अनेक अर्थांचा ‘अनेक’

अनेक अर्थांचा ‘अनेक’

हाणामारी होते, शांतता करार होतात, अश्वासनांची खैरात होते. तरी मणीपूरच्या लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, तिथं शांतता नांदत नाही. असा लोचा आहे. तर हा लोचा संपत का नाही या प्रश्नाचा शोध या चित्रपटात आहे.

झुंडशाहीला विरोधः मान्यवरांच्या पत्राची पीएमओला माहिती नाही
‘अल्ला हू अकबर’ ही अवमानकारक प्रतिक्रिया नव्हती’
अज्ञात आहे पण ही पोकळी नाही

‘अनेक’ या नावाचा सिनेमा आला आणि गेला.

पोलिटिकल थ्रिलर.

किती लोकांनी पाहिला कुणास ठाऊक.

माझ्या जवळच्या सिनेमाघरात एकच शो होता. रविवार असूनही सिनेघरात मी धरून २३ लोक होते. त्यातले दोघे जण जेमतेम मध्यंतरापर्यंत होते, मध्यंतरात बाहेर पडले ते गुलच झाले.

बाहेर पडताना ते सिनेमाला शिव्या देत होते. शिव्या म्हणजे शिव्या. त्यांना सिनेमात काय आहे ते कळत नव्हतं.

ते स्वाभाविकच म्हणायला हवं. एका जॉन्सन नावाच्या माणसाचा सतत उल्लेख येतो आणि जॉन्सन काही दिसत नाही. सिनेमाच्या टोकाला उलगडत की जॉन्सन नावाचा माणूसच नसतो, जॉन्सन हे प्रतिक असतं, बंडाचं ते प्रतिक असतं, त्या  नावाचा हाडीमाशी माणूसच नसतो.

बाहेर पडलेले दोघे वैतागले कारण त्यांना मध्यंतर आला तरी जॉन्सन का दिसला नाही, हा कसला सिनेमा असं ते चिडून बोलत होते.

मणीपूर या पूर्वोत्तर राज्यातली इन्सर्जंसी, बंड,  हा चित्रपटाचा विषय होता. भारतातले लोक  मणीपुरीना त्यांच्या दिसण्यावरून चिनी म्हणतात, भारतीय मानत नाहीत. दिल्लीकर त्यांच्यावर राज्य करतात, भारत देशाला ते परके वाटतात. त्यामुळं अनेक लोक भारतातून सुटका करायचा प्रयत्न करतात, फुटीर होतात. चळवळी करतात. चळवळ केली की सरकार लष्करी बळ वापरून चळवळ्यांना आणि ते रहात असलेल्या वस्त्यांना खलास करून टाकतं. मग ते चळवळे शस्त्रं गोळा करतात.

असली भानगड.

या फुटीर लोकांना बाहेरचे लोक, भारत या देशाला संकटात लोटू पहाणारे लोक मदत करतात. चळवळीचं रूप बदलतं.

तर भारत सरकार वेळोवेळी बंडखोरांविरुद्ध कारवाया करतं आणि त्यांच्याशी शांतता करार करतं. शांतता करार करताना मणीपुरच्या प्रजेच्या भल्याची आश्वासनं देतं.

हाणामारी होते, शांतता करार होतात, अश्वासनांची खैरात होते. तरी मणीपूरच्या लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, तिथं शांतता नांदत नाही.

असा लोचा आहे.

तर हा लोचा संपत का नाही या प्रश्नाचा शोध या चित्रपटात आहे.

म्हणजे सिनेमा राजकीय आहे, सामाजिक आहे.

सिनेमा संपताना शांतता प्रकरणात अडकलेला चित्रपटाचा नायक पोलीस अधिकारी आपल्या वरिष्ठाला विचारतो की स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी शांतता का नांदत नाही.

नायक स्वतःच म्हणतो जर लोकांचीच शांतता नांदावी अशी इच्छा नसेल तर शांतता कशी नांदणार.

बाप रे.

कठीण विषय दिग्दर्शकानं रंजक केलाय. सिनेमा म्हणजे शेवटी रंजन तर असतं. त्यात नाट्य हवं, रोमान्स हवा, थरार हवा, उत्कंठा हवी, फॅमिली ड्रामा हवा. ते सारं या सिनेमात दिग्दर्शकानं आणलंय

मणीपूर, तिथल्या दाट वस्त्या, तिथली शेतं, तिथंही हिरवीगार खोरी दिग्दर्शकानं छान टिपलीयत. चित्रपटात मधे मधे मणिपुरी भाषेतले संवाद येतात. दोन गाणीही मणीपुरी भाषेत आणि संगितात आहेत. कानाला नवं काही तरी ऐकायला मिळतं.

पोलिस कारवायांचं चित्रण थरारक आहे.

चित्रपटाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे कलाकारांची निवड. उदाहरण. दिल्लीकर अधिकारी अबरार भट्ट. पाहवानं ही भूमिका केलीय. हा अधिकारी देशभक्त, मोठ्या पदावरचा, म्हणून व्यायाम वगैरे करून बांधा जमवलेला, वागण्यात एकदम चुस्त आणि तर्रार, स्मार्ट, दाखवायला वाव होता होता. पण तसा तो दाखवलेला नाही. पोट पँटीच्या पट्यात न मानवणारा, अनुवठीखाली जमा झालेलं प्रचंड मांस, चांगलाच स्थूल माणूस. हा माणूस कसले धाडसी निर्णय घेणार असं वाटावं. पण तो प्रेक्षकांना घट्ट पकडून ठेवतो. भूमिकेतल्या माणसाची कामगिरी आणि त्याचं दिसणं, शरीरयष्टी, व्यक्तिमत्व यात संबंध असायलाच हवा असं नाही. डे ऑफ जॅकलमधे गुन्हा शोधून काढणारा डिटेक्टीव इतका साधा, कोणतंही वैशिष्ट्य नसलेला घरगुती माणूस दाखवलाय. पण तो पकड घेतो. पटकथेत माणूस कसा चितारलाय ते महत्वाचं असतं.

एकदम घट्ट विणलेली पटकथा. पात्रांच्या  जागा अगदी पक्केपणानं ठरवलेल्या. प्रसंगांची गुंफणही वेधक आणि आखीव

काही वेळा घरं आणि रेस्त्राँ एकदम चकाचक दिसतात. तशी ती नसतात, दाखवायचं कारण नाही. पण एकूणात तिकडल्या जगण्याचा बरा अंदाज यावा याची काळजी आर्ट डिरेक्टर आणि दिग्दर्शकानं घेतलीय.

भारत आणि मणीपूर अशा दोन समाजातला दुरावा आणि तणाव हा विषय ठसवण्यासाठी मणीपुरी बॉक्सर मुलीचं पात्र आणि प्रसंग घेतलेत.ते दृश्य म्हणून चांगले आहेत पण त्यांची आवश्यकता नव्हती, ओढून ताणून आहेत. कवीगिरी, लेखकगिरी करण्यासाठी सामाजिक कोन जोडण्याचा प्रयत्न झालाय. मुळ कथानकातच इतकं नाट्य आहे की त्यात ही मुलगी घेण्याची आवश्यकता नव्हती.

विषय सोडून फार न भटकता आटोपशीर सिनेमा अशी एक शैली आहे. युरोप, अमेरिकेत अशा शैलीत पोलिटिकल थ्रिलर करत असतात. त्यात गाणी घालत नाहीत, प्रेम प्रकरण फारसं आणत नाहीत. असे सिनेमे पहाण्याची पश्चिमी लोकांची सवय आहे. भारतात सामान्यतः जड विषय लोकांना नकोच असतात. जड विषय घ्यायचा तर त्यात मसाला घालून त्याचा टपरीवरचा चहा करण्याचा प्रयत्न भारतात होतो, कारण भारतीय माणसाची सिनेमा पहायची पद्दत तशी असते. ‘अनेक’ दोन तास सत्तावीस मिनिटांचा आहे. यातला तासभर कमी केला असता तर सिनेमा आणखी घट्ट झाला असता.  पैसे दिल्यानंतर किमान अडीच तास पडदा चालला पाहिजे अशी लोकांची भावना असते, त्यांना पैसा वसूल व्हायला हवा असतो म्हणून सिनेमा अडीच तासावर नेत असावेत.

चित्रपट चांगला आहे कारण गंभीर, गुंत्याचा विषय फार सांभाळून हाताळलाय.

बंड, फुटीरता, सैन्य-पोलिसांशी होणाऱ्या मारामाऱ्या, राज्य आणि केंद्र सरकार यातले संबंध, देशात राज्यांराज्यांमधला दुरावा,  देशातल्या भाषिक अस्मिता आणि खोटे समज हे मुद्दे फार कातर असतात. मणीपुरी तरूण वेगळा दिसला म्हणून दिल्लीत त्याचा खूनही झाला. पुण्यात रहाणाऱ्या मणीपुरींना पुणं सामावून घ्यायला तयार नसतं. भारतातला लोचा असा की प्रत्येक गट, पंथ, भाषा, वर्ण आपल्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्यांबद्दल प्रचंड गैरसमज, राग, द्वेष, दुरावा बाळगून असतात. दांभिकतेबद्दल तर विचारायलाच नको. आम्ही थोर, प्रश्न मिटला. इतर माणसं बंडल. विषय संपला. पण तरी आम्ही सारे एक.

अशा स्थितीत दिग्दर्शकानं मणीपुरी माणसाची दुःख, भारतातल्या राजकारणाची आणि सरकारची वागण्याची पद्धत, भारतीय माणसाचा दंभ, फार सांभाळून हाताळलाय. चित्रपट पाहताना मुठी वळाव्याशा वाटत नाहीत, विचार करावासा वाटतो.

सारं काही सांगायचं, पण चिथवायचं नाही.

चित्रपट भडक आणि वादग्रस्त आणि म्हणूनच गल्लाभरू करता येईल अशा किती तरी जागा चित्रपटात आहेत. त्या दिग्दर्शकानं टाळल्यात.

अनुभव सिन्हाचं दिग्दर्शन आहे.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: