एनसीबीला “छाप्या”बाबत विचारले जावेत असे काही प्रश्न

एनसीबीला “छाप्या”बाबत विचारले जावेत असे काही प्रश्न

राजकीय विरोधक आणि मतभेद व्यक्त करणाऱ्यांवर संशयास्पद कारवाई करण्याचे मापदंड केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी यापूर्वीच प्रस्थापित केले आहेत हा मुद्दा लक्षा

वानखेडे यांची खाजगी फौज – मलिक
आरोपामुळे वानखेडेंचीच एनसीबीकडून चौकशी
कार्डेलिया क्रूझ प्रकरणी आर्यन खान व ५ जणांना क्लिन चीट

राजकीय विरोधक आणि मतभेद व्यक्त करणाऱ्यांवर संशयास्पद कारवाई करण्याचे मापदंड केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी यापूर्वीच प्रस्थापित केले आहेत हा मुद्दा लक्षात घेतला तरीही, अमलीपदार्थ नियंत्रण मंडळाने (एनसीबी) गेल्या आठवड्यात, अमली पदार्थ घेणाऱ्यांना पकडण्याच्या उद्देशाने एका क्रुझ शिपवर घातलेला ‘छापा’ हे अनेक संशयांत बरबटलेले एक प्रकरण आहे.

छापा घालणाऱ्या एनसीबी अधिकाऱ्यांनी या छाप्यात हाती लागलेला ऐवज मोठ्या अभिमानाने जाहीर केला आहे- आठ तरुण मुलगे व मुली, १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफड्रोन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या (एस्कट्सी) २२ गोळ्या. अर्थात ही बातमी राष्ट्रीय स्तरावर मथळ्याच्या जागी पोहोचली, कारण, ताब्यात घेतलेल्यांमध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा, समावेश होता.

लगेचच आर्यन खानला एका छद्मी हसणाऱ्या व्यक्तीसोबत दाखवणारा सेल्फी सर्वत्र फिरू लागला. हा सेल्फी आर्यनला अटक झाली त्या रात्री घेतला गेला होता हे स्पष्ट होते. सेल्फीत दिसणारा माणूस आपला अधिकारी नव्हता हे एनसीबीने ठामपणे सांगितले. या छाप्याच्या वेळी किरण गोसावी हे खासगी गुप्तहेर उपस्थित होते. एका व्हिडिओमध्ये गोसावी एका संशयिताला घेऊन जाताना दिसत आहेत. याचा अर्थ ते ‘स्वतंत्र साक्षीदार’ नव्हते. त्यांना सर्व छाप्यांच्या वेळी नेले जाते, असा दावा एनसीबीने केला.

गोसावी पालघरमधील एका फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी आहेत हे नंतर पुढे आले. पुणे पोलिसांनाही ते एका प्रकरणात हवे आहेत. दुसरे ‘साक्षीदार’ होते मनीष भानुशाली. भानुशाली तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आपण ‘इन्फॉर्मंट’ अर्थात खबऱ्याचे काम करतो असा त्यांचा दावा आहे. त्यानंतर आर्यनला या पार्टीचे निमंत्रण आणखी एका भाजप नेत्याशी संबंधित व्यक्तीनेच दिले होते, असा आरोपही करण्यात आला.

ही सगळी एखाद्या बनावाची लक्षणे वाटत आहेत. हे आर्यन खानला सापळ्यात अडकवून जनतेपुढे तमाशा मांडण्यासाठी केलेले स्टिंग ऑपरेशन भासत आहे. विशेषत: आर्यन खानजवळ कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत असे एनसीबीनेच कबूल केल्यामुळे ही शंका अधिक पक्की होत आहे. हा छापा कसा चुकीचा होता याचे तपशील देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. एका भाजप नेत्याचा नातेवाईक या जहाजावर उपस्थित होता आणि संशयितांना ताब्यात घेण्यापूर्वी त्याला तेथून निसटून जाऊ देण्यात आले हेही त्यांनी सांगितले.

आता या सगळ्या परिस्थितीत एक प्रश्न साहजिकच पुढे येतो- आर्यन खानच का? हा त्याच्या वडिलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे का? किंवा कदाचित मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या त्याप्रमाणे त्याचे आडनाव खान आहे म्हणून? हा विचार अनेकांनी व्यक्त केला आहे.

ही कारवाई तसेच त्यानंतर उभी राहिलेली जनतेचे लक्ष मोठ्या प्रमाणात वेधून घेणारी केस या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना झालेल्या घडामोडी आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पूर्ण शक्तीनिशी मुस्लिमांना विरोध सुरू केला आहे, दुही निर्माण करणाऱ्या मुद्दयांना जाणीवपूर्वक हात घातला जात आहे. योगी आदित्यनाथ यांना मुस्लिमांबद्दल किती द्वेष आहे हे त्यांनी कधीच लपवून ठेवलेले नाही. त्यांच्या हिंदुत्ववादी अनुयायांच्या भावनांना हात घालण्यासाठी हे प्रकरण योग्य वेळी उभे राहिले असावे.

बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा मुद्दा ज्या पद्धतीने उचलला गेला होता, त्याच्या आठवणी या प्रकरणामुळे जाग्या झाल्या आहेत. सुशांतसिंग राजपूतचे कुटुंबीय बिहारमध्ये असल्याने त्याच्या आत्महत्येला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न या काळात झाला होता. त्याची गर्लफ्रेण्ड व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी व ते सुशांतला पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अनेक आठवडे माध्यमांनी हे प्रकरण जोरदार लावून धरले पण रियाच्या विरोधात ठोस असे काहीच आढळले नाही. निवडणुकीत भाजपची कामगिरी वाईट झाली आणि हे प्रकरण टीव्हीच्या पडद्यांवरून गायब झाले.

धार्मिक मुद्दा ज्वलंत असलेल्या तसेच ध्रुवीकरणावर लढल्या जाणाऱ्या निवडणुकींमध्ये शाहरुख खानचे उपयुक्तता मूल्य स्वयंसिद्ध आहे. तो हिंदू स्त्रीशी लग्न करणारा मुस्लिम आहे, अर्थात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ‘लव्ह जिहादी’ आहे! तो पडद्यावर आणि वास्तव आयुष्यात पूर्णपणे सेक्युलर आहे. मात्र, त्याची मुस्लिम ओळख छोट्या छोट्या बाबींतून दाखवून देण्यास तो अजिबात कचरत नाही. उदाहरणार्थ, आदाब वगैरे तो आवर्जून करतो. योगी आदित्यनाथ यांनी एका शाहरुख खानची तुलना मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार हफीझ सईदशी केली होती. शाहरुख खान “भारताची प्रतिमा कलंकित” करत आहे असेही योगी म्हणाले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत कायमच वेगवेगळ्या पार्श्वभूमींतील लोक एकत्र येऊन काम करत राहिले आहेत. मुस्लिमधर्मीय बॉलिवूडचे अविभाज्य अंग राहिले आहेत. अनेक मुस्लिम लेखक, गीतकार, तंत्रज्ञ व अभिनेते बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासून होते आणि आजही आहेत. खानमंडळींनी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून पडद्यावर वर्चस्व गाजवले आहे आणि चित्रपटांच्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले आहे. शाहरुख खानच्या उत्कट प्रेमिकाच्या प्रतिमेमुळे त्याचे चाहते जगभरात आहेत. पारंपरिक एनआरआय बाजारपेठेच्या पलीकडे तो लोकप्रिय आहे. भारताच्या मोलाच्या सांस्कृतिक राजदूताला “देशाच्या प्रतिमेला कलंक” ठरवण्यातून योगी यांची वैचारिक दिवाळखोरी व सांप्रदायिक वृत्ती दिसून येते.

आर्यनवरील आरोपांबाबत बोलायचे तर एनसीबीला अद्याप आपली केस सिद्ध करायची आहे. आत्तापर्यंत न्यायलयांनी गरज भासेल तशी संशयितांची कोठडी वाढवून दिली आहे. तो मुद्दा वेगळा आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या छाप्याच्या वेळी राजकीय कार्यकर्ते व फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपी तेथे काय करत होते, याचे स्पष्टीकरण एनसीबीला द्यावे लागणार आहे. ते एनसीबीसाठी सोपे नसेल.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0