नवी दिल्लीः गेली तीन दशके भारतात वाहन उद्योगात अग्रेसर असलेली अमेरिकेची कारनिर्मिती कंपनी फोर्डने भारतातील दोन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्लीः गेली तीन दशके भारतात वाहन उद्योगात अग्रेसर असलेली अमेरिकेची कारनिर्मिती कंपनी फोर्डने भारतातील दोन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या कारमुळे देशातील कार उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. फोर्ड कारचे भारतातले उत्पादन बंद झाल्याने भारतातील ग्राहकाला आता अमेरिकेतून कारची मागणी करावी लागेल. या निर्णयामुळे फोर्डच्या इकोस्पोर्ट, फिगो व एस्पायर या कारची विक्रीही बंद होणार आहे.
फोर्ड कंपनीचे चेन्नई व साणंद (गुजरात) येथे सुमारे अडीच अब्ज डॉलर गुंतवणुकीचे दोन कारनिर्मिती प्रकल्प होते. पण गेल्या १० वर्षांत कंपनीला सुमारे दोन अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले आहे. आता कंपनीने कारनिर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या कंपन्यांमधील सुमारे ४ हजाराहून अधिक कामगार,१५० वाहनविक्रीदारांना त्याचा फटका बसणार आहे. फोर्ड कंपनीची देशात ३०० हून अधिक विक्री केंद्रेही आहेत.
आता साणंदमध्ये कारच्या इंजिनाची निर्मिती केली जाईल व तिची जगभरात निर्यातही होणार आहे. पण येथील वाहनजुळणी ही २०२१च्या चौथ्या तिमाहीनंतर बंद होईल. तर चेन्नईमधील वाहन व इंजिन निर्मिती प्रकल्प २०२२च्या दुसर्या तिमाहीत बंद होणार आहे.
आपली कंपनी भविष्यात इंजिन निर्मिती व इंजिनिअयरिंगवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे फोर्डचे अध्यक्ष व सीईओ जिम फार्ले यांनी म्हटले आहे.
कंपनीने बेरोजगार कामगारांना योग्य तो मोबदला देणार असल्याचेही जाहीर केले आहे. आमच्या निर्णयाची झळ बसलेल्या कामगाराला योग्य पॅकेज दिले जाईल असे कंपनीने म्हटले आहे.
फोर्ड इंडियाकडून दरवर्षी ६,१०००० इंजिन व ४,४०००० वाहने तयार केली जातात.
१९९१च्या उदारीकरणाच्या निर्णयानंतर फोर्ड ही जगातील पहिली कारनिर्मिती कंपनी होती ज्यांनी भारतात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तीन दशके ही कंपनी भारतात कार्यरत होती. ऑगस्टमध्ये भारताच्या कार बाजारपेठेतील फोर्डचा हिस्सा १.४ टक्के इतका होता.
भारताच्या कार बाजारपेठेत जपानची मारुती सुझुकी, द. कोरियाची ह्युंडाई मोटार या दोघांचा मिळून ६० टक्के हिस्सा आहे.
२०१७मध्ये अन्य अमेरिकी कंपनी जनरल मोटर्सने भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला होता. जनरल मोटर्सने गुजरातमधील हलोल येथील आपला वाहन निर्मिती प्रकल्प बंद केला होता. त्या शिवाय महाराष्ट्रातील तळेगांवमधील प्रकल्प चीनची कंपनी ग्रेट वॉल मोटर्सला विकला होता.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकी मोटार सायकल कंपनी हार्ले डेव्हिडसनने हरियाणामधील बावल येथील आपला प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
मूळ बातमी
COMMENTS