लँडमार्क माइलस्टोन – अमिताभ बच्चन

लँडमार्क माइलस्टोन – अमिताभ बच्चन

दिलीपसाहेबांचे चित्रपटसृष्टीतील योगदान पाहता, भारतीय चित्रपटांचा इतिहास माझ्या अंदाजाप्रमाणे "दिलीपसाहेबांच्या अगोदर' आणि "दिलीपसाहेबांच्या नंतर' असा मांडावा लागेल. जेव्हा तुम्ही प्रवास मोजता, तेव्हा तुम्ही मैलाचा दगड बदलू शकत नाही. दिलीपसाहेब हे आमच्या फिल्म इंडस्ट्रीमधील मैलाचा दगड होते...

चित्रपटसृष्टीत शिरकाव करण्यापूर्वी एका सुट्टीत मुंबईला आलो होतो. तेव्हा माझ्या एका मित्राने ट्रीट म्हणून मला हॉटेलमध्ये नेले. योगायोग आणि आश्चर्य म्हणजे, दिलीपसाहेबही आपल्या मित्रासोबत त्याच रेस्टॉरंटमध्ये होते. त्यांना पाहून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मला दिलीपसाहेबांची सही घ्यायची होती. मी धावत धावत जवळच्या स्टेशनरीमध्ये गेलो आणि ऑटोग्राफ बुक घेऊन आलो. पण मी आलो, तेव्हा दिलीपसाहेबांभोवती त्यांच्या चाहत्यांचा गराडा होता आणि ते त्यांच्याशी संवाद साधण्यात मग्न होते. त्यांचे संभाषण मध्येच थांबवणे, मला प्रशस्त वाटले नाही. त्यामुळे काहीसा निराश होऊन, मी माझ्या टेबलापाशी परतलो.

पुढे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला, तेव्हा एका गेट-टुगेदरमध्ये दिलीपसाहेबांशी जुजबी भेट झाली. एखादे काम परिपूर्ण होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही, ही शिकवण दिलीपसाहेबांकडून मला त्यावेळी मिळाली. आपल्या सहकलाकारांचा व त्यांच्या कामाचा आदर करण्याची वृत्ती मी त्यांच्याकडूनच आत्मसात केली. त्यांच्या या वृत्तीबाबतचा एक प्रसंग माझ्या चांगलाच स्मरणात आहे. “शक्ति’ सिनेमासाठी माझ्या मृत्यूच्या दृश्याचे चित्रीकरण करतानाचा हा प्रसंग होता. आम्हा कलाकारांसाठी मरणाचे दृश्य साकारणे, हे एक आव्हान असते. कारण वेगवेगळ्या सिनेमांमध्ये तसा शॉट देताना प्रत्येक वेळी पार्श्वभूमी वेगवेगळी असते. ती पार्श्वभूमी आणि दिग्दर्शकाच्या अपेक्षा यांचे भान ठेवून हा अभिनय करावा लागतो. “शक्ति’मधील हा सीन जुहू विमानतळावर चित्रित झाला होता. या सीनची एकदा रिहर्सल करावी, म्हणून मी आणि दिलीपसाहेब धावपट्टीकडे चाललो होतो. चित्रीकरणाच्या ठिकाणी विमानतळावरील कर्मचारी, युनिट कर्मचारी, लाइटमन आिण बघे मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने एकंदर गोंधळ, गडबड असे वातावरण होते. माझ्या नेहमीच्या सवयीनुसार, या सीनसाठी माझी मानसिक आणि भावनिक तयारी झाली पाहिजे, हे दिलीपसाहेबांच्या लक्षात आले. पण गर्दीला त्याची तमा नव्हती. गोंधळ कमी होत नव्हता. दिलीपसाहेबांनी मला थांबण्यास सांगितले आणि त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचा इशारा केला. ते शांत स्वरात तरीही खंबीरपणे म्हणाले, कलाकार एखाद्या भूमिकेसाठी जेव्हा तळमळीने, जीव ओतून काम करतात, तेव्हा सेटवरील सहकाऱ्यांकडून त्यांना शांतता राखण्याची आणि त्यांच्या कामाविषयी आदर बाळगण्याची किमान अपेक्षा असते. “कलाकारांचा आदर करायला शिका’ असे त्यांनी सुनावले आणि पॅकअप करण्यास सांगितले. या प्रसंगाने मी आणि उपस्थित कर्मचारी हेलावून गेलो. त्यांचे हे वागणे सूचक होते, कारण हा सीन माझा होता आणि मी तो जास्तीत जास्त चांगला द्यावा, अशी त्यांची अपेक्षा होती.

दिलीपसाहेब हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेलेल्या प्रत्येकाला ते कायम वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करायचे. घरात भावंडांमध्ये ते थोरले असल्याने कदाचित त्यांच्या स्वभावात हा वडीलधारेपणा आला असावा. मला आठवतंय, एका रात्री उशिरा सलीम-जावेद या लेखकद्वयीने मला पूर्वपरवानगी न घेता दिलीपसाहेबांच्या घरी चलण्याविषयी आग्रह धरला. मी पेचात पडलो आणि नाखुशीनेच तयार झालो. कारण अशा प्रकारे आगंतुकासारखे कोणाकडे जाणे, तेही एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे, माझ्या स्वभावात बसणारे नव्हते. पण ते दोघे ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी, आम्ही दिलीपसाहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो. वॉचमनने आम्हाला सांगितले, की साहेब आता कामं संपवून बेडरुममध्ये गेले आहेत. मी सलीम-जावेदना आपण परत जाऊ या, असे म्हणू लागलो. पण माझे न ऐकता, त्यांनी वॉचमनला सांगितले, साहेबांना सांगा की, त्यांचे काही मित्र गेटवर आलेत, त्यांना भेटण्यासाठी!

थोड्याच वेळात हॉलमधील दिवे लागल्याचे, आमच्या लक्षात आले आणि दिलीपसाहेबांचा नोकर आम्हाला आत घेऊन गेला. साहेब त्यांच्या बेडरुममधून हसत हसत खाली आले आणि त्यांनी आनंदाने आमचे स्वागत केले. आम्ही इतक्या अडनिड्या वेळी जाऊनही, ते अतिशय शांत व आतिथ्यशीलपणे वागले होते. मग आमच्या गप्पा अशा काही रंगल्या, की अखेर पहाटे चारच्या सुमारास आम्ही नाखुशीनेच त्यांच्याकडून निघालो. त्यांनी सांगितलेले अनेक गमतीदार किस्से, आठवणी ऐकून आम्ही हरखून गेलो.

एकंदर दिलीपसाहेबांचे चित्रपटसृष्टीतील योगदान पाहता, भारतीय चित्रपटांचा इतिहास माझ्या अंदाजाप्रमाणे “दिलीपसाहेबांच्या अगोदर’ आणि “दिलीपसाहेबांच्या नंतर’ असा मांडावा लागेल. जेव्हा तुम्ही प्रवास मोजता, तेव्हा तुम्ही मैलाचा दगड बदलू शकत नाही. दिलीपसाहेब हे आमच्या फिल्म इंडस्ट्रीमधील मैलाचा दगड होते, असे मला वाटते. लँडमार्क कायम असतो; तुम्हाला त्यापासूनचे अंतर मोजावे लागते- अगोदरचे वा नंतरचे, एवढेच!

COMMENTS