अभिनेता मंगेश देसाई यांनी जागवल्या अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या आठवणी.
मी अकरावीत होतो. साधारण १९८९-९० च्या काळातली गोष्ट असेल. औरंगाबादला होतो. ‘रंगकर्मी’ नावाची एक संस्था होती. त्या अंतर्गत आम्ही एकांकिका स्पर्धा आयोजित करायचो. या संस्थेच्या पहिल्या एकांकिका स्पर्धेच्या वेळी आशालता वाबगावकर या उद्घाटनासाठी आल्या होत्या. राजू पाटोदकर नावाचे माझे पत्रकार मित्र होते. त्यांचे आणि आशालता वाबगावकर यांचे खूप चांगले संबंध होते. राजूभाऊ त्यांना मम्मी म्हणत असे. त्यामुळे आम्हीही त्यांना मम्मी म्हणू लागलो. आमच्या सर्वांच्याच त्या मम्मी झाल्या. त्यानंतर नकळतच आमचं एक वेगळं नातं तयार झालं. आमचं मुंबईत नेहमी येणं-जाणं व्हायचं. आम्ही भेटायचो, गप्पा मारायचो.
त्यांच्या सोबतची माझी सर्वांत जास्त आठवणीत असलेली गोष्ट म्हणजे मी साधारण १९९० साली साधारण बारावीत असताना ‘एक होतं स्वातंत्र्य’ नावाचं एक पथनाट्य केलं होतं. त्यात मला पुण्याच्या महापौर चषक या राज्यस्तरीय आणि गोव्यासह स्पर्धेचे आयोजित केलेल्या स्पर्धेत सर्वोत्तम अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं. त्याचा एक शो मम्मीसाठी ठेवला होता. पण त्या ठरलेल्या वेळेत येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आम्ही तो शो रद्द केला. मग रात्री जेवणाच्या वेळेला त्या म्हणाल्या की, मंगेश, मला हे नाटक बघायचं आहे. तू चांगलं काम केलंस हे मी ऐकलंय. त्यामुळे मला तो प्रयोग बघायचाच आहे. मी त्यातला माझा जो तुकडा होता तो त्यांना करून दाखवला. त्या म्हणाल्या की, तू खूप चांगला अभिनेता आहेस. जो अभिनेता प्रेक्षकांना रडवू आणि हसवू शकतो त्याच्यामध्ये खूप ताकद असते. तू मला रडवलं आहेस. हे खूप छान आहे.
माझी पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर मी मुंबईला यायचं ठरवलं. तेव्हा मी मम्मीला फोन केला, की मम्मी मला मुंबईला यायचंय.
त्यांनी विचारलं की, तू काय करणार मुंबईला येऊन बाळ?
मी म्हणालो की मला अभिनयात करियर करायचं आहे.
त्या म्हणाल्या की, तुला माहितीय ना की मुंबई समुद्र आहे?
मी म्हणालो- हो माहितीय.
त्यांनी सांगितलं- बघ मंगेश, तू ज्या शहरात राहतोस ते एक छोटं तळं आहे. तळ्यात छोटा मासादेखील मोठा असतो. मुंबई हा मोठा समुद्र आहे. या समुद्रात मोठ्या माशानेही स्वतःला सिद्ध करेपर्यंत त्याला किंमत नसते.
तरीही मी हट्ट करत होतो. तर त्यांनी माझा पत्ता मागितला. त्या पत्त्यावर आठ-दहा दिवसांनी मला त्यांनी एक सुंदर पत्र पाठवलं. तू नट कसा आहेस, माणूस कसा आहेस याबाबत त्यांनी लिहिलं होतं. तुझ्यासारख्या नटाने मुंबईला आलं पाहिजे. शेवटी त्यांनी लिहिलं होतं की एक लक्षात ठेव की हे जे फील्ड आहे ते ९९ टक्के नशिबावर अवलंबून आहे आणि १ टक्का टॅलेंटवर. तुझ्याकडे टॅलेंट आहे पण तुझ्याकडे नशीब आहे की नाही हे पाहावं लागेल आणि त्यासाठी तुला तुझं आयुष्य पणाला लावावं लागेल. असे अनेक नट आहेत जे इथे आले, प्रयत्न केला आणि परत घरी गेले. त्यात त्यांचं आर्थिक नुकसान झालं, महत्त्वाची वर्षं वाया गेली आणि वेळेचंही नुकसान झालं. त्यामुळे तू नीट विचार करून निर्णय घे.
मी त्यांना परत फोन केला आणि म्हटलं की, मला तुझं पटलंय, पण तुझी काय इच्छा आहे?
त्या म्हणाल्या की, माझी इच्छा आहे की तू यावंस. पण की तुझं कुटुंब आणि इतर गोष्टींचा सारासार विचार केला तर तू येऊ नयेस असं मला वाटतं.
मी म्हणालो की, मम्मी, तू मला लिहिलंयस की तू खूप टॅलेंटेड आहेस आणि ९९ टक्के नशीब या क्षेत्रात लागतं वगैरे. पण मला मी चांगला नट आहे की नाही हे सिद्ध करायचं असेल मला ९९ टक्के नशीब आहे की नाही हे आजमवावं लागेल. हे आजमवण्यासाठी मला मुंबईशिवाय पर्याय नाही. कारण तूच म्हणालीस की मुंबई मोठा समुद्र आहे आणि इथे मोठ्या माशालाही स्वतःला सिद्ध करावं लागतं. मी स्वतःला सिद्ध करेन आणि नशीब माझ्यासोबत असेल तर हे नक्कीच सिद्ध असू शकेल.
मग त्यांनी विचारलं की तुझी किती वर्षं राहायची तयारी आहे?
मी म्हणालो की किमान २ वर्षं तरी मी मुंबईला देईन.
त्या म्हणाल्या की, आपण इथेच चुकतो. मुंबईला तू दोन वर्षं देशील आणि मुंबई तुला मोठं करेल असं होत नाही. मुंबई हेच बघत असते की, तू किती देतो आहेस. त्याच्यावर ती ठरवते की याला किती द्यायचं आहे. तू नशीब आजमावायला येत असशील तर तुला माहितीय का की दोन वर्षांत तू मोठा होशील की नाही? तुला यायचंच असेल तर अशी तयारी करून ये की काहीही झालं तरी मी मुंबईतच जगेन आणि मुंबईतच मरेन. जोपर्यंत माझं ९९ टक्के नशीब सिद्ध होत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार.
मला आठवतं की मी औरंगाबादहून मुंबईला यायला निघालो तेव्हा मित्रांना सांगितलं होतं की दुनिया इकडची तिकडे झाली तरी मी इथे येणार नाही. त्यांनी मला सांगितलंय की माझ्याकडे टॅलेंट आहे. आता मला बघायचंय की माझ्याकडे नशीब आहे की नाही. त्यासाठी मी माझं आयुष्य पणाला लावणार.
ती गेली त्या दिवशी मला तिचं तेच पत्र आठवत होतं. ते पत्र मी जपून ठेवलं होतं. पण औरंगाबाद-मुंबईमध्ये स्थलांतराच्या दरम्यान ते गहाळ झालं.
त्या मला जवळ घेऊन म्हणायच्या, बाळा तू खूप चांगला कलाकार आहेस. पण आपण घरची परिस्थितीही बघितली पाहिजे. पण त्यांना म्हणायचो की मला नशीब आजमायचंच आहे. औरंगाबादला रंगकर्मी नावाच्या आमच्या ग्रुपमधल्या सात-आठ जणांची ती मम्मीच होती. मी मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडे राहायला घर नव्हतं. तेव्हा तिने मला सांगितलं होतं की माहीमला शितलादेवी मंदिराजवळ माझं घर आहे. तिथे तू कधीही ये आणि राहा. माझा सुनील अष्टेकर नावाचा एक मित्र आहे आणि गुरूही आहे. त्याच्यामुळे मी या क्षेत्रात आलो. तो मुंबईत आला तेव्हा तो तिच्याच घरी राहत होता. त्याचं खाणंपिणं हे सगळंच ती बघायची. ती अशी खूप प्रेमळ आणि लाघवी होती.
नंतरच्या काळात आम्ही संपर्कात होतो. अधूनमधून भेट व्हायची. मी माझ्या कामात अडकलो, ती कौटुंबिक गोष्टींमध्ये अडकली. पण आम्ही जिथे कुठे भेटायचो तेव्हा मम्मी आणि बाळ असाच आमचा संवाद व्हायचा.
त्या आजारी पडल्यावर मला खूप काळजी वाटत होती. राजू पाटोदकरांनाही फोन केला. पण वाटत होतं की अलकाताई (अलका कुबल) वगैरे सगळेच तिथे आहेत. पण कोरोना आणि त्यांचं वय बघता त्यांचा जीव वाचणं शक्य झालं नाही. मी प्रार्थना करतो की तिने ज्या पद्धतीने मला प्रोत्साहन दिलं होतं, मला इथे यायची हिंमत दिली होती तशीच हिंमत मलाही इतरांना देता यावी अशी शक्ती मला मिळावी.
त्यांच्या मृत्यूनंतर निर्माते नुकसानभरपाई देणार का, असे वाद निर्माण झाले आहेत. पण अलकाताईंनी ८२ वर्षांच्या या अभिनेत्रीला- चल मी तुझ्यासाठी रोल काढते असं म्हणून काम देणं खूप महत्त्वाचं होतं. हीच सर्वांत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट असते. त्यातून सेटवर इतक्या लोकांना कोरोना झाला हे निव्वळ दुर्दैव होतं. कोरोना हे ड्रायव्हिंगसारखं झालंय. इतरांचा आणि आपला जीव वाचावा यासाठी आपणच स्वतःची काळजी घेतली पाहिजे. निर्मात्यांचीही स्थिती सध्या इतकी काही चांगली नाही की ते नुकसानभरपाई देऊ शकतील. ते काम देत आहेत हेच आजच्या घडीला सर्वांत महत्त्वाचं आणि आवश्यक आहे.
शब्दांकनः कोमल कुंभार
COMMENTS