतो मात्र तेव्हाच त्याला हेही समजून चुकते की, नेरुदावर त्याच्या देशाने लादलेली प्रवेशबंदी आता उठवली आहे. नेरूदा आता आपल्या देशात परत जाऊ शकतात. जड अंतःकरणाने मारियो पाब्लो नेरुदांचा निरोप घेतो. नेरूदा निघून गेले तरी कवितेचं एक अक्षय्य भांडार त्यांनी मारियोसाठी उघडून दिलेलं असतं. नेरुदांच्या सहवासात आणि कवितेच्या जादुई प्रभावाने मारियोचं जीवन बदलून जातं. नेरूदा निघून गेल्यानंतर मारियो महिनोंमहिने नेरुदाकडून येणाऱ्या पत्राची वाट पाहत राहतो. अनेक वर्षांनंतर त्याला पत्र तर येते मात्र ते नेरुदाच्या सेक्रेटरीने त्याच्या मागे राहिलेल्या सामानासाठी. पण मारियोची काही तक्रार नाही. त्या बेटावर राहत असताना नेरूदानी कवितेच्या माध्यमातून त्याला जे दिलं तेच त्याच्यासाठी पुष्कळ होतं.

“ते कशाला माझी आठवण ठेवतील?…मला विसरणं स्वाभाविकच आहे.’ आपले अश्रू कसेबसे रोखून मारियो स्वतःची समजूत काढतो. मारियो नेरुदासाठी समुद्राच्या गाजेचा, कोळ्यांचा आवाज आणि पक्षांचा स्वर नेरूदानीच दिलेल्या एका छोट्या रेकॉर्डरमध्ये टिपून ठेवतो. शहरात निघणाऱ्या एका मजूर रॅलीत नेरुदासाठी लिहिलेल्या कविता तो वाचून दाखविणार असतो. मात्र तसे होत नाही. नियतीने त्याच्यासाठी एक निराळेच भवितव्य योजलेले असते. बऱ्याच वर्षांनंतर नेरूदा आपल्या दोस्ताला भेटायला परत त्या बेटावर येतात तेव्हा त्यांना मारियोची पत्नी आणि मुलगा भेटतात. मारियोने आपल्या मुलाचं नाव नेरुदाच्या नावावरून पाब्लितो असं ठेवलेलं असतं. नेरूदा भारावून जातात. मात्र मारियोशी त्याची भेट होणं आता शक्य नसतं. काही वर्षांपूर्वी एका मजूर रॅलीत पाब्लो नेरुदासाठी लिहिलेल्या कविता लोकांना ऐकवण्यापूर्वीच मारियो गोळी लागून मृत्युमुखी पडलेला असतो. आपल्या अविस्मरणीय अशा मित्राच्या निधनाची वार्ता ऐकून नेरूदा अपार दुःखाने निश्चल उभे राहतात. सिनेमा संपतो.

एखाद्या सुंदर कादंबरीवर तेवढाच सुंदर चित्रपट निघावा, असा दुर्मिळ योगायोग या सिनेमात घडून आला आहे. सिनेसमीक्षक डॅनियल कॅनन यांनी मासिमोच्या अभिनयाबद्दल लिहिलं आहे; “मासिमोचा अभिनय सर्वथा अविस्मरणीय आहे…आपली एक-एक उडती नजर आणि आणि मोठ्या मोठ्या डोळ्यांनी मासिमो एवढं काही सांगून जातात की ते सांगण्यासाठी लोक आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालतात.’

मासिमो आणि मायकेल रेडफोर्ड यांचा ‘इल पोस्तिनो’ हा सिनेमा हा एक जादूभरी मंतरलेला अनुभव आहे.

भाषांतर – अभिषेक धनगर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1