कार्डेलिया क्रूझ प्रकरणी आर्यन खान व ५ जणांना क्लिन चीट

कार्डेलिया क्रूझ प्रकरणी आर्यन खान व ५ जणांना क्लिन चीट

मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार शाह रुख खान याचा मुलगा आर्यन खान व त्याच्या अन्य ५ जणांवर अमली पदार्थाचे सेवन केलेले आरोप आम्ही मागे घेत असल्याचे नार्कोटिक्स

‘आर्यनने कट रचल्याचा एनसीबीकडे पुरावा नाही’
एनसीबीला “छाप्या”बाबत विचारले जावेत असे काही प्रश्न
ड्रग्ज प्रकरणे हाताळण्याचा एनसीबी ‘पॅटर्न’

मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार शाह रुख खान याचा मुलगा आर्यन खान व त्याच्या अन्य ५ जणांवर अमली पदार्थाचे सेवन केलेले आरोप आम्ही मागे घेत असल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शुक्रवारी न्यायालयाला सांगितले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आपल्या आरोपपत्रात आर्यन खान व त्याच्या अन्य ५ मित्रांची नावे वगळली आहेत. या सर्वांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा आम्हाला मिळालेला नाही असे नार्कोटिक्स ब्युरोने न्यायालयाला सांगितले. आर्यन खान याच्याव्यतिरिक्त अविन साहू, गोपाल जी आनंद, समीर सायगन, भास्कर रोडा व मानव सिंघल अशी ६ नावे आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कार्डेलिया ड्रग्ज प्रकरणात ६ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. यात एकूण १४ आरोपी आहेत. कार्डेलिया क्रूझवर आर्यन खान याने अंमली पदार्थाचे सेवन केल्याचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा दावा होता. हा दावा आता खुद्द नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सिद्ध करता आलेला नाही.

कार्डेलिया क्रूझवर आर्यन खान व त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी अमली पदार्थाचे सेवन वा बाळगल्याचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आरोप केला असला तरी प्रत्यक्ष कारवाई दरम्यान त्यांनी घटनेची व्हीडिओ चित्रण केलेले नव्हते. ब्युरोला आर्यन खानच्या मोबाइलमधूनही अमली पदार्थसंदर्भात कोणताही पुरावा मिळाला नाही. आर्यनची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नव्हती. या प्रकरणातील एक साक्षीदाराने जबानी फिरवली. आपल्याला कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या असे या साक्षीदाराने सांगितले. तर अन्य दोन साक्षीदारांनी एनसीबीची टीमच्या छाप्यादरम्यान आपण घटनास्थळी उपस्थित नव्हतो असे सांगितले. एनसीबीच्या ढिसाळ तपासामुळे आर्यन खानविरोधात खटला उभा राहू शकला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण महत्त्वाचे ठरले

आर्यन खान व अन्य दोन व्यक्ती अरबाज मर्चंट व मूनमून धमेचा यांनी कोणताही कट रचून अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. आर्यन खानच्या व्हॉट्स अप संभाषणात तसा काही आक्षेपार्हही मजकूर नाही. आणि तसे पुरावे एनसीबी सादर करू शकलेले नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण होते. हे निरीक्षण देत न्यायालयाने आर्यन खान व त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांना जामीन मंजूर केला होता.

मुंबई उच्च न्यायालयाचे हे निरीक्षण एकूणच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीच्या संशयास्पद कार्यपद्धतीवर बोट ठेवणारे ठरले.

न्यायालयाने जामीन आदेशात म्हटले होते की, आर्यन खान, अरबाज व मूनमून हे तिघे बेकायदा कृत्य करण्यासाठी एकत्र जमले होते, असा कोणताही ठोस पुरावा एनसीबीला सादर करता आलेला नाही. हे तिघे स्वतंत्र प्रवास करत होते, असे एनसीबीच्या तपासातून लक्षात येते. कटकारस्थान रचल्याचा एखादा सबळ पुरावा सादर करायला लागतो व तो एनसीबी सादर करू शकलेला नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

आर्यन खान, अरबाज व मूनमून हे क्रूझवर एकत्र प्रवास करत होते हा आधार त्यांनी कटकारस्थान रचले आहे, हे सिद्ध करू शकत नाही आणि एनसीबीने आरोप केले म्हणजे त्यावर आम्ही विश्वास ठेवावा हे आमच्यावर बंधनकारक नाही, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली होती.

नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

आर्यन खान प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी मुंबई क्रूझ पार्टी ड्रग प्रकरण हे बनावट असून त्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप केला होता. नवाब मलिक यांनी या प्रकरणाचे तपास करणारे समीर वानखेडे यांच्यावर अनेक पत्रकार परिषदा घेऊन आरोप केले होते. वानखेडे यांचे बनावट जात प्रमाणपत्र त्यांनी प्रसार माध्यमांसमोर उघड केले होते. आता एनसीबीने आर्यन खानला क्लिन चीट दिल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रियेसाठी एक ट्विट केले असून या ट्विटमध्ये एनसीबी आता वानखेडे, त्यांची टीम वा त्यांची प्रायव्हेट आर्मी यांच्याविरोधात काही कारवाई करणार का, की या गुन्हेगारांचा बचाव करणार असा सवाल केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0