मुंबई सत्र न्यायालयाच्या सुट्टीतील विशेष न्यायालयाने मनी लाँड्रिंगप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई सत्र न्यायालयाच्या सुट्टीतील विशेष न्यायालयाने मनी लाँड्रिंगप्रकरणात जामीन नाकारून ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) देशमुख यांची चौकशी केल्यानंतर मध्यरात्रीनंतर त्यांना अटक केली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
“सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख हे केवळ संशयित असल्याचे पूर्वीपासून म्हटले होते. २९ ऑक्टोबरच्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीतही तसेच म्हटले होते. त्यानुसार ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. मग तीन दिवसांत ईडीला असे काय पुरावे मिळाले की त्यांना अटक करणे आवश्यक वाटले. देशमुख यांची प्रकृती ठीक नाही, त्यांना अनेक आजार आहेत. त्यामुळे ईडी कोठडी देण्यात येऊ नये”, असा युक्तिवाद देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी केला. मात्र न्यायालयाने देशमुख यांना कोठडी सुनावली.
अंमलबजावणी संचलनालयाच्या कोठडीत अनिल देशमुख यांची अंमलबजावणी संचलनालया(ईडी)कडून जेव्हा चौकशी होईल तेव्हा विशिष्ट अंतरावर त्यांच्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज देशमुख यांच्यातर्फे न्यायालयात देण्यात आला. तसेच त्यांना घरचे जेवण व औषधे पुरवण्यात यावेत, यासाठीही अर्ज सादर करण्यात आला. न्यायालयाने त्यांचे दोन्ही अर्ज मान्य करून त्याविषयी अंमलबजावणी संचलनालयाला निर्देश दिले.
अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाने पाच वेळा समन्स बजावले होते. मात्र ते अंमलबजावणी संचलनालयासमोर आले नव्हते. ते फरार झाल्याच्या बातम्या मध्यमांमध्ये येत होत्या. मात्र सोमवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या कार्यालयात पोहोचले. त्या वेळी त्यांच्याबरोबर त्यांचे वकीलही होते. दिवसभर अनिल देशमुख यांची सुमारे १३ तास चौकशी झाली. सायंकाळी साडेसात-आठच्या वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील काही अधिकारी अंमलबजावणी संचलनालयाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर रात्री उशिरा देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली आणि सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
COMMENTS