अलिगढ विद्यापीठात पोलिसांची क्रूर मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ

अलिगढ विद्यापीठात पोलिसांची क्रूर मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ

पोलिस आणि आरएएफ विद्यार्थ्यांचा पाठलाग करून मारत असताना मुस्लिमविरोधी शिवीगाळ करत होते आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत होते असे विद्यार्थ्यांनी टीमला सांगितले.

विवेक व प्रेम पसरवणं ही आपली जबाबदारी
शार्जिल इमामला बिहारमधून अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल
जामिया मिलिया व अलिगड मुस्लिम विद्यापीठात पोलिसांची दडपशाही

नवी दिल्ली:अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU) मधील पोलिस कारवाईवरीलएका तथ्यशोधन अहवालामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या विरोधात अत्यंत क्रूर कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे विद्यार्थी नुकत्याच मंजूर झालेल्या नागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९ च्या विरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील हिंसक कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी निदर्शन करत होते.

अहवालामध्ये विद्यापीठ प्रशासन, जिल्ह्यातील अधिकारी आणि राज्य सरकारला कँपस आणि त्यातील रहिवाश्यांना संरक्षण देण्याच्या त्यांच्या कर्तव्यात अपयशी ठरल्याबद्दलच नव्हे तर कँपसमध्ये सशस्त्र पोलिसांना आमंत्रित केल्याबद्दलही जबाबदार धरण्यात आले आहे. “अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीला वेढा” या शीर्षकाचा हा अहवाल २४ डिसेंबर रोजी दिल्ली येथे प्रसिद्ध करण्यात आला.

१५ डिसेंबरच्या रात्री एएमयूच्या विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाईच्या बातम्यांनंतर वकील, मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि विचारवंत यांचा समावेश असलेल्या सजग नागरी समाजाच्या सदस्यांनी १७ डिसेंबर रोजी एएमयू कँपसला भेट दिली.

मानवाधिकार कार्यकर्ता हर्ष मंदेर यांच्या नेतृत्वाखालील या पथकाच्या म्हणण्यानुसार, ते शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर आणि विद्यापीठ प्रशासनाचे रजिस्ट्रार आणि प्रॉक्टरसह इतर अनेक सदस्यअशा १०० लोकांशी बोलले.

हे पथक ज्या लोकांशी बोलले त्या सर्व लोकांच्या साक्षींच्या आधारे ते म्हणतात, यूपी पोलिस आणि रॅपिड ऍक्शन फोर्स यांच्याद्वारे करण्यात आलेल्या अंदाधुंद कारवाईमुळे अनेक विद्यार्थ्यांची हाडे मोडली, त्यांना गंभीर जखमा झाल्या, मुका मार लागला आणि तीव्र मानसिक धक्का बसला.

१५ डिसेंबर पासून ज्या काही घटना घडल्या त्यांचा अनेक साक्षीदारांच्या कथनामधून आढावा घेतल्यानंतर, या पथकाला असे वाटते की मुळात पोलिसांना कँपसमध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी दिलेली नसावी, मात्र झालेल्या हिंसेला वैध स्वरूप देण्यासाठी ती नंतर देण्यात आली.

“विद्यापीठाचे व्हाइस चॅन्सेलर, रजिस्ट्रार आणि प्रॉक्टर म्हणतात, की दगडफेक आणि इतर हिंसेच्या घटनांमुळे त्यांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि कँपसमधील लोकांच्या आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी आरएएफ आणि पोलिसांना विद्यापीठाच्या कँपसवर प्रवेशाला परवानगी द्यावी लागली. पण खरोखरच तसे असेल तर बाब-ई-सैद गेटचेच चार तुकडे का झाले आहेत हा प्रश्न पडतो. त्या गेटचा जड लोखंडी कोपरा व्यवस्थित कापलेला आहे, मात्र त्याला लावलेली कुलपे जशीच्या तशी आहेत,” असे अहवालात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांनी पथकाला सांगितले, की चेहऱ्यावर मास्क लावलेले साध्या वेशातले अनेक नागरिक, जे विद्यार्थ्यांपैकी नव्हते, ते गेटच्या दोन्ही बाजूंनी दगड फेकत होते. त्यामुळे कँपसमध्ये पोलिसांना प्रवेश देण्यासाठी मुद्दाम हे केले गेले असे म्हणता येते. पोलिसांनी विद्यार्थ्यांचा पाठलाग केला आणि बॅटनने अंदाधुंद मारहाण करायला सुरू केली. अहवालात असेही म्हटले आहे, की त्यांनी अश्रूधुराची नळकांडी, स्टन ग्रेनेड्स आणि गोळ्यांचा मारा केला.

अहवालात पोलिस आणि आरएएफने जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय सहाय्यही मिळू दिले नाही, अगदी रुग्णवाहिकेच्या चालकावरही हल्ला केला असा आरोप करण्यात आला आहे. “आम्ही हेरिटेड मॉरिसन बॉइज होस्टेलला भेट दिली, जिथे सैनिकांनी गार्डना मारले आणि विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये अश्रूधूराचा मारा केला, जेणेकरून ते बाहेर येतील. एका खोलीला आग लागली जी विद्यार्थ्यांनी विझवली. विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी जखमी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी दहा रुग्णवाहिका पाठवल्या पण सैनिकांनी त्यांना परवानगी देण्याचे नाकारले, आणि एका चालकाची हाडेही मोडली,” असेही त्यात म्हटले आहे.

यूपी केडरमधील एक सेवेत असलेला पोलिस अधिकारी विद्यापीठाचा रजिस्ट्रार आहे ही गोष्ट पथकाला धक्कादायक वाटते. “त्यांचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांची देखभाल करणारा पालक यापेक्षा शिक्षा करण्यात आनंद मानणाऱ्या कठोर पोलिसासारखाच होता,” असे त्यांचे म्हणणे आहे. मंदेर स्वतः भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आहेत.

अहवाल प्रसिद्ध करण्याच्या वेळी, मंदेर आणि माजी आयपीएस अधिकारी चमन लाल या दोघांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला व म्हटले, विद्यार्थ्यांना ‘दहशतवादी’ असल्यासारखे वागवले जात होते आणि पोलिस आणि आरएएफ या दोघांनीही वापरलेल्या पद्धती अनावश्यक होत्या.

“स्टन ग्रेनेड्स हे केवळ युद्ध परिस्थितीतच किंवा धोकादायक दहशतवाद्यांच्या विरोधात लष्करी पोलिस कारवाईमध्येच वापरले जातात, विद्यार्थी निदर्शने मोडण्यासाठी नाही. त्यांचा वापर हा सामान्य अशांतता परिस्थितीसाठीच्या एसओपीचा भाग नसतो. आणि अगदी युद्धाच्या वेळी सुद्धा जखमींना वाचवण्यासाठी रुग्णवाहिकांना परवानगी दिली जाते,” असे अहवालात म्हटले आहे.

पोलिस आणि आरएएफ विद्यार्थ्यांचा पाठलाग करून मारत असताना मुस्लिमविरोधी शिवीगाळ करत होते आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत होते असे विद्यार्थ्यांनी टीमला सांगितले.

अहवालात एका विद्यार्थ्याला उद्धृत केले आहे, “असे वाटत होते की पोलिसांच्या मनात खोलवर आमच्याबद्दल द्वेष होता आणि आम्हाला अत्यंत क्रूरपणे वागवून ते त्यांचा तो द्वेष प्रगट करत होते.”

अहवाल प्रसिद्धीच्या वेळी, वक्त्यांनी असाही आरोप केला, की एएमयूमधील पोलिस कारवाईच्या मागे धर्मांध प्रेरणा होत्या.“एएमयू मध्ये जे झाले ते जेएनयूमध्ये होणार नाही,” मंदेर म्हणाले. “आपण याची नोंद घेतली पाहिजे, की जिथे पोलिसांनी अशी अंदाधुंद कारवाई केली त्या जामिया आणि एएमयू या दोन्ही संस्था अल्पसंख्यांकांच्या संस्था आहेत,” असे सईदा हमीद म्हणाल्या.

देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये निदर्शने चालू आहेत, मात्र त्या ठिकाणी अशी तीव्र पोलिस कारवाई झाली नाही. या दोन विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांची धार्मिक ओळख हे यामागचे कारण असू शकते याबाबत वक्ते सहमत होते.

१०० विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि १०० जखमी आहेत, ज्यापैकी २० गंभीर जखमी आहेत.

पथकाचा असा दावा आहे की विद्यार्थ्यांनी मालमत्तेचे जे नुकसान केले त्याचे सर्व पुरावे त्यांनी कँपसला भेट देण्यापूर्वीच नष्ट करण्यात आले होते.

“जोराने आघात होणे व त्यातून मेंदूत रक्तस्त्राव होणे या गोष्टी रबर गोळ्यांचा मारा झाल्याचे दर्शवतात. एका पीएचडी विद्यार्थ्याच्या हातात स्टन ग्रेनेड फुटल्यामुळे त्याचा हात मनगटापासून कापावा लागला,” असे अहवालात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: