नवी दिल्लीः जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० दोन वर्षांपूर्वी रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्
नवी दिल्लीः जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० दोन वर्षांपूर्वी रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले होते. त्यानंतरच्या काळात काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत ९६ नागरिक, ८१ जवान मारले गेले तर ३६६ दहशतवादी ठार झाल्याची माहिती सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली.
काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंग यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तर दिले. यात ५ ऑगस्ट २०१९ ते ३० नोव्हेंबर २०२१ या काळात ९६ नागरिक, ८१ जवान व ३६६ दहशतवादी ठार झाले, असे त्यांनी स्पष्ट केले.
राय यांनी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, १६ एप्रिल २०१७ ते ४ ऑगस्ट २०१९ या काळात जम्मू व काश्मीरमध्ये ८४३ दहशतवादी हल्ले झाले. त्यात ८६ नागरिक व ७८ जवान मारले गेले. त्यानंतर ५ ऑगस्ट २०१९ ते २२ नोव्हेंबर २०२१ या काळात ४९६ दहशतवादी हल्ले झाले, त्यात ७९ नागरिक व ४५ जवान मारले गेले.
काश्मीरमधील दहशतवाद थांबवण्यासाठी आपले सरकार ३७० कलम रद्द करत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितले होते. पण गेल्या दोन वर्षांत प्रत्यक्षात काश्मीरमधील दहशतवाद आटोक्यात आलेला नाही व तेथे शांतताही प्रस्थापित झालेली नाही.
डिसेंबर २०२०मध्ये जम्मू व काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी ३७० कलम रद्द केल्यानंतर दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झाली असली तरी या निर्णयानंतर दहशतवादी संघटनांत तरुणांची भरती होण्याची संख्या वाढल्याचे सांगितले होते.
काश्मीर गेली दोन वर्षे लॉकडाऊनचा सामना करत आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये संचारबंदी, इंटरनेट बंदी लावण्यात आली होती. त्यानंतर कोविड-१९ महासाथीचा मोठा फटका या राज्याला बसला होता. सध्या लॉकडाऊन उठवल्यानंतर व अन्य निर्बंध कमी केल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल असा अंदाज होता. पण गेल्या ऑक्टोबरमध्ये नागरिकांच्या हत्या करण्याच्या २५ घटना घडल्या आहेत.
मूळ वृत्त
COMMENTS