अँजेला मर्केल जर्मनीच्या चॅन्सेलरपदावरून निवृत्त झाल्या. त्यांचं बरं चाललं होतं. ७५ टक्के जर्मन जनतेला त्यांचं नेतृत्व पसंत होतं. त्यांच्या कोविड हाता
अँजेला मर्केल जर्मनीच्या चॅन्सेलरपदावरून निवृत्त झाल्या. त्यांचं बरं चाललं होतं. ७५ टक्के जर्मन जनतेला त्यांचं नेतृत्व पसंत होतं. त्यांच्या कोविड हाताळणीवर ८५ टक्के जनता खुष होती. जर्मनीतच नव्हे तर साऱ्या युरोपातल्या जनतेनं त्यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. आणखी चारआठ वर्ष जरी त्या सत्तेत राहिल्या असत्या तरी लोकांना ते हवं होतं. आज तरी त्यांच्याएव्हढं समर्थ नेतृत्व युरोपात नाही.
२०१८ सालीच त्यांनी सांगून टाकलं होतं की आता बास झालं, सोळा वर्षे सत्ता उपभोगली, पुरे झालं, आता आपण २०२१ची निवडणुक लढवणार नाही.
त्यांनी २०२१ची निवडणुक न लढवायचं जाहीर केलं तेव्हां कोणीही रडलं बिडलं नाही की मोर्चे काढले नाहीत. लोकांनी आग्रह करणं, मग नेत्यानं गहिवरणं, नंतर नेत्यानं केवळ जनतेच्या आग्रहाखातर आणि देशाची सेवा करण्यासाठी नेतृत्व करण्याचं मान्य करणं असं काहीही झालं नाही.
या जर्मन लोकांना नाटकाचा सेन्सच दिसत नाही.
अँजेला मर्केलना १९९० साली हेल्मुट कोल यांनी राजकारणात आणलं. माझी मुलगी अशी त्यांची ओळख कोल करून देत असत. कोल यांना त्यांचं ऐकणारं एक माणूस राजकारणात हवं होतं.
कोल हडेलप्पी करत. मर्केलना ते आवडत नसे. पण त्या गप्प बसत. आपल्या अत्यंत निकटच्या व्यक्तिगत सहाय्यकाला त्या म्हणाल्या- कोल माणसाला कोपऱ्यात लोटतात आणि खतम करतात. मीही त्यांना एक दिवस कोपऱ्यात लोटणार आहे. मी वाट बघतेय त्या संधीची.
मर्केलनी कोल यांची चमचेगिरी केली नाही, स्तुतीस्तोत्रं गायली नाहीत. एका क्षणी कोल निवडणुक फंडाच्या घोटाळ्यात सापडले. मर्केलनी त्यांची पाठराखण केली नाही, त्यांनी सत्ता सोडावी असं मर्केलनी एका वर्तमानपत्रात लिहून टाकलं. कोलना सत्ता सोडावी लागली.
लोक कोलना घाबरत असत, त्यांचा पक्षावर फार दबाव असे. मर्केलनी तो दबाव झुगारून पक्षाला नवं वळण दिलं. ही गोष्ट पक्षाला आवडली, पक्षानं त्यांना पक्षाध्यक्षपद आणि चॅन्सेलरपद दिलं.
कोल भडकले. म्हणाले मर्केलला सत्तेची हाव आहे. म्हणाले मी माझा मारेकरी विकत घेतला, मी साप बाळगला.
१९९० मधे मर्केल पहिल्यांदा मंत्री झाल्या आणि २००५ मध्ये त्या चॅन्सेलर झाल्या.
२००५ पासून २०१७ पर्यंत अशा चार निवडणुका मर्केलनी सीडीयू (ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पार्टी) या पक्षातर्फे लढवल्या. सीएसयु (ख्रिश्चन सोशल पार्टी) या पक्षाशी त्यांची युती होती. या निवडणुकांत मर्केल यांना कधीही बहुमत मिळालं नाही. २००५ साली बहुमतासाठी ३०८ जागा हव्या होत्या. तेव्हां त्यांच्या पक्षाला २४८ जागा मिळाल्या. २००९ साली बहुमताला ३१२ जागा आवश्यक होत्या, मर्केलना २२६ मिळाल्या. २०१३ साली ३१६ जागा हव्या होत्या, त्यांना ३११ मिळाल्या. २०१७ साली ३५५ जागांची आवश्यकता होती, मर्केलना २१६ जागांवर समाधान मानावं लागतं.
बहुमत नसतांनाही त्या कायम चॅन्सेलर झाल्या यात त्यांचं कौशल्य दिसतं. त्या अशा भूमिका वेळोवेळी जनमताला जोखून लोक खुष होतील अश भूमिका घेत. विरोधकांची पंचाईत होत असे. विरोधी पक्षाचे पुढारी म्हणत की त्या अशा भूमिका घेत की आमचे मतदार मतदानाला बाहेरच पडत नसत.
समलिंगी व्यक्तीना लग्न करण्याचा अधिकार असू नये असं मर्केल यांचं मत होतं आणि आहे. त्या कंझर्वेटिव ख्रिश्चन आहेत. समलिंगी लग्नाला त्यांनी सतत जाहीरपणे विरोध केला. पण एक वेळ अशी आली की समलिंगींच्या अधिकाराची जाणीव जगातल्या अनेक देशाना झाली. समलिंगी लग्नाला मान्यता देणं हे पुरोगामित्वाचं लक्षण ठरलं. जगभरच्या देशांनी तसे कायदे करायला सुरवात केली.
मर्केलनी बदलतं वारं लक्षात घेतलं. जर्मन लोकसभेत समलिंगी लग्नाला संमती देण्याचा ठराव आणला. पण मतदान करतांना स्वतः ठरावाच्या विरोधात मत टाकलं. म्हणजे ठराव आणल्याचं श्रेय घेऊन मोकळ्या झाल्या पण आपलं मत मात्र बदललं नाही.
फुकुशिमा अपघात झाला. सुनामी झाली आणि अणूउर्जा प्रकल्पात पाणी शिरून तो प्रकल्प उध्वस्थ झाला. अणुसंसर्गानं माणसं मेली. हिरोशिमानंतर तितकाच भयानक प्रसंग. जगभर अणुच्या वापराबद्दल नाराजी उमटली.
मर्केलनी जर्मनीतले अणुऊर्जा प्लाँट्स बंद केले. जर्मनीची ऊर्जा गरज प्रामुख्यानं अणुऊर्जा भागवते. त्यामुळं अणुऊर्जा प्लांट बंद करणं म्हणजे उद्योगावर घाला होता. आणखी एक गोष्ट. उर्जेसाठी कोळसा वापरावा लागणार होता. कोळसा म्हणजे धूर, प्रदुषण. नवं संकट.
सारं जग प्रदूषणाबद्दल बोंबलत असताना अणूउर्जा प्रकल्प बंद करणं म्हणजे प्रदुषणाला आमंत्रण देणं होतं. पण मर्केल नेहमी प्राप्त परिस्थिती आणि लोकांचं मत महत्वाचं मानत असल्यानं त्यांनी अणूउर्जा प्लांट्स बंद करण्याचा निर्णय घेतला.
जनता खुष झाली. पुढचं पुढं पाहून घेऊ असा विचार मर्केलनी केला असावा.
लोकमताच्या विरोधातही त्या वागलेल्या दिसतात.
कोविडचं उदाहरण घ्या. जनता लस टोचायला तयार नव्हती. लॉकडाऊनला लोकांचा विरोध होता. हॉटेलं, थेटरं, प्रवास इत्यादी गोष्टी बंद करायला लोकांचा विरोध होता. मर्केल यांचा विशेष असा की या सर्व अप्रिय गोष्टी त्यानी लोकांच्या गळी उतरवल्या. हा विषय राज्यांच्या अखत्यारीत होता. मर्केल राज्याराज्यात गेल्या. तिथं स्थानिक सरकारांच्या बैठका घेतल्या. ही कामं पार पाडण्यासाठी अधिक पैसे देऊ केले. नुकसान झालं तर तेही भरून काढायची तयारी दाखवली. जनता तयार झाली.
ग्रीस, स्पेन, इटाली हे देश कोविड उपाययोजनेला विरोध करत होते, कारण त्यांच्याकडं पैसे नव्हते. मर्केल त्या देशात गेल्या. तिथल्या पंतप्रधानांशी बोलल्या. काय हवं ते मागा, पैसेही मागा, देते, पण कोविड हाताळा असं त्यानी सांगितलं. अगदी व्यक्तीगत पातळीवर त्या भेटत असल्यानं त्यांचा प्रभाव पडत असे.
भांडून उपयोगाचं नाही. विरोध करून उपयोगाचं नसतं. व्यवस्थेत दोष असतात ते दूर करावे लागतात, व्यवस्था ठीक असते, अंमलबजावणी करावी लागते हे मर्केल यांचं तत्व.
सीरियातून लाखो माणसं युरोपात पोचली. ग्रीस, इटाली, स्पेन इत्यादी देशांची आर्थिक स्थिती खराब होती. घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं, अशी त्यांची स्थिती होती. लाखो लोकांचं ओझं अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना घेता येणार नव्हतं. फक्त जर्मनीचीच स्थिती दहा लाख स्थलांतरितांना सामावून घेण्यासारखी होती.
मर्केलनी त्यांच्या पद्धतीनं वाट काढली. स्पेन इत्यादी देशाना सांगितलं की त्यांना पैसे दिले जातील. पण ऑस्ट्रिया, नेदरलँड, स्वीडन इत्यादी देशांचा पैसे वाटण्याला विरोध होता, इतर देशांची सुटका करण्यासाठी आम्ही कां पैसे खर्च करायचे असा त्यांचा सवाल होता.
मर्केलनी याही संकटातून वाट काढली. एक फंड तयार केला आणि त्या फंडांसाठी सरकारांकडून पैसे न घेता बाजारातून पैसे गोळा केले. त्यामुळं नेदरलँड इत्यादींना तक्रार करायला वाव राहिला नाही.
परिस्थिती जसजशी येईल तस तशा वाटा काढणं हे मर्केलचं तत्वं. त्यांचे विरोधक म्हणतात की मर्केल यांच्याकडं कोणतंही दूरगामी आर्थिक धोरण नाही, कोणतंच धोरण त्यांच्याजवळ नाही. त्या परिस्थितीचा अभ्यास करतात, जनमत काय आहे ते आजमावतात आणि वाट काढतात. एका परीनं या आरोपात तथ्थ्यही आहे. कारण मर्केल अर्थशास्त्रज्ञ किंवा राज्यशास्त्रज्ञ नाहीत. त्यांची पीएचडी क्वांटम केमेस्ट्री या विषयात आहे.
अर्थशास्त्रातली पदवी नसली तरी विज्ञान संशोधक असल्यानं विचार आणि कामाची रीत त्या संशोधन करताना शिकल्या आहेत. विश्लेषण करणं, घटकांची वर्तणुक तपासणं, कोणत्या शक्यता आहेत ते तपासणं आणि नंतरच निष्कर्षाला येणं ही विज्ञानातली प्रक्रिया मर्केल राजकारण करतात. एका परीनं ही पद्धत निर्विकार असते, त्यात भावनांचा संबंध नसतो.
मर्केल चार वेळा चॅन्सेलर राहिल्या. त्यांच्या कार्यकाळात जर्मनीचा आणि युरोपचा विकास झाला. त्या यशस्वी ठरल्या. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. त्यांनी हुशारीनं विरोधकांना निष्प्रभ केलं. स्पर्धा करणाऱ्या लोकांना त्यांनी हुशारीनं हरवलं आणि सत्ता हस्तगत केली.
मर्केल यांनी सत्ता मिळवली. त्यांनी सत्तेचा वापर देश आणि युरोपच्या हितासाठी केला.
कारकीर्दीच्या सुरवातीला त्या निष्पाप (mein madchen) मुलगी होत्या. सत्ता मिळवण्याच्या खटाटोपात त्या साप झाल्या. पण शेवटी निवृत्त होत असताना त्या अम्मा (Mutti)झाल्या.
राजकारण करणाऱ्यांना त्यांच्याकडून बरंच शिकण्यासारखं आहे.
निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.
COMMENTS