मुस्लिमांना बलात्काराची धमकी देणारा मुनी सरकारी वकिलांसाठी सन्माननीय

मुस्लिमांना बलात्काराची धमकी देणारा मुनी सरकारी वकिलांसाठी सन्माननीय

नवी दिल्लीः फेक न्यूजचा पर्दाफाश करणाऱ्या अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबैर यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अन्य एका प्रकरणात हंगामी जामीन मं

‘बाबरीचा निकाल बिलकुल योग्य नाही’
उ. प्रदेशात निवडणुका ८० विरुद्ध २० होतील : आदित्य नाथ
मंदिर परिसरात मुस्लिमांच्या व्यवसायबंदीवर भाजपचे २ आमदार नाराज

नवी दिल्लीः फेक न्यूजचा पर्दाफाश करणाऱ्या अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबैर यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अन्य एका प्रकरणात हंगामी जामीन मंजूर केला.

झुबैर यांनी हिंदुत्ववादी नेते यती नरसिंहानंद, महंत बजरंग मुनी व आनंद स्वरुप यांच्यावर दोन धर्मात, समाजात घृणा, तेढ पसरवण्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झुबैरविरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा व हिंदुत्ववादी नेत्यांचा अवमान केल्याचा आरोपावरून उ. प्रदेशातल्या सीतापूर जिल्ह्यातून पोलिस फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्या संदर्भात शुक्रवारी झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत झुबैर यांना ५ दिवसांचा हंगामी जामीन मंजूर केला. त्याच बरोबर झुबैर याला न्यायालयीन क्षेत्राच्या (दिल्ली) बाहेर न जाण्याचा, कोणतेही ट्विट न करण्याचा बंधन न्यायालयाने घातले आहे. न्यायालयाने झुबैर यांना संरक्षणही देण्याचे आदेश दिले आहेत.

झुबैर याच्या जामीन प्रकरणावर सुनावणी होत असताना देशाचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी बजरंग मुनी हे सीतापूर येथील प्रतिष्ठित, आदरणीय धार्मिक नेते असून त्यांच्या मागे मोठा भक्त समुदाय आहे. अशा व्यक्तीवर धार्मिक तेढ पसरवण्याचा आरोप केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात. झुबैर हे एका मोठ्या सिंडेकेटचा भाग आहेत, असा युक्तिवाद केला.

तुषार मेहता यांच्या सोबत अतिरिक्त सॉलिसीटर जनरल एस. व्ही. राजू हेही होते. हे दोघे बजरंग मुनी यांचा बचाव करत होते.

बजरंग मुनी कोण आहे?

ज्या बजरंग मुनी यांचा बचाव सरकारी वकिलांकडून केला जात होता त्या बजरंग मुनींकडून मुस्लिम धर्माविरोधात तेढ निर्माण करणाऱी विधाने झाली होती. हिंदूंनी लव जिहादला प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम स्त्रियांवर सामूहीक बलात्कार केले पाहिजेत असे त्यांनी विधान केले होते. जो मुल्ला महिलांना त्रास देईल त्याच्या बहीण/मुलीचे मी जाहीर अपहरण करेन, तिला संगत देऊन तिच्यावर बलात्कार केला जाईल याची खात्री मी करेन, असे विधान केले होते. या संदर्भातला एक व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हीडिओची दखल घेत त्या संदर्भात मुनी यांच्यावर पोलिस फिर्याद दाखल करावी असे राष्ट्रीय महिला आयोगाने उ. प्रदेश पोलिसांना सांगितले होते.

त्यानंतर मुनी यांना १३ एप्रिल २०२२ रोजी अटक झाली पण २४ एप्रिलला जामीन देण्यात आला. जामीन मिळाल्यानंतरही मुनी यांनी आपण आपल्या विधानावर कायम असल्याचे सांगितले. माझ्या धर्मासाठी मला एक हजारवेळा जरी तुरुंगात जावे लागले तरी मी जाण्यास तयार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. प्रसंगी आयुष्यही पणाला लावेल असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, या प्रकरणाचा दिल्ली प्रकरणातील फिर्यादीशी संबंध नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

७ जुलैला सीतापूर येथील स्थानिक न्यायालयाने झुबैर यांना १४ जुलैपर्यंत उ. प्रदेश पोलिसांकडे कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी कडक संरक्षणात झुबैर यांना तिहार जेलमध्ये आणण्यात आले होते. झुबैर यांनी सीतापूर फिर्यादीवरून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

जाणूनबुजून लक्ष्य

झुबैर यांना या आधी ‘हनीमून-टू-हनुमान हॉटेल’ ट्विट फोटोप्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. हा फोटो १९८३मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘किसीसे ना कहना’ या प्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या हिंदी चित्रपटातला होता. झुबैर यांच्यावर धार्मिक तेढ व दंगल भडकवण्याच्या आरोप दिल्ली पोलिसांनी लावले आहेत व ते सध्या  अटकेतही आहेत.

झुबैर यांनी हे ट्विट २४ मार्च २०१८ सालमध्ये केले होते. हे ट्विट म्हणजे हॉटेल बोर्डाचे फोटो होता व ते गेले चार वर्षे अजूनही त्यांच्या ट्विटर अकाउंटवर कायम होते.

झुबैर यांच्या या ट्विटविरोधात तक्रार एका ट्विटर हँडलवरून करण्यात आली होती, ते अकाउंट ऑक्टोबर २०२१मध्ये उघडण्यात आले होते. या अकाउंटमधून एकदाच १९ जूनला ट्विट करण्यात आले होते, त्या ट्विटमध्ये झुबैरला लक्ष्य करण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांनी ज्या फोटोवरून झुबैर यांना अटक केली तो फोटो २०१८मध्ये इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखातही प्रसिद्ध झाला होता. त्यावर कोणाचे लक्षही गेले नव्हते व अशा फोटोने धार्मिक तेढ निर्माण झाली अशी तक्रारही कोणी केली नव्हती.

महत्त्वाची बाब अशी की किसीसे ना कहना चित्रपटातील या हॉटेलच्या बोर्डावर सेन्सार बोर्डने हरकत घेतली नव्हती. हा चित्रपट आजपर्यंत अनेक वेळा दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवर दाखवण्यात आला आहे.

प्रेषित पैगंबर यांच्यावर अवमानास्पद टीका केल्यामुळे निलंबित व्हाव्या लागलेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी झुबैर यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. झुबैर यांच्या अनेक ट्विटमुळे आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर #ArrestMohammedZubair या हॅशटॅगखाली राष्ट्रीय स्तरावर ट्विटर ट्रेंड चालू करण्यात आला आणि उ. प्रदेशातून एक फिर्याद दाखल करण्यात आली. झुबैर यांनी आपल्या ट्विटमधून धार्मिक तेढ निर्माण केली असा आरोप करण्यात आला.

झुबैर आपल्या ट्विटर हँडलवरून अनेक उपहासात्मक ट्विट, फोटो प्रसिद्ध करत असतात, त्यांचे बहुतांश ट्विट सत्ताधारी भाजप व कडव्या हिंदुत्ववादी गट यांच्याविरोधात असल्याने ते हिंदुत्ववादी गटांचे विशेष करून लक्ष्य झाले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0